(घोषित दि. 14.11.2014 व्दारा श्रीमती. नीलिमा संत, अध्यक्ष)
प्रस्तुत तक्रार तक्रारदारांनी ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 अंतर्गत सेवेतील कमतरतेसाठी केलेली आहे. तक्रारदारांची तक्रार थोडक्यात अशी की, तक्रारदार हे गैरअर्जदार बॅंकेचे सन् 2009 पासून ग्राहक आहेत. त्यांचा खाते क्रमांक 62540483173 असा आहे. त्यांचा नियमित पगार वरील खात्यात जमा होत असतो.
दिनांक 22.09.2013 रोजी त्यांनी एस.बी.आय च्या अंबड येथील ए.टी.एम मधून रुपये 6,500/- काढण्याचा प्रयत्न केला. परंतू ती रक्कम त्यांना मिळालेली नाही व त्याच दिवशी ती पुन्हा बचत खात्यात जमा झाली. त्यानंतर सुमारे पाच महिन्यापर्यंत त्यांचे सर्व व्यवहार सुरळीत झाले होते. अचानक दिनांक 23.02.2014 रोजी त्यांच्या बचत खात्यातून रुपये 6,500/- कपात केल्याचा मेसेज त्यांना बॅंकेकडून आला. तक्रारदार म्हणतात की, त्यांनी ए.टी.एम मधून अथवा बॅंकेतून अथवा धनादेशाव्दारे वरील रक्कम काढलेली नाही. त्यांच्या खात्यातून बॅंकेने ATM AC NOT DR22/9/1/2013 या शीर्षकाखाली बॅंकेने चुकीने रुपये 6,500/- एवढया रकमेची कपात केली आहे.
त्यानंतर तक्रारदारांनी बॅंकेत दिनांक 24.02.2014 रोजी वरील रक्कम त्यांच्या खात्यात त्वरीत जमा करावी असा अर्ज देखील दिला. परंतू गैरअर्जदारांनी अद्यापही वरील रक्कम जमा केलेली नाही म्हणून तक्रारदार ही तक्रार दाखल केली आहे.
तक्रारदार तक्रारी अंतर्गत रुपये 6,500/- एवढी रक्कम व्याजासह मागत आहेत व तेवढयाच रकमेचा दंड गैरअर्जदारांना व्हावा अशी मागणी करत आहेत.
तक्रारदारांनी आपल्या तक्रारी सोबत त्यांनी दिनांक 24.02.2014 रोजी गैरअर्जदारांकडे दिलेला अर्ज, त्यांचा जबाब, खाते उतारा, रिझर्व बॅंक ऑफ इंडिया यांचे परिपत्रक अशी कागदपत्र दाखल केली आहेत.
गैरअर्जदार मंचा समोर हजर झाले. त्यांनी आपला लेखी जबाब दाखल केला. त्यांच्या जबाबानुसार दिनांक 22.09.2013 रोजी तक्रारदारांनी ए.टी.एम मधून रुपये 6,500/- काढून घेतले. मात्र ए.टी.एम मशीनच्या Reverse System मुळे वरील रक्कम पुन्हा अर्जदाराच्या खात्यामध्ये जमा झाली. ही बाब लक्षात आल्यावर गैरअर्जदारांनी दिनांक 23.02.2014 रोजी वरील रक्कम तक्रारदारांच्या खात्यातून काढत बॅंकेच्या खात्यात डेबीट केली आहे व तसे करण्याचा त्यांना पुर्णपणे हक्क आहे.
तक्रारदारांनी त्यांचेकडे तक्रार केल्यावर गैरअर्जदारानी संपूर्ण भारतात लागू असणा-या ए.टी.एम प्रणालीकडे तक्रार केली व अहवाल मागवला तेंव्हा त्यांनी तक्रारदारांना दिनांक 22.09.2013 रोजी 000 या कोड व्दारे त्यांचा व्यवहार Successful झाल्याचे कळविले आहे. गैरअर्जदार म्हणतात की, ए.टी.एम स्लीपवर Response Code – 000 असा दाखविला आहे व 000 या कोडचा अर्थ व्यवहार यशस्वीरित्या पुर्ण झाला (Transaction Successful) असा होतो. असा अहवाल आल्या नंतर गैरअर्जदारांनी तक्रारदारांना तसे पत्र दिले. परंतू तक्रारदारांनी ते घ्यावयास नकार दिला. म्हणून गैरअर्जदारांनी वरील खुलासा लेखी स्वरुपात रजिस्टर पोस्टाने तक्रारदारांच्या नावे पाठविला. एस.बी.आय शाखाधिकारी, अंबड यांनी देखील तक्रारदार वरील रक्कम ए.टी.एम मधून काढण्यात यशस्वी झाला आहे असे कळविले आहे.
