::: निकालपत्र :::
( निकाल तारीख :23/03/2015 )
(घोषित द्वारा: श्री.अजय भोसरेकर, मा.सदस्य.)
तक्रारदाराने सदर तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 अंतर्गत गैरअर्जदारा विरुध्द दाखल केली आहे. तक्रारदाराची तक्रार थोडक्यात अशी की,
तक्रारदार हा व्यवसायाने शासकीय कर्मचारी असून महाराष्ट्र शासनाच्या औदयोगीक प्रशिक्षण संस्था औसा येथे डिझेल यांत्रीक शिल्पक निदेशक म्हणुन कार्यरत आहे. तक्रारदाराचे सामनेवाला क्र. 1 यांच्याकडे दि. 30.08.2011 रोजी बचत खाते काढले , त्याचा खाता क्र. 62199456453 असा असून, तक्रारदारास सामनेवाला क. 1 यांनी ए.टी.एम. कार्ड दिले आहे. तक्रारदाराची औसा येथुन उमरगा येथे 6 महिण्यासाठी बदली झाली असता तक्रारदार त्या काळात 5 महिने रजेवर होता. रजा काळातील पगार प्राचार्य आय.टी.आय. उमरगा यांनी आय.टी.आय. औसा यांच्याकडे रक्कम रु. 1,67,042/- दि.19.03.2012 चा चेक क्र. 906827 असा पाठवला. तो तक्रारदारास मिळाला.
तक्रारदाराने सदर चेक सामनेवाला क्र. 1 यांच्याकडे दि.20.03.2012 रोजी रक्कम जमा करण्यासाठी दिला. उमरगा प्राचार्य यांची सही इंटरनेटवर नसल्यामुळे सामानेवाला क्र. 1 यांनी तक्रारदाराचा सदर चेक सामनेवाला क्र. 2 यांच्याकडे पाठवला. तक्रारदारास त्याच्या मोबाईलवर दि. 31.03.2012 रोजी रक्कम रु. 1,67,042/- जमा झाल्याचा संदेश मिळाला. तक्रारदाराच्या खात्यावर दि. 31.03.2012 रोजी एकुण रु्. 1,67,855/- इतकी शिल्लक होती. त्यापैकी तक्रारदाराने रु. 300/- ए.टी.एम.द्वारे काढले.
दि. 16.04.2012 रोजी तक्रारदाराने बचत खात्यातील रक्कम काढण्याचा फॉर्म क्र. 404773 त्यावर रक्कम रु. 1,30,000/- लिहुन दिला. तक्रारदारास सामनेवाला क्र. 1 व सामनेवाला क्र. 2 यांनी आपली रक्कम लॉक केली असल्या बद्दलचे सांगीतले व त्यावर बँकेने रु. 221/- बँक सेवा चार्ज लावले. तक्रारदाराने दि. 21.04.2012 रोजी फसवणुक झाल्या बद्दलचा अर्ज केला. त्यावर सामनेवाला क्र. 2 यांचे पत्र तक्रारदारास सामनेवाला क्र.1 यांनी दिले, ज्यामध्ये सामनेवाला क्र.2 यांनी तक्रारदाराची रक्कम लॉक केली आहे, असे म्हटले आहे. तक्रारदार व सामनेवाला क्र. 2 यांना फोन वरुन चौकशी केली असता, उडवा उडवीची उत्तरे दिल्या कारणाने व खात्यातील रक्कम लॉक केली म्हणुन तक्रारदारास रक्कम न मिळाल्यामुळे, तक्रारदाराने सदर तक्रार या न्यायमंचात दाखल केली आहे. तक्रारदाराने रक्कम रु. 1,67,042/- मिळण्याचा आदेश व्हावा, व मानसिक शारिरीक त्रासापोटी रु. 6000/- तसेच कर्जाने घेतलेले रु. 2,00,000/- च्या व्याजाची रक्कम रु. 36,000/- तक्रारीचे खर्चापोटी रु. 5000/- मिळण्याची मागणी केली आहे.
तक्रारदाराने आपले तक्रारीचे पुष्टयर्थ शपथपत्र व एकुण 11 कागदपत्रे दाखल केले आहेत.
सामनेवाला क्र. 3 व 4 यांना न्यायमंचाची नोटीस प्राप्त असून, त्यात त्यांचे लेखी म्हणणे दाखल केलेले नाही.
सामनेवाला क्र. 1 व 2 यांना न्यायमंचाची नोटीस प्राप्त असून त्यांचे एकत्रीत लेखी म्हणणे दि. 29.09.2013 रोजी दाखल झाले असून, त्यात त्यांनी तक्रारदार हा सामनेवाला क्र. 1 यांचा ग्राहक आहे हे मान्य केले असून, सामनेवाला क्र. 2 यांच्याकडे तक्रारदाराने दि. 27.07.2006 रोजी वैयक्तीक कर्ज रक्कम रु 1,00,000/- तक्रारदाराची मुलगी कु वृषाली गणेश बोधले हिच्या शिक्षणासाठी दि. 06.07.2007 रोजी रु. 1,70,000/- चे कर्ज घेतलेले होते. त्यामुळे सामनेवाला क्र. 2 यांनी तक्रारदाराची रक्कम रु. 1,67,042/- दि.31.03.2012 रोजी रोखुन ठेवली. त्यामुळे तक्रारदारास रक्कम न देवुन आम्ही कोणतीही सेवेत त्रूटी केली नाही. त्यामुळे तक्रारदाराची तक्रार प्रत्येकी रु. 1,00,000/- नुकसान भरपाई पोटी आदेश करुन नामंजुर करावी, अशी मागणी केली आहे.
