(द्वारा- श्रीमती रेखा कापडिया, सदस्य) अर्जदाराने गैरअर्जदार यांच्याकडे वटविण्यासाठी पाठविलेले धनादेश न वटता उशिरा परत आल्यामुळे झालेल्या नुकसान भरपाईसाठी मंचात तक्रार दाखल केली आहे. अर्जदाराने दाखल केलेल्या तक्रारीनुसार त्यांचा वाळूज एम.आय.डी.सी., जिल्हा औरंगाबाद येथे पर्ल मार्केटींग सर्व्हिसेस, नावाने व्यवसाय आहे. मे.जे.सी.पी.एल जळगाव या संस्थेतर्फे त्यांना काही धनादेश देण्यात आले होते, जे त्यांनी औरंगाबाद येथील, त्यांचे खाते असलेल्या जनता सहकारी बँक, तसेच सारस्वत सहकारी बँक येथे वटविण्यासाठी जमा केले. सदरील धनादेश गैरअर्जदार यांनी दोन महिन्याच्या कालावधीनंतर ‘Funds Insufficient’ म्हणून परत पाठविले. गैरअर्जदार यांनी रिझर्व बँकेच्या मार्गदर्शक तत्वानुसार सदरील धनादेश हे 15 दिवसाच्या आत परत पाठविणे अपेक्षित होते. गैरअर्जदार यांनी केलेल्या विलंबामुळे अर्जदाराने त्यांना नुकसान भरपाई देण्याबाबत कायदेशिर नोटीस पाठविली, पण गैरअर्जदार यांनी त्याची दखल न घेतल्यामुळे अर्जदाराने मंचात तक्रार दाखल केली असून, नुकसान भरपाईची मागणी केली आहे. गैरअर्जदार क्र.1 व 2 यांच्यातर्फे दाखल करण्यात आलेल्या जवाबानुसार अर्जदार हे त्यांचे ग्राहक नसल्याचे म्हटले आहे. तसेच अर्जदाराने, ज्या बँकेत धनादेश वटविण्यासाठी जमा केले, त्यांना प्रतिवादी केले नसल्याचे म्हटले आहे. अर्जदाराने दाखल केलेली तक्रार चुकीची असून, कायद्यानुसार योग्य नाही. दोन्ही बाजूकडून मंचात दाखल करण्यात आलेल्या कागदपत्रांवरुन व सुनावणीवरुन असे आढळून येते की, मे.जे.सी.पी.एल, या जळगाव येथील संस्थेतर्फे व्यावसायिक व्यवहाराबददल अर्जदारास धनादेश देण्यात आले होते, अर्जदाराने सदरील धनादेश औरंगाबाद येथील सारस्वत सहकारी बँक, येथे वटविण्यासाठी जमा केले. सदरील धनादेश गैरअर्जदार यांनी न वटविता उशिरा परत पाठविल्यामुळे अर्जदाराने नुकसान भरपाई देण्याची मागणी तक्रारीमध्ये केली आहे. अर्जदाराने आपल्या तक्रारीमध्ये सदरील धनादेश कोणत्या तारखेस, स्वतःच्या बँकेत वटविण्यासाठी जमा केले आहेत याचा उल्लेख केलेला नाही. त्यामुळे झालेल्या विलंबास गैरअर्जदार जवाबदार आहेत असे म्हणता येणार नाही. रिझर्व बँक ऑफ इंडियाच्या मार्गदर्शक तत्वानुसार ज्या बँकेत धनादेश जमा केले जातात, त्या बँकेस विलंबापोटी जवाबदार धरले जाते व त्या बँकेकडून विलंबापोटी व्याज देण्याचा नियम आहे. अर्जदाराने या प्रकरणात सारस्वत सहकारी बँकेस प्रतिवादी करणे अपेक्षित होते. वरील सर्व निरीक्षणावरुन गैरअर्जदार यांचा या प्रकरणात दोष आढळून येत नाही. आदेश 1) अर्जदाराची तक्रार खारीज करण्यात येत आहे. श्रीमती रेखा कापडिया श्रीमती अंजली देशमुख, सदस्य अध्यक्ष
| [ Smt.Rekha Kapadiya] MEMBER[ Smt. Anjali L. Deshmukh] PRESIDENT | |