निकाल
(घोषित दि. 14.10.2016 व्दारा श्रीमती एम.एम.चितलांगे, सदस्य)
तक्रारदार याने सदरील तक्रार ग्राहक संरक्षण कायदा कलम 12 अन्वये गैरअर्जदार यांनी सेवा देण्यात त्रुटी ठेवल्यामुळे नुकसान भरपाई मिळणेकामी दाखल केली आहे.
तक्रारदार याची तक्रार थोडक्यात येणेप्रमाणे.
तक्रारदार हा बसस्टॅंड रोड अभिनव शाळा पुर्णा जिल्हा परभणी येथील रहिवाशी आहे. तक्रारदार हा राज्य राखीव पोलीस बल गट 3 जालना येथे प्रमुख लिपीक या पदावर कार्यरत आहे. तक्रारदार याचे गैरअर्जदार यांच्या बॅंकेत खाते असून त्याचा क्रमांक 20226888024 असा आहे. हज 2013 मध्ये शासनातर्फे प्रतिनियुक्तीवर तक्रारदार हा हज असिस्टंट म्हणून सौदी अरेबीया येथे गेला होता त्यावेळी त्याला मिळालेल्या वेतनातील विदेशी भत्यामध्ये वाढ झाल्यामुळे फरकाची रक्कम म्हणून रु.42,171/- चा धनादेश तक्रारदाराला मिळाला. सदरील धनादेश हा भारतीय स्टेट बॅंक मुख्य शाखा संसद मार्ग नई दिल्ली या बॅंकेचा असून भारत सरकार विदेश मंत्रालय कौंसलावास, जेद्या या कार्यालयातून प्राप्त झालेला आहे. सदरील धनादेश हा दि.31.01.2016 चा असून त्याचा क्रमांक 249620 असा आहे. सदरील धनादेश तक्रारदारास पोस्टाकडून उशिरा मिळाल्याकारणाने तक्रारदार याने दि.18.04.2016 रोजी सदरील धनादेश गैरअर्जदार यांच्या बॅंकेत वटविण्याकरता परस्पर दिला. तक्रारदार यांच्या मुलाचे दि.28.04.2016 रोजी लग्न असल्याकारणाने तक्रारदारास सदर पैशाची नितांत आवश्यकता होती. धनादेश वटला आहे किंवा नाही याबाबत तक्रारदार यांनी गैरअर्जदार यांचेकडे वांरवार चौकशी केली असता गैरअर्जदार यांनी तक्रारदारास उडवाउडवीचे उत्तर दिले. तसेच सदरील धनादेशाचे पैसे कधी मिळतील याबाबत सविस्तर माहिती दिली नाही. तदनंतर गैरअर्जदार यांनी तक्रारदारास धनादेश वटविण्याकरता 21 दिवसाची मुदत लागेल असे सांगितले. त्यामुळे तक्रारदारास मानसिक त्रास झाला. दि.04.05.2016 रोजी तक्रारदार हा धनादेशाची रक्कम मागणे करता गैरअर्जदार यांचे बॅंकेत गेला असता त्यांनी धनादेश भरताना वापरलेली काऊंटर स्लिप मागितली व ती ठेवून घेतली त्यानंतर तक्रारदाराचा धनादेश परत केला आणि सांगितले की, धनादेशाची मुदत संपली आहे. तक्रारदार याने सदरील धनादेश मुदतीत गैरअर्जदार यांच्याकडे वटविण्याकरता जमा केला होता. तक्रारदार यास पैशाची आवश्यकता असल्याकारणाने सदरील धनादेश गैरअर्जदाराकडे जमा केला. तक्रारदार याने त्याला सदर चेकची रक्कम तात्काळ मिळावी व चेक त्याच्याकडे आल्यानंतर तो बॅंकेत जमा करण्यात येईल असे निवेदन केले आहे. आणि झालेल्या मानसिक व शारीरिक त्रासापोटी नुकसान भरपाई मागितली. तसेच तक्रारीचा खर्च म्हणून रक्कम रु.2,000/- मिळण्याची विनंती केलेली आहे.
