तक्रार दाखल तारीख 18/03/2017
तक्रार निकाली तारीख 28/11/2017
व्दाराः- मा. सौ. सविता प्र. भोसले, अध्यक्षा
1) तक्रारदाराने प्रस्तुत तक्रार अर्ज ग्राहक सरंक्षण कायदा, 1986 चे कलम 12 प्रमाणे दाखल केला आहे. तक्रार अर्जातील थोडक्यात कथन पुढीलप्रमाणे—
यातील तक्रारदार हे चांदे ता. राधानगरी जि. कोल्हापूर येथील कायमस्वरुपी रहिवाशी आहेत. तक्रारदाराची आई मृत्यूपूर्वी शेती हा व्यवसाय करत होती. तिचे नावे 7/12 उतारा आहे. तक्रारदाराचे आईचा विमा वि.प. विमा कंपनीकडे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत शासनामार्फत उतरविला होता. दि. 10/09/2015 रोजी तक्रारदाराची आई धानवडे पैकी चव्हाणवाडी रस्त्यावर पायी चालत असताना पाय घसरुन पडलेने तिच्या डोक्यास मार लागला होता. तिचा दि.11/09/2015 रोजी मृत्यू झाला. तिच्या प्रेताचे शवविच्छेदन सी.पी.आर हॉस्पीटल, कोल्हापूर येथे झालेले आहे. सदर घटनेची नोंद राधानगरी पोलीस ठाणे येथे झालेली आहे. तसेच सदर घटनेचा तपास राधानगरी पोलीसांनी केलेला आहे. तक्रारदाराने आईचा शेतकरी अपघात विमा क्लेम मिळावा म्हणून तालुका कृषी अधिकारी, राधानगरी यांचे माध्यमातून योग्य त्या कागदपत्रांसह विमा प्रस्ताव पाठविलेला होता. तथापि तक्रारदार यांचा विमा प्रस्ताव वेळेत दाखल नाही या कारणावरुन वि.प. ने नाकारलेला आहे म्हणून सदरची तक्रार तक्रारदाराने या मंचात दाखल केली आहे.
2. तक्रारदाराने प्रस्तुतकामी वि.प. विमा कंपनीकडून शेतकरी जनता व्यक्तीगत अपघात विमा योजना या योजनेअंतर्गत विमा क्लेमची रक्कम रु.1,00,000/- (रुपये एक लाख मात्र) द.सा.द.शे. 15 टक्के व्याजदराने क्लेम दाखल तारखेपासून तक्रारदार यांना वि.प. कंपनीकडून अदा करणेबाबत आदेश व्हावेत, मानसिक त्रासापोटी रु.10,000/- व अर्जाचा खर्च, वकील फीसह रक्कम रु.10,000/- वि.प. यांचेकडून वसूल होवून मिळावेत अशी विनंती तक्रारदाराने याकामी केली आहे.
3. तक्रारदाराने प्रस्तुतकामी अॅफिडेव्हीट, नि.5 चे कागदयादीसोबत अ.क्र.1 ते 15 कडे अनुक्रमे विमा प्रस्तावासोबत दिलेले पत्र, विमा क्लेमफॉर्म भाग-1 सोबतचे सहपत्र, गट नं.474 चा 7/12 उतारा, जमीन खाते नं.395 चा 8-अ उतारा, जुनी डायरी उतारा, गावकामगार तलाठी यांनी दिलेला दाखला, यशवंत पाटोळे यांचा मृत्यू दाखला, तक्रारदाराचे प्रतिज्ञापत्र, तक्रारदाराचे आईचे ओळखपत्र, तक्रारदाराचे आईचा मृत्यूचा दाखला, मरणोत्तर पंचनामा, पी.एम.साठी प्रेतासोबत पाठवलेला फॉर्म, सी.पी.आर. हॉस्पीटल यांनी दिलेले मृत्यू प्रमाणपत्र, पी.एम. रिपोर्ट, वि.प. कंपनीने विमा क्लेम नाकारलेचे पत्र, पुराव्याचे शपथपत्र, पुरावा संपलेची पुरसीस व लेखी युक्तिवाद वगैरे कागदपत्रे तक्रारदाराने याकामी दाखल केली आहेत.
