निकालपत्र तक्रार दाखल दिनांकः- 11/01/2011 तक्रार नोदणी दिनांकः- 13/01/2011 तक्रार निकाल दिनांकः- 04/05/2011 कालावधी 03 महिने 21 दिवस. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी अध्यक्ष - श्री.चंद्रकांत बी. पांढरपट्टे, B.Com.LL.B. सदस्या सदस्या सुजाता जोशी B.Sc.LL.B. सौ.अनिता ओस्तवाल M.Sc. दत्तात्रय पिता विष्णुपंत शिकारे. अर्जदार वय 40 वर्षे.धंदा. व्यवसाय. अड. जी.एच.दोडिया. रा.सेलू ता.सेलू जि.परभणी.
विरुध्द शाखा व्यवस्थापक. गैरअर्जदार. दि ओरियंटल इन्शुरंन्स कं.लि. अड. जी.व्ही.नरवाडे. दौलत बिल्डींग शिवाजी चौक.परभणी ता.जि.परभणी. ------------------------------------------------------------------------------------- कोरम - 1) श्री.सी.बी.पांढरपट्टे. अध्यक्ष. 2) सौ.सुजाता जोशी. सदस्या. 3) सौ.अनिता ओस्तवाल. सदस्या. ------------------------------------------------------------------------------------------------------- ( निकालपत्र पारित व्दारा श्री.सी.बी.पांढरपट्टे.अध्यक्ष. ) अपघातात डॅमेज झालेल्या इन्श्युअर्ड इंडिका कारची नुकसान भरपाई देण्याचे विमा कंपनीने बेकायदेशिररित्या नाकारले म्हणून प्रस्तुतची तक्रार आहे. तक्रार अर्जातील थोडक्यात हकीकत. अर्जदाराच्या मालकीची इंडिका कार रजि.नं. एम.एच. 21 सी.2038 चा गैरअर्जदार विमा कंपनीकडून विमा उतरविलेला होता.त्याचा पॉलिसी क्रमांक 182003/31/2010/1494 व पॉलिसीची मुदत 31/07/2009 ते 30/07/2010 अखेर होती.तारीख 26/10/2009 रोजी कारचालक बसमत येथून अर्जदाराचे खाजगी काम करुन गावी परत येत असतांना रात्री 11 वाजता समोरुन येणा-या वाहनाचे फोकस लाईट कारचालकाच्या डोळयावर चमकल्याने समोरुन येणारे वाहन कारला जोरात घासून गेले त्यामुळे इंडिका कारचे अपघातात सुमारे रु.2,00,000/- चे नुकसान झाले. अपघाताची नोंद नवा मोंढा पोलिस स्टेशन परभणी येथे अ.क्र.12/09 प्रमाणे करुन पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला.त्यानंतर अर्जदाराने लगेच गैरअर्जदारास वाहनाच्या नुकसानी बाबत माहिती दिली. व विमा कंपनीतर्फे सर्व्हेअर यांनी घटनास्थळी भेट देवुन नुकसानीचा सर्व्हे केला.त्यानंतर गॅरेज मधून अर्जदाराने कारची दुरुस्ती करुन घेतल्यावर विमा कंपनीकडे क्लेमफॉर्म व खर्चाची बिले व इतर आवश्यक ती सर्व कागदपत्रासह गैरअर्जदाराकडे सादर केली,परंतु एकवर्ष होवुन गेले तरी गैरअर्जदाराने मंजुरी बाबत काहीच कळवले नाही म्हणून वकिला मार्फत तारीख 06/12/2010 रोजी नोटीस पाठवली.नोटीस स्वीकारुनही गैरअर्जदाराने दाद दिली नाही.म्हणून ग्राहक मंचात प्रस्तुतची तक्रार दाखल करुन वाहनाची नुकसानी रु. 200,000/- 18 टक्के व्याजासह मिळावी अशी मागणी केली आहे. तक्रार अर्जाच्या पुष्टयर्थ अर्जदाराचे शपथपत्र ( नि.2) आणि पुराव्यातील कागदपत्रात नि.5 लगत 4 कागदपत्रे दाखल केली आहेत. तक्रार अर्जावर लेखी म्हणणे सादर करण्यासाठी गैरअर्जदाराना मंचातर्फे नोटीस पाठविल्यावर त्यांनी तारीख 20/04/2011 रोजी प्रकरणात लेखी जबाब ( नि.13) दाखल केला आहे. तक्रार अर्जातील अर्जदाराच्या कारच्या मालकी बाबतचा व विमा पॉलिसी बाबतचा मजकूर वगळता इतर सर्व विधाने गैरअर्जदाराने नाकारले आहेत.