ग्राहक तक्रार क्र. 15/2013
दाखल तारीख : 01/03/2013
निकाल तारीख : 02/07/2015
कालावधी: 02 वर्षे 04 महिने 01 दिवस
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद
1. अजमोद्दीन शब्बीर शेख,
वय - 35 वर्षे, धंदा – व्यवसाय,
रा.पोहणेर, ता.जि. उस्मानाबाद. ....तक्रारदार
वि रु ध्द
1. शाखा व्यवस्थापक,
इकबाल आलम पठाण,
द. न्यू इंडिया अॅश्युरन्स कंपनी, शिवाजी चौक,
नाईक निवास, उस्मानाबाद ता. व जि. उस्मानाबाद. ..विरुध्द पक्षकार
कोरम : 1) मा.श्री.एम.व्ही.कुलकर्णी, अध्यक्ष.
2) मा.श्रीमती विद्युलता जे.दलभंजन. सदस्या.
3) मा.श्री.मुकुंद बी.सस्ते, सदस्य.
तक्रारदारांतर्फे विधीज्ञ : श्री.ए.पी.फडकूले.
विरुध्द पक्षकारातर्फे विधीज्ञ : श्री.एस.पी.दानवे.
न्यायनिर्णय
मा. अध्यक्ष श्री.एम.व्ही.कुलकर्णी यांचे व्दारा:
अ) आपल्या इंडीका गाडीचा विरुध्द पक्षकार (विप) विमा कंपनीकडे चोरी व अपघाती दुरुस्ती बद्दल विमा उतरविला असताना गाडी चोरी गेल्यानंतर व त्यानंतर नादुरुस्त अवस्थेत सापडल्यानंतर दुरुस्तीबद्दल भरपाई देण्यास नकार देऊन विप ने सेवेत त्रूटी केली म्हणून भरपाई मिळणेसाठी तक्रारकर्ता (तक) ने ही तक्रार दिलेली आहे.
तक चे तक्रारीतील कथन थोडक्यात पुढीलप्रमाणे आहे.
1. टाटा इंडिका कार नंबर एम.एच.-25-बी-895 या गाडीचा तक मालक आहे. विप कडे गाडीचा विमा दि.28.1.2012 ते 27.01.2013 या कालावधीसाठी घेतला. त्यांचा पॉलिसी नंबर 15130531110100002787 असा आहे. तक सदरची गाडी टूरिस्ट वाहन म्हणून वापरत होता. त्यासाठी आवश्यक तो परवाना काढलेला होता. दि.10.09.2012 रोजी तक ने आपली गाडी सदाशिव पेठ लोकमान्य पोस्ट ऑफिस शेजारी उभी केली. दि.11.09.2012 रोजी तक ला गाडी आढळून आली नाही. तक पोलिस स्टेशन मध्ये तक्रार देण्यासाठी गेला. तेथील कर्मचा-याने सांगितले की गाडी आर.टी.ओ. अगर पोलिसांनी नेली असेल त्यांचा शोध घ्यावा. तक ला गाडी मिळून आली नाही. दि.17.09.2012 रोजी तक ने त्याबद्दलची तक्रार विश्रामबाग पोलिस स्टेशनला दिली गु.र.264/2012 ने कलम 379, भा.द.वि. खाली गुन्हा नोंदला गेला.
2. दि.18.09.2012 रोजी हवालदार देसाई यांचा तक ला फोन आला. त्याप्रमाणे तक ची गाडी भरेकरवाडी, मुठा गाव, पुणे येथे सापडली होती. ती गाडी क्रेंन ने उचलून पेरुगेट पोलिस चौकी येथे आणली होती. तक दि.190.09.2012 रोजी त्या पोलिस चौकीकडे गेला. त्यांला आढळून आले की, गाडीची बॅटरी, उजव्या बाजूचे पुढचे व मागचे टायर, स्टेफनी, पाने व टेप गाडीतून नाहीसे झाले आहेत.
