निकालपत्र
तक्रार दाखल दिनांकः- 11/09/2013
तक्रार नोदणी दिनांकः- 25/09/2013
तक्रार निकाल दिनांकः- 07/02/2014
कालावधी 04 महिने. 13 दिवस.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी
अध्यक्ष श्री.पी.पी.निटूरकर.B.Com.LL.B.
सदस्या
सौ.अनिता ओस्तवाल. M.Sc.LLB.
---------------------------------------------------------------------------------------------------------
सौ.शेषिकला केशवराव चव्हाण. अर्जदार
वय 60 वर्षे. व्यवसाय. घरकाम. अॅड.जी.बी.भालेराव.
रा. शिवराम नगर,परभणी.
विरुध्द
शाखाधिकारी. गैरअर्जदार.
दि न्यु इंडिया एश्योरन्स कं.लि. अॅड.जी.एच.दोडीया.
यशोदिप बिल्डींग,शिवाजी रोड, परभणी.
______________________________________________________________________
कोरम - 1) श्री.पी.पी.निटूरकर. अध्यक्ष.
2) सौ.अनिता ओस्तवाल. सदस्या.
(निकालपत्र पारित व्दारा.श्री.पी.पी.निटुरकर.अध्यक्ष.)
गैरअर्जदार विमा कंपनीने अर्जदाराचा वाहनाचा अपघात विमादावा कमी मंजूर करुन अर्जदारास सेवेत त्रुटी दिल्या बद्दलची तक्रार आहे.
अर्जदाराची थोडक्यात तक्रार अशी आहे की, ती परभणी येथील रहिवाशी असून स्वतःसाठी व घरवापरासाठी तीने महिन्द्रा कंपनीची लोगन कार कर्जाव्दारे विकत घेतली होती, ज्या गाडीचा क्रमांक MH-22-S-9595 असा होता. सदरची कार ही गैरअर्जदार विमा कंपनीकडे विमाकृत केली होती. ज्याचा पॉलिसी क्रमांक 160902/31/12/01/00000608 अन्वये काढला होता.
अर्जदाराचे म्हणणे की, दिनांक 18/10/2012 रोजी अर्जदाराची सदर गाडीने त्याचा मुलगा परभणीहून नांदेडकडे जात असतांना व ब्रिजच्या जवळ अचानक त्याच्या गाडीसमोर गाय आलेने व तिला वाचविण्यासाठी अर्जंट ब्रेक मारलेमुळे सदर कारचे चेंबर फुटले व अर्जदाराच्या गाडीचे सदर अपघाता मध्ये प्रचंड नुकसान झाले. याबाबत अपघाताची माहिती विमानतळ पोलीस स्टेशन नांदेड येथे माहिती दिली व पोलीसांनी गुन्हा नं. 14/12 नोंदवुन घटनास्थळ पंचनामा केला.
अर्जदाराचे म्हणणे की, सदर गाडी दुरुस्तीसाठी गैरअर्जदाराच्या सांगण्याप्रमाणे रत्नप्रभा मोटार्स औरंगाबाद येथे नेण्यात आली. व गाडीची दुरुस्ती करण्यात आली, त्यावेळी गैरअर्जदाराने सांगीतले की, सुरवातीस अर्जदाराने गाडी दुरुस्तीचे पैसे भरावयाचे त्यानंतर त्यांना विमा कंपनीकडून देण्यात येईल.
