निकाल
दिनांक- 23.07.2013
(द्वारा- श्री.विनायक लोंढे, अध्यक्ष)
तक्रारदाराची तक्रार थोडक्यात खालीलप्रमाणे आहे.
तक्रारदार हे सामनेवाला यांचे खातेदार असून त्यांचे ग्राहक आहेत. तक्रारदाराने सामनेवाला बँकेचे शाखेत दि.21.10.2002 ते दि.08.01.2012 या दहा वर्षाचे कालावधीसाठी मुदत ठेव योजनेत रक्कम रु.1,08,508/- गुंतवली होते. सदरील कराराप्रमाणे मुदत कालावधी पूर्ण झालेनंतर सामनेवाला बँकेने अर्जदारास एक मुश्त रक्कम रु.2,20,708/- देण्याचे ठरले होते. मुदत ठेव पावती क्र.0549335 असा आहे. तक्रारदाराने ती रक्कम मुलांचे भविष्य उज्वल होण्यासाठी बँकेत गुंतविले होते. तक्रारदाराचा मुलगा हा सुशिक्षीत बेरोजगार असून, त्यांस राजीव गांधी ग्रामीण योजनेअंतर्गत एल.पी.जी. वितरक नेकनुर येथे नेमणेसाठी दि.20.12.2011 रोजीचे दैनिक लोकमत वृतपत्रामध्ये जाहीरात प्रसिध्द झाली होती. सदरील एल.पी.जी.वितरक अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत दि.19.01.2012 होती. सदर अर्ज भरणा करणेचे तारखेस रक्कम रु.2,00,000/- खात्यामध्ये जमा असणे आवश्यक होते. तक्रारदाराने वितरकाची डिलरशिप मिळणे कामी आवश्यक त्या कागदपत्रांची जमवाजमव करण्यास सुरुवात केली होती. तक्रारदाराने सामनेवाला यांचेकडे मुलास डिलरशिप मिळण्यसाठी आवश्यक सामनेवाले यांचे नियमाप्रमाणे मुदत ठेव पावती, पॅनकार्डची प्रत दि.08.01.2012 रोजी जमा करुन रक्कम रु.2,00,000/- ची मागणी केली असता, सामनेवाला यांनी तक्रारदाराचे बचत खात्यात रक्कम रु.1,86,188/- जमा केले. उर्वरित रक्कम टि.डी.एस. कामी कपात केल्याचे तक्रारदारा सांगितले. सामनेवाले यांच्या बेकायदेशीर कृत्यामुळे तक्रारदारास प्रचंड मानसिक,शारीरिक त्रास झाला. तक्रारदाराने दि.12.01.2012 रोजी माहितीचा अधिकार नियम 2005 अन्वये अर्ज करुन तक्रारदाराची इतकी मोठी रक्कम कशा आधारे कपात केली यांची माहिती मागितली. परंतु बँकेने माहिती दिली नाही, तक्रारदाराने पुन्हा दि.05.02.2012 रोजी सामनेवाला यांचे प्रधान कार्यालयास अर्ज करुन माहिती मागितली असता सामनेवाला यांनी दि.01.03.2012 रोजी तक्रारदाराची टी.डी.एस.कामी फक्त रक्कम रु.5203/- कपात केल्याची माहीती देऊन रक्कम रु.2,15,505/- तक्रारदारास मिळतील अशी सुचना केली. तक्रारदारास रक्कम रु.29,315/- रक्कमेची व्यवस्था करण्यास प्रचंड मानसिक, शारीरिक त्रास झाला. त्यांस घरातील मौल्यावान वस्तुची मोड करावी लागली. सामनेवाला यांनी तक्रारदारास रक्कम न देऊन सेवेत त्रूटी केली आहे, त्यामुळे तक्रारदाराची नूकसान भरपाई म्हणून रु.20,000/- तसेच मानसिक,शारीरिक त्रासापोटी रककम रु.1,50,000/- तसेच तक्रारीच्या खर्चापोटी रक्कम रु.30,000/- ची मागणी करीत आहेत.
