निकालपत्र तक्रार दाखल दिनांकः- 05/08/2010 तक्रार नोदणी दिनांकः- 05/08/2010 तक्रार निकाल दिनांकः- 15/12/2010 कालावधी 04 महिने 10 दिवस जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी अध्यक्ष - श्री.चंद्रकांत बी. पांढरपट्टे, B.Com.LL.B. सदस्या सदस्या सुजाता जोशी B.Sc.LL.B. सौ.अनिता ओस्तवाल M.Sc. केशव पिता रुपाजी जाधव. अर्जदार वय 40 वर्षे,धंदा लेबर. अड.आर.जी.जाधव. रा.खानापूर चित्ता,ता.जि.हिंगोली. विरुध्द 1 शाखा प्रबंधक, गैरअर्जदार. ओरिएंटल इंशूरंस कं.लि. अड.ए.डी.गिरगांवकर. शाखा – दौलत बिल्डींग शिवाजी चौक,परभणी. 2 मुख्याध्यापक, केंद्रीय प्राथमिक शाळा खानापूर चित्ता, ता.जि.हिंगोली. ------------------------------------------------------------------------------------ कोरम - 1) श्री.सी.बी.पांढरपट्टे. अध्यक्ष. 2) सौ.सुजाता जोशी. सदस्या. 3) सौ.अनिता ओस्तवाल. सदस्या. ------------------------------------------------------------------------------------------------------- ( निकालपत्र पारित व्दारा – श्रीमती अनिता ओस्तवाल. सदस्या.) गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 यांनी त्रुटीची सेवा दिल्याच्या आरोपावरुन अर्जदाराने ही तक्रार दाखल केली आहे. अर्जदाराची थोडक्यात तक्रार अशी आहे की, अर्जदाराची मुलगी मनिषा जाधव ही प्राथमिक शाळा खानापूर चित्ता ता.जि. हिंगोली येथे शिक्षण घेत होती.दिनांक 03/06/2008 रोजी अर्जदाराच्या मुलीचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.राजीव गांधी विद्यार्थी सुरक्षा योजने अंतर्गत विमा दाव्याची रक्कम मिळण्याकरीता अर्जदाराने गैरअर्जदार क्रमांक 1 कडे आवश्यक त्या कागदपत्राची पूर्तता करुन देखील अद्याप पावतो अर्जदारास त्याच्या मयत मुलीच्या विमादाव्याची रक्कम देण्यात आलेली नाही. सदरील योजने बाबत माहिती देणे व क्लेमफॉर्म भरुन विमा कंपनीकडे पाठविण्याची जबाबदारी गैरअर्जदार क्रमांक 2 यांची आहे.परंतु त्याने अत्यंत निष्काळजीपणाने कागदपत्रे हाताळून तसेच गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 हयांनी संगनमत करुन अर्जदारास विमा रक्कम देण्यास टाळाटाळ केली म्हणून अर्जदाराने प्रस्तुतची तक्रार मंचासमोर दाखल करुन गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 यांनी संयुक्तीकरित्या अर्जदारास राजीव गांधी विद्यार्थी सुरक्षा योजना अंतर्गत अर्जदारास दिलेल्या मानसिक , शारीरिक व आर्थीक त्रासापोटी व्याजासह रक्कम रु.60,000/- द्यावी. अशी मागणी मंचासमोर केली आहे. अर्जदाराने लेखी अर्जासोबत शपथपत्र नि.2 वर व पुराव्यातील कागदपत्र नि.4/1 ते 4/15 वर मंचासमोर दाखल केली आहेत. मंचाची नोटीस गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 यांना तामील झाल्यानंतर त्यांनी लेखी निवेदन अनुक्रमे नि.12 वर व नि.7 वर दाखल करुन अर्जदाराचे कथन बहूतअंशी अमान्य केले आहे. गैरअर्जदार क्रमांक 2 यांचे म्हणणे असे की, दिनांक 03/06/2008 रोजी अर्जदाराच्या मुलीचा पाण्यात बुडून मृत्यू झाला तेव्हा 1 मे 2008 ते 15 जून 2008 पर्यंत