केवळ Reverse System मुळे तक्रारदारांना रुपये 6,500/- काढले असतांना देखील वरील रक्कम पुन्हा तक्रारदारांच्या खात्यात जमा झाली या तांत्रिक चुकीचा गैरफायदा घेवून तक्रारदारांचा वरील रक्कम दोनदा घेण्याचा उद्देश आहे. म्हणून तक्रारदारांनी लबाडी करुन बॅंकेची बदनामी करण्यासाठी हा खोटा अर्ज केलेला आहे. त्यामुळे तो नामंजूर करण्यात यावा.
गैरअर्जदारांनी आपल्या जबाब सोबत त्यांनी तक्रारदारांना उत्तर पाठविले. त्याबाबतची पोस्टाची पावती, Complaint management System यांनी तक्रारदारांच्या तक्रारीवर दिलेला अहवाल, तक्रारदारांचा व्यवहार यशस्वी झाल्याचे सांगणारी नोंद, ए.टी.एम. सेंटरचा अहवाल, Central System ने दिलेले उत्तर अशी कागदपत्रे दाखल केली आहेत.
तक्रारदारा तर्फे विव्दान वकील श्री.आर.व्ही.जाधव यांचा युक्तीवाद ऐकला. गैरअर्जदारा तर्फे विव्दान वकील श्री.आर.आर.कुलकर्णी यांनी लेखी युक्तीवाद दाखल केला त्याचे वाचन केले. त्यावरुन मंचाने खालील मुद्दे विचारात घेतले.
मुद्दे निष्कर्ष
1.गैरअर्जदार यांनी तक्रारदारांना द्यावयाच्या सेवेत
काही त्रुटी केली आहे का ? नाही
2.काय आदेश ? अंतिम आदेशा नुसार
कारणमिमांसा
तक्रारदारांनी दाखल केलेल्या कागदपत्रांत त्यांच्या खाते क्रमांक 62540483173 चा खाते उतारा आहे. त्यात दिनांक 22.09.2013 रोजी त्यांच्या खात्यातून रुपये 6,500/- वजा झाल्याचा व लगेचच रुपये 6,500/- जमा झाल्याचे दिसते व त्यानंतर दिनांक 23.03.2014 रोजी ATM/AC/NOT/DR/22/9/1/2013 या शिर्षकाखाली रुपये 6,500/- वजा केल्याचे दिसते आहे. तक्रारदारांनी या व्यवहारा बाबतची Slip मंचा समोर दाखल केलेली नाही.
गैरअर्जदारांनी दाखल केलेल्या कागदपत्रात त्यांनी ए.टी.एम सेंटरकडे तक्रारदारांचा दिनांक 22.09.2013 च्या व्यवहारा बाबत केलेली तक्रार व तिचे उत्तर दाखल केले आहे. त्यात दिनांक 22.09.2013 ला 11.49 वाजता त्यांनी रुपये 6,500/- काढले तो व्यवहार पुर्ण झाला अशी नोंद दिसते व त्या नोंदीवर आधारीत compliant management system ने त्यांची तक्रार बंद केली व तसा अहवाल गैरअर्जदारांना पाठविला असे दिसते. (नि.14/7) त्यात त्यांनी “This TXN is successful in atm web as well as find the successful JP/EJ. Please close the case” असे नमूद केले आहे. (नि.14/2) नि.14/4 व 14/5 वर गेरअर्जदारांनी ATM व्यवहाराचा तपशील दाखवणारी Slip व ATM Swith Center चा अहवालही दाखल केला आहे. त्या दोनही कागदपत्रात दिनांक 22.09.2013 रोजी 11.49 वाजता तक्रारदारांच्या खात्यातून रुपये 6,500/- ATM व्दारे काढल्याचा व्यवहार यशस्वी झाल्याचे लिहीले आहे.
वरील सर्व पुराव्यावरुन दिनांक 22.09.2013 रोजी तक्रारदारांनी रुपये 6,500/- ATM व्दारे काढले होते व केवळ मशीनमधील तांत्रिक चुकीमुळे कागदोपत्री त्यांच्या खात्यात ती रक्कम पुन्हा जमा झाल्याचे दिसते आहे.
वरील बाब गैरअर्जदार बॅंकेच्या लक्षात आल्यावर योग्य ती खातरजमा करुन गैरअर्जदारांनी ती रक्कम बॅंकेच्या खात्यात डेबिट केली यात गैरअर्जदारांची काहीही चुक अथवा सेवेतील कमतरता नाही असा निष्कर्ष मंच काढत आहे.
म्हणून मंच खालील आदेश पारित करत आहे.
आदेश
- तक्रारदार यांची तक्रार नामंजूर करण्यात येते.
- खर्चा बाबत आदेश नाही.