नि.32 मे.जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच,रत्नागिरी यांचेसमोर तक्रार क्रमांक : 15/2010 तक्रार दाखल झाल्याचा दि.04/03/2010 तक्रार निकाली झाल्याचा दि.22/07/2010 श्री.अनिल गोडसे, अध्यक्ष श्रीमती स्मिता देसाई, सदस्या श्री.अमर सुरेश कीर रा.चांदेराई, ता.जि.रत्नागिरी. ... तक्रारदार विरुध्द शाखा व्यवस्थापक, दि न्यू इंडिया ऍश्युरन्स कं.लि., नाईक कॉम्प्लेक्स, मारुती मंदीर, रत्नागिरी. ... सामनेवाला तक्रारदारतर्फे : विधिज्ञ श्री.धारीया सामनेवालेतर्फे : विधिज्ञ श्री.भाटवडेकर -: नि का ल प त्र :- द्वारा : मा.अध्यक्ष, श्री.अनिल गोडसे 1. तक्रारदाराने सदरचा तक्रार अर्ज त्याच्या विमा दाव्याबाबत दाखल केला आहे. 2. सदर तक्रारीचा थोडक्यात तपशिल खालीलप्रमाणे – तक्रारदाराच्या मालकीचे क्वालिस गाडी नं.एम-एच-13-एबी-4545 या वाहनास विमा मुदतीत दि.28/05/2009 रोजी अपघात झाला. सदर अपघाताची खबर तक्रारदार यांनी सामनेवाला यांना दिली व सर्व कागदपत्रे व कोटेशन सादर केले. तथापी विमा कंपनीने तक्रारदारास दि.15/01/2010 रोजीच्या पत्राने गाडी भाडयाने दिली असल्यामुळे क्लेम नामंजूर करीत आहोत असे कळविले. वास्तविक तक्रारदार यांनी गाडी भाडयाने दिली नव्हती केवळ मैत्रीखातर तक्रारदार हा त्याच्या मित्रांना कुटुंबिंयासह पाचगणी येथे घेवून गेला होता. विमा कंपनीने सर्व मूळ कागदपत्रे घेवूनही जवळजवळ आठ महिन्यानंतर तक्रारदाराचा क्लेम नाकारला त्यामुळे तक्रारदार यांनी गाडीची नुकसानभरपाई रक्कम रु.1,40,000/- 12% व्याजासह मिळावी, शारिरिक, मानसिक त्रासापोटी नुकसानभरपाई व तक्रार अर्जाचा खर्च मिळावा म्हणून सदरचा तक्रार अर्ज दाखल केला आहे. तक्रारदार यांनी तक्रार अर्जासोबत नि.2 ला शपथपत्र दाखल केले आहे व नि.4 वर अर्ज देवून सामनेवाला यांच्याकडे सादर केलेली मूळ कागदपत्रे हजर करण्याबाबत आदेश करण्याची विनंती केली आहे. तक्रारदार यांनी नि.5 चे यादीसोबत 4 कागद दाखल केले आहेत. 3. सामनेवाला यांनी याकामी हजर होवून नि.10 वर आपले म्हणणे दाखल केले आहे. सामनेवाला यांनी आपल्या म्हणण्यामध्ये तक्रारदाराच्या वाहनास विमा मुदतीत अपघात झाला ही गोष्ट मान्य केली आहे. अपघात झाल्यानंतर सामनेवाला यांनी गावडे सर्व्हेअर यांची अपघाताची चौकशी करण्यासाठी नेमणूक केली होती. त्याप्रमाणे सर्व्हेअर यांनी चौकशी केली व सदर वाहनात प्रवास करणारे सादिक होडेकर यांचा जबाब नोंदविला. सदर होडेकर यांनी त्यांच्या जबाबात असे कबूल केले आहे की सदर गाडीमध्ये त्यांनी व त्यांचे मित्र तवसाळकर यांनी डिझेल भरले. त्यामुळे तक्रारदार यांनी विमा पॉलिसीमधील अटी व शर्तीचा भंग करुन सदरचे वाहन Hire or reward या कारणासाठी वापरले असल्यामुळे तक्रारदाराचा विमा दावा फेटाळण्यात आला व तसे तक्रारदारांना कळविण्यात आले. त्यामुळे तक्रारदार यांचा तक्रार अर्ज फेटाळण्यात यावा असे सामनेवाला यांनी नमूद केले आहे. सामनेवाला यांनी आपल्या म्हणण्यामध्ये वैकल्पिकरित्या असे नमूद केले आहे की सामनेवाला कंपनीची नुकसानभरपाई देण्याची जबाबदारी आहे अशा निर्णयापर्यंत आल्यास गावडे सर्व्हेअर यांनी सर्व्हे रिपोर्टमध्ये नमूद केलेली रक्कमच तक्रारदारास देय आहे असा आदेश करण्यात यावा. सामनेवाला यांनी आपल्या म्हणण्याच्या पृष्ठयर्थ नि.11 ला शपथपत्र दाखल केले आहे. 