सामनेवाले यांनी हजर होऊन दि.12.02.2013 रोजी त्यांचा लेखी जवाब दाखल केला. तक्रारदार यांनी मुदत ठेव रक्कम रु.1,08,508/- दहा वर्षाकरिता केले होते हे मान्य आहे. एल.पी.जी. बाबत सामनेवाले यांना काहीही माहीत नाही.तक्रारदारास रक्कमेची आवश्यकता असल्यामुळे त्यांनी दि.08.01.2010 रोजी मुदत ठेव तोडण्यास सांगितले व ती रक्कम बचत खात्यात जमा करण्यास सांगितले त्याप्रमाणे सामनेवाला यांनी रक्कम रु.1,86,188/- जमा केले व उर्वरित रककम टी.डी.एस. तसेच संगणकाच्या चुकीमुळे व्याज कमी मिळून कटले असल्याचे तक्रारदारास सांगण्यात आले होते.संगणकाच्या चुकीमुळे तक्रारदाराच्या खात्यावर रक्कम टाकण्यास 4 ते 5 दिवसांचा कालावधी लागेल असे तक्रारदारास सांगण्यात आले होते. तक्रारदारांच्या खात्यामध्ये दि.12.01.2012 रोजी उर्वरित रक्कम रु.29,317/- जमा करण्यात आले. सामनेवाला यांनी टी.डी.एस.कामी रक्कम रु.5203/- कपात केल्याचे तक्रारदारास सांगण्यात आले आहे. संगणाकाच्या चुकीमुळे रक्कम जमा करण्यास उशिर झाला, तक्रारदार यांना त्रास देण्याचा कोणताही हेतू नव्हता. सिस्टम एरर ची चुक झाल्यामुळे चार ते पाच दिवस रक्कम देण्यास उशिर झाला त्यात सामनेवाला बँकेची कोणतीही चुक नाही. सामनेवाला यांनी सेवेत कोणताही कसूर केलेला नाही म्हणून तक्रारदाराची तक्रार रदद करण्यात यावी.
तक्रारदार यांनी दाखल केलेले शपथपत्र व पुरावाकामी दाखल केलेले कागदपत्र यांचे अवलोकन केले. तक्रारदार यांचे वकील श्री.डी.वाय.भंडारी यांचा यूक्तीवाद ऐकला. सामनेवाले यांचे वकील श्री.डि.एस.देशमुख यांचा यूक्तीवाद ऐकला. सामनेवाला यांनी दाखल केलेले कागदपत्र यांचे अवलोकन केले.
तक्रारदार यांची तक्रार व दाखल कागदपत्र, सामनेवाला यांचे लेखी म्हणणे यांचे बारकाईने अवलोकन केले असता खालील मुददे उपस्थित होतात.
मुददे उत्तर
1. सामनेवाला यांनी सेवा देण्यामध्ये कसूर केला आहे
काय ही बाब तक्रारदार यांनी सिध्द केली आहे काय ? होय.
2. आदेश काय ? अंतिम आदेशाप्रमाणे.
कारणमिमांसा
मुददा क्र.1 व 2 ः-
तक्रारदार यांनी तक्रारीतील मजकूर सिध्दतेसाठी स्वतःचे शपथपत्र दाखल केलेले आहे. तसेच तक्रारदार यांनी सामनेवाला यांचेकडे रक्कम रु.1,08,508/- मुदत ठेवीमध्ये ठेवले होते त्यांची छायाकिंत प्रत दाखल केली आहे. तक्रारदार यांनी स्वतःचे खात्याचा उतारा दाखल केला आहे. सामनेवाला यांनी मुदतीत उर्वरित रक्कम तक्रारदाराच्या खात्यारवर जमा केली नाही या बाबत पत्रव्यवहार दाखल केला आहे.तक्रारदार यांनी त्यांचे मूलास पेट्रोल पंप वितरण परवाना मिळणेकामी भारत पेट्रोलियम लि. यांचेकडे जे अर्ज केला त्यांची प्रत दाखल केली आहे.
सामनेवाला यांनी श्री.चंद्रा मिश्रा यांचे शपथपत्र दाखल केले आहे. सामनेवाला यांनी तक्रारदारांच्या खाते उता-याचे स्टेटमेंट दाखल केले आहे.