शाळेला उन्हांळी सुट्या होत्या, तरी सुध्दा गैरअर्जदार याने अर्जदाराची भेट घेवुन त्यांना सदर योजनेची माहिती दिली व विमादावा दाखल करण्यासाठी आवश्यक ते सहकार्य केले सुट्टी नंतर शाळेच्या पहिल्या दिवशी म्हणजे दिनांक 16/06/2008 रोजी प्रस्ताव पंचायत समिती येथे दाखल केला. यात कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा किंवा निष्काळजीपणा त्यांच्याकडून झालेला नाही. व विमादावा मंजूर करणे अथवा नामंजूर करणे हे सर्वस्वी गैरअर्जदार विमा कंपनीच्या अखत्यारित असल्यामुळे त्यांचा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही.गैरअर्जदार क्रमांक 1 शी संगनमत केल्याच्या आरोपाचा गैरअर्जदार क्रमांक 2 ने इनकार केला आहे.गैरअर्जदाराने पुराव्यातील कागदपत्र नि.8/1 ते नि.8/9 वर मंचासमोर दाखल केली. गैरअर्जदार क्रमांक 1 ने लेखी निवेदन नि.12 वर दाखल करुन अर्जदाराचे कथन बहूतअंशी नाकारले आहे. गैरअर्जदार क्रमांक 1 चे म्हणणे असे की, कलम 64 (V) (B) of Insurance Act. 1938 नुसार क्रमांक 163600/48/2008/2612 व कालावधी दिनांक 27/10/2007 ते 26/08/2008 पर्यंतची पॉलिसी देण्यात आलेली होती, परंतु पॉलिसीची मुदत दिनांक 26/08/2008 पर्यंतच होती तदनंतर शासनाने दुस-या एजन्सीकडे जबाबदारी सोपवली होती म्हणून सदर प्रकरणाचा विचार गैरअर्जदाराने केलेला नाही.तसेच अर्जदाराच्या मुलीचा मृत्यू दिनांक 03/06/2008 ला झाला होता, त्यानंतर 7 दिवसाच्या आत क्लेम कागदपत्रांसह गैरअर्जदाराकडे पॉलिसीच्या अटी व शर्तीनुसार दाखल करणे आवश्यक होते परंतु त्याने अटी व शर्तीचे उल्लंघन केलेले आहे. तसेच राजीव गांधी सुरक्षा योजने अंतर्गत विमा दाव्यापोटी मिळणारी रक्कम फक्त रु.30,000/- आहे.अर्जदाराने अवास्तव रक्कमेची केलेली मागणी अयोग्य आहे.म्हणून वर नमुद केलेल्या कारणास्तव अर्जदाराची तक्रार खर्चासह खारीज करण्याची विनंती गैरअर्जदार क्रमांक 1 ने मंचासमोर केली आहे. गैरअर्जदार क्रमांक 1 ने शपथपत्र नि.13 वर दाखल केले. दोन्ही पक्षांच्या कैफियतीवरुन खालील मुद्दे उपस्थित होतात. मुद्दे. उत्तर. 1) गैरअर्जदार क्रमांक 1 ने अर्जदारास त्रुटीची सेवा दिल्याचे शाबीत झाले आहे काय ? होय. 3) अर्जदार कोणती दाद मिळण्यास पात्र आहे ? अंतिम आदेशा प्रमाणे. कारणे मुद्दा क्रमांक 1 व 2 अर्जदाराची मुलगी मनिषा जाधव ही केंद्रीय प्राथमिक शाळा खानापूर चित्ता ता.जि.हिंगोली येथे शिक्षण घेत होती तिचा दिनांक 03/06/2008 रोजी पाण्यात बुडून मृत्यू झाला.राजीव गांधी विद्यार्थी सुरक्षा विमा योजने अंतर्गत ती लाभार्थी होती.अर्जदाराने सदर योजने अंतर्गत विमा दाव्याची रक्कम मिळण्यासाठी क्लेमफॉर्म सोबत आवश्यक त्या सर्व कागदपत्रांची पुर्तता केली, परंतु गैरअर्जदाराने विमा दाव्याची रक्कम देण्यासाठी टाळाटाळ केली अशी थोडक्यात अर्जदाराची तक्रार आहे.