4. तक्रारदार यांनी नि.17 ला शपथपत्राच्या स्वरुपात आपले प्रतिउत्तर दाखल केले आहे त्यामध्ये सामनेवाला यांच्या म्हणण्यातील मजकूर नाकारलेला आहे. सादिक होडेकर यांनी केव्हाही अशा प्रकारचा जबाब दिला नाही व गावडे सर्व्हेअर यांनी त्यांच्याकडे चौकशी करुन जबाब वगैरे घेतलेला नाही असे तक्रारदार यांनी आपल्या प्रतिउत्तरामध्ये नमूद केले आहे. 5. सामनेवाला यांनी लेखी म्हणण्याप्रमाणेच आपला युक्तिवाद आहे अशी पुरशीस नि.19 ला दाखल केली आहे. सामनेवाला यांनी नि.20 च्या अर्जाने व नि.21 च्या यादीने 7 कागद दाखल केले आहेत. तक्रारदार यांनी सदर यादीतील गावडे सर्व्हेअर यांचा अहवाल, सादिक होडेकर यांचा जबाब व गावडे सर्व्हेअर यांचा बिलचेक रिपोर्ट हे कागद मान्य नाहीत असे नमूद केले आहे. त्यानंतरच्या नेमले तारखेस सामनेवाला यांनी गावडे सर्व्हेअर यांना साक्षीसमन्स काढण्यात यावे अशी विनंती करणारा अर्ज सादर केला. त्यावर सामनेवाला यांनी सर्व्हेअर यांचे शपथपत्र दाखल करावे असा आदेश करण्यात आला त्याप्रमाणे सामनेवाला यांनी सर्व्हेअर यांचे शपथपत्र नि.25 ला दाखल केले. तक्रारदारतर्फे सर्व्हेअर यांचा उलटतपास घेण्यात आला. तक्रारदार यांनी नि.26 ला जादा लेखी अथवा तोंडी पुरावा देण्याचा नाही अशी पुरशीस दाखल केली तर सामनेवाला यांनी नि.27 ला लेखी अथवा तोंडी पुरावा देण्याचा नाही अशी पुरशीस दाखल केली. त्यांनतरच्या नेमल्या तारखेस अंतिम युक्तिवादाचेवेळेस सामनेवालातर्फे नि.29 च्या अर्जाने व नि.30 च्या यादीने गावडे सर्व्हेअर यांचा अहवाल दाखल करण्यास परवानगी मागणारा अर्ज सादर करण्यात आला. तक्रारदारतर्फे सदर अर्जावर तीव्र आक्षेप घेण्यात आला. सर्व्हेअर यांचा उलटतपास झाल्यानंतर व कोणतीही कागदपत्रे दाखल करावयाची नाहीत अशी पुरशीस दिल्यावर सामनेवाला यांनी सदरचा अर्ज दिला आहे तो नामंजूर करण्यात यावा असे म्हणणे तक्रारदारातर्फे देण्यात आले. त्यामुळे सामनेवाला यांचा नि.29 चा सर्व्हेअर यांचा अहवाल दाखल करुन घेण्यात यावा अशी विनंती करण्यात येणारा अर्ज नामंजूर करण्यात आला व तक्रारदार व सामनेवाला यांचे विधिज्ञांचा युक्तिवाद ऐकण्यात आला. 6. तक्रारदार यांचा तक्रार अर्ज, शपथपत्र, तक्रारदार यांनी दाखल केलेली कागदपत्रे, सामनेवाला यांनी दिलेले म्हणणे, शपथपत्र, सामनेवाला यांनी दाखल केलेली कागदपत्रे, प्रतिउत्तर, दोन्ही विधिज्ञांचा ऐकण्यात आलेला तोंडी युक्तिवाद यावरुन खालील मुद्दे मंचाच्या निष्कर्षासाठी उपस्थित होतात. अ.क्र. | मुद्दे | उत्तरे | 1. | तक्रारदार यांचा विमा क्लेम नाकारुन सामनेवाला यांनी त्यांना सदोष सेवा दिली आहे काय ? | होय. | 2. | तक्रारदार हे मागणीप्रमाणे अनुतोष मिळण्यास पात्र आहेत काय ? | अंशतः मंजूर. | 3. | काय आदेश ? | अंतिम आदेशाप्रमाणे. |
