(आदेश पारीत द्वारा- श्रीमती जयश्री यंगल, मा.सदस्या) -/// आ दे श ///- (पारीत दिनांक 09 फेब्रुवारी, 2011) 1. तक्रारकर्ती श्रीमती लज्जोबाई वि. अजाबराव कडवे, रा.क्वॉ.एम..क्यु—852, शोभापूर कॉलनी पाथाखेडा, जि.बैतुल (मध्यप्रदेश) यांनी सदर तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 अंतर्गत विरुध्द पक्ष नं.1 शाखा प्रबंधक, न्यू इन्डीया एश्योरन्स कंपनी लिमिटेड नागपूर आणि विरुध्द पक्ष नं.2 खान प्रबंधक, सारणी माईन्स पाथाखेडा यांचेविरुध्द दाखल करुन समुह जनता वैयक्तिक अपघात विमा योजना अंतर्गत रक्कम रुपये 5 लक्ष मिळावी आणि सदर रक्कम अद्यापी न मिळाल्याने तक्रारकर्तीस झालेल्या मानसिक व शारीरिक त्रासाबद्दल रुपये 10,000/- व तक्रारीचा खर्च म्हणुन रुपये 1,000/- व्याजासह मिळावेत अशी मागणी केली आहे. 2. तक्रारकर्तीच्या तक्रारीतील तपशिल थोडक्यात खालीलप्रमाणे आहे. 3. तक्रारकर्ती श्रीमती लज्जोबाई हिचे पती अजाबराव कडवे हे डब्ल्यू.सी.एल. सारणी, पाथाखेडा एरिया जि.बैतुल (मध्यप्रदेश) येथे मागील दहा वर्षांपेक्षा जास्त कालावधीपासून कार्यरत होते. त्यांचा दिनांक 26/4/2009 रोजी एका सडक दुर्घटनेत अपघाती मृत्यू झाला. त्याबद्दलची रिपोर्ट (एफआयआर) पोलीस स्टेशन बोरदेही, जि. बैतुल (मध्यप्रदेश) यांचेकडे नोंदविण्यात आली. 4. मृतक अजाबराव कडवे यांनी विरुध्द पक्ष नं.2 खान प्रबंधक, सारणी माईन्स, पाथाखेडा यांचेमार्फत विरुध्द पक्ष नं.1 न्यू इंडिया एश्योरन्स कंपनी लिमिटेड यांचेकडे समुह जनता वैयक्तिक अपघात विमापत्र काढले असून त्याचा क्रमांक 47/160202/0356 असा आहे. तसेच स्वर्गीय अजाबराव मन्ना कडवे यांचा विमाप्रमाणपत्र क्र.17872 असा आहे. मृतक अजाबराव मन्ना कडवे यांचा विमा रुपये 5 लक्ष एवढ्या रकमेकरीता उतरविला होता आणि विमा प्रस्तावामध्ये तक्रारकर्तीचे नाव नामनिर्देशित केलेले आहे.विमाप्रस्तावाचे हमीनुसार विमादाराचे मृत्यूनंतर त्यांचे पत्नीला रुपये 5 लक्ष एवढ्या रकमेचे भुगतान विरुध्द पक्ष नं.1 यांनी करावयाचे आहे. 6. तक्रारकर्तीचे विमाधारक/पती यांचा दिनांक 26/4/2009 रोजी मुलताई बोरदेही रोडवर अपघाती मृत्यू झाला. त्यानंतर तक्रारकर्तीने विम्याचे संपूर्ण कागदपत्र व दावापत्र विरुध्द पक्ष नं.2 यांचेतर्फे विरुध्द पक्ष नं.1 यांचे कार्यालयात सादर केले. विरुध्द पक्ष नं.1 यांचे प्रस्ताव अर्जानुसार त्यांनी विमीत व्यक्तीचे निधनानंतर विमा प्रस्तावानुसार तक्रारकर्तीला रकमेचे भुगतान करावयास पाहिजे होते, परंतू विरुध्द पक्ष नं.1 यांचे कार्यालयात बरेचदा चौकशी करुन सुध्दा त्यांनी त्याबद्दलची दखल घेतली नाही आणि उडवाउडवीची उत्तरे देत राहिले. 7. तक्रारकर्तीने वकीलामार्फत विरुध्द पक्ष नं.1 व 2 यांना दिनांक 21/8/2010 रोजी कायदेशिर नोटीस बजावून सुध्दा त्यांनी नोटीसला उत्तर दिले नाही आणि तक्रारकर्तीला विमा हक्काची रक्कम दिली नाही. 6. तक्रारकर्तीचे म्हणण्याप्रमाणे विरुध्द पक्ष नं.1 हे विम्याचे प्रस्तावाप्रमाणे तक्रारकर्तीस रक्कम देण्यास बाध्य आहेत आणि तक्रारकर्तीने विम्याचे नियमानुसार संपूर्ण कागदपत्रांची पूर्तता केली आहे आणि विरुध्द पक्ष नं.1 यांनी तक्रारकर्तीला विम्याची रक्कम रुपये 5 लक्ष 18% व्याजासह द्यावी अशी मंचास विनंती केली आहे. विरुध्द पक्ष नं.1 यांनी तक्रारकर्तीला विम्याची रक्कम दिली नाही ही त्यांचे सेवेतील त्रुटी ठरते. 