गैरअर्जदार हे मंचासमोर हजर झाले त्यांनी आपले लेखी निवेदन नि.क्र.6 अन्वये दाखल केले आहे. लेखी निवेदनासोबत नि.क्र.7 अन्वये उल्हास दिगंबर गोसावी यांचे शपथपत्र दाखल केले आहे. गैरअर्जदार यांचे कथन की, परिशिष्ट क्र.1 मध्ये दिलेला तक्रारीतील मजकुर हा गैरअर्जदारास मान्य आहे. तक्रारदार याने ज्या दिवशी सदरील धनादेश हा बॅंकेत वटविण्याकरता जमा केला त्याच दिवशी सदरील धनादेश हा मुंबई येथे पाठवला. रकमेसाठी कमीतकमी 21 दिवसांचा अवधी लागेल असे तक्रारदारास सांगितले. बॅंकेतील श्री.मोरे यांनी तक्रारदारास सदरील धनादेश मुंबई येथे जाऊन वटविण्याकरता सांगितले असता तक्रारदार यांनी त्याला मुंबईला जाणे शक्य नसल्यामुळे सदरील धनादेश गैरअर्जदार बॅंकेने स्विकारावा व तो वटविण्याकरता पाठवावा असे सांगितले. त्यामुळे गैरअर्जदार यांनी सदरील धनादेश स्विकारला तांत्रीक कारणामुळे सदरचा धनादेश हा न वटवता मुंबई येथील शाखेने गैरअर्जदार बॅंकेकडे परत पाठविला. त्याकरीता दि.26.04.2016 रोजीचे पत्र मंचासमोर दाखल केले आहे. या पत्रावरुन ही बाब स्पष्ट होते की, गैरअर्जदार यांनी तक्रारदारास सेवा देण्यात कोणतीही त्रुटी ठेवलेली नाही. सदरील धनादेश गैरअर्जदार बॅंकेने तक्रारदारास परत केला आहे. तक्रारदाराने जेव्हा बॅंकेकडे सदरील धनादेशाबाबत चौकशी केली तेव्हा त्यास योग्य ते उत्तर देण्यात आलेले आहे. त्यामुळे गैरअर्जदार यांनी तक्रारदारास द्यावयाच्या सेवेत त्रुटी ठेवली नाही. सबब तक्रारदाराची तक्रार खारीज करण्यात यावी अशी विनंती केली आहे.
तक्रारदार यांनी दाखल केलेले कागदपत्र व गैरअर्जदार यांनी दाखल केलेले कागदपत्र तसेच तक्रारदार व गैरअर्जदार यांचा युक्तीवाद लक्षात घेतला असता न्यायनिर्णयासाठी खालील मुददे उपस्थित होतात.
मुददे उत्तर
1) तक्रारदार याने दाखल केलेली तक्रार
योग्य आहे काय? नाही.
2) तक्रारदार तक्रारीतील मागणी मिळण्यास
पात्र आहे काय? नाही.
3) गैरअर्जदार याने तक्रारदारास द्यावयाच्या
सेवेत त्रुटी ठेवली आहे काय? नाही.
4) आदेश काय? अंतिम आदेशाप्रमाणे.
कारणमीमांसा
मुद्दा क्र.ः- 1 ते 3 तक्रारदार याने युक्तीवाद असा केला की, तक्रारदार याचे गैरअर्जदाराकडे खाते असून तो गैरअर्जदार यांचा ग्राहक आहे. तक्रारदार याने त्याचा धनादेश गैरअर्जदार बॅंकेकडे वटविण्याकामी दिला होता परंतू सदर धनादेश न वटविता परत आला. तक्रारदारास पैशाची नितांत आवश्यकता होती परंतू गैरअर्जदार यांनी सदर धनादेश न वटविता परत दिला. आता सदर धनादेश तक्रारदार याच्या ताब्यात आहे. गैरअर्जदार यांनी सदर धनादेश न वटवून सेवा देण्यात त्रुटी ठेवली आहे.
गैरअर्जदार यांच्या वकीलांनी असा युक्तीवाद केला की, तक्रारदार याने सदर धनादेश दि.18.04.2016 रोजी बॅंकेत वटविण्याकामी दिला असता सदर धनादेश वटविण्याकरिता 21 दिवसांचा अवधी लागणार असे तक्रारदारास सांगितले, तक्रारदारास ही बाब मान्य होती. असा युक्तीवाद केला. गैरअर्जदार यांनी तक्रारदारास धनादेश मुंबईयेथे वटविण्यासाठी पाठविला होता परंतू मुंबई येथील शाखेने सदर धनादेश तांत्रीक कारणास्तव वटविण्यात येत नसल्यामुळे दि.26.04.2016 रोजी पत्र देऊन गैरअर्जदारास कळविले. त्यामुळे गैरअर्जदार यांच्या सेवेत त्रुटी नाही.
