जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच बीड यांचे
तक्रार क्रमांक – 57/2011 तक्रार दाखल तारीख –05/04/2011
1. सिंमीता भ्र. बन्सीधर अंबाड
वय 54 वर्षे धंदा घरकाम .तक्रारदार
रा.लाडेगांव ता.केज जि.बीड
2. रविंद्र पि. बन्सीधर अंबाड
वय 17 वर्षे, धंदा शिक्षण
रा. सदर, अ.पा.क.आई सिंमीता
विरुध्द
रिलायंस जनरल इन्शुरन्स कंपनी लि.
मार्फत शाखाधिकारी सामनेवाला
अनिल धिरुभाई अंबानी ग्रुप
सी 9/10, दुसरा मजला, औरंगाबाद व्यापारी केंद्र,
अदालत रोड, औरंगाबाद
को र म - पी.बी.भट, अध्यक्ष
अजय भोसरेकर, सदस्य.
तक्रारदारातर्फे :- अँड.बी.डी.अंबाड
सामनेवाला तर्फे :- अँड.डी.बी.कुलकर्णी
निकालपत्र
तक्रारदार यांनी प्रस्तुतची तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 प्रमाणे सामनेवाले विरुध्द दाखल केली आहे.
तक्रारदार क्र.1 चे पती तक्रारदार क्र.2 चे वडील बन्सीधर मारुती अंबाड दि.25.7.2008 रोजी लातूर येथून मुरुड मार्गे लाडेगांव येथे टी.व्ही.एस. स्कुटी मोटार सायकल क्र.एम.एच.44/ई 1593 ही स्वतः चालवित येत असताना लातूर मुरुड रोडवर मुरुड शिवारात तवले पेट्रोल पंपाजवळ आले असताना स्कूटी स्लिप झाली. बन्सीधर हे स्कूटी मोटारसायकलसह पडले. त्यांच्या डोक्यास गंभीर मार लागून ते जागीच मरण पावले. मयत बन्सीधर हे पेन्शनर शिक्षक होते.
स्कूटी ही तक्रारदार क्र.2 च्या नांवाने आर.टी.ओ.कार्यालयाला नोंद केलेली आहे. मयत बन्सीधर यांनी सदर स्कूटीचा व स्कूटी चालविणा-या व्यक्तीचा तसेच त्रयस्थ व्यक्तीचा सामनेवालाकडून विमा घेतला आहे. त्यांचा विमा पत्र नंबर 1000636824 असून दि.24.9.2008 पर्यत विम्याची हमी सामनेवाला यांनी घेतली होती. वाहन चालविणा-या व्यक्तीचा अपघात झाल्यास रु.1,00,000/- ची नूकसान भरपाईची जबाबदारी सामनेवाला यांना घेतली आहे.
वरील अपघाताचे खबर पोलिस स्टेशन मुरुड येथे दिली. गु.र.नं.67/08 नुसार कलम 279, 304 (अ) भा.द.वि. प्रमाणे नोंद झालेली आहे. त्यावरुन घटनास्थळ पंचनामा, मरणोत्तर पंचनामा, शवविच्छेदन अहवाल झालेला आहे.
घटना घडल्यानंतर 10-12 दिवसांनी सामनेवालाकडे अपघाताची सुचना तक्रारदार क्र.1 ने दिली. घटने बाबतचे सर्व पोलिस पेपर सादर केले. सामनेवाला यांनी दि.15.7.2009 रोजी कोर्टातून रक्कमेची मागणी करा म्हणून रक्कम देण्याचे टाळले व सेवेत कसूर केला. त्यामुळे तक्रारदारांनी तक्रार क्र.124/09 दि.12.7.2009 रोजीदाखल केली होती. ज्यांचा निकाल दि.31.3.2010 रोजी झाला. त्यानुसार मयत बन्सीधर यांचे मृत्यूचा दावा कागदपत्रासह सामनेवालाकडे आदेश मिळाल्यापासून एक महिन्याचे आंत दाखल करण्याचा आदेश झाला. त्याप्रमाणे निकालाची प्रत व सर्व कागदपत्र दि.26.4.2010 रोजी सामनेवालाकडे दाखल केले. दावा मंजूर करण्याची विनंती केली. तसेच वरील प्रकरणात विलंबा मूददा वगळून दावा दाखल दिनांकापासून एक महिन्याचे आंत गुणवत्तेवर सामनेवाला यांनी निर्णय घ्यावा असा आदेश आहे. परंतु सामनेवाला यांनी त्याप्रमाणे निर्णय घेतलेला नाही. दि.4.10.2010 रोजी मुंबई येथील कार्यालयाला रजिस्ट्रर पोस्टाने अर्ज करुन विनंती केली परंतु अद्यापपर्यत निर्णय घेतला नाही. रक्कम दिली नाही त्यामुळे सेवेत कसूर केला. त्यामुळे तक्रारदारांना आर्थिक मानसिक त्रासा सहन करावा लागतो आहे.
