Maharashtra

Bhandara

CC/16/112

(1) Archana Arvind Raut (2) Ku.Samruddhi Arvind Raut (3) Divyanshu Arvind Raut - Complainant(s)

Versus

BRANCH MANAGER,LIFE INSURANCE CORPORATION OF INDIA LTD - Opp.Party(s)

Adv Nirwan

17 Sep 2019

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM,BHANDARA
Near Akhil Sabhagruha, Ganeshpur Road,Bhandara
 
Complaint Case No. CC/16/112
( Date of Filing : 21 Sep 2016 )
 
1. (1) Archana Arvind Raut (2) Ku.Samruddhi Arvind Raut (3) Divyanshu Arvind Raut
R/o Gopichand Chauragade,Rajgopalchari Ward,Bhandara
Bhandara
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. BRANCH MANAGER,LIFE INSURANCE CORPORATION OF INDIA LTD
Gadchiroli
Gadchiroli
Maharashtra
2. Raiwanta Kisan Raut
R/o Sindhpuri Tah Tumsar
Bhandara
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. BHASKAR B. YOGI PRESIDENT
 HON'BLE MRS. VRUSHALI JAGIRDAR MEMBER
 
For the Complainant:Adv Nirwan, Advocate
For the Opp. Party: Adv.Sushma Singh, Advocate
Dated : 17 Sep 2019
Final Order / Judgement

(पारीत व्‍दारा श्री भास्‍कर बी.योगी, मा.अध्‍यक्ष )

                   (पारीत दिनांक– 17 सप्‍टेंबर, 2019)

01.   तक्रारदारांनी प्रस्‍तुत तक्रार विमाधारक श्री अरविंद किसन राऊत यांचे मृत्‍यूपःश्‍चात विम्‍याची रक्‍कम मिळण्‍यासाठी विरुध्‍दपक्ष क्रं 1 भारतीय जीवन बिमा निगम विमा कंपनी विरुध्‍द ग्राहक मंचा समक्ष दाखल केलेली आहे. तसेच ग्राहक मंचात तक्रार दाखल करण्‍यासाठी झालेला विलंब माफ होण्‍यासाठी किरकोळ प्रकरण क्रं-MA/16/18 दाखल केलेली आहे.

02.  तक्रारीचा थोडक्‍यात आशय खालील प्रमाणे-     

     तक्रारदारांचे तक्रारी प्रमाणे तक्रारकर्ती क्रं-1) ही मृतक विमाधारक श्री अरविंद किसन राऊत यांची पत्‍नी आहे तर अज्ञान त.क.क्रं 2 आणि त.क.क्रं 3 ही त्‍यांची मुले आहेत. मृतक विमाधारक श्री अरविंद किसन राऊत यांनी ते हयातीत असताना विरुध्‍दपक्ष क्रं 1) भारतीय जीवन बिमा निगम कडून दोन विमा पॉलिसीज काढल्‍या होत्‍या, त्‍या विमा पॉलिसीचे क्रमांक अनुक्रमे-976828303  आणि 976828649 असे आहेत आणि प्रत्‍येक विमा पॉलिसी ही रुपये-2,00,000/- एवढया रकमेची होती. सदर दोन्‍ही पॉलिसीजची D.O.C. अनुक्रमे दिनांक-10.02.2011 आणि 23.02.2011 अशी होती आणि परिपक्‍वता तिथी 02/2032 अशी होती. दोन्‍ही विमा पॉलिसीचे प्रिमीयम हे अर्धवार्षिक असून अर्धवार्षिक हप्‍ता प्रत्‍येकी रुपये-5933/- असा होता.     दिनांक-29.10.2013 रोजी विमाधारक श्री अरविंद किसन राऊत यांचा मृत्‍यू झाला. विमाधारक श्री अरविंद राऊत हे विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीचे ग्राहक आहेत. विमाधारक श्री अरविंद राऊत यांनी त्‍यांचे मृत्‍यू पूर्वीचे दोन्‍ही विमा पॉलिसीजचे अर्धवार्षिक हप्‍ते भरलेले नव्‍हते. विमाधारक श्री अरविंद राऊत यांनी माहे फेब्रुवारी-2013 पर्यंत दोन्‍ही विमा पॉलिसीजचे अर्धवार्षिक हप्‍ते नियमिपणे भरलेले होते. विमाधारक श्री अरविंद राऊत यांचे मृत्‍यू नंतर  नमुद दोन्‍ही विमा पॉलिसीजचे हप्‍ते भरलेले नाहीत.

