(आदेश पारीत द्वारा- श्री.विजयसिंह ना. राणे, मा.अध्यक्ष) -/// आ दे श ///- (पारीत दिनांक – 05 मार्च, 2011) तक्रारदारांनी प्रस्तूत तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 12 अन्वये मंचासमक्ष दाखल केलेली आहे. यातील तक्रारदारांची गैरअर्जदार बँकेविरुध्द थोडक्यात तक्रार अशी आहे की, त्यांची पुर्नगुंतवणूकीची दोन खाती गैरअर्जदार बँकेकडे आहेत. गैरअर्जदार बँकेने सदर खात्याची पुर्नगुंतवणूक करताना तक्रारकर्ती नं.2 यांचेवर टिडीएसची कारवाई करुन दोन्ही खात्याची मिळून रुपये 2,167/- एवढी रक्कम कपात केली. पुढे त्यांना याबाबतची प्रमाणपत्रे दिली, मात्र रुपये 10,000/- पेक्षा जास्त व्याज मिळत नसताना अशी रक्कम कपात करता येत नाही. यासंबंधी तक्रारदारांनी बँकेकडे संपर्क केला आणि आपली नुकसानीची मागणी केली, मात्र गैरअर्जदार बँकेने त्यांना योग्य ती मदत केली नाही. त्यांचे पुढे असेही म्हणणे आहे की, गैरअर्जदार बँकेने तक्रारकर्ती नं.2 यांना निष्कारण पॅन कॉर्ड काढावयास लावले आणि यासाठी त्यांना मानसिक त्रास सहन करावा लागला आणि त्यामुळे उपचाराचा खर्च सोसावा लागला. पुढे तक्रारकर्त्यांनी यासंबंधात बँकेला नोटीस दिली असता त्यांनी त्यांची चूक झाल्याचे मान्य केले व चूक दुरुस्त करुन नुकसान भरपाई देण्याचे सुध्दा कबूल केले, मात्र पुढे तक्रारकर्त्याने बँकेकडे त्यांचेच सांगण्याप्रमाणे पुन्हा संपर्क केला असता नुकसान भरपाई देण्यास असमर्थता दर्शविली आणि त्यांच्या मुदत ठेवी वेळेपूर्वीच काढुन घेण्यास सांगीतले. अशाप्रकारे गैरअर्जदार बँकेने आपल्या सेवेत त्रुटी ठेवली. यास्तव तक्रारकर्त्यांनी ही तक्रार मंचासमक्ष दाखल करुन तीद्वारे रुपये 35,832/- एवढी नुकसानीची मिळावी, ज्यात गैरअर्जदाराचे गैरव्यवहारामुळे तक्रारकर्त्यांस टिडीएसचे रुपये 2,167/- चे नुकसान सोसावे लागले, समाविष्ट आहेत, अशी मागणी केली आहे. यात गैरअर्जदार यांना मंचाद्वारे नोटीस बजाविण्यात आली, त्यावरुन हजर होऊन त्यांनी आपला लेखी जबाब मंचासमक्ष दाखल केला आहे. गैरअर्जदार यांनी तक्रारकर्ते त्यांचे खातेदार असल्याचे मान्य केले, मात्र ते त्यांचे ग्राहक नाहीत असा उजर घेतला. तक्रारकर्त्यांची इतर सर्व विपरीत विधाने नाकबूल केली. पुढे त्यांनी असाही उजर घेतला की, गैरअर्जदार बँकेत तक्रारकर्त्यांची दोन खाती आहेत. पुढे दिनांक 3/7/2007 रोजी गैरअर्जदार बँक कोअर बँकीग या प्रकारात वळविण्यात आली व त्यांचे संगणकात नोंद घेण्यात आली. सदरची नोंद करतांना दोन्ही संयुक्त खात्यांमध्ये पाहिले नांव अनावधानाने तक्रारकर्ती नं.2 यांचेच नोंदल्या गेले. आणि ही चूक त्यांचेकडून अनावधानाने झालेली आहे. आता ही चूक दुरुस्त करता येऊ शकत नाही व यावर उपाय म्हणुन उपरोक्त दोन्ही खाते बद करुन पुन्हा नव्याने उघडण्यात यावे. सदर दोन्ही खाते तक्रारकर्त्या नं.2 यांचेच नावाने असल्यामुळे दोन्हीचे एकूण व्याज 10,000/- पेक्षा