सिंधुदुर्ग जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सिंधुदुर्ग
तक्रार क्र. 66/2010
तक्रार दाखल झाल्याचा दि.25/10/2010
तक्रार निकाल झाल्याचा दि.18/12/2010
जालमसिंह सुखदेवजी पुरोहित
वय सुमारे 42 वर्षे, धंदा – व्यापार,
रा.कुडाळ (बाजारपेठ), ता.कुडाळ,
जिल्हा – सिंधुदुर्ग. ... तक्रारदार
विरुध्द
शाखा व्यवस्थापक,
स्टेट बँक ऑफ इंडिया,
शाखा – कुडाळ, ता.कुडाळ,
जिल्हा सिंधुदुर्ग. ... विरुध्द पक्ष.
गणपूर्तीः-
1) श्री. महेन्द्र म. गोस्वामी, अध्यक्ष
2) श्रीमती उल्का राजेश गावकर, सदस्या
3) श्रीमती वफा जमशीद खान, सदस्या.
तक्रारदारातर्फेः- विधिज्ञ श्री आर.के. परुळेकर.
विरुद्धपक्षातर्फे- विधिज्ञ श्री अमोल सामंत
आदेश निशाणी 1 वर
1) तक्रारदाराने विकत घेतलेल्या महाराष्ट्र राज्य लॉटरी वैभवलक्ष्मीचे तिकिटवर बक्षीस लागून हे तिकिट वटवण्यासाठी विरुध्द पक्षाच्या बँकेत मुदतीत देऊन देखील सदरचे लॉटरी तिकिट निहित मुदतीत शासनाकडे सादर न केल्यामुळे झालेली नुकसान भरपाई मिळणेसाठी सदरची तक्रार दाखल करण्यात आली आहे.
2) सदर तक्रारीचे नोटीस विरुध्द पक्षाच्या स्टेट बँक ऑफ इंडियाला बजावण्यात आले. त्यानुसार विरुध्द पक्ष हे त्यांचे वकील प्रतिनिधीमार्फत मंचासमोर हजर झाले. दरम्यान उभय पक्षकारांमध्ये आपसी समेट होऊन विरुध्द पक्षाने तक्रारदारास लॉटरी तिकिटाची बक्षीसपात्र रक्कम रु.10,000/- व नुकसान भरपाई रु.2,000/- असे एकूण रु.12,000/- (रुपये बारा हजार मात्र) तक्रारदारास धनादेशाद्वारे अदा करीत असल्याचे स्पष्ट केले व तसा अर्ज विरुध्द पक्षाने नि.11 वर दाखल केला.
3) या अर्जाला अनुसरुन तक्रारदार व विरुध्द पक्ष यांचे दरम्यान आपसी समेट होऊन उभय पक्षकारांनी संयुक्तपणे लेखी तडजोडीचे पुरसीस नि.12 वर प्रकरणात दाखल केले व विरुध्द पक्ष अदा करीत असलेली रक्कम स्वीकारण्यास तयार असल्याचे तक्रारदार व त्याचे वकीलांनी मान्य केले. त्यानुसार सदर रक्कम रु.12,000/- चा धनादेश तक्रारदारास अदा करणेत आला.
4) दरम्यान सदर तक्रार प्रकरणात दाखल केलेले बक्षीसपात्र तिकिट विरुध्द पक्षाच्या बँकेस त्यांच्या कार्यालयीन प्रक्रियेसाठी देण्यात यावे, अशी विनंती बँकेच्या व्यवस्थापकांनी मंचाला केली. त्यावर तक्रारदाराने हे तिकिट बँकेला देण्यास हरकत नसल्याचे नि.12 वर लिहून दिले. त्यामुळे आम्ही सदरचे प्रकरण तडजोडीने निकाली काढण्याच्या दृष्टीकोनातून खालील आदेश पारीत करीत आहोत.
आदेश
1) तक्रारदार व विरुध्द पक्षकार यांचे दरम्यान झालेल्या नि.12 वरील आपसी तडजोड पुरसीसनुसार सदरचे प्रकरण निकाली काढण्यात येते.
2) सदर प्रकरणात दाखल करणेत आलेले महाराष्ट्र राज्य लॉटरी वैभवलक्ष्मी तिकिट क्र.VL-0814B 18310, हे विरुध्द पक्षाच्या स्टेट बँक ऑफ इंडियाला त्यांच्या कार्यालयीन प्रक्रियेसाठी देण्यात यावे.
3) खर्चाबद्दल काही हुकूम नाही.
4) प्रकरण नस्तीबध्द करणेत येते.
ठिकाणः सिंधुदुर्गनगरी
दिनांकः 18/12/2010
सही/- सही/- सही/-
(उल्का गावकर) (महेन्द्र म.गोस्वामी) ( वफा खान)
सदस्या, अध्यक्ष, सदस्या,
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सिंधुदुर्ग
प्रत तक्रारदार यांना हातपोहोच/रजि पोस्टाने रवाना दि.
प्रत विरुद्ध पक्ष यांना हातपोहोच/रजि. पोस्टाने रवाना दि.
Ars/-