     तक्रारदारांनी पुढे असे नमुद केले की, विमाधारक श्री अरविंद किसन राऊत यांचे मृत्‍यू नंतर तक्रारदारांनी मा.दिवाणी न्‍यायाधिश, सिनीयर डिव्‍हीजन, भंडारा यांचे न्‍यायालयात वारसान प्रमाणपत्र मिळविण्‍यासाठी प्रकरण दाखल  केले होते, त्‍या प्रकरणा मध्‍ये  विरुध्‍दपक्ष क्रं 1 भारतीय जीवन बिमा निगम कंपनी तर्फे उत्‍तर दाखल करण्‍यात आले होते, त्‍या उत्‍तरा मध्‍ये विमा कंपनीने मृतक विमाधारक श्री अरविंद किसन राऊत यांच्‍या वादातील दोन्‍ही विमा पॉलिसीज हया लॅप्‍स झालेल्‍या असल्‍याने कोणतीही विमा राशी देय नसल्‍याचे नमुद केले होते. तक्रारदारांना दोन्‍ही विमा पॉलिसीज का लॅप्‍स झालेल्‍या आहेत याची कल्‍पना नव्‍हती म्‍हणून त्‍यांनी वारसान प्रकरणात मा.न्‍यायालयापुढे दिनांक-29.06.2015 रोजी अर्ज करुन विरुध्‍दपक्ष क्रं 1 भारतीय जीवन बिमा निगम कंपनीला दोन्‍ही विमा पॉलिसीजचे कागदपत्र तक्रारदारांना पुरविण्‍यासाठी निर्देशित व्‍हावे अशी विनंती केली होती. मा.दिवाणी न्‍यायालयाचे आदेशा प्रमाणे विरुध्‍दपक्ष क्रं 1 भारतीय जीवन बिमा निगम कंपनीने दिनांक-13.01.2016 रोजी सदर दोन्‍ही विमा पॉलिसीज लॅप्‍स असल्‍या बाबतचे दस्‍तऐवज न्‍यायालयापुढे सादर केले, त्‍यामुळे तक्रारदारांनी न्‍यायालया पुढील वारसान प्रमाणपत्राचे प्रकरणात दोन्‍ही विमा पॉलिसीजची रक्‍कम वगळण्‍यासाठी दिनांक-15.06.2016 रोजी अर्ज सादर केला होता आणि सदरचा अर्ज दिनांक-29.07.2016 रोजी न्‍यायालयाने मंजूर केला होता, त्‍याप्रमाणे दिनांक-12.08.2016 रोजी वारसान प्रमाणपत्राचे अर्जातून दोन्‍ही विमा राशीची रक्‍कम वगळण्‍यात आली आणि शेवटी प्रस्‍तुत तक्रार वादातील दोन्‍ही विमा पॉलिसीजची रक्‍कम मिळावी म्‍हणून ग्राहक मंचा समोर दाखल केली.

    तक्रारदारांनी पुढे असे नमुद केले की, वादातील दोन्‍ही पॉलिसीजचे अर्धवार्षिक हप्‍ते थकीत झाल्‍याने विमा पॉलिसी हया लॅप्‍स होऊ शकत नाहीत. परंतु विरुध्‍दपक्ष क्रं 1 भारतीय जीवन बिमा निगम कंपनी ही विमा पॉलिसीची रक्‍कम देण्‍यास टाळाटाळ करुन तक्रारदारांना दोषपूर्ण सेवा देत आहे. तक्रारदार अनुक्रमे क्रं 1 ते 3 हे मृतक विमाधारक श्री अरविंद किसन राऊत यांचे नात्‍याने अनुक्रमे पत्‍नी आणि मुले आहेत, तर विरुदपक्ष क्रं 2 मृतक विमाधारकाची आई आहे. कायदेशीर तरतुदी प्रमाणे तक्रारदार क्रं 1 ते 3 आणि विरुध्‍दपक्ष क्रं 2 हे मृतक विमाधारकाचे वर्ग-1 कायदेशीर वारसदार आहेत. विरुध्‍दपक्ष क्रं 2  हया विमाधारक श्री अरविंद किसन राऊत यांचे दोन्‍ही पॉलिसीज मध्‍ये नामनिर्देशित व्‍यक्‍ती आहेत त्‍यामुळे तक्रारदार अनुक्रमे क्रं 1 ते 3 मृतक विमाधारक याची पत्‍नी व मुले आणि विमाधारकाची आई समप्रमाणात विमा रक्‍कम मिळण्‍यास पात्र आहेत. तक्रारदारांनी वकील श्री एम.जी.हरडे यांचे मार्फतीने दिनांक-16.08.2016 रोजी विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीला दोन्‍ही वादातील पॉलिसीजपोटी विमा रक्‍कम मिळण्‍यासाठी कायदेशीर नोटीस पाठविली होती परंतु विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनी कडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही तसेच नोटीसला उत्‍तर सुध्‍दा दिले नाही. म्‍हणून शेवटी तक्रारदारांनी प्रस्‍तुत तक्रार ग्राहक मंचा समोर दाखल करुन त्‍याव्‍दारे विरुध्‍दपक्ष क्रं 1 भारतीय जीवन बिमा निगम कंपनीचे विरुध्‍द खालील प्रमाणे मागण्‍या केल्‍यात-

 (01)   विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीला आदेशित करण्‍यात यावे की, त्‍यांनी   दोन्‍ही विमा पॉलिसीज अनुक्रमे-976828303  आणि 976828649 प्रत्‍येकी रुपये-2,00,000/- प्रमाणे विमा रक्‍कम विमाधारकाचा मृत्‍यू झाल्‍याचा दिनांक-29.10.2013 पासून ते रकमेच्‍या प्रत्‍यक्ष अदायगी पावेतो वार्षिक-18 टक्‍के दराने व्‍याजासह तक्रारदार क्रं 1 ते 3 यांना प्रत्‍येकी ¼ हिश्‍श्‍याप्रमाणे देण्‍याचे आदेशित व्‍हावे.

(02)   तक्रारदार क्रं 1 ते 3 यांना झालेल्‍या शारिरीक, मानसिक त्रासा बद्यल रुपये-20,000/- आणि तक्रारीचा खर्च म्‍हणून रुपये-10,000/- विरुध्‍दपक्ष पतसंस्‍थेनी तक्रारकर्त्‍याला देण्‍याचे आदेशित व्‍हावे.