3. तक ने विप ला घटने बद्दल कळवले. विप चा सर्व्हेअर श्रीकांत यांने गाडीची तपासणी केली व अहवाल दिला. त्यानंतर तक ला गाडीचा ताबा मिळाला. विप चे सूचनेप्रमाणे सर्व कागदपत्रे व इस्टीमेंटसह विप कडे क्लेम दाखल केला व रु.2,50,000/- ची मागणी केली. तक ला गाडी पार्क केल्या ठिकाणचे भाडे प्रतिदिन रु.200/- द्यावे लागत आहे. त्यांच्याकडे उपजिवीकेचे साधन नाही. त्यांचे कूटूंबावर उपासमारीची वेळ आलेली आहे. त्यामुळे तक ला दुरुस्ती खर्च रु.2,50,000/- मानसिक त्रासापोटी रु.10,000/- व पार्कीग भाडेसाठी रु.40,000/- मिळावेत म्हणून ही तक्रार दि.01.03.2013 रोजी दाखल केलेली आहे.
4. तक्रारीत सोबत तक ने विप कडे दि.14.01.2013 रोजी दिलेल्या अर्जाची प्रत, दि.17.09.2012 रोजीचे एफ.आय.आर. ची प्रत, आर.सी. बूकाची प्रत, टॅक्स पावती, कव्हर नोटची प्रत, टूरिस्ट परमिट, दि.20.09.2012 रोजीचे पंचनाम्याची प्रत, विप कडे दिलेले अर्जाची प्रत, डि.बी.अॅटो कडील दुरुस्तीचे एस्टीमेट, विप चे दि.27.12.2012 चे पत्र, इत्यादी कागदपत्रे हजर केली आहेत.
ब) विप यांनी हजर होऊन दि.04.06.2014 रोजी लेखी म्हणणे दाखल केलेले आहे. विप चे म्हणणे आहे की, तक ने आपली कार सार्वजनिक ठिकाणी तिचे सुरक्षेबाबत काळजी न घेता ठेवली व तो निघून गेला. गाडी गेल्याबद्दलची तक्रार त्याबद्दलचा मजकूर खोटा व संदिग्ध आहे अशी तक्रार नोंदवणे पोलिसांना बंधनकारक आहे. अधिकृत पार्कीग मधून पोलिस अगर आर.टी.ओ. यांनी कार नेण्याचा प्रश्न उदभवत नाही. दि.17.09.2012 रोजी विश्रामबाग पोलिसांकडे दिलेल्या तथाकथीत तक्रारीची प्रत हजर करणे हेतूतः टाळलेले आहे. हवालदार देसाई यांनी फोन करुन गाडी सापडल्याचे कळविले व क्रेनने उचलून गाडी पेरुगेट चौकीत आणली हे अमान्य आहे. दि.20.09.2012 चे पोलिस पंचनाम्यानुसार पौड पोलिस स्टेशन डायरी एंट्री क्र.14/12 दि.20.09.2012 अन्वये त्या पोलिस स्टेशनचे हद्दीत इंडीका कार पलटी झालेल्या अवस्थेत आढळली होती त्यामुळे दि.18 किंवा 19 तारखेला पेरुगेट पोलिसचौकी मध्ये कार आढळण्याचा प्रश्न उदभवत नाही. डि.बी. ऑटो कडील एस्टीमेट चुकीचे आहे. तक ला पार्कीगचे भाडे रोज रु.200/- द्यावे लागते हे अमान्य आहे. दि.25.03.2013 चे रजिस्टर पत्राने विप ने तक चा दावा अमान्य केल्याचे कळविले आहे. पॉलिसीचे अट क्र.5 प्रमाणे विप ने तक चा दावा अमान्य केलेला आहे. सर्व कागदपत्राची छाननी करुन विप ने दावा नामंजूर केला आहे. त्यामुळे तक ची तक्रार रद्द होण्यास पात्र आहे. पॉलिसीचे कागदपत्र स्पॉट सर्व्हे रिपोर्ट, फायनल सर्व्हे रिपोर्ट, इत्यादी कागदपत्रे विप ने हजर केली आहेत. तसेच विश्रामबाग पोलिस स्टेशनकडील कागदपत्र विप ने हजर केली आहेत.
