::: आ दे श :::
( पारित दिनांक : 28/10/2015 )
आदरणीय अध्यक्षा, सौ. एस. एम. ऊंटवाले, यांचे अनुसार : -
1. ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे, कलम : 12 अन्वये, सादर करण्यात आलेल्या, सदर तक्रार प्रकरणातील मजकूर, थोडक्यात आढळून येतो तो येणेप्रमाणे :-
दिनांक 09/03/2012 रोजी, तक्रारकर्ता क्र. 1 व त्यांची पत्नी हे मोटार सायकलवर मालेगाव अनसिंग रोडने जात असतांना, त्यांच्या गाडीला नागरदास फाटयाजवळ ट्रक क्र. एमएच-34-अेबी-2198 ने धडक दिली व त्या अपघातामध्ये तक्रारकर्त्याची पत्नी इंदुबाई प्रल्हाद आंधळे घटनास्थळी मरण पावली. त्या अपघाताबद्दलची खबर दिनांक 09/03/2012 रोजी पोलीस स्टेशन, मालेगांव येथे देण्यात आली व गुन्हा क्र. 35/2012 दाखल करण्यात आला.
तक्रारकर्त्याची पत्नी ही व्यवसायाने शेतकरी असल्यामुळे, तक्रारकर्त्याने शेतकरी जनता अपघात विमा योजनेचा लाभ मिळण्याकरिता तालुका कृषी अधिकारी, मालेगांव यांच्याकडे अर्ज केला होता. महाराष्ट्रातील शेतक-यांकरिता, महाराष्ट्र शासनाने शेतकरी अपघात विमा योजना लागू केली आहे. ही योजना दि. 15 ऑगष्ट 2011 ते 14 ऑगष्ट 2012 या कालावधी करिता होती. सदर योजनेचा हप्ता हा महाराष्ट्रातील सर्व शेतक-यांच्या वतीने, महाराष्ट्र शासन हे स्वत: भरत असतात. या योजनेनुसार शेतकरी मरण पावल्यास रुपये 1,00,000/- नुकसान भरपाई पोटी मिळत असतात. तक्रारकर्त्याच्या पत्नीच्या अपघाताचे काळात ही योजना चालू स्थितीत होती. त्यामुळे तक्रारदार या योजनेचे लाभार्थी आहेत. हया योजनेचा लाभ मिळण्याकरिता तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षाकडे रितसर अर्ज केला होता, परंतु कोणताही लाभ मिळालेला नाही.
विरुध्द पक्षांकडून विमा रक्कम मिळाली नाही. म्हणून, तक्रारकर्त्यांनी प्रस्तुत तक्रारअर्ज दाखल करुन, विमा रक्कम रुपये 1,00,000/- व त्यावर तक्रार दाखल केल्याच्या तारखेपासुन द.सा.द.शे. 18 % दराने व्याज ,तसेच शारीरिक, मानसिक, आर्थिक त्रासापोटी रुपये 10,000/- व तक्रार खर्च रुपये 5,000/- विरुध्द पक्षाकडून मिळावेत, या व्यतिरिक्त योग्य ती दाद द्यावी, अशी विनंती केली. तक्रारीचे पृष्ठयर्थ पुरावा म्हणून प्रतिज्ञापत्र केले व दस्तऐवज यादीप्रमाणे एकूण 12 कागदपत्रे दाखल केलीत.
2) विरुध्द पक्ष क्र. 1 चा लेखी जबाब :- विरुध्द पक्ष क्र. 1 – दि न्यु इंडिया एशुरंन्स कंपनीने त्यांचा लेखी जबाब )निशाणी 19) दाखल करुन, तक्रारकर्त्यांचे बहुतांश कथन नाकबूल केले व पुढे अधिकचे कथनामध्ये नमुद केले की, तक्रारकर्त्याने, विरुध्द पक्ष क्र. 1 कडे कुठलाही अर्ज दाखल केलेला नाही. तसेच सदरहू योजना ही दि. 15 ऑगष्ट 2011 ते 14 ऑगष्ट 2012 या नमुद कालावधी करिता होती. परंतु तक्रारकर्त्याने या योजनेचा लाभ मिळण्याकरिता विरुध्द पक्षाकडे प्रत्यक्ष अथवा विरुध्द पक्ष क्र. 1 व 2 यांच्यामार्फत सुध्दा कुठलाही प्रस्ताव अर्ज दाखल केलेला नाही. त्यामुळे तक्रार चालू शकत नाही. तसेच तक्रारकर्त्याने सदरहू तक्रार दिनांक 02/09/2014 रोजी दाखल केला असुन, मुदतीत नाही. तक्रारकर्त्याने स्वत:ची चुक लपविण्याकरिता वि. मंचामध्ये पोचपावती दाखल केली आहे, परंतु कुठलीही नोटीस, कुठलाही प्रस्ताव तसेच अर्ज सुध्दा विरुध्द पक्षाकडे दाखल केला नाही. तक्रारकर्त्याने विरुध्द पक्ष यांच्याकडे सुरुवातीला प्रस्ताव दाखल करायला पाहिजे होता, तो प्रस्ताव जर विरुध्द पक्ष यांनी नाकारला किंवा बंद केला तर त्यांच्याविरुध्द न्यायमंचाकडे दाद मागता येऊ शकते.