(03)   या शिवाय योग्‍य ती दाद तक्रारदारांचे बाजूने मंजूर करण्‍यात यावी.

03.   विरुध्‍दपक्ष क्रं 1 भारतीय जीवन बिमा निगम कंपनी तर्फे तक्रारदारांचे  विलंब माफीचे अर्जास लेखी उत्‍तर पान क्रं 57 ते 60 वर दाखल केलेंडर तर तक्रारीला लेखी उत्‍तर पान क्रं 96 ते 104 वर दाखल केले.  विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीचे लेखी उत्‍तरा नुसार मृतक विमाधारक  श्री अरविंद किसन राऊत यांचे त.क.क्रं 1 ते 3 अनुक्रमे नात्‍याने पत्‍नी आणि मुले आणि विरुध्‍दपक्ष क्रं 2 ही आई असल्‍याची बाब नाकबुल केली. वादातील दोन्‍ही विमा पॉलिसीज अनुक्रमे-976828303  आणि 976828649  हया प्रत्‍येकी रुपये-2,00,000/- रकमेच्‍या आहेत हा एक अभिलेखाचा भाग असल्‍याचे नमुद केले. सदर दोन्‍ही विमा पॉलिसी मध्‍ये विमाधारकाचा भाऊ नामे प्रकाश यास नामनिर्देशित म्‍हणून दर्शविले होते. तक्रारीमध्‍ये नमुद दोन्‍ही विमा पॉलिसीचे क्रमांक, कालावधी आणि विमा रकमा या मंजूर असल्‍याचे नमुद केले. विमाधारकाचा मृत्‍यू दिनांक-29.10.2013 रोजी झाल्‍या बाबत मान्‍य  असल्‍याचे नमुद केले. दोन्‍ही विमा पॉलिसीपोटी विमाधारकाचे अर्धवार्षिक दोन हप्‍ते माहे फेब्रुवारी-2013 आणि ऑगस्‍ट, 2013 थकीत होते. पॉलिसी मध्‍ये नमुद ग्रेस पिरिएड संपल्‍या नंतरही विमा हप्‍ते न भरल्‍यामुळे वादातील दोन्‍ही विमा पॉलिसीज हया विमाधारकाचे मृत्‍यूचे दिनांकास म्‍हणजे दिनांक-29.10.2013 रोजी लॅप्‍स झाल्‍यात, त्‍यामुळे विमा अटी व शर्ती नुसार तक्रारदार कोणतीही विमा रक्‍कम मिळण्‍यास पात्र नाहीत. विमा पॉलिसीचे क्‍लॉज 2 प्रमाणे ग्रेस पिरिएड हा वार्षिक हप्‍त्‍याचे पॉलिसी मध्‍ये 30 दिवसांचा नमुद केलेला आहे. जर ग्रेस पिरिएड संपल्‍या नंतरही विमा हप्‍ता न भरल्‍यास विमा पॉलिसी लॅप्‍स होते. सदर वादातील दोन्‍ही विमा पॉलिसीज मध्‍ये ग्रेस पिरिएड संपल्‍या नंतरही विमा हप्‍ते भरलेले नाहीत. विमाधारकाचे मृत्‍यू पूर्वीचे दिनांका पर्यंत वादातील दोन्‍ही पॉलिसीजचे दोन अर्धवार्षिक हप्‍ते भरलेले नव्‍हते. वादातील दोन्‍ही विमा पॉलिसीज लॅप्‍स असल्‍याची बाब मा.दिवाणी न्‍यायालय भंडारा येथे स्‍पष्‍ट झाल्‍या नंतर वादातील दोन्‍ही विमा पॉलिसीचे रकमेचा वाद तक्रारदारांनी संपुष्‍टात आणला होता परंतु पुन्‍हा सदर वाद ग्राहकमंचा समोर तक्रारदारांनी प्रस्‍तुत तक्रारी मधून केलेला आहे.  विमाधारकाचे मृत्‍यू नंतर तक्रारदार हे विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीचे ग्राहक होत असल्‍याची बाब नाकबुल केली. विमाधारकाचे मृत्‍यू नंतर तक्रारदारांनी वारसान प्रमाणपत्र मिळण्‍यासाठी दिवाणी न्‍यायालय, भंडारा येथे प्रकरण क्रं 40/2013 दाखल केले होते, तयामध्‍ये  विरुदपक्ष क्रं 1 विमा कंपनीने लेखी उत्‍तर दाखल करुन दोन्‍ही विमा पॉलिसीज लॅप्‍स अवस्‍थेत असल्‍याने विमा राशी देय नसल्‍याचे नमुद केले होते, त्‍यामुळे दोन्‍ही विमा पॉलिसीज हया लॅप्‍स असल्‍याची बाब तक्रारदारांना सन-2013-2014 मध्‍ये अवगत झालेली होती. तक्रारदारांनी विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीला दिनांक-16.08.2016 रोजीची नोटीस दिल्‍याची बाब मान्‍य केली परंतु नोटीस मधील मजकूर नामंजूर असल्‍याचे नमुद केले. तक्रारदार हे माहिती अधिकार कायद्या अंतर्गत सुध्‍दा विमा पॉलिसीची माहिती सन-2013-2014 मध्‍ये घेऊ शकले असते परंतु तक्रारदार हे स्‍वतःच पॉलिसीचे रकमेपोटी निष्‍काळजी होते, त्‍यामुळे तक्रारदारांचा ग्राहक मंचा समोर तक्रार दाखल करण्‍यास 322 दिवसांचा झालेला विलंब माफ होऊ शकत नाही तसेच तक्रार दाखल करण्‍यास झालेल्‍या विलंबाची कारणे नमुद केलेली नाहीत सबब तक्रार ही मुदतबाहय असलयाने ती खारीज होण्‍यास पात्र असल्‍याचे विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनी तर्फे नमुद करण्‍यात आले.