आम्ही वर नमुद केलेला युक्तीवाद लक्षात घेतला. तक्रारदार याने दाखल केलेले कागदपत्र व पुराव्याचे शपथपत्र याचे अवलोकन केले. गैरअर्जदार यांनी दाखल केलेले कागदपत्र व पुराव्याचे शपथपत्र याचे अवलोकन केले. यावरुन असे दिसते की, तक्रारदार हयाचे गैरअर्जदार यांच्या बॅंकेत बचत खाते असून तक्रारदार हा गैरअर्जदार यांचा ग्राहक आहे ही बाब गैरअर्जदार यांना मान्य आहे. तक्रारदाराने रु.42171/- चा दि.31.01.2016 रोजीचा धनादेश गैरअर्जदार यांच्या बॅंकेत दि.18.04.2016 रोजी वटविण्याकामी दिला होता सदर धनादेश गैरअर्जदार यांनी मुंबई येथील शाखेत वटविण्याकामी पाठविला होता परंतू मुंबई येथील शाखेने तक्रारदार याचा धनादेश तांत्रीक कारणास्तव न वटल्यामुळे सदर धनादेश गैरअर्जदार यांच्याकडे दि.26.04.2016 रोजी पाठविला. सदर धनादेश गैरअर्जदार बॅंक याने तक्रारदारास परत दिला आहे, धनादेश सद्यःस्थितीत तक्रारदार याच्या ताब्यात आहे.
तक्रारदार याने युक्तीवादात नमुद केल्याप्रमाणे तक्रारदारास सदरील धनादेश हा पोस्टाकडून उशीराने मिळाला आहे असे नमुद केले. परंतू सदरील धनादेश तक्रारदारास कधी प्राप्त झाला याबाबत कोठेही स्पष्ट खुलासा केलेला नाही. यावरुन दि..31.01.2016 रोजीचा धनादेश तक्रारदारास आठ दहा दिवसानंतर म्हणजेच दि. 10.02.2016 पर्यंत प्राप्त झाला असे गृहीत धरण्यास हरकत नाही. सदरील धनादेश प्राप्त झाल्यानंतर तक्रारदाराने दि.18.04.2016रोजी गैरअर्जदार बॅंकेत वटविण्याकामी जमा केला. सदरील धनादेश जमा करण्याकरीता एवढा विलंब का झाला, याबाबत तक्रारदार याने कोणताही स्पष्ट खुलासा केलेला नाही यावरुन तक्रारदार हा स्वतः निष्काळजी व बेजबाबदार आहे असे दिसून येते. त्याकरीता तक्रारदार हा स्वतःच सर्वस्वी जबाबदार आहे. तक्रारदार याने मंचात वादग्रस्त धनादेशबाबत तक्रार दाखल केली त्यावेळेस सदरील धनादेश हा तक्रारदार याच्या ताब्यात होता. त्यामुळे तक्रारदारास सदरील तक्रार दाखल करण्याचे कोणतेही कारण घडले असल्याचे निदर्शनास येत नाही. तक्रारीतील वादग्रस्त धनादेश हा सद्यःस्थितीत व तक्रार दाखल करतेवेळेस तक्रारदार याच्याच ताब्यात असल्याकारणाने तक्रारदार याने तक्रारीत केलेली धनादेशच्या रकमेची मागणी ही रास्त व योग्य नाही. त्यामुळे गैरअर्जदार याने तक्रारदारास सेवा देण्यात त्रुटी ठेवली आहे असा निष्कर्ष काढणे उचित होणार नाही.
वरील सर्व बाबींचा विचार करता तक्रारदाराने दाखल केलेली तक्रार ही अयोग्य आहे त्यामुळे गैरअर्जदार बॅंकेने तक्रारदारास द्यावयाच्या सेवेत त्रुटी ठेवली नाही या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. म्हणून मुददा क्र.1 ते 3 चे उत्तर नकारार्थी देण्यात येते.
सबब मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1) तक्रारदाराची तक्रार नामंजुर करण्यात येते.
2) खर्चाबददल आदेश नाही.
श्रीमती एम.एम.चितलांगे श्री. सुहास एम.आळशी श्री. के.एन.तुंगार
सदस्या सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, जालना