विवेचन 7. मुद्दा क्र.1 व 2 एकत्रित - तक्रारदार यांच्या वाहनास विमा मुदतीत अपघात झाला ही गोष्ट उभयपक्षी मान्य आहे. दि.28/05/2009 रोजी अपघात झाल्यानंतर तक्रारदार यांना विमा क्लेम नाकारल्याचे दि.15/01/2010 रोजीच्या पत्राने कळविण्यात आले. म्हणजे तक्रारदाराच्या विमा दाव्याबाबत सामनेवाला यांनी सात ते आठ महिन्यानंतर निर्णय घेतला. तक्रारदाराचा विमा दावा नाकारण्यास सामनेवाला यांनी जे कारण नमूद केले आहे ते तक्रारदार यांनी सदरचे वाहन Hire or reward या कारणासाठी वापरुन विमा पॉलिसीतील अटी व शर्तीचा भंग केला आहे. सामनेवाला यांनी त्यासाठी सर्व्हेअर गावडे यांची इन्व्हेस्टीगेटर म्हणून नेमणूक केली होती व सर्व्हेअर गावडे यांनी सादिक महमद होडेकर या प्रवाशाचा जबाब घेतला असे नमूद केले आहे. सदर सादिक होडेकर यांचा जबाब सामनेवाला यांनी याकामी नि.21/3 ला दाखल केला आहे. तसेच सर्व्हेअर यांनी दिलेला चौकशी अहवाल नि.21/2 ला दाखल आहे. तक्रारदार यांचे विधिज्ञांनी सर्व्हेअर यांच्या चौकशी अहवालामधील पान नं.9 वरील Conclusion या शिर्षकाखाली मुद्दा क्र.3 येथे सर्व्हेअर यांनी I.V. was not used for hire at the time of accident असा निष्कर्ष नोंदविला आहे. सदरची बाब सर्व्हेअर यांनी आपल्या उलटतपासामध्येही मान्य केली आहे. सामनेवाला यांच्या विधिज्ञाने एखाद्याने वाहन डिझेल टाकून नेले तर ते Hire or reward होईल असे आपल्या युक्तिवादामध्ये नमूद केले व तक्रारदाराच्या विधिज्ञाने मैत्रीखातर वाहनात डिझेल टाकले तर ते Hire or reward होणार नाही. सदर वाहन हे तक्रारदार स्वतः चालवत होते ते दुस-या कोणासही भाडयाने दिले नव्हते तसेच तक्रारदार यांनी आपल्या युक्तिवादाच्या पृष्ठयर्थ The mere payment to the owner of the cost of petrol used by the vehicle was at the disposal of the another does not amount to hiring the vehicle असा निष्कर्ष सन्मा.मद्रास उच्च न्यायालयाने Kadir Mohideen SahibAIR 1935 Madras 577 या निवाडयाच्या कामी नोंदविला आहे असे नमूद केले व त्याचा संदर्भ असलेले Motor Vehicle Act, 1988 हे पुस्तक सादर केले. तथापी तक्रारदार यांनी संपूर्ण निवाडयाची प्रत याकामी दाखल केली नाही. सर्व्हेअर यांनी आपल्या निष्कर्षामध्ये सदरचे वाहन Hire or reward या कारणासाठी वापरले नव्हते असे नमूद केले आहे. तसेच तक्रारदार स्वतः चालवत असलेल्या वाहनामध्ये त्याच्या मित्राने डिझेल टाकले म्हणजे सदरचे डिझेल टाकणे Hire or reward होणार नाही असे मंचाचे मत आहे. त्यामुळे ज्या कारणासाठी तक्रारदारचा विमा क्लेम नाकारला ते कारण संयुक्तिक वाटत नाही असे या मंचाचे मत झाले आहे. 8. तक्रारदाराने आपल्या तक्रार अर्जामध्ये वाहन दुरुस्तीसाठी D.S.K.Motors यांनी दिलेल्या कोटेशनची रक्कम रु.1,40,000/- ची मागणी केली आहे. तर सामनेवाला यांनी आपल्या म्हणण्यामध्ये सर्व्हेअर यांनी सुचविलेली रक्कम देणेचा आदेश करण्यात यावा असे नमूद केले आहे. सामनेवाला यांनी सर्व्हेअर यांनी किती रक्कम सुचविली याबाबत कोणतेही कथन आपल्या म्हणण्यामध्ये केले नाही. आपल्या म्हणण्यासोबत कोणतीही कागदपत्रे सादर केली नाहीत. तक्रारदारांनी रिजॉईंडर दाखल केल्यावर