अर्जदाराने गैरअर्जदाराच्या सांगण्यावर विश्वास ठेवुन तिच्या कार दुरुस्तीचे संपूर्ण बिल रु. 1,50,899/- नगदी स्वरुपात रत्नप्रभा मोटार्स औरंगाबाद यांचेकडे जमा केले, त्यानंतर आवश्यक त्या कागदपत्रासह गैरअर्जदार विमा कंपनीकडे विमादावा दाखल केला. त्यानंतर विमा कंपनीकडे अर्जदाराने विमादाव्या विषयी वेळोवेळी चौकशी केली असता दिनांक 17/01/2013 रोजी अर्जदाराचे बँक खाते नंबर विचारले त्यावेळेस तिला अशी माहिती मिळाली की, अर्जदाराचा विमादावा 62,000/- रु. विमा कंपनीने मंजूर केला आहे. व अर्जदारास धक्का बसला कारण कार दुरुस्तीसाठी 1,50,899/- रु. खर्च आले असतांना विमा कंपनीने केवळ 62,000/- रु. दिले. व सदरची रक्कम अर्जदाराने बळ जबरीने स्वीकारली व विमा कंपनीस विमा रक्कम कमी मिळाली म्हणून आक्षेप अर्ज दिनांक 11/02/2013 रोजी दिला, परंतु विमा कंपनीने त्याचे काहीही उत्तर दिले नाही, म्हणून सदरची तक्रार दाखल करणे भाग पडले व मंचास विनंती केली आहे की, सदरचा तक्रार अर्ज मंजूर करावा गैरअर्जदारांना आदेश द्यावा की, त्याने अर्जदाराची गाडी नं. MH-22-S-9595 च्या विमा दाव्यापोटी रु. 1,50,899/- मधून 62,000/- वजा जाता 88,899/- रु. अर्जदारास देण्याचा आदेश व्हावा व सदर रक्कमेवर गैरअर्जदारास दिनांक 17/01/2013 पासून पूर्ण रक्कमेवर 12 टक्के व्याजाने अर्जदारास देण्याचा आदेश व्हावा व तसेच मानसिक त्रासापोटी व तक्रार अर्ज खर्चापोटी रु. 10,000/- गैरअर्जदाराने अर्जदारास देण्याचा आदेश व्हावा.
तक्रार अर्जाच्या पुष्टयर्थ अर्जदाराने नि.क्रमांक 2 वर आपले शपथपत्र दाखल केले आहे.
अर्जदाराने पुराव्याबाबत नि.क्रमांक 4 वर 10 कागदपत्रे दाखल केले आहेत, ज्यामध्ये MH-22-S-9595 चे आर.टी.ओ.चे प्रमाणपत्र, पॉलिसीची प्रत, ड्रायव्हींग लायसेंन्स, अर्जदाराने दिलेला पोलीस स्टेशन मधील अर्ज, घटनास्थळ पंचनामा, रत्नप्रभा मोटार्स औरंगाबाद यांचे 1,50,899/- चे गाडी दुरुस्ती बिल, अर्जदाराने दाखल केलेल्या रक्कमेची पावती, अर्जदाराने विमा कंपनीस पत्राव्दारे त्याचे बँक खाते क्रमांक कळविल्याचे पत्र, अर्जदाराने गैरअर्जदार कंपनीला दिलेले पत्र, पोस्टाची पावती, कागदपत्रे दाखल केली आहेत.
तक्रार अर्जास लेखी निवेदन सादर करण्यासाठी मंचातर्फे गैरअर्जदारास नोटीसा काढण्यात आली, गैरअर्जदार वकिला मार्फत मंचासमोर हजर, व नि.क्रमांक 9 वर आपला लेखी जबाब सादर केला. त्यात त्यांचे असे म्हणणे आहे की, सदरची तक्रार ही खोटी व बनावटी आहे. विमा कंपनीने अर्जदारास कसल्याही प्रकारची सेवेत त्रुटी दिली नाही, म्हणून प्रस्तुत तक्रार ग्राहक संरक्षण कायदे अंतर्गत चालु शकत नाही व विद्यमान मंचास चालविण्याचा अधिकार नाही.
विमा कंपनीचे म्हणणे की, अर्जदाराने त्याच्या सदर गाडीच्या अपघाताची माहिती दिल्यानंतर विमा कंपनीने अधिकृत सर्व्हेअर नियुक्त केला ( L.R.Iyer ) व त्याने Final Survey Report तयार केला, व Bill Check Report तयार केले, त्यानंतर विमा कंपनीने सदर अहवाला बाबत अर्जदारास माहिती दिली व अहवाला प्रमाणे Matter Settle करा असे कळविले व अर्जदारास बँक खाते मागीतले असता त्याने विमा कंपनीस त्याचे बँक खाते कळविले व Surveyor Report प्रमाणे 60,599/- दिनांक 23/01/2013 रोजी विमा कंपनीने अर्जदारास त्याच्या बँक खात्याव्दारे दिले व सदर रक्कम अर्जदाराने स्विकारली व परत कायद्याप्रमाणे अर्जदारास प्रस्तुत तक्रार दाखल करणेचा अधिकार नाही, म्हणून मंचास विनंती केली की, सदरची तक्रार खर्चासह खारीज करण्यात यावी.
