जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच बीड यांचे समोर.
तक्रार क्रमांक – 207/2012 तक्रार दाखल तारीख – 21/12/2012
तक्रार निकाल तारीख– 10/05/2013
श्री. धट शिवाजी श्रीरंग
वय 44 वर्षे, धंदा नौकरी,
रा.सन्मित्र कॉलनी,श्रीराम नगर,बीड. ..अर्जदार
विरुध्द
1. मा. व्यवस्थापक,
स्टेट बँक ऑफ हैद्राबाद
शाखा हिरापुर ता.गेवराई जि.बीड ....गैरअर्जदार
2. मा.व्यवस्थापक,
स्टेट बँक ऑफ इंडिया
शाखा नगर रोड,बीड.
-----------------------------------------------------------------------------------
समक्ष - श्रीमती निलीमा संत, अध्यक्ष
श्रीमती माधुरी विश्वरुपे, सदस्य.
-----------------------------------------------------------------------------------
तक्रारदारातर्फे - स्वतः
गैरअर्जदार क्र.1 तर्फे – अँड.एस.डी.देशमुख
गैरअर्जदार क्र.2 तर्फे - स्वतः
------------------------------------------------------------------------------------
निकालपत्र
(घोषित द्वारा ः-श्रीमती नीलिमा संत,अध्यक्ष)
तक्रारदाराची तक्रार थोडक्यात अशी की, तक्रारदार हा श्रीराम नगर बीड येथील रहिवासी आहे व व्यवसायाने शिक्षक आहे. त्यांचे पगाराचे खाते स्टेट बॅंक ऑफ हैद्राबाद शाखा हिरापुर येथे आहे व त्यांने एटीएम कार्डाची सुविधा घेतलेली आहे.
दि.1.1.09.2012 या दिवशी स्टेट बँक ऑफ इंडिया, शाखा नगर रोड बीड मधून रु.500/- काढण्याचा प्रयत्न केला. ते त्यांला मिळाले नाहीत. नंतर त्यांने रु.100/- काढण्याचा प्रयत्न केला, ते देखील त्यांला मिळाले नाहीत. त्यांच्या खात्यावर रु.6221/- शिल्लक होते. तरी देखील सदरची रक्कम त्यांला मिळाली नाही.
नंतर दि.18.09.2012 रोजी तक्रारदार त्यांच्या खात्यांवरील रक्कम काढण्यासाठी गेला असताना त्यांला रक्कम मिळाली नाही व “ Sorry unable to process” अशी स्लिप बाहेर आली. त्यात शिल्लक रक्कम रु.221/- अशी दाखवली होती. रु.6,000/- गेले कोठे असा प्रश्न पडल्याने तक्रारदार गैरअर्जदार क्र.1 स्टेट बँक ऑफ हैद्राबाद शखा हिरापूर यांचेकडे गेला असता त्यांनी स्टेट बँक ऑफ इंडिया च्या व्यवस्थापकाकडे चौकशी करण्यास सांगितले. त्यांनी पुन्हा स्टेट बॅंक ऑफ हैद्राबाद येथेच चौकशी करण्यास सांगितले.
तक्रारदाराने दि.20.09.2012 रोजी स्टेट बँक ऑफ हैद्राबाद शाखा हिरापूर यांचेकडे तक्रार अर्ज दिला, परंतु त्यांला रक्कम रु.6,000/- परत मिळाली नाही. म्हणून तक्रारदाराची तक्रार आहे. त्यांने आपल्या तक्रारीसोबत एटीएमच्या पावत्या, गैरअर्जदार क्र.1 यांचेकडे दिलेला तक्रार अर्ज, पासबुकची झेरॉक्स इत्यादी कागदपत्रे दाखल केली आहेत.
गैरअर्जदार क्र.1 व 2 मंचासमोर हजर झाले. त्यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केले. गैरअर्जदार क्र.1 यांच्या लेखी म्हणण्यानुसार तक्रारदाराने त्यांचेकडे लेखी तक्रार दि.20.09.2012 रोजी केल्यावर गैरअर्जदार क्र.1 यांनी एस.बी.आय. नगर रोड एटीएम ला तक्रार एटीएम द्वारे टाकली तेव्हा एस.बी.आय. नगर रोडचे सिस्टीम मधून दि.11.09.2012 रोजीच रु.6,000/- चा व्यवहार झाल्याचे दिसले ते गैरअर्जदार क्र.1 ने तक्रारदाराला दि.22.10.2012 रोजी लेखी कळविले व तक्रार बंद केली. यावरुन अर्जदाराने जाणीवपूर्वक खोटी तक्रार केली असे दिसते म्हणून सदरची तक्रार खारिज करण्यात यावी. त्यांनी जवाबा सोबत अर्जदाराला लिहीलेले पत्र, स्टेट बॅंक ऑफ इंडिया- एटीएम चे स्टेटमेंट, तक्रारीची माहीती (Complaint details) ही कागदपत्रे दाखल केली.