8. तक्रारकर्तीने आपले तक्रारीसोबत एकूण 10 कागदपत्रे दाखल केली असून, त्यामध्ये मृत्यू प्रमाणपत्र, विमा प्रस्तावपत्र, एफआयआर आणि इतर दस्तऐवजांचा समावेश आहे. 9. विरुध्द पक्ष नं.1 व 2 यांना मंचातर्फे पंजीकृत डाकेद्वारे नोटीस बजाविली. विरुध्द पक्ष नं.1 मंचात उपस्थित राहून त्यांनी दिनांक 4/1/2011 ला आपले लेखी उत्तर दाखल केले. आणि विरुध्द पक्ष नं.2 हे सदर प्रकरणात उपस्थित न झाल्याने त्यांचेविरुध्द प्रकरण विना जबाबाने चालविण्याचा आदेश पारीत झाला. 10. विरुध्द पक्ष नं.1 यांनी तक्रारीतील मजकूर तांत्रिकपणे अमान्य केला आहे, परंतू तक्रारकर्तीचे पती अजाबराव कडवे हे डब्ल्यूसीएल सारणी, पाथाखेडा एरिया जि. बैतुल (मध्यप्रदेश) येथे मागील दहा वर्षांपेक्षा अधिक कालावधीपासून कार्यत होते ही बाब मान्य केली आहे. त्यांनी पुढे हेही मान्य केले आहे की, विरुध्द पक्ष नं.2 कंपनीने समुह जनता वैयक्तिक विमा पॉलीसी योजना काढली होती त्याचा कालावधी दिनांक 15/9/1999 पासून 14/3/2009 पर्यंत होती आणि तक्रारकर्तीचे म्हणण्या प्रमाणे तिचे विमाधारक पतीचा दिनांक 26/4/2009 रोजी मृत्यू झाला, त्यामुळे विमा योजनेची मुदत संपलेली होती. म्हणुन तक्रारकर्तीची तक्रार ही मुदतबाह्य व गैरकायदेशिर असल्याने ती खारीज करण्यात यावी असे त्यांचे उत्तरात नमूद केले आहे. 11. विरुध्द पक्ष नं.1 यांनी उत्तर दाखल केल्यावर त्याला प्रतिउत्तर दाखल करुन तक्रारीतील नमूद विमा योजना दिनांक 14/9/2009 पर्यंत अस्तीत्वात होती असे मा. उच्च न्यायालयाचे आदेशाची प्रत दाखल केली आहे. त्यावरुन सदर विमा योजना ही दिनांक 14/9/2009 पर्यंत अस्तीत्वात होती हे आढळून येते. 12. तक्रारकर्तीचा युक्तीवाद ऐकला, आणि रेकॉर्डवरील सर्व कागदपत्रांचे सुक्ष्म अवलोकन केले असता, मंचाचे निरीक्षण व निष्कर्ष खालीलप्रमाणे आहेत. 13. तक्रारकर्ती ही विमाधारक अजाबराव कडवे यांची विधवा आहे व अजाबराव कडवे हे दहा वर्षांपेक्षा जास्त कालावधीपासून डब्ल्यूसीएल सारणी माईन्स पाथाखेडा येथे कार्यरत होते आणि त्यांनी समुह जनता वैयक्तिक विमा पॉलीसी योजनेंतर्गत विम्याची पॉलीसी घेतली होती व त्यांचा अपघाती मृत्यू झाला होता आणि वर नमूद विमा योजना मृतकाचे मृत्यूचे तारखेपर्यंत अस्तीत्वात होती ह्या बाबी रेकॉर्डवरील कागदपत्रांवरुन सिध्द होतात. 14. विरुध्द पक्ष नं.1 यांनी अद्यापपावेतो तक्रारकर्तीला समुह जनता वैयक्तिक विमा योजनेंतर्गत देय रक्कम दिलेली नाही ही त्यांचे सेवेतील त्रुटी ठरते असे आमचे मत आहे. 15. सबब हे मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे. -/// अं ती म आ दे श ///- 1) तक्रारकर्तीची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते. 2) विरुध्द पक्ष नं.1 विमा कंपनीने तक्रारकर्तीस विमा रक्कम रुपये 5 लक्ष मृतकाचे मृत्यूची तारीख 26/4/2009 पासून रक्कम प्रत्यक्ष हातात पडेपर्यंत द.सा.द.शे. 9% व्याजासह द्यावी. 3) विरुध्द पक्ष नं.1 विमा कंपनीने तक्रारकर्तीस शारीरिक व मानसिक त्रासाकरीता रुपये 10,000/- आणि तक्रारीचे खर्चाबाबत रुपये 1,000/- याप्रमाणे एकंदरीत रुपये 11,000/- (रुपये अकरा हजार फक्त) एवढी रक्कम द्यावी. 4) विरुध्द पक्ष नं.2 यांचेविरुध्द तक्रार खारीज करण्यात येते. गैरअर्जदार यांनी उपरोक्त आदेशाचे पालन त्यांना आदेशाची प्रत प्राप्त झाल्याचे दिनांकापासून एक महिन्याचे आत करावे.
| [HONABLE MRS. Jayashree Yangal] MEMBER[HONORABLE Shri V. N. Rane] PRESIDENT[HONABLE MRS. Jayashree Yende] MEMBER | |