जास्त झाल्याने संगणकाद्वारे टिडीएसची रक्कम कपात करण्यात आली. तक्रारकर्त्यांना सर्व सेवा देण्यास गैरअर्जदार तत्पर होते आणि त्यांना याबाबत मदत करण्यासही तयार होते, मात्र तक्रारकर्त्यांनी ही चूकीची तक्रार निष्कारण मंचासमक्ष दाखल केलेली आहे म्हणुन ती खारीज करण्यात यावी असा उजर घेतला. तक्रारकर्त्यांनी आपली तक्रार प्रतिज्ञालेखावर दाखल केलेली असून, सोबत ठेवीची प्रमाणपत्रे, करसल्ला व पॅनकॉर्ड साठी वकीलाना दिलेल्या रकमेची पावती, नोटीस, पोचपावती, इतर पत्रव्यवहार, वैधकिय प्रमाणपत्र इत्यादी दस्तऐवज दाखल केले आहेत. गैरअर्जदाराने फॉर्म नं.26 एएस चे दस्तऐवज मंचासमक्ष दाखल केले आहेत. सदर प्रकरणात तक्रारदार व गैरअर्जदार यांचे वकीलांनी युक्तीवाद केला. सदर प्रकरणात गैरअर्जदार बँकेने ही बाब स्पष्टपणे नमूद केली आहे की, कोअरबँकींग प्रकरणामध्ये खात्याची नोंद करतांना त्यांचे संगणकामध्ये अनावधानाने दोन्ही खात्यांमध्ये पहिले नाव तक्रारकर्त्या नं.2 यांचे नोंदविल्या गेले. परीणामी दोन्ही खाते एकाच व्यक्तीच्या पहिल्या नावाचे दिसत असल्यामुळे टिडीएसची रक्कम कपात करण्यात आली. यामध्ये संगणकामध्ये झालेली चूक ही गैरअर्जदार बँकेची आहे आणि ही त्यांचे सेवेतील त्रुटी आहे ही बाब उघड आहे. गैरअर्जदार बँकेच्या संगणकीय प्रणालीमध्ये काही अडचणी असल्यास खातेधारकांना त्याचेशी काहीही देणे—घेणे नाही. गैरअर्जदारानी केलेली चूक ही त्यांनी वेळीच निस्तारणे गरजेचे होते, मात्र त्यांनी तशी कोणतीही कार्यवाही केल्याचे दिसून येत नाही. गैरअर्जदार त्यांचे चूकीमुळे तक्रारकर्त्यांची कपात केलेली रक्कम काढून त्यांना परत करु शकले असते तेही अद्यापपावेतो कबूल करुनही त्यांनी केलेले नाही. उलट तक्रारकर्त्यांचे खाते बंद करुन नव्याने पुन्हा खाते उघडण्यास सांगणे ही बाब योग्य नाही आणि तसे तक्रारकर्त्यांनी करावे असे म्हणता येणार नाही. यास्तव आम्ही खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहोत. -// अं ती म आ दे श //- 1) तक्रारकर्त्यांची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते. 2) गैरअर्जदार यांनी तक्रारकर्त्यांस चूकीचे कारणास्तव कपात केलेली टिडीएसची रक्कम रुपये 2,167/-, कपात केल्याचे तारखेपासून रकमेच्या प्रत्यक्ष अदायगीपावेतो द.सा.द. शे. 9% व्याजासह, मिळून येणारी रक्कम द्यावी. 3) गैरअर्जदार यांनी तक्रारकर्त्यांस मानसिक त्रासाबाबत रुपये 3,000/- आणि तक्रारीच्या खचापोटी रुपये 1,000/- याप्रमाणे एकंदरीत रुपये 4,000/- (रुपये चार हजार फक्त) एवढी रक्कम द्यावी. 4) गैरअर्जदार यांनी उपरोक्त आदेशाचे पालन त्यांना आदेशाची प्रत प्राप्त झाल्याचे दिनाकांपासून 30 दिवसाचे आत करावे. (जयश्री येंडे) (विजयसिंह ना. राणे) सदस्या अध्यक्ष अ ति रि क्त जि ल्हा ग्रा ह क मं च ना ग पू र
| [HONABLE MRS. Jayashree Yende] MEMBER[HONORABLE Shri V. N. Rane] PRESIDENT | |