विनंती की, विम्याची रक्कम रु.1,00,000/- घटनेचे दिनांकापासून 12 टक्के व्याजासह सामनेवाला यांनी तक्रारदारांना देण्या बाबत आदेश व्हावेत. मानसिक त्रासापोटी व तक्रारीचे खर्चापोटी योग्य ती रक्कम देण्याचे बाबत आदेश व्हावेत.
सामनेवाला यांनी त्यांचा खुलासा दि.13.2.2012 रोजी दाखल केला.खुलाशातील सर्व आक्षेप त्यांनी नाकारलेले आहेत. दि.26.4.2010 रोजी जिल्हा मंचाचे आदेशानुसार सर्व कागदपत्रासह दावा दाखल केला व रक्कमेची विनंती केली हे बरोबर आहे.
सामनेवाला यांनी मृत्यूचे दाव्याचा निर्णय घेतला नाही या हददीपर्यत चूक आहे.
स्कूटी मोटार सायकल नंबर एम.एच.44/ई 1593 च्या विमा पत्राचे अवलोकन केले असता दिसून येते की, त्या पॉलिसीमध्ये चालक मालक दोघांचा विमा कव्हर आहे. सदर वाहनाचा मालक हा तक्रारदार क्र.2 हा आहे.तो जर वाहन चालवत असेल तर त्यांचीच जोखीम विमा पत्र संरक्षीत आहे.सदरील स्कूटी घटनेच्या दिवशी तक्रारदार क्र.2 चे वडील चालवित होते. त्यांची जोखीम विमा संरक्षीत नसल्यामूळेच तक्रारदार सामनेवाला विरुध्द न्यायालयात दाद मागण्यास पात्र नाहीत. या कारणास्तव तक्रारदाराचा अर्ज सामनेवाला यांनी मंजूर केलेला नाही. यात सेवेत कसूर नाही. तक्रार खर्चासह खारीज करण्यात यावी.
तक्रारदाराची तक्रार, दाखल कागदपत्रे, तक्रारदाराचे शपथपत्र, सामनेवाला यांचा खुलासा,सामनेवाला यांचे शपथपत्र, यांचे सखोल वाचन केले.
तक्रारदाराचे विद्वान वकील श्री.अंबाड व सामनेवाला यांचे विद्वान वकील श्री.डी.बी.कूलकर्णी यांचा यूक्तीवाद ऐकला.
तक्रारीतील सर्व कागदपत्रे पाहता तक्रारीतील स्कूटी हे वाहन तक्रारदार क्र.2 चे नांवाने आहे व घटनेचे दिवशी तक्रारदाराचे वडील बन्सीधर हे स्कूटी चालवित होते व सदरची स्कूटी अचानक स्लिप झाली. त्यावरील मोटार सायकल चालक वडील बन्सीधर पडल्याने डोक्यास गंभीर मार लागून जागीच मरण पावले.
सदर स्कूटीचा विमा सामनेवालाकडे घेतलेला आहे. विमा कालावधीतच अपघात झालेला आहे. सदर अपघात मृत्यूनंतर श्री. बन्सीधर यांचा मृत्यूच्या नूकसानीची रक्कम विमा कंपनीने न दिल्याने तक्रारदारानी जिल्हा मंचात यापूर्वी तक्रार क्र.124/2009 दाखल केली होती व त्यांचा निकाल दि.31.3.2010 रोजी झालेला आहे.त्यानुसार तक्रारदारांना लेखी स्वरुपात दावा अर्ज व कागदपत्र एक महिन्याचे आंत दाखल करण्या बाबत आदेश झालेले होते. त्याप्रमाणे तक्रारदारांनी दि.26.4.2010 रोजी दावा अर्ज योग्य त्या कागदपत्रासह सामनेवालाकडे पाठविला आहे, परंतु सामनेवाला यांनी त्यावर निर्णय न घेतल्याने दि.4.10.2010 रोजी स्मरणपत्र सामनेवाला यांना पाठविले आहे.