प्रथम तक्रारदार यांनी दाखल केलेले शपथपत्र व कागदपत्राचे अवलोकन करुन सामनेवाला यांनी सेवा देण्यास कसूर केला आहे काय हे पाहणे क्रमप्राप्त ठरते. तक्रारदार यांनी शपथपत्रामध्ये कथन केले की, त्यांनी सामनेवाला बँकेमध्ये 10 वर्ष मुदतीकरिता रक्कम रु.1,08,508/- दि.21.10.2002 रोजी गुंतवले होते. मुदत 10 वर्षाची होती. मुदत संपल्यानंतर म्हणजे दि.08.01.2012 रोजी तक्रारदार यांनी रक्कम रु.2,20,708/- दयायचे होते. तक्रारदार यांचे कथन की, सामनेवाला बँकेने मुदत संपल्यानंतर त्यांचे खाते रक्कम रु.1,86,188/- जमा केले व उर्वरित रक्कम रु.34,520/- जमा न करता टी.डी.एस. कामी कपात केल्याचे सांगितले. तक्रारदार यांनी सामनेवाला कडे वेळोवेळी पाठपुरावा करुनही अनुज्ञेय रक्कम तक्रारदार यांचे खाती जमा केली नाही. तक्रारदार यांनी माहीती अधिकार नियम 2005 अन्वये सामनेवाला यांचेकडे विचारणा केली असता त्यांनी दि.1.3.2012 रोजी टी.डी.एस. कामी रक्कम रु.5203/- कपात करुन रु.2,15,505/- रक्कम तक्रारदार यांचे खाती जमा केल्या बाबत कळविले. सामनेवाला यांनी तक्रारदार यांची रक्कम रु.29,315/- देण्यास टाळाटाळ केली. सामनेवाला यांचे कायदेशीर कर्तव्य असतानाही सदरील सेवा पुर्ती केली नाही. त्यामुळे तक्रारदार यांनी गुंतवणूक केलेली रक्कम त्यांना मूदतीत मिळाली नाही.
तक्रारदार यांचे तक्रारीतील कथन की, त्यांचे मुलाने एल.पी.जी. वितरकाची डिलरशिप मिळावी म्हणून अर्ज करावयाचा होता. त्याकामी खात्यामध्ये रु.2,00,000/- शिल्लक असणे गरजेचे होते. सामनेवाला यांनी संपूर्ण रक्कम जमा न केल्यामुळे तक्रारदार यांना त्यांचे मूलाचे नांवे सदरील रक्कम दाखवता आली नाही व त्याकामी त्यांला मौल्यवान वस्तूची मोडतोड करावी लागली व त्यांचे आर्थिक नुकसान झाले.
सामनेवाला यांनी त्यांचे शपथपत्रात तक्रारदार यांनी 10 वर्ष मुदतीकरिता रक्कम रु.1,08,508/- ठेवल्याचे मान्य केले आहे. सामनेवाला यांनी एफ.डी.तोडण्याची मुदत दि.08.01.2012 होती ही बाब मान्य केली आहे. सामनेवाला यांनी तक्रारदार यांचे खाती दि.08.01.2012 रोजी रक्कम रु.1,86,188/- जमा केल्याचे मान्य केले आहे. तक्रारदार यांचे कथन की, संगणकाच्या चुकीमुळे उर्वरित रक्कम तक्रारदार यांचे खाती जमा झाली नाही हे तक्रारदार यांना सांगण्यात आले. सामनेवाला यांचा बचाव की, संगणकाचे चुकीमूळे व्याजकामी कटले असल्याचे निदर्शनास आल्यानंतर दि.12.01.2012 रोजी उर्वरित रक्कम रु.29,317/- तक्रारदार यांचे बचत खात्यामध्ये जमा केले आहे व टी.डी.एस. कामी रक्क्म रु.5203/- कपात केले आहे.