तसेच अपघात घटने संबंधीचा मजकूरही वैयक्तिक माहिती अभावी नाकारला आहे.अपघाताची माहिती अर्जदाराने दिल्याचा मजकूर व सर्व्हेअर तर्फे सर्व्हे केल्याचा मजकूर त्यांना मान्य आहे तसेच आवश्यक त्या कागदपत्रासह अर्जदाराने त्यांचेकडे विमा क्लेम केलेला होता ही बाबही त्यांनी नाकारलेली नाही. त्यांचे पुढे म्हणणे असे की, क्लेम मंजुरीसाठी वरिष्ठ कार्यालयाकडे क्लेमची कागदपत्रे पाठवले आहेत त्यांच्याकडून अद्यापी निर्णय कळालेला नाही.असे असतांना अर्जदाराने प्रस्तुतची केस दाखल केलेली असल्यामुळे ती अपरिपक्व असल्यामुळे फेटाळण्यात यावी.गैरअर्जदाराकडून कोणत्याही प्रकारे सेवात्रुटी झालेली नाही.विमा कंपनीतर्फे नुकसानीचे मुल्यांकन करण्यासाठी श्री परळीकर सर्व्हेअर यांची नेमणुक केलेली होती त्यांनी अर्जदाराने कंपनीकडे दाखल केलेल्या कारच्या दुरुस्तीच्या बिलांची छाननी केल्यावर रु.1,07,500/- एवढी नुकसान भरपाईचे मुल्यांकन केलेले आहे. अपघाता विषयी गैरअर्जदाराने सखोल चौकशी केल्यावर कार चालकाच्या निष्काळजीपणामुळेच अपघात झाल्याचे समजले अर्जदाराने क्लेमफॉर्म स्वतःच्या हस्तक्षरात भरुन दिलेला नव्हता किंवा त्याच्यावर सही केलेली नाही ते कृत्य नियमबाह्य आहे.अर्जदार वरील सर्व बाबी विचारात घेवुन खर्चासह तक्रार अर्ज फेटाळण्यात यावा. अशी शेवटी विनंती केलेली आहे. लेखी जबाबाच्या पुष्टयर्थ गैरअर्जदाराचे शपथपत्र (नि.14 ) दाखल केला आहे. व पुराव्यातील कागदपत्रात नि.16 लगत असेसमेंट रिपोर्ट, वगैरे 3 कागदपत्रे दाखल केली आहेत. तक्रार अर्जाच्या अंतिम सुनावणीच्या वेळी अर्जदारा तर्फे अड.जी.एच.दोडिया आणि गैरअर्जदारा तर्फे अड. नरवाडे यांनी युक्तिवाद केला. निर्णयासाठी उपस्थित होणारे मुद्दे. मुद्दे. उत्तर. 1 गैरअर्जदाराने अर्जदाराच्या कारची अपघातात झालेली नुकसान भरपाई आजपर्यंत मंजूर करण्याच्या बाबतीत सेवात्रुटी केली आहे काय ? होय. 3 अर्जदार नुकसान भरपाई मिळणेस पात्र आहे काय ? होय. असल्यास किती ? अंतिम आदेशा प्रमाणे. कारणे. मुद्दा क्रमांक 1 अर्जदाराच्या मालकीची इंडिकाकार रजि.नं.एम.एच. 21 / सी.2038 चा गैरअर्जदाराकडून विमा उतरविलेला होता ही अडमिटेड फॅक्ट आहे.तसेच पॉलिसीची मुदत 31/07/2009 ते 30/07/2010 असल्या संबंधीचा व पॉलिसी नंबर संबंधीचा तक्रार अर्जातील मजकूरही गैरअर्जदारांने नाकारलेला नाही.तारीख 26/10/2009 रोजी अर्जदाराच्या कारचा परभणी बसमत रोडवर रात्री 11 वाजता समोरुन येणारे वाहन निष्काळजीपणे कारला जोरात घासुन गेल्यामुळे अपघात होवुन कारचे नुकसान झाले होते.ती गोष्ट शाबीत करण्यासाठी अर्जदाराने पुराव्यात नवा मोंढा पोलिस स्टेशन अपघात र.क्रमांक 12/09 मधील तपास कामातील घटनास्थळ पंचनामा (नि.5/1) दाखल केला आहे.अपघाता नंतर अर्जदाराने गैरअर्जदारास घटनेची माहिती कळविली होती.त्यानंतर कंपनीतर्फे नेमलेल्या सर्व्हेअरने घटनास्थळी भेट देवुन नुकसानीचा सर्व्हे केला होता.अर्जदाराने त्यानंतर वाहनाची गॅरेज मध्ये दुरुस्ती करुन घेवुन दुरुस्तीची बिले व आवश्यक त्या सर्व कागदपत्रासह गैरअर्जदाराकडे नुकसान भरपाईचा क्लेमफॉर्म सादर केलेला होता.ही देखील अडमिटेड फॅक्ट आहे.अर्जदाराने क्लेमफॉर्म व कागदपत्रे सादर केल्यानंतर वास्तविक त्याची तातडीने दखल घेवुन नुकसान भरपाई मंजूर अथवा नामंजुरीचा निर्णय अर्जदारास कळवण्याची जबाबदारी असतांना देखील गैरअर्जदाराने त्यासंबंधी कसलाही निर्णय न कळवता गप्प राहिले.हा पहिला निष्काळजीपणा व सेवात्रुटी केल्याचे लक्षात येते.क्लेम मंजुरीचा निर्णय वर्ष होवुन गेले तरी गैरअर्जदाराने न कळवल्यामुळेच अर्जदाराला वकिला मार्फत तारीख 06/12/2010 रोजी गैरअर्जदारास रजि.नोटीस पाठवावी लागली होती. त्या नोटीसीची स्थळप्रत व पोष्टाच्या पावत्या पुराव्यात 5 लगत दाखल केल्या आहेत.गैरअर्जदारास नोटीस प्राप्त झाल्यानंतर तरी किमान अर्जदाराच्या क्लेम मंजुरी सबंधीचा निर्णय कळवणे काहीच हरकत नव्हती.परंतु त्याबाबतीतही दुर्लक्ष करुन दुस-यांदा सेवात्रुटी केल्याचे दिसते. लेखी जबाबात अर्जदाराची क्लेम फाईल वरिष्ठ कार्यालयाकडे मंजुरीसाठी गेली आहे त्यामुळे प्रलंबित असल्याचा बचाव घेतलेला असला तरी तो मुळीच ग्राह्य धरण्या जोगा नाही.लेखी जबाबामध्ये अर्जदाराने असेही मान्य केले आहे की, नुकसान भरपाई क्लेमचे मुल्यांकन करण्यासाठी त्यांनी नेमलेले श्री.परळीकर सर्व्हेअरने मुल्यांकन रु.1,07,500/- केल्याचे म्हंटलेले आहे.पुराव्यात युक्तिवादाच्या वेळी सदर असेसमेंट रिपोर्टची प्रत (नि.16/1) दाखल केलेली आहे.त्या मुल्यांकना प्रमाणे अर्जदार वरील रक्कम मिळणेस नक्कीच पात्र आहे.लेखी जबाबामध्ये अर्जदाराने क्लेमफॉर्म स्वतःच्या हस्तक्षारात भरलेला नाही त्यावर सही नाही ते नियमबाह्य कृत्य आहे म्हणून अर्जदार नुकसान भरपाई मिळणेस पात्र नाही असा बचाव विमा कंपनीतर्फे घेतलेला आहे तो निरर्थक आहे.नुकसान भरपाई मंजूर करण्याच्या कामी त्याची बाधा येण्याचा ही प्रश्न उदभवत नाही. गैरअर्जदारांनी जाणुन बुजून अर्जदाराचा क्लेम विनाकारण बराच काळ प्रलंबित ठेवुन अर्जदारास मानसिकत्रास देवुन त्याचे आर्थिक नुकसान केलेले आहे असे आमचे स्पष्ट मत आहे.मा.सर्वोच्च न्यायालयाने व मा.राष्ट्रीय आयोगाने अनेक प्रकरणात या संदर्भात असे मत व्यक्त केले आहे की, अपघात घटने नंतर विमा कंपनीकडे नुकसान भरपाई मंजुरीसाठी कागदपत्रे सुपूर्द केल्यानंतर विमा कंपनीने जास्तीत जास्त 4 महिन्याच्या आत क्लेम मंजुर/ नामंजुरीचा निर्णय घेंतला पाहिजे त्यापेक्षा उशीर केला तर क्लेमंटला त्यापुढील उशिराचे व्याज दिले पाहिजे.अर्जदाराच्या केसचीही ही परिस्थिती आहे. त्यामुळे 4 महिन्या पेक्षा जास्त काळ झालेल्या उशिरा बाबतचे 01 मार्च 2010 पासूनचे व्याज मिळणेस अर्जदार पात्र आहे.वरील सर्व बाबी विचारात घेवुन मुद्दा क्रमांक 1 व 2 चे उत्तर होकारार्थी देवुन आम्ही खालील प्रमाणे आदेश देत आहोंत. आदेश 1 तक्रार अर्ज अंशतः मंजूर करण्यात येत आहे. 2 गैरअर्जदाराने आदेश तारखे पासून 30 दिवसांच्या आत अर्जदारास कारची अपघातात झालेली नुकसान भरपाई रु.1,07,500/- तारीख 01/मार्च/2010पासून द.सा.द.शे. 9 टक्के दराने व्याजासह द्यावी. 3 पक्षकारांनी आपला खर्च आपण स्वतः सोसावा. 4 संबंधीतांना आदेशाच्या प्रती मोफत पुरवाव्यात. श्रीमती अनिता ओस्तवाल. सौ.सुजाता जोशी. श्री.सी.बी.पांढरपट्टे. सदस्या. सदस्या. अध्यक्ष.
| [HONABLE MRS. Sujata Joshi] Member[HONABLE MR. JUSTICE C. B. Pandharpatte] PRESIDENT[HONABLE MRS. Anita Ostwal] Member | |