क) तक ची तक्रार, व विप चे म्हणणे तसेच त्यांनी दाखल कलेली कागदपत्रे यांचे अवलोकन करता आमचे विचारार्थ खालील मुद्दे निघतात व त्यांची उत्तरे आम्ही त्यांच्यासमोर खाली दिलेल्या कारणांसाठी लिहिली आहेत.
मुद्दे उत्तरे
- विप ने सेवेत त्रुटी केली आहे काय ? नाही.
- तक अनुतोषास पात्र आहे काय ? नाही.
- आदेश काय ? अंतिम आदेशाप्रमाणे
ड) कारणमिमांसा
मुद्दा क्र.1 व 2 :
1. तक ने तक्रारीत म्हटले की, त्यांने दि.10.09.2012 रोजी आपली इंडीका गाडी सदाशीव पेठ लोकमान्य नगर, पोष्टाशेजारी उभी केली. ती गाडी पुणे येथे होती याचा उल्लेख केलेला नाही. तक हा पोहनेर ता.जि. उस्मानाबादचा रहीवासी आहे व गाडीचे रजिस्ट्रेशन उस्मानाबाद येथे झालेले आहे. गाडी टूरिस्ट व्हेईकल आहे याबाबत परवाना काढलेला आहे. म्हणजेच प्रस्तूत वेळी गाडी उस्मानाबाद येथून निघून पुणे येथे गेलेली असणार. गाडी टूरिस्ट घेऊन गेली किंवा आणखी कोणत्या कारणाने गेली याबाबत खूलासा केलेला नाही. तसेच तक स्वतःच गाडीचा चालक होता असेही म्हटलेले नाही. गाडी नमूद ठिकाणी का ठेवण्यात आली याचा खुलासा नाही. गाडी ठेवल्यानंतर तक कूठे गेला याचाही खुलासा नाही. फक्त असे म्हटले की, दुस-या दिवशी गाडी नमूद ठिकाणी आढळून आली नाही. त्यानंतर कोणत्या पोलिस ठाण्यात तक गेला त्याचे नांव दिले नाही. पोलिस कर्मचा-याने तुमची गाडी पार्कीग मधून आर.टी.ओ. अगर पोलिसांने नेली असेल असे म्हटल्याचे लिहीले आहे. गाडी कोणत्या पार्कीग मध्ये होती यांचा खुलासा नाही. पार्कीग मधील कर्मचा-याला का विचारणा केली नाही हे ही समजून येत नाही. गाडी प्रायव्हेट ठिकाणी सोडून दिली असल्याचे दिसून येत आहे.
