निकालपत्र
निकाल दिनांक – २७/०२/२०२०
(द्वारा मा.सदस्या : श्रीमती.चारु विनोद डोंगरे)
___________________________________________________________
१. तक्रारदार हे बाभूळवेढा, ता.नेवासा जि. अहमदनगर येथील रहिवासी आहे. तक्रारदाराचे ‘द अहमदनगर डिस्ट्रीक्ट सेंट्रल बॅंक शाखा उस्थळ दुमाला’ येथे ००२९४० या क्रमांकाचे बचत खाते आहे. त्यांनी घरगुती प्रवासासाठी व शेतीच्या कामाकरीता सामनेवाले टाटा मोटर्स फायनान्स कंपनीकडून इंडीगो इ.सी.एस. (एम.एच.१७ ए-झेड.१०५७) सदर वाहनासाठी कर्ज घेतलेले आहे. त्याकरीता तक्रारदार यांनी जोखीम म्हणुन एकूण २० चेक वर वर्णन केलेल्या त्यांचे खात्याचे सामनेवालेकडे जमा केलेले आहे. त्यानंतर सामनेवालेकडे एकूण १० चेक दिलेत, आजरोजीसाठी पुन्हा सामनेवालेकडे तक्रारदार यांनी त्यांचे सदरील खात्याचे १० चेक जमा केलेले आहेत. सदर गाडीचे हप्ते तक्रारदार यांनी कधीही थकवले नव्हते. असे असतांना सामनेवाले यांनी चेक नं.९७८३४ हा तक्रारदाराचे खात्यातुन वटला नाही त्यामुळे तक्रारदाराला रिटेनर चार्जेस व ओ.डी.सी. चार्जेस लागले. सदर हप्ता तक्रारदाराने रोख स्वरूपात भरला. तसेच १५ ऑक्टोबर २०१५ रोजीचा चेक तक्रारदाराचे खात्यात वटला नाही व ०३ डिसेंबर २०१५ रोजी सलग २ हप्ते तक्रारदाराच्या खात्यातून वर्ग झाले आहे. त्यानंतर देखील सामनेवाले यांच्याकडे चेक जमा असतांना परत चेक टाकलेले नाहीत. मात्र तक्रारदाराच्या खात्यात त्यावेळी पुरेशी रक्कम शिल्लक असतानासुध्दा सदरचे चेक सामनेवाले यांनी विणाकारण वेळेत जमा केले नाहीत. याबाबत सामनेवाले यांनी तक्रारदारास काहीही माहिती सांगितली नाही. सामनेवाले यांनी सदरचे चेक उशीरा पाठवून जादा चार्जेस वसूल करण्याच्या हेतुन विणाकारण चेक टाकण्यास उशीर केला. तरी सदर प्रकारच्या चार्जेसला तक्रारदार जबाबदार नाहीत. याबाबत तक्रारदार यांनी सामनेवालेकडे अर्ज देखील केले व वारंवार चकरा मारून मोठा भुर्दंड सोसला आहे. तक्रारदाराच्या शेती व्यवसायाच्या दृष्टीकोणातुन कर्ज पत टिकवून ठेवणे अतिशय महत्वाचे आहे. परंतु सामनेवाले कंपनीने सेवा बरोबर न दिल्याने तक्रारदाराचे व्यवसाय व दैनंदीन जिवनात लाखो रूपयांचे नुकसान झालेले आहे. याबाबत सामनेवाले यांना वकिलामार्फत दिनांक १७-०३-२०१७ रोजी रितसर कायेशीर नोटीस पाठविलेली आहे. परंतु सदर नोटीसीची सामनेवाले यांनी दखल घेतली नाही. त्यामुळे तक्रारदारास तक्रार दाखल करण्याचे कारण घडले आहे.
तक्रारदार यांनी अशी विनंती केली आहे की, तक्रारदारास त्यांचे खात्यात रक्कम रूपये २,००,०००/- नुकसान भरपाई म्हणुन जमा करण्यात यावे, सि.बिल मधील पत चांगली निर्माण करून संपुर्ण नुकसान भरपाई देण्यात यावी व तक्रार अर्जाचा खर्च देण्यात यावा.
२. तक्रारदार यांनी तक्रारीचे पुष्ट्यर्थ निशाणी ६ वर दस्तऐवज यादीसोबत एकूण ४ कागदपत्रांच्या छायांकीत प्रती दाखल केलेल्या आहेत. त्यामध्ये दिनांक १७-०३-२०१७ रोजी टाटा मोटर्स फायनान्स लि. यांना पाठविलेली नोटीस, तक्रारदाराचे खाते क्रमांक २९४० चा खाते उतारा, टाटा मोटार्स फायनान्स लि. यांची दिनांक ०३-०३-२०१७ रोजीचे तक्रारदार यांचे नावाचा उतारा, सामनेवाले यांना तक्रारदार यांनी पाठविलेल्या नोटीसचे पोहच पावतीची मुळप्रत दाखल आहे. नि.१३ वर तक्रारदारतर्फे सरतपासणीचे प्रतिज्ञापत्र व नि.१८ वर लेखी युक्तिवाद दाखल केला आहे. निशाणी १९ सोबत दि.२८-०२-२०१४ ते २८-०२-२०१८ पर्यंत तक्रारदार यांनी भरलेल्या कर्जाच्या हप्त्यांचा उतारा व तक्रारदार यांनी रोख भरलेल्या हप्त्यांची टाटा मोटर्स यांचेकडील रिसीट दाखल केली आहे.