तक्रारदार यांनी दाखल केलेले कागदपत्र, शपथपत्र, सामनेवाला यांनी दाखल केलेले शपथपत्र व कागदपत्र यांचे अवलोकन केले असता तक्रारदार यांनी सामनेवाला बँकेमध्ये मूदत ठेवीमध्ये रक्कम रु.1,08,508/- ठेवली होती ही बाब सिध्द होते. दि.08.01.2012 रोजी मूदत संपली असल्यामुळे व्याज व मुदत ठेव मध्ये नमूद केलेली रक्कम तक्रारदार यांचे खात्या मध्ये जमा करण्याची व सेवा देण्याची जबाबदारी सामनेवाले यांचेवर होती. सामनेवाला यांनी संपूर्ण रक्कम जमा न करता रु.1,86,188/- दि.08.01.2012 रोजी तक्रारदार यांचे खात्यामध्ये जमा केले. उर्वरीत रक्कम जमा करण्याची जबाबदारी सामनेवाला यांचेवर असतानाही ती रक्कम जमा केली नाही. केवळ संगणकाची चुक झाली या कारणास्तव सामनेवाला यांचे सेवेत त्रूटी नाही असे म्हणता येणार नाही. संगणक चालवण्याचे काम सामनेवाला यांचे बँकेतील अधिकारी करतात. त्यांनी योग्य नोंदी ठेवल्या असत्या तर तक्रारदार यांचे खात्यात संपूर्ण रक्कम जमा झाली असती. सामनेवाला यांचे कर्मचा-याचे चुकीमूळे तक्रारदार यांचे खात्यात वेळेत रक्कम जमा होऊ शकली नाही. तसेच तक्रारदार यांनी त्यांचे मुलाचे नांवे भारत पेट्रोलियम लि. यांचे डिलरशिप मिळण्यासाठी अर्ज करण्याकामी दूसरीकडून रक्कमेची व्यवस्था केली. तक्रारदार यांना साहजिकच त्यामुळे शारीरिक व मानसिक त्रास झाला. तक्रारदार यांचे खात्यात दि.12.01.2012 रोजी सामनेवाला यांनी उर्वरित रक्कम जमा केली आहे. उर्वरित रक्कम जमा करताना सामनेवाला यांनी तक्रारदार यांना टी.डी.एस. कपात केल्या बाबत लेखी कळविले नाही व तसेच फॉर्म 16-अ हा सुध्दा दिला नाही. त्या बाबत सामनेवाला यांनी कोणतेही समर्थन करणारे कारण दिले नाही. सबब, सामनेवाला यांनी तक्रारदार यांना जी सेवा देणे गरजेचे हाते त्यामध्ये कसूर केला आहे. त्यामुळे सामनेवाला यांनी तक्रारदार यांना मानसिक व शारीरिक दिला आहे व सेवेत कसूर केला आहे ही बाब सिध्द होते. सबब, संपूर्ण तक्रारदाराचे तक्रारीचा विचार करता तक्रारदार हे त्यांचे झालेल्या नुकसानीपोटी रक्कम रु.10,000/- मिळण्यास पात्र आहेत. तसेच तक्रारदार यांना शारीरिक व मानसिक त्रास झाला त्याबददल रककम रु.5,000/- व तक्रारीचा खर्च रु.3,000/- दयावा.
वरील सर्व विवेचनावरुन मुददा क्र.1 चे उत्तर होकारार्थी देत आहोत.
सबब, मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करत आहे.
आदेश
1. तक्रारदाराची तक्रार मंजूर करण्यात येत आहे.
2. सामनेवाला यांनी तक्रारदार यांना नुकसान भरपाई रक्कम रु.10,000/- (अक्षरी रुपये दहा हजार फक्त) निकाल कळाल्यापासून 30 दिवसांचे आंत दयावेत.
3. सामनेवाला यांना आदेश देण्यात येतो की, तक्रारदार यांना मानसिक व शारीरिक त्रासापोटी रक्कम रु.5,000/-(अक्षरी रुपये पाच हजार फक्त) दयावेत.
4. सामनेवाला यांना आदेश देण्यात येतो की,तक्रारदार यांना तक्रारीच्या खर्चापोटी रक्कम रु.3,000/- (अक्षरी रुपये तिन हजार फक्त) दयावेत.
3. ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे अधिनियम 2005 मधील कलम 20
(3) प्रमाणे तक्रारीतील सदस्यांचे संच तक्रारदाराला परत करावेत.
श्रीमती मंजुषा चितलांगे श्री.विनायक लोंढे
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, बीड.