4. वि.प. विमा कंपनीने याकामी म्हणणे/कैफियत, कागदयादीसोबत अ.क्र. 1 ते 9 कडे अनुक्रमे महाराष्ट्र शासनासोबतचा त्रिपक्षीय करार, विमा पॉलिसी अटी व शर्ती, तक्रारदाराकडून मिळालेले पत्र, वि.प. ने ब्रोकरला पाठवलेली पत्रे, वि.प. ने महाराष्ट्र सरकारला पाठवलेले पत्र, पुराव्याचे शपथपत्र, पुरावा संपलेची पुरसीस व लेखी युक्तिवाद, वगैरे कागदपत्रे वि.प. ने याकामी दाखल केली आहेत.
5. वि.प. यांनी त्यांचे म्हणणे/कैफियतीमध्ये तक्रारदाराचे तक्रारअर्जातील सर्व कथने फेटाळलेली आहे. त्यांनी तक्रारदाराचे तक्रारअर्जावर पुढीलप्रमाणे आक्षेप नोंदवलेले आहेत.
i) तक्रारदाराचा तक्रारअर्ज व त्यातील कथने मान्य व कबूल नाहीत.
ii) मयताचे नावे शेतजमीन नव्हती तसेच तक्रारदार हे मयताचे कायदेशीर वारस नाहीत, सबब, तक्रारदाराचे वि.प. बरोबर ग्राहक असे नाते नाही. सबब, तक्रारअर्ज चालणेस पात्र नाही.
iii) तक्रारदाराचा विमा प्रस्ताव त्यामध्ये त्रुटी असलेने व मुदतबाहय असलेने कृषी अधिका-याने नाकारला होता. म्हणून तक्रारदाराने दि.26/10/2016 चे पत्राने विमा प्रस्ताव वि.प. कडे पाठवला. तो दि.2/11/2016 रोजी वि.प. ला मिळाला. सदरचा विमा क्लेम मुदतबाहय असलेने दि.11/11/2016 चे पत्राने योग्य कारणासाठी नाकारला आहे. तक्रारदार विमा क्लेम मिळणेस पात्र नाहीत.
iv) तक्रारदाराने दि कमिशनर ऑफ अॅग्रीकल्चर, गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्र, पुणे डिव्हीजन व मे. युनिव्हर्सल इन्शुरन्स ब्रोकर सर्व्हिसेस प्रा.लि. यांना तक्रारीत वि.प. म्हणून सामील केलेले नाही. सबब, सदर तक्रारीस नॉन जॉईंडर ऑफ नेसेसरी पार्टीज या तत्वाची बाधा येते. सबब, सदरची तक्रार चालणेस पात्र नाही.
v) त्रिपक्षीय करार व विमा पॉलिसीतील अटी पाळणे बंधनकारक असते. तसे न केल्यास विमादावा नामंजूर होणेस पात्र ठरतो. सदर पॉलिसी व करारात सर्व अटींचा समावेश आहे. त्रिपक्षीय करार व विमा पॉलिसीमधील शर्तीनुसार पॉलिसीचा कालावधी दि.31/10/2015 ला संपतो व ज्या शेतक-याला क्लेम करावयाचा, त्याने पॉलिसी कालावधीत व त्यानंतर जास्तीत जास्त 90 दिवसापर्यंत म्हणजेच दि.31/01/2016 पर्यंत क्लेम संबंधीत कृषी अधिक्षक अथवा ब्रोकर मार्फत सादर करायचा आहे. तथापि, तक्रारदाराचा क्लेम मुदतबाहय असलेने कृषी अधिकारी यांनी स्वीकारला नव्हता. सबब, तक्रारदाराने स्वतः तक्रारदाराचे आईचे मृत्यूनंतर 1 वर्ष 2 महिन्यांनी सादर केला आहे. तसेच सदर विलंबाचे कोणतेही संयुक्तिक कारण दिलेले नाही. सबब, विमा कंपनीने विलंबाच्या कारणास्तव योग्य कारणास्तव तक्रारदाराचा विमा क्लेम नाकारला आहे.
vi) 7/12 नोंदीवरुन सोनाबाई यांचे नांव शेतकरी म्हणून लागलेले नव्हते, त्यामुळे सोनाबाई या शेतकरी नाहीत. त्यामुळे विमा क्लेमची जबाबदारी विमा कंपनीवर येत नाही. वि.प. कंपनी तक्रारदाराला कोणतीही रक्कम देणे लागत नाहीत. सबब, तक्रारदाराचा तक्रारअर्ज खर्चासह फेटाळणेत यावा असे आक्षेप वि.प. ने तक्रारदाराच्या तक्रारअर्जावर घेतलेले आहेत.
6. वर नमूद तक्रारदार व वि.प. यांनी दाखल केलेल्या सर्व कागदपत्रांचे काळजीपूर्वक अवलोकन करुन मे. मंचाने सदर तक्रार अर्जाचे निराकरणार्थ पुढील मुद्दे विचारात घेतले.
अ. क्र. | मुद्दा | उत्तरे |
1 | तक्रारदार व वि.प. हे नात्याने ग्राहक व सेवापुरवठादार आहेत काय ? | होय. |
2 | वि.प. कंपनीने तक्रारदाराचा क्लेम नाकारुन तक्रारदाराला सदोष सेवा दिली आहे काय ? | होय. |
3 | तक्रारदार वि.प. विमा कंपनीकडून विमाक्लेम व नुकसान भरपाई मिळणेस पात्र आहेत काय ? | होय. |
4 | अंतिम आदेश काय ? | खालील नमूद आदेशाप्रमाणे. |
वि वे च न –
7. वर नमूद मुद्दा क्र.1 ते 3 चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत कारण तक्रारदाराची आई शेतकरी होती. तिचा शासनामार्फत वि.प. विमा कंपनीकडे शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजना या योजनेअंतर्गत विमा उतरविला होता व सदर विम्याचा हप्ता शासनामार्फत वि.प.कडे जमा केला होता. तसेच प्रस्तुत तक्रारदाराची आईचा व्यवसाय शेती होता ही बाब गावकामगार तलाठी मौजे चांदे, ता. राधानगरी यांनी दिले दाखल्यावरुन तसेच तक्रारदाराने दाखल केले उता-यावरुन स्पष्ट होते. वि.प. ने नमूद तक्रारदाराचे आईचा विमा मिळणेसाठी गावकामगार तलाठी यांनी वर नमूद दाखल दिलेचे सदर प्रमाणपत्रात म्हटले आहे. या सर्व कागदपत्रांवरुन तक्रारदाराची आई शेतकरी होती. तिचा विमा शासनाने वि.प.कडे उतरविला होता व सदर विमाधारक आईचे मृत्यूनंतर तक्रारदार हेच तिचे कायदेशीर वारस असलेने तक्रारदार व वि.प. हे नात्याने ग्राहक व सेवापुरवठादार आहेत ही बाब निर्विवादपणे स्पष्ट व सिध्द झाली आहे. सबब, मुद्दा क्र.1 चे उत्तर आम्ही होकारार्थी दिले आहे.
8. वर नमूद मुद्दा क्र.2 चे उत्तर आम्ही होकारार्थी दिले आहे कारण तक्रारदाराने त्याचे आईचे पाय घसरुन रस्त्यावर पडलेने डोक्यास मार लागलेने तिचा मृत्यू झालेनंतर विमाक्लेम सर्व कागदपत्रांसह कृषी अधिकारी, राधानगरी यांचेकडे दाखल केला. परंतु कृषी अधिकारी, राधानगरी यांनी प्रस्तुत विमा प्रस्ताव हा मुदतीत नाही असे कारण सांगून स्वीकारला नाही. सबब, तक्रारदाराने स्वतः सदर विमाक्लेम वि.प. विमा कंपनीकडे पाठवला परंतु वि.प. विमा कंपनीने पुन्हा सदरचा विमा क्लेम मुदतीत दाखल केला नसलेचे कारण देवून नाकारला आहे.
9. वास्तविक वि.प. विमा कंपनीने तक्रारदार यांना विमा दाखल करणेस का उशिर झाला ? याची कारणे तक्रारदाराने वि.प. कडे विमा प्रस्ताव पाठविताना सविस्तरपणे दि. 26/10/16 चे पत्रात दिलेली होती. परंतु प्रस्तुत कारणांचा कोणताही विचार न करता वि.प. विमा कंपनीने, तक्रारदाराचे आईचा विमाक्लेम मुदतीत दाखल केला नाही, हे कारण देवून विमाक्लेम नाकारला/फेटाळलेला आहे. वि.प. यांनी तक्रारदार यांना क्लेम दाखल करणेस झाले उशिराची कारणे जाणून न घेता तक्रारदाराचा विमा क्लेम केवळ उशिरा दाखल केला या कारणाने फेटाळलेला आहे. ही सेवात्रुटीच आहे असे या मंचाचे स्पष्ट मत आहे. प्रस्तुत कामी आम्ही मे. वरिष्ठ न्यायालयाच्या खालील नमूद न्यायानिवाडा व त्यातील दंडकांचा आधार घेतला आहे.
I (2009) CPJ 147
National Insurance Co.Ltd.
Vs.
Asha Jamdar Prasad
Head Note – Consumer Protection Act 1986 – Sec. 2(1)(g) – Insurance - Accidental death – claim repudiated due to delayed filing of claim – complaint allowed by Forum – Hence, appeal – No reasonable opportunity given to widow to explain delay – Widow undergoing mourning period cannot be expected to rush to insurer to lodge claim – Claim submitted on 25/8/2003, repudiated on 18/3/2005 – Delay in rejection of claim highly objectionable – No post-mortem carried out, insistence for post-mortem report unjustified – Voluminous documentary evidence produced to show that insured met with accidental death – Order of Forum upheld.
वर नमूद न्यायनिवाडयांचा ऊहापोह करता विमाक्लेम दाखल करणेस उशिर झाला म्हणून विमा क्लेम फेटाळणे न्यायोचित होणार नाही असा निष्कर्ष मे. वरिष्ठ न्यायालयाने काढलेला आहे. सबब, प्रस्तुत तक्रारदाराचा वि.प. कंपनीने विमाक्लेम उशिरा दाखल केला म्हणून फेटाळलेला आहे आहे, ही सेवात्रुटी असून केवळ विमा क्लेम मुदतीत दाखल केला नाही म्हणून फेटाळणे न्यायोचित होणार नाही असे या मंचाचे स्पष्ट मत आहे.
10. वरील सर्व कागदपत्रे तसेच मे. वरिष्ठ न्यायालयाचा न्यायनिवाडा व त्यामध्ये घालून दिले दंडकांचा ऊहापोह करता याकामी तक्रारदार हे वि.प. विमा कंपनीकडून विमा क्लेम मिळणेस पात्र आहेत असे या मंचाचे स्पष्ट मत आहे. तसेच वि.प. विमा कंपनीने विमाक्लेम नाकारलेचे पत्रामध्ये तक्रारदाराची आई शेतकरी नव्हती तसेच तिचे नांव 7/12 उता-यास अगर मिळकतीचे उता-यास लागलेले नाही, त्यामुळे क्लेम देता येत नाही असे कुठेही नमूद केलेले नाही. त्यामुळे आता तक्रारदाराचे आईचे नांव 7/12 उता-यावर व मिळकत पत्रिकेत नाही हे कारण बचाव म्हणून वापरता येणार नाही असे या मंचाचे स्पष्ट मत आहे.
11. सबब, तक्रारदार हे वि.प. विमा कंपनीकडून विमा क्लेमची रक्कम रु.1,00,000/- (रुपये एक लाख फक्त) विमा नाकारलेपासून रक्कम हाती पडेपर्यंत द.सा.द.शे. 10 टक्के व्याजदराने वसूल होवून मिळणेस तसेच मानसिक त्रासापोटी रक्कम रु.10,000/- व वकील फी व तक्रारअर्जाचे खर्चापोटी रक्कम रु.10,000/- वि.प. विमा कंपनीकडून वसूल होवून मिळणेस पात्र आहेत या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. सबब, प्रस्तुत कामी आम्ही पुढीलप्रमाणे अंतिम आदेश पारीत करीत आहोत.
- आ दे श -
1) तक्रारदाराचा तक्रार अर्ज अंशत: मंजूर करणेत येतो.
2) वि.प. विमा कंपनीने तक्रारदाराला विमा क्लेमपोटी रक्कम रु.1,00,000/- (रक्कम रुपये एक लाख मात्र) अदा करावेत. प्रस्तुत विमा रकमेवर विमा क्लेम नाकारले तारखेपासून रक्कम प्रत्यक्ष तक्रारदाराचे हाती पडेपर्यंत द.सा.द.शे. 10% व्याज वि.प. कंपनीने तक्रारदाराला अदा करावे.
3) मानसिक त्रासापोटी रक्कम रु. 10,000/- (रक्कम रुपये दहा हजार मात्र) तसेच वकील फी व अर्जाचे खर्चापोटी रक्कम रु.10,000/- (रक्कम रुपये दहा हजार मात्र) वि.प.कंपनीने तक्रारदाराला अदा करावेत.
4) वर नमूद सर्व आदेशांची पुर्तता वि.प. विमा कंपनीने आदेश पारीत तारखेपासून 45 दिवसांत करावी.
5) विहीत मुदतीत आदेशांची पुर्तता न केलेस ग्राहक सरंक्षण कायदा, 1986 कलम 25 व 27 प्रमाणे वि.प. विरुध्द कारवाई करणेची मुभा तक्रारदाराला देणेत येते.
6) आदेशाच्या सत्यप्रती उभय पक्षकारांना विनामुल्य पाठवाव्यात.