यावरुन त.क.ने हेतुपूरस्सरपणे विरुध्द पक्षाला त्रास देण्याचे उद्देशाने, बदनामी करण्याचे उद्देशाने खोटी व खोडसाळपणाची तक्रार दाखल केलेली आहे. विरुध्द पक्षाने सेवेत कोणतीही न्युनता दर्शविलेली नाही, अथवा अनुचित व्यापार प्रथेचा अवलंब केलेला नाही. म्हणून तक्रारदारांची तक्रार रुपये 50,000/- खर्चासह खारिज करण्यांत यावी.
3) विरुध्द पक्ष क्र. 2 चा लेखी जबाब :- विरुध्द पक्ष क्र. 2 - तालुका कृषी अधिकारी यांनी त्यांचा लेखी जबाब ( निशाणी-11) दाखल केला. त्यामध्ये नमुद केले की, तक्रारकर्ता प्रल्हाद निवृत्ती आंधळे रा. अनसिंग, ता. मालेगांव जि. वाशिम यांचा शेतकरी जनता अपघात विमा प्रस्ताव दिनांक 15/08/2011 ते 14/08/2012 या कालावधीत तालुका कृषी अधिकारी, मालेगांव या कार्यालयास प्राप्त झालेला नाही.
4) विरुध्द पक्ष क्र. 3 चा लेखी जबाब :- विरुध्द पक्ष क्र. 3 – जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांनी त्यांचा लेखी जबाब ( निशाणी-09) दाखल केला. त्यामध्ये नमुद केले की, शेती व्यवसाय करतांना होणारे अपघात, विज पडणे, पूर, सर्पदंश, विंचूदंश, विजेचा धक्का बसणे, इ. नैसर्गिक अपत्तीमुळे होणारे अपघात, रस्त्यावरील अपघात, वाहन अपघात तसेच अन्य कोणत्याही कारणामुळे होणा-या अपघाताकरिता शासनाने दिनांक 8/08/2011 रोजीच्या शासन निर्णयान्वये दि. 15/08/2011 ते 14/08/2012 या एक वर्षाच्या कालावधीसाठी, चालू ठेवण्यास मान्यता देण्यात आली होती.
सदर योजने अंतर्गत, अर्जदाराने विमा रक्कम मिळणेबाबतचा प्रस्ताव, 15/08/2011 ते 14/08/2012 या तारखेपर्यंत तालुका कृषी अधिकारी, मालेगांव यांचेमार्फत त्यांच्या कार्यालयास सादर करावयाचे होते. परंतु सदर अर्जदाराचा विमा रक्कम मिळणेबाबतचा कोणत्याही प्रकारचा प्रस्ताव तालुका कृषी अधिकारी, मालेगांव यांचे कार्यालयाकडून दि. 15/08/2011 ते 14/08/2012 या कालावधीत प्राप्त झालेला नाही.
5) का र णे व नि ष्क र्ष :::
या प्रकरणातील तक्रारकर्ते यांची तक्रार, दाखल केलेले सर्व दस्तऐवज, विरुध्द पक्ष क्र. 1, 2 व 3 यांचे स्वतंत्र लेखी जबाब, उभय पक्षांनी दाखल केलेला लेखी युक्तिवाद, यांचे काळजीपूर्वक अवलोकन करुन, खालील निष्कर्ष कारणे देवुन नमुद केला तो येणेप्रमाणे . . .
तक्रारकर्ते यांचा युक्तिवाद असा आहे की, तक्रारकर्ते क्र. 1 ची पत्नी इंदुबाई प्रल्हाद आंधळे या रोड अपघातात दिनांक 09/03/2012 रोजी मरण पावल्या, त्या शेतकरी होत्या व शासनाच्या जनता अपघात विमा योजनेच्या लाभार्थी असल्यामुळे तसेच ही योजना दिनांक 15/08/2011 ते 14/08/2012 या कालावधीत कार्यान्वित असल्यामुळे, या योजनेचा लाभ मिळण्यासाठी विरुध्द पक्ष क्र. 2 व 3 मार्फत अर्ज केला होता. परंतु विरुध्द पक्ष क्र. 1 यांनी सदर योजनेचा लाभ दिला नाही.