सामनेवाला क्र. 1 व 2 यांच्या वतीने सामनेवाला क्र.1 यांचे फक्त शपथपत्र दाखल झाले असून, त्यांच्या लेखी म्हणण्याचे पुष्टयर्थ अन्य कोणतेही कागदपत्रे दाखल केले नाहीत.
तक्रारदाराने दाखल केलेली तक्रार, सोबतची कागदपत्रे, सामनेवाला यांनी दाखल केलेले लेखी म्हणणे यांचे बारकाईने वाचन केले असता, तक्रारदाराचे बचत खाते हे सामनेवाला क्र. 1 यांच्याकडे होते हे दोघांनाही मान्य आहे. त्यामुळे तक्रारदार हा त्यांचा ग्राहक होतो. तक्रारदाराने सामनेवला क्र. 1 यांच्याकडे त्याच्या पगारीपोटी मिळालेली रक्कम रु. 1,67,042/- चा चेक जमा केला होता. सदर चेकची रक्कम सामनेवाला क्र. 2 यांनी राखुन ठेवली असे सामनेवाला क्र.1 व 2 यांच्या एकत्रीत लेखी उत्तरात म्हटले आहे.
सामनेवाला क. 2 यांनी तक्रारदाराने दि. 27.07.2006 रोजी रु. 1,00,000/- व दि. 06.07.2007 रोजी रु. 1,70,000/- असे दोन कर्ज घेतल्याचे म्हटले आहे. सदर कर्ज तक्रारदाराने घेतले असल्या बद्दलचा पुरावा सामनेवला क्र. 1 व 2 यांना देता आला असता, परंतु त्यांनी आपले लेखी म्हणण्याचे पुष्टयर्थ दाखल केलेले नाही. त्यामुळे तक्रारदाराने खरेच सामनवेाला क्र. 2 यांच्याकडून कर्ज घेतले होते का ? या बद्दल शंका उत्पन्न होते. जर तक्रारदाराने सामनेवाला क्र. 2 यांच्याकडून कर्ज घेतले असते तर सामनेवाला क्र. 2 यांनी सन 2006 व 2007 पासुन दि. 31.03.2012 पर्यंत तक्रारदारास थकीत कर्जापोटी योग्य ती कार्यवाही किंबहुना थकीत कर्जाच्या पोटी रक्कमेची मागणीची नोटीस देता आली असती. तसे कृत्य सामनेवाला क्र. 2 यांनी केले असल्या बद्दलचा पुरावा या न्यायमंचात सादर केला नाही. म्हणजेच दि. 31.03.02012 रोजी सामनेवाला क्र. 2 यांनी सामनेवालाक्र. 1 यांच्याकडे असलेल्या खात्याची रक्कम रु. 1,67,042/- रोखुन ठेवुन तक्रारदारास दयावयाच्या सेवेत त्रूटी केली आहे हे प्रथम दर्शनी सिध्द होते.
सामनेवाला क्र. 1 व 2 यांनी लेखी म्हणणे एकत्र दिले आहे पण त्यातील कथन हे तक्रारदाराची रक्कम सामनेवाला क्र. 2 यांनी रोखली आहे, पण याबाबत सामनेवाला क्र. 2 यांचे शपथपत्रावर हे कथन नाही, तर सामनेवाला क्र. 1 यांनी शपथपत्र दाखल केले आहे. सामनेवाला क्र. 2 यांचे म्हणणेसाठी सामनेवाला क्र. 1 हे शपथेवर कसे काय सांगणे योग्य आहे, याचा खुलासा लेखी उत्तरात व शपथपत्रात नाही. तक्रारदाराने केलेली मागणी अनुचित असल्या बद्दलचा कोणताही पुरावा कायदयानुसार योग्य असेल असा पुरावा, सामनेवाला क्र. 1 व 2 यांनी दाखल केला नसल्यामुळे तक्रारदारास सामनेवाला क्र. 1 यांनी तक्रारदाराच्या बचत खात्यात जमा असलेली रक्कम रु. 1,67,042/- व बॅंक खर्च पोटी लावलेली रक्कम रु. 221/- व त्यावर दि. 31.03.2012 पासुन द.सा.द.शे. 9 टक्के व्याज, मानसिक व शारिरीक त्रासापोटी प्रत्येकी रु.3000/- व तक्रारीचे खर्चापोटी रु. प्रत्येकी रु. 2000/- मंजुर करणे न्यायाचे होईल, असे या न्यायमंचाचे मत आहे.
सबब न्यायमंच खालील प्रमाणे आदेश पारित करीत आहे.
आदेश
- तक्रारदाराची तक्रार अंशत: मंजुर करण्यात येत आहे.
- सामनेवाला क्र. 1 यांना आदेश देण्यात येतो की, तक्रारदारास त्याच्या बचत खात्यातील रक्कम रु. 1,67,042/- व बँक खर्चा पोटी लावलेली रक्कम रु. 221/- व त्यावर दि. 31.03.2012 पासुन द.सा.द.शे. 9 टक्के व्याजासह, आदेश प्राप्ती पासुन 30 दिवसाचे आत दयावेत.
- सामनेवाला क्र. 1 व 2 यांनी तक्रारदारास मानसिक व शारिरीक त्रासापोटी प्रत्येकी रक्कम रु. 3000/- व तक्रारीचे खर्चापोटी प्रत्येकी रक्कम रु. 2000/- आदेश प्राप्ती पासुन 30 दिवसाचे आत दयावेत.