कागदपत्रे सादर केली आहेत. त्यामध्येही सर्व्हेअर यांचा इन्व्हेस्टीगेशन रिपोर्ट सादर केला आहे परंतु सर्व्हेअर यांचा सर्व्हे रिपोर्ट कागद दाखल करण्याची संधी असताना दाखल केला नाही. सर्व्हेअर यांचा उलटतपास झाल्यावर व सामनेवाला यांनी लेखी व तोंडी पुरावा देण्याचा नाही अशी पुरशीस सादर केल्यावर सर्व्हे रिपोर्ट दाखल करण्यासाठी विलंबाने अर्ज सादर केला. सदर रिपोर्ट दाखल करण्यास विलंब का झाला याबाबत कोणतेही संयुक्तिक कारण न दिल्याने सामनेवाला यांचा सदरचा अर्ज नामंजूर करण्यात आला त्यामुळे याकामी सर्व्हेअर यांचा सर्व्हे रिपोर्ट दाखल होवू शकला नाही. गावडे सर्व्हेअर यांनी आपल्या उलटतपासामध्ये D.S.K.Motors यांचेकडील दुरुस्तीचे कोटेशन सादर केले होते सदरचे कोटेशन हे रु.1,97,393/- चे होते असे मान्य केले आहे. तसेच त्यानंतर सर्व्हेअर यांनी वर्कशॉपला भेट दिली होती ही गोष्टही मान्य केली आहे. त्यामुळे तक्रारदार यांनी याकामी केलेली मागणी विचारात घेता तक्रारदाराची सदरची मागणी मान्य करणे योग्य व संयुक्तिक होईल या निष्कर्षाप्रत सदरचा मंच आला आहे. 9. तक्रारदार यांनी शारिरिक, मानसिक त्रासापोटी नुकसानभरपाई व तक्रार अर्जाचा खर्च मिळावा अशी मागणी केली आहे. तक्रारदाराच्या तक्रार अर्जावर निर्णय घेण्यास सामनेवाला यांनी विलंब केला. तसेच कोणतेही योग्य सबळ कारण नसताना तक्रारदार यांचा विमा दावा नाकारला त्यामुळे तक्रारदारांना जो मानसिक त्रास सहन करावा लागला व सदरची तक्रार दाखल करावी लागली त्यामुळे तक्रारदारांना शारिरिक, मानसिक त्रासापोटी नुकसानभरपाई व तक्रार अर्जाच्या खर्चापोटी रक्कम रु.5,000/- मंजूर करणे योग्य होईल असे या मंचाचे मत झाले आहे. वरील सर्व विवेचनावरुन सदरचा मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे. आदेश 1. तक्रारदाराचा तक्रार अर्ज अंशतः मंजूर करण्यात येत आहे. 2. तक्रारदारास सामनेवाला यांनी रक्कम रु.1,40,000/- (रु.एक लाख चाळीस हजार मात्र) व सदर रकमेवर अपघात तारखेपासून म्हणजे दि.28/05/2009 पासून संपूर्ण रक्कम पदरी पडेपर्यंत संपूर्ण रकमेवर 9% दराने व्याजासह अदा करावी असा आदेश करण्यात येतो. 3. तक्रारदार यास सामनेवाला यांनी शारिरिक मानसिक त्रासापोटी नुकसानभरपाई व तक्रार अर्जाचा खर्च म्हणून रक्कम रु.5,000/- (रु.पाच हजार मात्र) अदा करावेत असा आदेश करण्यात येतो. 4. वर नमूद आदेशाची पूर्तता सामनेवाला यांनी दि.31/08/2010 पर्यंत करण्याची आहे. 5. सामनेवाला यांनी विहीत मुदतीत आदेशाची पूर्तता न केल्यास तक्रारदार त्यांचेविरुध्द ग्राहक संरक्षण कायद्यातील तरतुदीनुसार दाद मागू शकतील. रत्नागिरी दिनांक : 22/07/2010. (अनिल गोडसे) अध्यक्ष, ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच, रत्नागिरी जिल्हा. (स्मिता देसाई) सदस्या, ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच, रत्नागिरी जिल्हा. प्रत : तक्रारदार यांना हातपोच/रजि.पोस्टाने प्रत : सामनेवाले यांना हातपोच/रजि.पोस्टाने
| HONABLE MRS. Smita Desai, MEMBER | HONABLE MR. Anil Y. Godse, PRESIDENT | , | |