04.   विरुध्‍दपक्ष क्रं 2 श्रीमती रायवंता राऊत यांनी लेखी उत्‍तर पान क्रं 115 व 116 वर दाखल केले. त्‍यांचे लेखी उत्‍तरा प्रमाणे तक्रारकर्ती क्रं 1 ही मृतक विमाधारक श्री अरविंद किसन राऊत यांची पत्‍नी असून त.क.क्रं 2 व 3 हे मृतक विमाधारकाची मुले आहेत आणि विरुध्‍दपक्ष क्रं 2 ही मृतक विमाधारक श्री अरविंद किसन राऊत यांची आई आहे त्‍यामुळे तक्रारदार क्रं 1 ते 3 सोबत विरुध्‍दपक्ष क्रं 2 ही सुध्‍दा विम्‍याची रक्‍कम मिळण्‍यास हक्‍कदार असल्‍यामुळे  तयांना त्‍या प्रमाणात विम्‍याची रक्‍कम देण्‍यात यावी असे नमुद केले.

05.    उभय पक्षां तर्फे दाखल दस्‍तऐवजांच्‍या प्रती, दाखल पुरावे, दाखल लेखी युक्‍तीवाद आणि तक्रारदारांचे वकीलांनी दाखल केलेले मा.वरिष्‍ठ न्‍यायालयांचे न्‍यायनिवाडे तसेच उभय पक्षांचे वकीलांचा मौखीक युक्‍तीवाद यावरुन मंचा समोर खालील मुद्दे उपस्थित होतात-

अक्रं

मुद्दा

उत्‍तर

 

(1)

तक्रारदार क्रं 1 ते 3 हे विरुध्‍दपक्ष क्रं 1  विमा कंपनीचे ग्राहक होतात काय?

होय.

(2)

तक्रारदार क्रं 1 ते 3 यांची ग्राहक तक्रार मुदतीत आहे काय?

होय.

 

 

 

(3)

 

वि.प.क्रं 1 विमा कंपनीने, तक्रारदारांना दोषपूर्ण सेवा दिल्‍याची बाब सिध्‍द होते काय?

होय.

(4)

काय आदेश?

 

अंतिम आदेशा नुसार

:: कारण मिमांसा ::

मुद्दा क्रं-1  बाबत-

06.   तक्रारदार क्रं 1 ते 3 हे मृतक विमाधारक श्री अरविंद किसन राऊत यांचे नात्‍याने अनुक्रमे पत्‍नी व मुले असल्‍याने मृतक विमाधारकाचे मृत्‍यू नंतर ते विमा पॉलिसीची रक्‍कम‍ मिळण्‍यास कायदेशीर वारसदार म्‍हणून पात्र असल्‍याने तक्रारदार क्रं 1 ते 3 हे विरुध्‍दपक्ष  क्रं 1 भारतीय जीवन बिमा निगम कंपनीचे ग्राहक होत असल्‍याने मुद्या क्रं 1 चे उत्‍तर होकारार्थी नोंदविण्‍यात येते.

मुद्दा क्रं-2 बाबत-

07.  तक्रारदार क्रं 1 ते 3 यांनी मृतक विमाधारक श्री अरविंद किसन राऊत यांचे मृत्‍यू नंतर मा. दिवाणी न्‍यायाधिश सिनियर डिव्‍हीजन, भंडारा यांचे न्‍यायालयात वारसान प्रमाणपत्र मिळविण्‍यासाठी प्रकरण क्रं 40/2013 दाखल केले होते, त्‍यामध्‍ये विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने वादातील दोन्‍ही पॉलिसीज अनुक्रमे-976828303  आणि 976828649  प्रत्‍येकी रुपये-2,00,000/- रकमेच्‍या लॅप्‍स अवस्‍थेत असल्‍याचे उत्‍तर दाखल केले होते, त्‍यामुळे तक्रारदारांनी सदर वारसान प्रकरणात दिनांक-15.06.2016 रोजी दोन्‍ही पॉलिसीजची विमाराशी वगळण्‍यासाठी अर्ज दाखल केला होता, तो अर्ज पान क्रं 85 व 86 वर दाखल आहे, त्‍यानुसार मा.दिवाणी न्‍यायालयाने वारसान प्रकरणात योग्‍य ती दुरुस्‍ती करण्‍यासाठीचा आदेश दिनांक-29.07.2016 रोजी पारीत केल्‍याचे सदर अर्जावरील आदेशा वरुन दिसून येते. वादातील दोन्‍ही पॉलिसीज लॅप्‍स अवस्‍थेत असल्‍याने या विमा राशींची रक्‍कम‍ मिळण्‍यासाठी तक्रारदारांनी प्रस्‍तुत तक्रार ग्राहक मंच भंडारा यांचे समोर दिनांक-21.09.2016 रोजी दाखल केल्‍याचे दिसून येते. प्रस्‍तुत तक्रारी मधील तक्रार दाखल करण्‍यासाठीचे कारण हे मा.दिवाणी न्‍यायालय सिनीयर डिव्‍हीजन, भंडारा यांचे दिनांक-29.07.2016 रोजीचे आदेशानुसार घडलेले आहे आणि त्‍यानंतर लगेच दोन महिन्‍याच्‍या आत तक्रारदारांनी प्रस्‍तुत ग्राहक तक्रार ग्राहक मंच, भंडारा येथे दाखल केलेली असलयामुळे ग्राहक सरंक्षण कायद्यातील तरतुदी प्रमाणे तक्रारीचे कारण घडल्‍या पासून दोन वर्षाच्‍या आत प्रस्‍तुत तक्रार दाखल केलेली असल्‍यामुळे प्रस्‍तुत तक्रार ही विहित मुदतीत ग्राहकमंचा समोर दाखल केली असल्‍याचे दिसून येते. तथापि जास्‍तीची काळजी म्‍हणून तक्रारदारांनी विलंब माफ होण्‍यासाठीचा अर्ज सुध्‍दा दाखल केलेला आहे. अशापरिस्थितीत विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने प्रस्‍तुत ग्राहक तक्रार मुदतबाहय असल्‍या बाबत जो आक्षेप घेतलेला आहे त्‍यामध्‍ये ग्राहक मंचास कोणतेही तथ्‍य दिसून येत नाही म्‍हणून आम्‍ही मुद्या क्रं 2 चे उत्‍तर होकारार्थी नोंदवित आहोत.