३. सामनेवाले यांनी त्यांची लेखी कैफीयत निशाणी १२ वर प्रकरणात दाखल केली आहे. तक्रारदाराने तक्रारीत केलेले कथन खोटे व दिशाभूल करणारे आहे. तक्रारदाराने नियमती कर्जाची रक्कम न भरल्याने सामनेवालेने नोटीस पाठविली, त्यावर तक्रारदाराने काहीही उत्तर दिले नाही. रोख स्वरूपात रक्कम दिली नाही, असे कथन केले. त्यानंतर हे प्रकरण Arbitration मध्ये चालले. Arbitration च्या एकाही तारखेला तक्रारदार हजर नव्हता. त्यामुळे तक्रारदाराचे विरूध्द Arbitrator यांनी दिनांक २४-०७-२०१७ रोजी ex-party order केलेली आहे. तक्रारदाराचे विरूध्द आदेश झाल्याकारणाने त्याने मुद्दाम सामनेवाले यांना दिशाभूल करण्यासाठी सदर मंचात खोटी तक्रार घेऊन आला आहे. तक्रारदाराने दिवाणी न्यायालयात जावे. सबब तक्रारदाराची तक्रार खारीज करण्यात यावी अशी विनंती सामनेवाले यांनी केली आहे.
सामनेवाले यांनी कैफीयतीसोबत Arbitrator यांचे आदेशाची छायांकीत प्रत दाखल केली आहे. तसेच कर्ज करारनाम्याची प्रत, कर्ज खाते उता-याची प्रत इत्यादी कागदपत्रे दाखल केलेली आहे. तसेच निशाणी २२ वर पुराव्याचे शपथपत्र दाखल केले आहे.
४. तक्रारदार यांनी दाखल केलेले कागदपत्र, शपथपत्र व त्यांचे वकील श्री.जे.आर. नजन यांनी दाखल केलेला युक्तिवाद तसेच सामनेवाले यांनी दाखल केलेले कागदपत्र, शपथपत्र, त्यांचे वकील सौ.गिरीजा डी. गांधी यांनी केलेला युक्तिवाद यावरून न्यायनिर्णयासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात व त्यांचे उत्तर आम्ही सकारण खालील विवेचनाप्रमाणे देत आहोत.
अ.नं. | मुद्दे | निष्कर्ष |
(१) | तक्ररादार हे सामनेवाले यांचे ग्राहक आहेत काय ? | होय |
(२) | सामनेवाले यांनी तक्रारदार यांना सेवेत त्रुटी दिली आहे काय ? | नाही |
(३) | तक्रारदार नुकसान भरपाईची रक्कम मिळणेस पात्र आहे काय ? | नाही |
(४) | आदेश काय | अंतिम आदेशा प्रमाणे |
कारणमिमांसा
५. मुद्दा क्र. (१) : तक्रारदार यांनी घरगुती प्रवासासाठी व शेतीच्या कामाकरीता सामानेवाले टाटा मोटर्स फायनान्स कंपनीकडून इंडीगो इ.सी.एस. (एम.एच.१७ ए-झेड.१०५७) या वाहनासाठी कर्ज घेतले होते, असे कथन केले व सामनेवाले यांनीसुध्दा तक्रारदाराने कर्ज प्रकरण केल्याची बाब मान्य केली आहे. यावरून तक्रारदार हे सामनेवाले यांचे ग्राहक आहे, ही बाब सिध्द होते. सबब मुददा क्र.१ चे उत्तर होकारार्थी देण्यात येत आहे.