सामनेवाला यांनी खुलाशात तक्रारदार क्र.2 चे नांवाने गाडी असून वाहन त्यांचे वडील बन्सीधर चालवित होते व त्यांचे विमा संरक्षण नाही असा बचाव घेतला आहे. यूक्तीवादात त्यांचे मूददयावरुन दावा नाकारल्याचे सांगितले परंतु त्या संदर्भात दावा नाकारल्याचे कोणतेही पत्र तक्रारदारांना दिलेले नाही असे तक्रारदाराचे म्हणणे आहे व सामनेवाला यांनी सदरचे पत्र दाखल केलेले नाही.
खुलाशात नमूद केलेले कारणाचा विचार करता सामनेवाला यांनी खुलाशातनमूद केले आहे की, सदर विमा पत्रामध्ये चालक मालक या दोघांचे विमा संरक्षण आहे व या संदर्भात चालक मालक या शब्दाचा अर्थ सदरी जीआर नंबर36 चा आधार घेतला आहे. सदरची जीआर नंबर हे आयआरडीऐ यांनी निर्देशित केल्याप्रमाणे असल्याचे सामनेवाला यांचे म्हणणे आहे. परंतु या संदर्भात केवळ जीआर नंबर 35, 36 यांचे तिन पाने सामनेवाला यांनी दाखल केलेले आहे. सदरचा निर्देश आयआरडीऐ ने कधी निर्देशीत केले या बाबतचा खुलासा नाही. सदरचा निर्देश अंमलात आल्याची कोणतीही दिनांक त्यावर नाही. या संदर्भात विमा पत्र हे 2008-09 या कालावधीचे आहे व त्या कालावधीला सदरचे निर्देश अस्तित्वात होते या बाबतचा सामनेवाला यांचा कोणताही खुलासा नाही. त्यामुळे वाहन चालक मालक या शब्दाचा अर्थ वाहन मालक आणि वाहन चालविणारा चालक असा होतो मग तो मालक असो किंवा इतर कोणताही व्यक्ती असो सदरचा चालक हा मालकच असला पाहिजे असे चालकमालक या शब्दावरुन स्पष्ट होत नाही. त्यामुळे सामनेवाला यांचा सदरचा बचाव याठिकाणी ग्राहय धरणे उचित होणार नाही असे न्यायमंचाचे मत आहे.
सामनेवालाकडे दावा अर्ज प्राप्त झाल्यापासून सामनेवाला यांनी तो कधी नाकारला या बाबतचा कोणताही उल्लेख खुलाशात नाही. परंतु यूक्तीवादाचे वेळी सदरचा दावा नाकारल्याचे यूक्तीवादात आले त्यामुळे वरील कारणाने सामनेवाला यांनी वरील दावा नाकारुन तक्रारदारांना दयावयाचे सेवेत कसूर केल्याची बाब स्पष्ट होते. म्हणून सामनेवाला यांनी तक्रारदारांना सदर विमा पत्र अंतर्गत विमा संरक्षण रु.1,00,000/- तक्रारदारांना देणे उचित होईल असे न्यायमंचाचे मत आहे.
सेवेत कसूरीची बाब स्पष्ट झाल्याने सामनेवाला यांनी तक्रारदारांना मानसिक त्रासाची रक्कम रु.5,000/- व तक्रारीच्या खर्चाची रक्कम रु.5,000/- देणे उचित होईल असे न्यायमंचाचे मत आहे.
सबब, मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1. तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
2. सामनेवाला यांना आदेश देण्यात येतो की, तक्रारदारांना मयत
बन्सीधर अंबाड यांचे अपघाती मृत्यू दाव्याची रक्कम
रु.1,00,000/- (अक्षरी एक लाख फक्त) आदेश मिळाल्यापासून
एक महिन्याचे आंत अदा करावी.
3. सामनेवाला यांना आदेश देण्यात येतो की,वरील रक्कम मूदतीत
न दिल्यास वरील रक्कमेवर द.सा.द.शे. 9 टक्के दराने व्याज तक्रार
दाखल दि.05.04.2011 पासून देण्यास सामनेवाला जबाबदार राहतील.
4. सामनेवाला यांना आदेश देण्यात येतो की, मानसिक त्रासाची
रक्कम रु.5000/-(अक्षरी रु.पाच हजार फक्त) व तक्रारीच्या खर्चाची
रककम रु.5,000/-(अक्षरी रु.पाच हजार फक्त) आदेश प्राप्तीपासून
30 दिवसांचे आंत अदा करावी.
5. ग्राहक संरक्षण कायदा- 1986, अधिनियम 2005 मधील कलम-20
(3) प्रमाणे तक्रारीतील सदस्यांचे संच तक्रारदाराला परत करावेत.
(अजय भोसरेकर) (पी.बी.भट)
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, बीड