मुद्दा क्रं-3 व 4 बाबत-

08.   विरुध्‍दपक्ष क्रं 1 भारतीय जीवन बिमा निगम कंपनी तर्फे पान क्रं 78 व 80 वर अनुक्रमे- 976828649  आणि 976828303  स्‍टेटस रिपोर्ट दाखल करण्‍यात आले, त्‍यानुसार दोन्‍ह‍ी विमा पॉलिसी हया प्रत्‍येकी रुपये-2,00,000/- एवढया रकमेच्‍या आहेत आणि दोन्‍ही विमा पॉलिसी हया अरविंदकुमार किसन राऊत यांच्‍या नावाच्‍या असून त्‍यामध्‍ये नामनिेर्देशित व्‍यक्‍ती म्‍हणून त्‍यांचे भाऊ श्री प्रकाश यांचे नाव दर्शविलेले आहे. दोन्‍ही विमा पॉलिसीज अनुक्रमे दिनांक-23.02.2011 आणि 10.02.2011 रोजी काढलेल्‍या असून त्‍यामध्‍ये अनुक्रमे 23.02.2032 आणि 10.02.2032 परिपक्‍वता तिथी दर्शविलेल्‍या आहेत. सदर दोन्‍ही विमा पॉलिसीज हया विरुध्‍दपक्ष विमा कंपनीच्‍या गडचिरोली कार्यालयातून निर्गमित केलेल्‍या आहेत. दोन्‍ही विमा पॉलिसीजचे अर्धवार्षिक हप्‍ते प्रत्‍येकी रुपये-5933/- असे दर्शविलेले आहेत. दोन्‍ही पॉलिसी सुरु असताना विमाधारक श्री अरविंद किसन राऊत यांचा मृत्‍यू दिनांक-29.10.2013 रोजी झालेला आहे.  विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने पान क्रं 77 वर दिनांक-30.12.2015 रोजीचे एक प्रमाणपत्र  दाखल केलेले आहे त्‍यामध्‍ये असे नमुद केलेले आहे की, वादातील दोन्‍ही विमा पॉलिसी हया लॅप्‍स स्थितीत आहेत. विमाधारक श्री अरविंद राऊत यांचा मृत्‍यू दिनांक-29.10.2013 रोजी झालेला असून दोन्‍ही विमा पॉलिसीचे हप्‍ते हे माहे फेब्रुवारी, 2013 पर्यंत भरलेले आहेत त्‍यामुळे विमाधारक श्री अरविंद किसन राऊत यांचे दिनांक-29.10.2013 रोजी दोन्‍ही विमा पॉलिसीज हया लॅप्‍स अवस्‍थेत असल्‍याने विमा राशी देय होत नसल्‍याचे नमुद केले.

09.  ग्राहकमंचाचे मते प्रकरणातील दाखल दस्‍तऐवजां वरुन असे दिसून येते की, विमाधारक श्री अरविंद किसन राऊत यांनी माहे फेब्रुवारी-2013 पूर्वी पर्यंत वादातील दोन्‍ही विमा पॉलिसीजचे हप्‍ते नियमित भरलेले आहेत आणि ही बाब विरुध्‍दपक्ष क्रं 1 भारतीय जीवन बिमा निगम कंपनीला सुध्‍दा मान्‍य आहे. विमाधारक श्री अरविंद किसन राऊत यांचा मृत्‍यू दिनांक-29 ऑक्‍टोंबर, 2013 रोजी झालेला आहे आणि त्‍यांचे मृत्‍यूपूर्वी वादातील दोन्‍ही विमा पॉलिसीपोटी  माहे फेब्रुवारी, 2013 आणि माहे ऑगस्‍ट, 2013 असे दोन अर्धवार्षिक विमा हप्‍ते प्रलंबित होते आणि ही बाब विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीला सुध्‍दा मान्‍य आहे. याचाच अर्थ असा होतो की, वादातील दोन्‍ही विमा पॉलिसीज पोटी माहे फेब्रुवारी, 2013 आणि माहे ऑगस्‍ट, 2013 मध्‍ये दोन अर्धवार्षिक हप्‍ते देय झाल्‍या नंतर दोनच महिन्‍यात काही कारणांमुळे विमाधारक श्री अरविंद किसन राऊत यांचा मृत्‍यू झालेला असल्‍याने काही अपरिहार्य कारणास्‍तव माहे फेब्रुवारी-2013 आणि माहे ऑगस्‍ट, 2013 चे दोन अर्धवार्षिक हप्‍ते विमाधारक श्री अरविंद किसन राऊत हे त्‍यांचे मृत्‍यूपूर्वी भरु शकले नाहीत. विमाधारकाचे मृत्‍यू नंतर त्‍यांची पत्‍नी नामे श्रीमती अर्चना अरविंद राऊत हिने वारसान प्रमाणपत्र मिळविण्‍यासाठी मा.दिवाणी न्‍यायाधिश भंडारा यांचे न्‍यायालयात वादातील दोन्‍ही विमा पॉलिसीची रक्‍कम मिळण्‍यासाठी प्रकरण क्रं 40/2013 दाखल केले होते, त्‍यामध्‍ये विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने वादातील दोन्‍ही पॉलिसीज अनुक्रमे-976828303  आणि 976828649  प्रत्‍येकी रुपये-2,00,000/- रकमेच्‍या लॅप्‍स अवस्‍थेत असल्‍याचे उत्‍तर दाखल केले होते, त्‍यामुळे तक्रारदारांनी सदर वारसान प्रकरणात दिनांक-15.06.2016 रोजी दोन्‍ही वादातील पॉलिसीजची विमाराशी वगळण्‍यासाठी अर्ज दाखल केला होता, तो अर्ज पान क्रं 85 व 86 वर दाखल आहे, त्‍यानुसार मा.दिवाणी न्‍यायालयाने वारसान प्रकरणात योग्‍य ती दुरुस्‍ती करण्‍यासाठीचा आदेश दिनांक-29.07.2016 रोजी पारीत केल्‍याचे सदर अर्जावरील आदेशा वरुन दिसून येते. या सर्व घडामोडी पाहता तक्रारदारांना सर्वप्रथम वादातील दोन्‍ही विमा पॉलिसीज हया लॅप्‍स अवस्‍थेत असल्‍याची बाब ही विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने वारसान प्रकरणात मा. दिवाणी न्‍यायालय, भंडारा यांचे समोर दाखल केलेल्‍या लेखी उत्‍तरावरुन समजली ही बाब स्‍वयंस्‍पष्‍ट आहे.

10.  ग्राहक मंचाचे मते महत्‍वाची बाब अशी आहे की, विमाधारक  श्री अरविंद‍ किसन राऊत यांचा दोन्‍ही वादातील पॉलिसीपोटी माहे फेब्रुवारी-2013 आणि माहे ऑगस्‍ट, 2013 रोजीचे दोन अर्धवार्षिक हप्‍ते प्रलंबित होते व ते त्‍यांनी भरावेत अशी सुचनावजा लेखी नोटीस विरुध्‍दपक्ष विमा कंपनीने विमाधारकाला दिलेली नाही तसेच विमाधारकाचे मृत्‍यू नंतरही मा.दिवाणी न्‍यायाधीश भंडारा यांचे समोरील वारसान प्रकरणात विरुध्‍दपक्ष क्रं 1  विमा कंपनीने लेखी उत्‍तर दाखल करे पर्यन्‍त त्‍यापूर्वी मृतक विमाधारकाचे  वारसदारांना म्‍हणजे तक्रारदारांना प्रलंबित विमा हप्‍त्‍याची रक्‍कम भरण्‍या बाबत लेखी नोटीस दिल्‍याचा पुरावा विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने दाखल केलेला नाही वा तसे विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीचे म्‍हणणे सुध्‍दा नाही. विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनी दोन्‍ही वादातील विमा पॉलिसीज लॅप्‍स होण्‍यापूर्वी लेखी सुचना देऊन वा मृत्‍यू नंतरही लेखी सुचना देऊन पॉलिसी पूर्ववत करु शकली असती परंतु त्‍यांनी तसे केलेले नाही. पॉलिसी लॅप्‍स होणे आणि पॉलिसी रद्य होणे या दोन्‍ही बाबी भिन्‍न भिन्‍न आहेत, लॅप्‍स (व्‍यपगत) झालेली पॉलिसी दंड आकारुन पुर्ववत सुरु करता येते परंतु तसे काहीही या प्रकरणात विरुध्‍दपक्ष              क्रं 1 विमा कंपनीने केलेले नाही तसेच लॅप्‍स पॉलिसी पूर्ववत सुरु करण्‍या करीता नेमकी काय कार्यपध्‍दती व नियम आहेत ते ग्राहक मंचा समोर दाखल केलेले नाहीत. अशाप्रकारे विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने विम्‍यातील अटी व शर्तीचा चुकीचा अर्थ लावून तक्रारदारांना वादातील दोन्‍ही विमाराशी पासून वंचित ठेऊन दोषपूर्ण सेवा दिल्‍याची बाब पुराव्‍यानिशी सिध्‍द होते. वादातील दोन्‍ही विमा पॉलिसीज लॅप्‍स झाल्‍याची बाब मा.दिवाणी न्‍यायाधीश भंडारा यांचे समोरील वारसान प्रकरणात विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने दाखल केलेल्‍या लेखी उत्‍तरा वरुन मृतक विमाधारकाचे वारसदार तक्रारकर्ती क्रं 1 हिला सर्वप्रथम समजल्‍याचे दिसून येते व ही बाब तक्रारकर्तीने पान क्रं 117  व 118 वर दाखल केलेल्‍या शपथपत्रात सुध्‍दा नमुद केलेली आहे.

 

 

11.   तक्रारदारांचे वकीलांनी खालील मा.वरिष्‍ठ न्‍यायालयांचे न्‍यायनिवाडयांवर आपली भिस्‍त ठेवली-

 

1)         1995 (3) Civil LJ 405 Supreme Court-“Shashi Gupta-Verus-LIC & Another.

     Life Insurance Corporations Act, 1956, Section 6-Claim for ex gratia payment-Policy holder of “Double Accident Benefit Policy”-Assassinated by terrorists-Policy lapsed due to nonpayment of their annual payment of its premium-Under , Circular issued by L.I.C., sum assured together with bonus, paid to widow by way of ‘ex-gratia payment’-Further claim for double benefit by dependents-interpretation of circular, favouring  policy holder-Be adopted-Supreme Court directed further payment of Rs.50,000/- to dependents.

 

2)       Distt.Consumer Forum, Bhandara C.C. No.-71/2005, Judgement dated-31st May, 2006-“Smt. Vanita Ashok Lanjewar-Versus-Br.Manager, LIC, Branch Sakoli, Distt. Bhandara”

 

3)     Hon’ble Consumer Disputes Redressal Commisssion, Circuit Bench Nagpur-FA No.-1230/2006 decided on-06.03.2009 “LIC-Versus-Smt.Vanita Ashok Lanjewar.

 

        उपरोक्‍त नमुद मा.सर्वोच्‍च न्‍यायालयाचा न्‍यायनिवाडा हातातील प्रकरणात लागू पडतो असे ग्राहक मंचाचे मत आहे.

 

 

12.   आम्‍ही भारतीय जीवन बिमा निगम  तर्फे बंद पडलेली पॉलिसी पूर्ववत सुरु करण्‍या करीता काय अटी व शर्ती आहेत पाहिल्‍यात, त्‍या अटी व शर्ती खालील प्रमाणे नमुद आहेत.

 

Payment of premium:

 

     A grace period of one month but not less than 30 days will be allowed for payment of yearly, half-yearly or quarterly premiums and 15 days for monthly premiums. If death occurs within this period and before the payment of the premium then due, the Policy will still be valid and the Sum Assured paid after deduction of the said premium as also unpaid premiums failing due before the next anniversary of the Policy.  If the premium is not paid before the expiry of the days of grace,  the Policy lapses.

      If the Policy has not lapsed and the claim is admitted in case of death under a Policy where the mode of Payment of Premium is other than yearly, unpaid premiums, if any, failing due before the next Policy anniversary shall be deducted from the claim amount.

 

 

 

 

Revival of Discontinued Policies:

    If the Policy has lapsed, it may be revived during the life time of the Life Assured, but within a period of 5 years from the date of the first unpaid premium and before the date of maturity, on submission of proof of continued insurability to the satisfaction of the Corporation, and the payment of all arrears of premium together with interest at such rate as may be fixed by the Corporation from time to time compounding half-yearly. The Corporation, reserves the right to accept or decline the revival of discontinued Policy.  The revival of the discontinued Policy shall take effect only after the same is approved by the Corporation and is specifically communicated to the Proposer/Life Assured.  

 

 

     उपरोक्‍त नमुद अटी व शर्तीप्रमाणे बंद पडलेली पॉलिसी भारतीय जीवन बिमा निगमच्‍या पॉलिसी प्रमाणे पुन्‍हा पुर्ववत सुरु करता येते. परंतु अशी बंद असलेली विमा पॉलिसी पूर्ववत सुरु करण्‍यासाठी लेखी सुचना विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने संबधितास देणे आवश्‍यक आहे परंतु तसे काहीही या प्रकरणात घडलेले दिसून येत नाही.

 

 

13.   उपरोक्‍त नमुद बाबीं वरुन स्‍पष्‍ट होते की, मृतक विमाधारक श्री अरविंद किसन राऊत यांचे मृत्‍यू नंतर वादातील दोन्‍ही पॉलिसीज अनुक्रमे-976828303  आणि 976828649 पोटी प्रत्‍येकी रुपये-2,00,000/- प्रमाणे एकूण रुपये-4,00,000/- एवढी रक्‍कम  हिंदु वारसा कायद्या प्रमाणे प्रथम कायदेशीर वारसदार  म्‍हणून तक्रारकर्ती क्रं 1 आणि त.क. क्रं 2 व 3 अनुक्रमे मृतक विमाधारकाचे नात्‍याने पत्‍नी आणि मुले आणि विरुध्‍दपक्ष क्रं 2 मृतक विमाधारकाची आई हे विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनी कडून‍ समप्रमाणात मिळण्‍यास पात्र आहेत आणि सदर विमा रक्‍कम रुपये-4,00,000/- वर  ग्राहक मंचात तक्रार दाखल दिनांक-21.09.2016 पासून ते रकमेच्‍या प्रत्‍यक्ष अदायगी पावेतो वार्षिक-12 टक्‍के दराने व्‍याज समप्रमाणात मिळण्‍यास पात्र आहेत. परंतु अशी विमा रक्‍कम देताना विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनी तक्रारदार क्रं 1 ते 3 आणि विरुध्‍दपक्ष क्रं 2 यांचे कडून समप्रमाणात मृतक विमाधारकाचे वादातील दोन्‍ही पॉलिसीजपोटी विमाधारकाचे मृत्‍यू पर्यंत थकीत असलेली विमा हप्‍त्‍यांची व्‍याज व विलंबशुल्‍कासह येणारी रक्‍कम समायोजित करु शकतील. विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीचे दोषपूर्ण सेवेमुळे तक्रारदारांना झालेल्‍या शारिरीक व मानसिक त्रासा बद्यल रुपये-10,000/- आणि तक्रारीचा खर्च म्‍हणून रुपये-5000/- तक्रारदार विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनी कडून मिळण्‍यास पात्र आहेत असे ग्राहक मंचाचे मत आहे. म्‍हणून आम्‍ही मुद्या क्रं 3 चे उत्‍तर होकारार्थी नोंदवित असून मुद्या क्रं 4 प्रमाणे वर नमुद केल्‍या प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत.

 

14.  उपरोक्‍त नमुद सर्व वस्‍तुस्थितीचा विचार करुन आम्‍ही तक्रारीत खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत-

                :: अंतिम आदेश ::

  1. तक्रारदार क्रं 1 ते  3 अनुक्रमे मृतक विमाधारक श्री अरविंद किसन राऊत यांची पत्‍नी आणि मुले यांची तक्रार विरुध्‍दपक्ष क्रं 1) भारतीय  जीवन बिमा निगम शाखा कार्यालय गडचिरोली तर्फे शाखा व्‍यवस्‍थापक यांचे  विरुध्‍द अंशतः मंजूर करण्‍यात येते.
  1. विरुध्‍दपक्ष क्रं 1 भारतीय जीवन बिमा निगम कंपनीला आदेशित करण्‍यात येते की, त्‍यांनी मृतक विमाधारक श्री अरविंद किसन राऊत यांचे वादातील दोन्‍ही पॉलिसीज अनुक्रमे-976828303  आणि 976828649 पोटी प्रत्‍येकी रुपये-2,00,000/- प्रमाणे एकूण रुपये-4,00,000/- (अक्षरी रुपये चार लक्ष फक्‍त)  एवढी रक्‍कम तक्रारकर्ती क्रं 1 आणि त.क. क्रं 2 व 3 आणि विरुध्‍दपक्ष क्रं 2 यांना समप्रमाणात अदा करावी आणि सदर विमा रक्‍कम रुपये-4,00,000/- वर  ग्राहक मंचात तक्रार दाखल दिनांक-21.09.2016 पासून ते रकमेच्‍या प्रत्‍यक्ष अदायगी पावेतो वार्षिक-12 टक्‍के दराने व्‍याज तक्रारदार क्रं 1 ते 3 आणि विरुध्‍दपक्ष क्रं 2 यांना समप्रमाणात द्यावे. विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनी ही त्‍यांना  मृतक विमाधारकाचे मृत्‍यू पर्यंतचे कालावधी करीता वादातील दोन्‍ही विमा पॉलिसीज पोटी थकीत असलेली विमा हप्‍त्‍यांची व्‍याज व विलंबशुल्‍कासह येणारी रक्‍कम तक्रारदार क्रं 1 ते 3 आणि विरुध्‍दपक्ष क्रं 2 यांचे कडून समप्रमाणात घेऊन समायोजित करु शकतील
  1. विरुध्‍दपक्ष क्रं 1 भारतीय जीवन बिमा निगम कंपनीला आदेशित करण्‍यात येते की,  त्‍यांनी तक्रारदार क्रं 1 ते 3 यांना झालेल्‍या शारिरीक व मानसिक त्रासा बद्यल रुपये-10,000/- (अक्षरी रुपये दहा हजार फक्‍त) आणि तक्रारीचा खर्च रुपये-5000/- (अक्षरी रुपये पाच  हजार फक्‍त) द्यावेत.
  1. सदर आदेशाचे अनुपालन विरुध्‍दपक्ष क्रं 1 भारतीय जीवन बिमा निगम कंपनीने प्रस्‍तुत  निकालपत्राची प्रमाणित प्रत प्राप्‍त झाल्‍याचे दिनांकापासून 30 दिवसांचे आत करावे.
  1. निकालपत्राच्‍या प्रमाणित प्रती उभय पक्षकारांना निःशुल्‍क उपलब्‍ध       करुन देण्‍यात याव्‍यात.
  1. तक्रार ग्राहक मंचात दाखल करण्‍यासाठी झालेला विलंब माफ होण्‍यासाठी तक्रारदारांनी विलंबमाफीसाठी दाखल केलेले किरकोळ प्रकरण क्रं-MA/16/18 हे प्रस्‍तुत ग्राहक तक्रार अंशतः मंजूर झालेली असल्‍याने आपोआपच निकाली निघते.
  1. तक्रारदारांना  “ब” व “क” फाईल्‍स परत करण्‍यात याव्‍यात.
 
 
[HON'BLE MR. BHASKAR B. YOGI]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. VRUSHALI JAGIRDAR]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.