यावर गैरअर्जदार क्रमांक 1 चे म्हणणे असे की, पॉलिसी क्रमांक 163600/48/2008/2612 ची मुदत दिनांक 27/10/2007 ते दिनांक 26/08/2008 पर्यंत होती व तदनंतर शासनाने ही जबाबदारी दुस-याकडे सोपवली होती त्यामुळे त्याला या प्रकरणांचा विचार करता येणार नाही. यावर मंचाचे असे मत आहे की, अर्जदाराच्या मुलीचा मृत्यू दिनांक 03/06/2008 रोजी झालेला असल्यामुळे तिचा मृत्यू हा पॉलिसी पिरियड मध्येच झाल्यामुळे तीला सदर योजने अंतर्गत लाभ मिळावयास हवा होता व विमा कंपनीने सर्व कागदपत्रांची पुर्तता झाल्यानंतर अर्जदारास विमा दाव्याची रक्कम द्यावयास काहीच हरकत नव्हती.परंतु अतिशय तकलादू स्वरुपाचा बचाव गैरअर्जदाराने घेतलेला दिसतो.पुढे गैरअर्जदार क्रमांक 1 चा आक्षेप असा की,दिनांक 03/06/2008 रोजी अर्जदाराच्या मुलीचा मृत्यू झाल्यानंतर अर्जदाराने पॉलिसीच्या अटी व शर्तीनुसार 7 दिवसांच्या आत गैरअर्जदारास लेखी सुचना दिलेली नाही व याच कारणास्तव दिनांक 14/05/2010 रोजीच्या पत्राव्दारे अर्जदाराचा क्लेम नाकारण्यात आलेला आहे ( नि.4/1) यावर मंचाचे असे मत आहे की, पॉलिसीची ही अट अथवा शर्त समाज भावनेच्या (Public Policy ) च्या विरोधात आहे.कुठल्याही व्यक्तीला तिच्या अप्तस्वकीयाचा मृत्यू झाल्यानंतर 7 दिवसांच्या आत विमा दावा मिळण्यासाठी विमा कंपनीशी संपर्क साधणे शक्य नाही व ते वर्तन योग्यही नाही तसेच गैरअर्जदार क्रमांक 2 ने त्याच्या लेखी निवेदनात शाळेला सुट्या असल्यामुळेच विमादावा थोडा विलंबाने दाखल करण्यात आल्याचे मान्य केले आहे यात अर्जदाराचा कोणताही दोष आढळून येत नाही.म्हणून अर्जदाराचा वाजवी क्लेम गैरअर्जदार क्रमांक 1 ने नामंजुर करुन त्रुटीची सेवा दिल्याचे शाबीत होते.म्हणून मुद्दा क्रमांक 1 चे उत्तर होकारार्थी देण्यात आले.आता प्रश्न उरतो तो फक्त अर्जदार कोणती दाद मिळावयास हवी एवढाच राजीव गांधी सुरक्षा योजने अंतर्गत लाभार्थीचा विमादावा हा प्रत्येकी रक्कम रु.30,000/- असल्याचे मंचाच्या Knowledge मध्ये असल्यामुळे जरी दोन्ही बाजूनी त्या संबंधीचा पुरावा मंचासमोर दाखल केलेला नसला तरी तेवढीच रक्कम अर्जदारास मंजूर करणे योग्य होईल. तसेच या प्रकरणात गैरअर्जदार क्रमांक 2 ने कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा किंवा हलगर्जीपणा केल्याचे शाबीत न झाल्यामुळे त्यांच्या विरोधात आदेश पारीत करणे योग्य होणार नाही.म्हणून गैरअर्जदार क्रमांक 1 ला अर्जदारास विमादाव्याची रक्कम व्याजासह देण्याचे आदेश देणे न्यायसंगत असल्यामुळे आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोंत. आदेश 1 अर्जदाराचा तक्रार अर्ज अंशतः मंजूर करण्यात येत आहे. 2 गैरअर्जदार क्रमांक 1 ने निकाल कळाल्यापासून 30 दिवसांच्या आत विमादाव्याची रक्कम रु.30,000/- दिनांक 14/05/2010 रोजी पासून सदरील रक्कम पदरी पडे पावेतो द.सा.द.शे. 9 टक्के व्याजदाराने द्यावी. 3 तसेच गैरअर्जदार क्रमांक 1 ने सेवात्रुटीपोटी व मानसिकत्रासा बद्दल रक्कम रु.1,000/- व दाव्याचा खर्च रक्कम रु.1,000/- आदेश मुदतीत द्यावी. 4 दोन्ही पक्षांना आदेशाच्या प्रती मोफत पुरवाव्यात. सौ. अनिता ओस्तवाल सौ.सुजाता जोशी श्री. सी.बी. पांढरपटटे सदस्या सदस्या अध्यक्ष.
| [HONABLE MRS. Sujata Joshi] Member[HONABLE MR. C. B. Pandharpatte] PRESIDENT[HONABLE MRS. Anita Ostwal] Member | |