2. तक चे म्हणणे की, नंतर दि.17.09.2012 रोजी त्यांनी विश्रामबाग पुणे पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली. त्या एफ. आय. आर. ची प्रत हजर करण्यात आलेली आहे. गाडी रस्त्यावर ठेवली होती असे नमूद करण्यात आले आहे. त्यानंतर दि.20.09.2012 रोजी मुठा ता.मुळशी जि.पुणे येथे पंचनामा केला त्यांची प्रत हजर केली आहे. त्याप्रमाणे पौड पोलिस ठाणे डायरी इंन्ट्री नंबर 14/12 दि.20.09.2012 प्रमाणे पोलिस पाटील मोहोळ यांनी कळविले की, गाडी बेवारस स्थितीत पडलेली दिसते. मूठा रोडवर पाण्याचे ओहळात पलटी झालेली गाडी आढळून आलेली होती. गाडीचे अंदाजे रु.1,25,000/- नुकसान दिलेले आहे. पौड पोलिस स्टेशनचे हेड कॉन्सटेबलचे समक्ष पंचनामा केल्याचे दिसते. त्यांचे नांव देसाई असल्याचे दिसते. विप ने पौड पोलिस स्टेशन डायरी इंन्ट्री नंबर 14/12 ची प्रत हजर केल्याचे दिसते. ती प्रत अस्पष्ट असून मोटार सायकल चोरी बद्दलची नोंद दिसून येते. एफ.आयआर नंबर 277/12 ची प्रत असून त्या गुन्हयाचा प्रस्तूत गुन्हयाशी काहीही संबंध दिसून येत नाही. विश्रामबाग पोलिस ठाण्याकडे गु.रं.261/12 ने दि.17.09.2012 रोजी तक ची फिर्याद नोंदवल्याचे दिसते. मात्र दि.20.09.2012 च्या पंचनाम्याप्रमाणे पौड पोलिस स्टेशन येथे वादातील गाडी पाण्याचे ओढयात पलटी झालेली आढळून आली. तो पंचनामा दूपारी 3 ते 4 या वेळेत करण्यात आला. पौड पोलिस स्टेशन डायरी इंन्ट्री नंबर 1412 त्यांच दिवशी करण्यात आली. त्यामुळे तक चे म्हणणे की, दि.18.09.2012 रोजी हवालदार देसाई यांनी गाडी सापडल्याचे कळवून पेरुगेट पोलिस चौकी येथे नेल्याचे कळविले हे सत्य मानता येत नाही. गाडी सापडल्यानंतर ती पौड पोलिस स्टेशन मार्फत विश्रामबाग पेालिस स्टेशन कडे जायला पाहिजे होती. त्यानंतर विश्रामबाग पोलिस ठाण्यामार्फत सीआरपीसी कलम 173 खाली योग्य तो अहवाल न्यायदंडाधिकारी यांचेकडे दाखल व्हायला पाहिजे. विप ने न्यायदंडाधिकारी यांचेकडील केस स्टेटस नेट वरुन काढून हजर केल्याचे दिसते. मात्र ते प्रस्तूत गुन्हयाशी संबंधीत असल्या बद्दल खात्रीने सांगता येत नाही. काहीही असले तरी गाडी ही गुन्हयातील मुद्देमाल असल्यामुळे न्यायदंडाधिकारी यांचेकडूनच गाडीचा ताबा तक ने मागायला पाहिजे होता. गाडी सापडल्याबद्दल केव्हा कळाले याबद्दल तक चे कथन अयोग्य दिसून येते.
3. तक ने डी.बी. ऑटो यांचेकडून एस्टीमेट मिळविले ते रु.2,01,000/- चे आहे. पंचनाम्याप्रमाणे गाडीची किंमत रु.1,25,000/- होती. विमा पॉलिसी प्रमाणे गाडीची किंमत रु.2,01,000/- होती. डि.बी. ऑटो यांचेशी संगनमत करुन तक ने जास्तीत जास्त पैसे मिळविण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून येते.
4. हे खरे आहे की, तक ने दि.17.09.2012 रोजी विश्रामबाग पोलिस ठाण्यामध्ये गाडी चोरीची फिर्याद नोंदली. गाडीची चोरी दि.10.09.2012 ते 11.09.2012 चे दरम्यान झाल्याचे म्हटले आहे. फिर्याद देण्यास झालेल्या उशिराबद्दल तक चे म्हणणे की, त्याआधी पोलिस ठाण्यामध्ये त्यांची फिर्याद घेण्यात आली नाही. ते त्यांचे कथन मोघम स्वरुपाचे आहे. तथापि, गाडी दि.20.09.2012 रोजी मुठा बहूली रस्त्यावर भरेकरवाडी येथे पाण्याचे ओहळात पलटी झालेल्या स्थितीत आढळून आली होती. या प्रकरणी न्यायदंडाधिकारी यांचेकडे कोणता अहवाल दाखल झाला. याबद्दल तक ने खुलासा केलेला नाही. तक चे म्हणणे की, गाडीचा ताबा मिळाला परंतु केव्हा याबद्दल खुलासा नाही.