लेखी जबाबाच्या पुष्टयर्थ नि.क्रमांक 10 वर आपले शपथपत्र दाखल केले आहे.
विमा कंपनीने पुराव्याबाबत नि.क्रमांक 12 वर 6 कागदपत्रे दाखल केली आहेत, ज्यामध्ये Bill Check Report, Final Survey Report, Discharge Voucher ची प्रत, Bank Account No. Cheque given by Insurance Co. ची प्रती दाखल केले आहेत.
दोन्ही बाजुंच्या कैफियतीवरुन निर्णयास उपस्थित होणारे मुद्दे खालील प्रमाणे आहेत.
मुद्दे. उत्तर.
1 गैरअर्जदार विमा कंपनीने अर्जदाराची गाडी क्रमांक MH-22-S-9595
चा अपघात विमादावा कमी मंजूर करुन अर्जदारास सेवेत त्रुटी
दिली आहे काय ? नाही.
2 आदेश काय ? अंतिम आदेशा प्रमाणे.
कारणे.
मुद्दा क्रमांक 1.
अर्जदाराची गाडी क्रमांक MH-22-S-9595 गैरअर्जदार विमा कंपनीकडे विमाकृत केली होती व तिचा अपघात दिनांक 18/10/2012 रोजी झाला होता व सदरचा अपघात हा पॉलिसीच्या वैध कालावधीतच झाला होता ही बाब अॅडमिटेड फॅक्ट आहे.
फक्त वादाचा मुद्दा हा आहे की, अर्जदाराच्या गाडीचे अपघता मध्ये किती रु. चे नुकसान झाले. याबाबत अर्जदाराचे म्हणणे की, त्याच्या गाडीचे अपघाता मध्ये रु. 1,50,899/- चे नुकसान झाले होते हे म्हणणे मंचास योग्य वाटत नाही, कारण याबाबत अर्जदाराने कोणताही ठोस कागदोपत्री पुरावा मंचासमोर आणला नाही, याबाबत अर्जदाराने दाखल केलेल्या नि.क्रमांक 4/6 वरील कागदपत्राचे अवलोकन केले असता अर्जदाराने फक्त रत्नप्रभा मोटार्स औरंगाबाद यांचे पावती दाखल केले आहे, संबंधीताचे शपथपत्र अर्जदाराने मंचासमोर दाखल केले नाही, त्यामुळे अर्जदाराने दाखल केलेला पावती पुरावा ग्राहय धरता येणार नाही. याबाबत गैरअर्जदार विमा कंपनीचे म्हणणे की, अर्जदाराच्या गाडीचे अपघाता मध्ये रु. 57,000/- चे नुकसान झाले होते, ही बाब नि.क्रमांक 12/1 वरील बिलचेक रिपोर्ट वरुन सिध्द होते व गैरअर्जदार विमा कंपनीने अर्जदारास त्याच्या गाडीचा अपघात विमादाव्यापोटी रु. 60,599/- रु. दिले होते, ही बाब नि.क्रमांक 12/15 वर दाखल केलेल्या 23 जानेवारी 2013 रोजीच्या पेमेंट व्हाऊचर वरुन सिध्द होते. विमा कंपनीने सर्व्हेअर अहवाला प्रमाणे अर्जदारास रक्कम दिल्याचे दिसून येते. विमा कंपनीने अर्जदाराच्या गाडीचा अपघात नुकसान भरपाई देताना कमी रक्कम दिल्याचे कोठेही दिसून येत नाही, व अर्जदारास सेवेत त्रुटी दिल्याचे सिध्द होत नाही, असे मंचाचे ठाम मत आहे. म्हणून मुद्दा क्रमांक 1 चे नकारार्थी उत्तर देवुन मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1 अर्जदाराचा तक्रार अर्ज फेटाळण्यात येत आहे.
2 तक्रारीचा खर्च ज्याचा त्यांनी सोसावा.
3 आदेशाच्या प्रती पक्षकारांना मोफत पुरवाव्यात.
सौ.अनिता ओस्तवाल. श्री. पी.पी.निटूरकर
मा.सदस्या. मा.अध्यक्ष.