विरुध्द पक्ष क्र. 1 – दि न्यु इंडिया इंन्शुरन्स कंपनी यांचे असे म्हणणे आहे की, तक्रारकर्ते यांनी या योजनेचा लाभ मिळण्याकरिता कोणताही अर्ज दाखल केला नाही किंवा विरुध्द पक्ष क्र. 2 व 3 यांच्या मार्फत देखील प्रस्ताव अर्ज दाखल केला नाही. कोणतीही नोटीस पाठविली नाही. त्यामुळे तक्रारकर्त्याच्या दुर्लक्षितपणाला हे विरुध्द पक्ष जबाबदार राहणार नाही.
विरुध्द पक्ष क्र. 2 व 3 यांचे देखील म्हणणे विरुध्द पक्ष क्र.1 ला पुरक आहे.
मात्र तक्रारकर्त्याने विरुध्द पक्ष क्र. 1 ते 3 यांच्या जबाबानंतर काही दस्तऐवज रेकॉर्डवर दाखल केले. त्यातील दस्त जसे की, विरुध्द पक्ष क्र. 1 यांनी त.क. ला दिनांक 05/10/2012 रोजी असे पत्र पाठविले होते की, . . .
संदर्भ – अकोला/2012/2234 दिनांक 05/10/2012
प्रति,
श्रीमान प्रल्हाद निवृत्ती आंधळे,
रा. अनसिंग, ता. मालेगांव, जि. वाशिम.
विषय – शेतकरी अपघात विमा योजना सन 2011-12 ची रक्कम मिळणेबाबत आपला अर्ज.
संदर्भ – आपल्याव्दारा पाठविण्यात आलेल्या पत्राबाबत.
उपरोक्त विषयाच्या संदर्भात, आम्ही आपल्याला कळवू इच्छित आहे कि, ‘ शेतकरी अपघात विमा योजना सन 2011-12 ’ ही योजना आमच्या कंपनीव्दारा राबविण्यात आलेली नाही. बहुतेक हि शासनाची अन्य कुठलीतरी योजना असावी. म्हणून आम्ही आपल्याव्दारा पाठविण्यात आलेली सर्व कागदपत्र आपल्याला परत पाठवत आहे. आपण या योजनेबाबत योग्य माहिती तहसिल/जिल्हाधिकारी कार्यालय, कृषि अधिकारी किंवा कबाल इन्सुरन्स ब्रोकींग सर्व्हिसेस प्रा. लिमीटेड, अमरावती यांच्या कडून घेवून योग्य ठिकाणी विमा दावा मिळण्यासाठी करावे. तसेच जर या योजनेबाबत आमच्या कंपनीबाबत आपल्याकडे कोणती पॉलिसी आहे, ती पॉलिसी उपलब्ध करुन सर्व कागदपत्रासह दयावे.
आपला आभारी
सही/- अस्पष्ट
मंडळ प्रबंधक
तसेच दिनांक 06/10/2012 रोजी तहसिलदार, मालेगांव जि. वाशिम यांनी विरुध्द पक्ष क्र. 2 ला असे कळविले होते की, . . .
क्र.कक्ष/नै.आ./कावि-1162/2012
तहसिलदार, मालेगांव यांचे कार्यालय
दिनांक 06/10/2012
प्रति,
तालुका कृषी अधिकारी,
( मेहकर रोड ) मालेगांव
जि. वाशिम
विषय :- शेतकरी अपघात विमा योजना सन 2011-12 ची रक्कम मिळणेबाबत.
संदर्भ :- प्रल्हाद निवृत्ती आंधळे, रा. अनसिंग, ता. मालेगांव, जि. वाशिम यांचे अर्ज दिनांक 05/10/2012
संदर्भीय अर्जानुसार उपरोक्त विषयाबाबत आपणांस कळविण्यात येते की, अर्जदार प्रल्हाद निवृत्ती आंधळे, रा. अनसिंग, ता. मालेगांव यांच्या पत्नी नामे इंदूबाई प्रल्हाद आंधळे, वय 45 वर्षे असून त्यांचा दिनांक 9.3.2012 रोजी मोटार सायकलच्या धक्क्याने मृत्यू झाला. त्यांचा व्यवसाय शेतीअसल्यामुळे त्यांनी ‘‘शेतकरी अपघात विमा योजनेचा ’’ अर्ज पंजीबध्द डाकेने सादर केला आहे. परंतु शासन निर्णयानुसार सदर अर्ज आपले कार्यालयास उचीत कार्यवाहीस सादर करावयास पाहीजे होता.
तरी आपण त्यांचे अर्जावर नियमानुसार कार्यवाही करावी. व केलेल्या कार्यवाहीचा अहवाल या कार्यालयास व अर्जदारास अवगत करावे.
सहपत्र :- अर्जदाराचा अर्ज सही/- अस्पष्ट
7 X 12/ P.M. व मर्ग खबरी. तहसिलदार, मालेगांव
जि. वाशिम
इतकेच नव्हे तर कबाल इन्शुरन्स ब्रोकींग सर्व्हिसेस प्रा.लि. यांनी देखील दिनांक 05/10/2012 च्या पत्रान्वये तक्रारकर्ते क्र. 1 यांना त्यांच्या विमा दाव्याची कागदपत्रे विरुध्द पक्ष क्र. 2 च्या कार्यालयास सादर करा, म्हणत परत दिले होते. म्हणजे या योजनेतील सहभागी / जबाबदार सर्व कार्यालयाने तक्रारकर्ते यांचा विमा प्रस्ताव अर्ज कारणे दाखवुन परत पाठविला होता. मात्र सर्व विरुध्द पक्षांनी असा बचाव घेतला की, तक्रारकर्ते यांनी त्यांच्याकडे विमा प्रस्ताव अर्जच दाखल केलेला नाही. विरुध्द पक्ष क्र. 1 ते 3 यांनी कोणतीही शहानिशा न करता असे बेजबाबदारपणाचे कथन मंचात दाखल केले आहे. सदर प्रकरणात तक्रारकर्ते यांचा ग्राहक असण्याबद्दलचा आक्षेप विरुध्द पक्ष क्र. 1 ते 3 यांनी दाखल केला नाही तसेच तक्रारकर्ते यांनी दाखल केलेल्या दस्तांवरुन असाही बोध होतो की, मयत इंदुबाई प्रल्हाद आंधळे या रोड अपघातात दिनांक 09/03/2012 रोजी मरण पावल्या होत्या व त्या शेतकरी होत्या तसेच शेतकरी जनता अपघात विमा योजनेच्या नमुद कालावधीतील लाभार्थी होत्या. त्यामुळे विरुध्द पक्ष क्र. 1 ते 3 यांनी सेवेत न्युनता दर्शविली हे सिध्द झाल्यामुळे ते संयुक्तपणे वा वेगवेगळे तक्रारकर्ते यांना शेतकरी अपघात विमा योजनेनुसार रक्कम रुपये 1,00,000/- ( रुपये एक लाख ) सव्याज, ईतर नुकसान भरपाईसह व प्रकरण खर्चासह देण्यास बाध्य आहेत, या निष्कर्षाप्रत सदर मंच आले आहे.
सबब, अंतिम आदेश पारित केला तो पुढीलप्रमाणे.
- तक्रारकर्ते यांची तक्रार अंशतः मान्य करण्यांत येते.
- विरुध्द पक्ष क्र. 1 ते 3 यांनी संयुक्तपणे वा वेगवेगळे तक्रारकर्ते यांना मृत इंदुबाई प्रल्हाद आंधळे यांच्या शेतकरी अपघात विमा योजनेची रक्कम रुपये 1,00,000/- ( रुपये एक लाख ) दरसाल, दरशेकडा 8 टक्के व्याजदराने प्रकरण दाखल दिनांक 02/09/2014 पासुन तर प्रत्यक्ष रक्कम अदायगीपर्यंत व्याजासहीत द्यावी. तसेच शारीरिक, आर्थिक, मानसिक नुकसान भरपाई पोटी रक्कम रुपये 5,000/- ( रुपये पाच हजार फक्त ) व प्रकरणाचा न्यायिक खर्च रुपये 2,000/- ( रुपये दोन हजार फक्त ) द्यावा.
- विरुध्द पक्ष क्र. 1 ते 3 यांनी सदर आदेशाचे पालन 45 दिवसाचे आत करावे.
- उभय पक्षकारांना आदेशाची प्रत नि:शुल्क दयावी.
(श्रीमती जे.जी. खांडेभराड) (श्री. ए.सी.उकळकर) ( सौ. एस.एम. उंटवाले )
सदस्या. सदस्य. अध्यक्षा.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,वाशिम,(महाराष्ट्र).
SVGiri