5. विश्रामबाग पोलिस स्टेशन मध्ये दि.17.9.2012 रोजी चोरीची फिर्याद तक ने दिली व दि.20.9.2012 रोजी गाडी पौड पोलिस स्टेशनच्या हद्दीत सापडली. म्हणून असे म्हणता येईल की, गाडीची खरोखरच चोरी झाली होती. विप चे म्हणणे प्रमाणे हा संपूर्ण तक चा बनाव आहे. तथापि, गाडी टाकलेल्या अवस्थेत मिळून आली असे दिसून येत आहे. यामुळे गाडी चोरीस गेली असे मानता येईल.
6. विप चे बचावाचा मुख्य मुद्दा आहे की, तक ने गाडी निष्काळजीपणाने सोडलेली होती. विप ने पॉलिसी कागदपत्र हजर केले आहेत. त्यामध्ये नमूद आहे की, विमाधारकाने वाहनाच्या सुरक्षेची संपूर्ण काळजी घेतली पाहिजे तसेच ते कोठेही टाकून नाही दिले पाहिजे. विप चे म्हणणे की प्रसतूत प्रकरणी तक ने आपले वाहन व्यवस्थित काळजीपूर्वक न ठेवता टाकून दिले व त्यामुळे विप ची कोणतही जबाबदारी येत नाही.
7. विप तर्फे खालील केस लॉ चा आधार घेण्यात आला आहे.
एक्सपोर्ट क्रेडीट गॅरंटी कार्पारेशन वि गर्ग सन्स, II 2013, सी.पी.जे. पान 1 सूप्रिम कोर्ट तेथे म्हंटले होते की, न्यायालयाला पक्षकारामधील करारामध्ये बदल करता येणार नाही. 2) कमल कुमार पाटीवाल वि. नॅशनल इन्शुरन्स I (2014) (P) नॅशनल कमीशन तेथे गाडी चोरीला गेली होती. ड्रायव्हरचे म्हणणे होते की, त्यांला काही तरी खायला देऊन बेशुध्द करण्यात आले ते म्हणणे न पटण्यासारखे होते म्हणून विमा दावा नाकारला ते योग्य ठरवले आहे. 3) न्यू इंडिया अॅश्युरन्स कंपनी विरुध्द त्रिलोचन IV (2012) सी.पी.जे. 441, नॅशनल कमीशन, तेथे म्हटले आहे की, कराराप्रमाणे गाडी चोरीची फिर्याद ताबडतोब दिली पाहिजे. ताबडतोब यांचा अर्थ 24 तास असा धरलेला आहे. नऊ दिवसांने विमा कंपनीला कळविले तो करारांचा भंग होतो असे धरलेले आहे.
8. प्रस्तूत प्रकरणात सुध्दा तक ने चोरीची घटना पोलिसांना अगर विप ला ताबडतोब कळविली नाही. त्याचप्रमाणे गाडी ही कोठे तरी टाकून दिली. त्यामुळे विम्यातील शर्तीचा भंग झाल्यामुळे विप ने विमा दावा नाकारुन सेवेत त्रूटी केली असे म्हणता येणार नाही. तक अनुतोषास पात्र नाही. म्हणून मूद्दा क्र.1 व 2 चे उत्तर नकारार्थी देत आहोत व खालीलप्रमाणे आदेश करीत आहोत.
आदेश
1) तक ची तक्रार रद्द करण्यात येते.
2) खर्चाबद्दल कोणतेही आदेश नाहीत.
3) ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे अधिनियम 2005 मधील कलम 20 (3) प्रमाणे तक्रारीतील सदस्यांचे संच तक्रारदाराला परत करावेत.
4) उभय पक्षकारांना आदेशाच्या प्रमाणित प्रती निशु:ल्क देण्यात याव्यात.
(श्री. एम.व्ही. कुलकर्णी)
अध्यक्ष
(श्री.मुकूंद.बी.सस्ते) (सौ.विद्युलता जे.दलभंजन)
सदस्य सदस्या
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद.