( आदेश पारित द्वारा : श्रीमती जयश्री येंडे, मा.सदस्या)
आदेश
( पारित दिनांक : 15 नोव्हेबर, 2011 )
तक्रारदार ह्यांनी प्रस्तूत तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 12 अन्वये मंचासमक्ष दाखल केली आहे.
प्रस्तुत प्रकरणातील तक्रारदाराचे म्हणण्यानुसार तक्रारदार हा गैरअर्जदार क्रं.2 यांचेकडे लोडर या पदावर कार्यरत आहे. गैरअर्जदार क्रं.2 यांनी त्यांचे माईनमधे काम करणा-या कर्मचा-यांचे गैरअर्जदार क्रं.1 कडे जनता पर्सनल अॅक्सीडेंट ग्रुप पॉलीसी काढली होती.तक्रारदाराचे पॉलीसीचा क्रमांक 18148888 असा आहे. तक्रारदाराचे दिनांक 22/1/2008 रोजी अपघात होऊन त्यात त्याला 70टक्के अपंगत्व आले. सदर पॉलीसीप्रमाणे तक्रारदाराने गैरअर्जदाराकडे विमा रक्कमेची मागणी केली असता गैरअर्जदार यांनी ते दिले नाही अथवा तक्रारदाराचे नोटीसला उत्तरही दिले नाही.
तक्रारदाराजवळ मुळ विमा प्रमाणपत्र नसल्याने गैरअर्जदार क्रं.2 यांनी तक्रारादारास पॉलीसी रक्कम देण्यास तोंडी नकार दिला. वास्तविक गैरअर्जदार क्रं.1 यांनी मुळ पॉलीसी तक्रारदाराला दिली नव्हती. गैरअर्जदार यांची सदरील कृती सेवेतील कमतरता आहे. म्हणुन तक्रारदाराने ही तक्रार दाखल करुन पॉलीसीप्रमाणे रुपये 4,00,000/-, मानसिक व शारिरिक व आर्थिक नुकसानीपोटी रुपये 1,00,000/- रक्कम मिळावी अशी मागणी केली.
सदर प्रकरणात तक्रारदाराने तक्रार दाखल करण्यास झालेला विलंब माफ करण्याचा अर्ज दाखल केला होता. सदर अर्ज दिनांक 08/7/2011 रोजीचे आदेशान्वये मंजूर करण्यात आला व तक्रार ग्रा.स.का.1986 चे कलम 12 प्रमाणे नोंदविण्यात आली.
यात गैरअर्जदार क्रं.1 व 2 यांना नोंदणीकृत डाकेद्वारे नोटीस पाठविण्यात आली. नोटीस मिळुन गैरअर्जदार हजर झाले व आपला लेखी जवाब दाखल केला.
गैरअर्जदार क्रं.1 आपले जवाबात नमुद करतात की, डब्ल्युसीएल ने त्यांच्या वेगवेगळया कर्मचा-यांकरिता जनता पर्सनल अॅक्सीडेन्ट पॉलीसी काढली होती. पॉलीसीच्या अटी व शर्तीप्रमाणे पॉलीसीधारकाचा मृत्यु झाल्यास 5,00,000/- आणि अपंगत्वआल्यास रुपये 2,50,000/-, पॉलीसीच्या ठरावीक मुदतीकरिता व शर्तीप्रमाणे मिळणार होते. तक्रारदाराची कोणतीही नोटीस गैरअर्जदारास प्राप्त झालेली नाही. गैरअर्जदारास विमा दावा तसेच विमादाव्यासंबंधी तक्रारदाराकडुन कुठलेही कागदपत्रे प्राप्त झालेले नाहीत. तक्रारदाराने आवश्यक कागदपत्रे जमा केली नसल्यामुळे गैरअर्जदार क्रं.2 यांना कुठलीही संधी न देता तक्रारदाराने सदर तक्रार मंचापुढे दाखल केली. तक्रारदाराची इतर विधाने अमान्य केली व तक्रार खारीज करण्याची विनंती केली.
गैरअर्जदार क्रं.2 यांच्या कथनानुसार सदरची तक्रार ही वेळेच्या अगोदरच दाखल करण्यात आली आहे. तक्रारदाराने आपला दावा गैरअर्जदार क्रं.2 कडे कधीही दाखल केला नाही. त्यामुळे तो विमा कंपनीकडे पाठविण्यात आला नाही. तक्रारदारास अपंगत्व आल्यामुळे त्यांना लोडरच्या कामासाठी अपात्र असल्यामुळे त्यांना सोपे काम सरफेस वर 2009 पासुन देण्यात आले. गैरअर्जदार क्रं.2 मान्य करतात की, ज्या लोकांना पैसे भरुन विमा पॉलीसी प्राप्त झालेली नाही त्याच्या विमा पॉलीसी प्रतिवादी क्रं.2 ला पाठविण्यात यावी. तसे पत्र गैरअर्जदार क्रं.1 यांना देण्यात आले व त्यासोबत 352 कर्मचा-यांची यादी जोडण्यात आली. गैरअर्जदार नमुद करतात की तक्रारदाराने विमा दावा गैरअर्जदार क्रं.1कडे पाठविलेला नाही. तो प्रथमतः तक्रारदाराने दिनांक 2/8/2011 रोजी गैरअर्जदार क्रं.1 यांचेकडे सादर केला. त्यामुळे तो पुढील कार्यवाहीस्तव गैरअर्जदार क्रं.1 कडे पाठविण्यात येईल. त्यामुळे त्यांचे सेवेत कुठलीही कमतरता नाही.
तक्रारदाराने आपली तक्रार प्रतिज्ञालेखावर दाखल केली असुन, दस्तऐवज यादीनुसार 09 कागदपत्रे दाखल केलीत. लेखी युक्तिवाद दाखल केला. गैरअर्जदाराने आपला जवाब प्रतिज्ञालेखावर दाखल केला व कागदपत्रे दाखल केलीत. उभयपक्षकारांचा युक्तिवाद ऐकला.
-: का र ण मि मां सा :-
प्रस्तुत प्रकरणातील एकंदरीत वस्तुस्थिती व दस्तऐवज पाहता या मंचाचे असे लक्षात येते की तक्रारदाराने गैरअर्जदार यांचेकडे विमा पॉलीसी अंतर्गत दावा दाखल केला होता याबाबत कुठलेही दस्तऐवज दिसुन येत नाही. गैरअर्जदार क्रं.2 यांचे शपथपत्रावरील जवाबावरुन असे लक्षात येते की, तक्रारदाराने गैरअर्जदार क्रं.2 यांचेकडे दावा दिनांक 02/8/2011 रोजी दाखल केला म्हणजेच ही तक्रार दाखल केल्यानंतर दाखल केल्याचे दिसुन येते. तक्रार दिनांक 23/3/2011 रोजी दाखल करण्यात आली व त्यामुळे तक्रार दाखल करण्यास कोणतेही कारण उद्भवल्याचे दिसुन येते नाही. त्यामुळे सदर तक्रार या मंचात चालविता येणार नाही. गैरअर्जदाराने सदर विमा दाव्याबद्दल त्यांचे अटी व शर्तीनुसार योग्य तो निर्णय घ्यावा. तक्रारदारास सदर निर्णय मान्य नसल्यास तक्रारदार या मंचात तक्रार दाखल करु शकतो. सबब आदेश
// अं ति म आ दे श //-
1. वरिल निरिक्षणासह सदरची तक्रार निकाली काढण्यात येते.
खर्च ज्याचा त्याने सोसावा.