गैरअर्जदार क्र.2 स्टेट बँक ऑफ इंडिया यांयच्या लेखी म्हणण्यानुसार तक्रारदाराचे खाते गैरअर्जदार क्र.1 स्टेट बँक ऑफ हैद्राबाद यांचेकडे आहे. त्यांने गैरअर्जदार क्र.2 यांचे एटीएम मधून पैसे काढण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांला पैसे मिळाले नाहीत. याबाबत काहीही पुरावा त्यांने बँकेला दिलेला नाही. त्याच्या खात्यातील रक्कमेबददल सदर गैरअर्जदारास काहीच सांगता येणार नाही.गैरअर्जदार क्र.1 स्टेट बँक ऑफ हैद्राबाद जी माहीती एटीएम स्विच सेंटरला देतात तिच एटीएम पटलावर दिसते. एटीएम मशीनमधून पैसे काढणे तांत्रिक बाब आहे. त्यात मानवी हस्तक्षेपाचा संबंध येत नाही. सदर तक्रारदार बँकेचा ग्राहक नाही. सबब तक्रारीतून या गैरअर्जदार क्र.2 ला वगळण्यात यावे.
तक्रारदार स्वतः यांच्या युक्तीवाद ऐकला तसेच गैरअर्जदार क्र.1 तर्फे विद्वान वकील श्री देशमुख यांचा युक्तीवाद ऐकला. त्यांनी दाखल केलेल्या कागदपत्रांचा अभ्यास केला.
तक्रारदाराने तक्रारी बरोबर एटीएम च्या पावत्या जोडल्या आहत. त्यांचे वरुन व गैरअर्जदार क्र.1 यांनी दाखल केलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या नगर रोड बीड येथील एटीएम च्या स्टेटमेंट वरुन दिसत आहे की, अर्जदाराच्या 62096861036 या खात्यातून एटीएम द्वारे दि.11.09.2012 रोजी रु.4500/- काढले गेले व रु.6221/- शिल्लक होते. पण त्यांच दिवशी पुन्हा एटीएम द्वारेच रु.6000/- काढले गेले व रु.221/- च शिल्लक राहिले.
तक्रारदार म्हणतात की, त्यांनी पैसे काढले नाहीत. परंतु या गोष्टीला काहीही कागदोपत्री पुरावा नाही. तक्रारदार पुढे म्हणतात की, दि.18.09.2012 रोजी पुन्हा पैसे काढण्यासाठी गेले असताना ही गोष्ट त्यांच्या लक्षात आली व दि.20.09.2012 ला त्यांनी लेखी तक्रार केली. त्यामुळे तक्रार अर्ज 9 दिवस उशिरा करण्यात आला. तक्रार दाखल केल्यानंतर लगेचच गैरअर्जदार क्र.1 यांनी ती पुढे पाठवली. त्या तक्रारी संदर्भात स्टेट बँक ऑफ इंडियाचे “रु.6000/- चा व्यवहार यशस्वी झालेला दिसतो ” असे उत्तर आले ते त्यांनी तक्रारदारास कळवले.
वरील विवेचनावरुन तक्रारदार एटीएम मधून काढली गेलेली रक्कम रु.6,000/- मिळण्यास पात्र आहे हे तो सिध्द करु शकलेला नाही. तसेच गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी तक्रारदाराला दयावयाच्या सेवेत त्रुटी केलेली आहे हे देखील तो सिध्द करु शकलेला नाही असा निष्कर्ष मंच काढत आहे.
सबब, मंच खालील आदेश पारीत करत आहे.
आदेश
1. तक्रारदाराची तक्रार नामंजूर करण्यात येत आहे.
2. खर्चाबाबत आदेश नाही.
3. ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे अधिनियम 2005 मधील कलम 20
(3) प्रमाणे तक्रारीतील सदस्यांचे संच तक्रारदाराला परत करावेत.
श्रीमती माधूरी विश्वरुपे, श्रीमती नीलिमा संत,
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, बीड