६. मुद्दा क्र. (२ व ३) - तक्रारदार यांनी सामनेवाले यांच्याकडुन वाहनासाठी कर्ज घेतले होते व त्यासाठी जोखीम म्हणुन २० चेक सामनेवाले यांच्याकडे जमा केले होते, असे कथन केल. परंतु तक्रारदाराने सदरच्या वाहनासाठी किती रक्कम रूपयाचे कर्ज घेतले याबाबत कथन केले नाही. तसेच हप्ता काय ठरविण्यात आला होता, हेसुध्दा प्रकरणात नमुद नाही. तक्रारदार यांनी परिच्छेद क्रमांक २ मध्ये असे कथन केले की, चेक नं. ९७८३४ हा सामनेवाले यांनी त्यांच्या हजगर्जीपणामुळे सदरचा चेक जमा केला नाही. त्यामुळे तक्रारदाराला विनाकारण रिटेनर चार्जेस व ओ.डी.सी. चार्जेस भरावे लागले. तक्रारदाराने पुढे कथन केले की, त्याची ‘दि अहमदनगर डिस्ट्रीक्ट सेंट्रल बॅंक शाखा उस्थळ दुमाला’ येथे खाते होते व त्यामध्ये रक्कम शिल्लक होती. परंतु सामनेवाले यांनी चेक लावला नाही. त्यामुळे तक्रारदाराला जादाचे चार्जेस भरावे लागले. परंतु तक्रारदाराने सामनेवालेला चेक दिल्याचा पुरावा दाखल नाही. तसेच सामनेवाले यांनी त्यांच्या लेखी कैफीयतीमध्ये बचाव घेतला की, तक्रारदाराचेविरूध्द आर्बीट्रेटरकडे आर्बीट्रेशन प्रोसिडींग चालू होते व तिचा निकाल दिनांक २४-०१-२०१७ रोजी झालेला आहे व तक्रारदाराने तक्रार दिनांक ०५-०४-२०१७ रोजी दाखल केली आहे. त्यामुळे सदरचे मंचासमक्ष तक्रार चालु शकत नाही. तक्रारदाराने खोटी तक्रार दाखल केलेली आहे. ही बाब स्पष्ट करणेसाठी सामनेवाले यांनी प्रकरणात आर्बीट्रेटरचे अॅवार्ड दाखल केलेला आहे. सदर अॅवार्ड सन २०१७ रोजी झालेला आहे. ही बाब दाखल कागदपत्रांवरून स्पष्ट झाली आहे व सदरची तक्रार तक्रारदाराने दिनांक ०५-०४-२०१७ रोजी दाखल केली. सदरचे तक्रारीमध्ये आर्बीट्रेशन अॅवार्ड पास झाल्यामुळे तक्रारदाराने याबाबत अपिल किंवा दरखास्त दिवाणी न्यायालयात दाखल करणे गरजेचे होते. या मंचासमक्ष सदरची तक्रार चालविता येणार नाही, असे मंचाचे मत आहे व तक्रारदाराने त्याचे बॅंकेकडचा खाते उतारा दाखल केलेला आहे. यावरून तक्रारदाराने सामनेवालेकडे किती रक्कम कर्जापोटी भरली व किती शिल्लक आहे, ही बाब स्पष्ट झाली नाही. कारण कर्ज किती रकमेचे घेतले ही बाब तक्रारीत नमुद नाही. त्यामुळे जे चेक दिले होते ते कोरे चेक दिले यासंबंधी मंचात कागदोपत्री पुरावा दाखल केला नाही. तसेच तक्रारदाराने मागणी केली आहे की, सिबील मधील पत चांगली निर्माण करून संपुर्ण नुकसान भरपाई देण्यात यावी, तसेच तक्रार अर्जाचा खर्च देण्यात यावा. सदर मागणी मान्य करता येणार नाही. तसेच सामनेवालेकडुन किती कर्ज घेतले, कर्जाचे किती हप्ते होते व किती कर्जाची रक्कम भरली होती यासंबंधी कोणतेही कागदपत्र नाही व तक्रारीत तपशील नाही. त्यामुळे सदरची बाब मंचासमक्ष स्पष्ट झालेली नाही. सामनेवाले यांनी आर्बीट्रेशन अॅवार्डची प्रत दाखल केली आहे. यावरून ही बाब स्पष्ट झाली आहे की, तक्रारदाराने तक्रार दाखल करण्यापुर्वीच आर्बीट्रेशन अॅवार्ड पास झाला आहे. त्यामुळे तक्रारदाराने त्या अॅवार्डविरूध्द योग्य त्या न्यायालयात दाद मागणे गरजेचे होते. या मंचासमक्ष हा मुद्दा उपस्थित करता येणार नाही. सामनेवाले यांनी तक्रारदाराप्रती सेवेत कोणतीही त्रुटी दिलेली नाही. त्यामुळे तक्रारदार नुकसान भरपाई मिळणेस पात्र ठरत नाही, या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. म्हणुन मुद्दा क्रमांक २ व ३ चे उत्तर नकारार्थी देण्यात येत आहे.
७. मुद्दा क्र. (४) : मुद्दा क्र.१, २ व ३ चे विवेचनावरून खालीलप्रमाणे आदेश पारीत करण्यात येत आहे.
आदेश
१. तक्रारदाराची तक्रार खारीज करण्यात येत आहे. |
२. उभय पक्षकार यांनी तक्रारीचा खर्च स्वतः सहन करावा. |
३. या आदेशाची प्रथम प्रत उभय पक्षकार यांना नि:शुल्क देण्यात यावी |
४. तक्रारकर्ता यांना या प्रकरणाची ‘’ब’’ व ‘’क’’ फाईल परत करावी. |