जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,नांदेड. प्रकरण क्रमांक :- 2009/283 प्रकरण दाखल तारीख - 23/12/2009 प्रकरण निकाल तारीख – 02/03/2010 समक्ष – मा.श्री. बी.टी.नरवाडे पाटील, - अध्यक्ष मा.श्री.सतीश सामते. - सदस्य अनुष्का भ्र.अकाशराव मांजरमकर, वय 35 वर्षे, धंदा मेडीकल प्रॅक्टीशनर, अर्जदार. रा.बळीरामपुर, नांदेड. विरुध्द. शाखा व्यवस्थापक, भारती जिवन विमा निगम, गैरअर्जदार. मुख्य शाखा कार्यालय, हॉटेल चंद्रलोक जवळ, हिंगोली नाकार जवळ,नांदेड. अर्जदारा तर्फे वकील - अड.ए.व्ही.चौधरी. गैरअर्जदार तर्फे वकील - अड.व्हि.व्हि.नांदेडकर. निकालपत्र (द्वारा- मा.श्री.सतीश सामते,सदस्य) गैरअर्जदार भारतीय जिवन विमा निगम यांनी अर्जदाराच्या मयत पतीचे पॉलिसी क्र.983398901 अंतर्गत मिळणारी रक्कम रु.5,00,000/- पतीच्या मृत्युनंतर न देऊन सेवेत त्रुटी केली आहे. म्हणुन ती रक्कम 18 टक्के व्याजासह देण्यात यावे तसेच नुकसान भरपाई व मानसिक त्रासा पोटी रु.50,000/- मिळावेत व दावा खर्च रु.5,000/- मिळावेत अशा मागणीसाठी सदरील तक्रार नोंदविली आहे. अर्जदाराच्या पतीने गैरअर्जदार यांचेकडे दि.15/07/2006 रोजी रु.5,00,000/- ची पॉलिसी काढली होती. ज्यासाठी मासीक हप्ता म्हणुन रु.3,037/- दर महिन्याच्या 15 तारखेपर्यंत भरावयाचे होते. दि.18/05/2008 रोजी अर्जदार यांचे पती त्यांच्या स्वतःच्या स्कुटीवर अपघात होऊन एका भरधाव ट्रकने धडक दिल्यामुळे त्यात त्यांचा मृत्यु झाला. अर्जदार हे कबुल करतात की, त्यांचा शेवटचा हप्ता दि.15/05/2008 या तारखेपर्यंत भरावयाचा होता व त्यासाठी एक महीन्याचा ग्रेस पिरीअड त्यांना देण्यात आला होता. पॉलिसीच्या हप्त्याची रक्कम भरण्यापुर्वी म्हणजे दि.17/05/2008 ला मयत अकाशराव मांजरमकर यांचा मृत्यु झाला. अर्जदार यांचे म्हणणे असे की, वेळेत हप्ता जरी नाही भरला तरी तो सहा महिन्यापर्यंत हप्ता भरु शकतो असे असतांना पॉलिसी लॅप्स झाली म्हणुन गैरअर्जदारांनी क्लेम नाकारला जे की, चुक असुन एका विधवा महिलेस त्यांच्या मुला बाळांच्या पालनपोशनासाठी सदरील रक्कम मिळणे आवश्यक आहे. म्हणुन वरील मागणीसाठी तक्रारअर्ज दाखल केलेला आहे. गैरअर्जदार यांनी वकीला मार्फत हजर झाले त्यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केले आहे. अर्जदाराने प्रकरणांची पुर्ण माहीती न घेता प्रकरण दाखल केलेले आहे जे की, खारीज होणे योग्य आहे. पॉलिसी दि.15/07/2006 रोजी काढलेली होती त्यामध्ये देय असलेला हप्ता भरण्याची मुदतीनंतर ही रक्कम न भरल्या कारणाने पॉलिसी बंद अवस्थेत गेली. अर्जदाराचे रु.5,00,000/- व्याजासह मिळण्याची मागणी गैरअर्जदाराने सेवेत कुठेही त्रुटी केली नाही म्हणुन मागणी करण्याचा अधिकार नव्हता. मयत व्यक्ति असुशिक्षीत नव्हती तर ती व्यवसायाने डॉक्टर होती. त्यांना विम्याचे नियमाबद्यल पुर्ण माहीती होती. प्रत्येक पॉलिसीवर नामनिर्देशीत व्यक्तिचे नांव असते व रक्कम देय असेल तर ती नक्कीच दिले जाते. अर्जदाराने हप्त्याची रक्कम हीमृत्यु होण्यापुर्वी वेळेवर भरले आहे, ही बाब खोटी व चुक आहे. विम्याच्या हप्त्याची रक्कम भरण्याची मुदत ही एप्रिल 2008 रोजी आहे व त्यासाठी एक महिन्याचा ग्रेस पिरीयड होता हा दि.14/05/2008 रोजी संपला व यानंतर दोनच दिवसांनी म्हणजे दि.17/05/2008 रोजी विमाधारक यांचा मृत्यु झाला म्हणजे सदर पॉलिसी ही त्यावेळेस लॅप्स झाली होती. अर्जदाराने त्रैमासीक हप्ते सहा महिन्यापर्यंत भरु शकतो हे म्हणणे खोटे व चुक आहे, पॉलिसी ही बंद अवस्थेत गेल्यामुळे पॉलिसी करारातील अट क्र.5 नुसार विशेष परिस्थितीमध्ये जी रक्कम फॉरफिचर होते त्या प्रकारामध्ये ही पॉलिसी मोडत असल्यामुळे सदर पॉलिसीमध्ये कोणतीही रक्कम देय नव्हते. अर्जदाराने मुद्यामहुन हे प्रकरण दाखल केले असुन ती रु.10,000/- खर्चासह खारीज करण्यात यावी असे म्हटले आहे. अर्जदाराने पुरावा म्हणुन आपले शपथपत्र दाखल केले तसेच गैरअर्जदार यांनी पुरावा म्हणुन आपले शपथपत्र दाखल केले. दोन्ही पक्षकार यांनी दाखल केलेले दस्तऐवज बारकाईने तपासुन व वकीला मार्फत केलेला युक्तीवाद ऐकुन खालील मुद्ये उपस्थित होतात. मुद्ये. उत्तर. 1. गैरअर्जदार यांच्या सेवेतील त्रुटी दिसुन येते का? नाही. 2. काय आदेश? अंतीम आदेशा प्रमाणे. कारणे. मुद्या क्र.1 गैरअर्जदारांनी पॉलिसी क्र.983398901 दाखल केले असुन ज्याची किंमत रु.2,00,000/- आहे ही पॉलिसी दि.15/07/2006 रोजी काढलेले असुन त्रैमासीक विम्याचा हप्ता भरणे ज्या जानेवारी, एप्रिल, जुलै या महिन्याचे हप्ते भरण्याचे होते. गैरअर्जदाराने पॉलिसीचे नियम तक्रारीसोबत दाखल केलेले आहे, यात अतीशय सरळ साधी गोष्ट अशी आहे की, अर्जदाराने हप्त्याची रक्कम रु.3,00,037/- ही दि.15/04/2007 ला डयु होती व ग्रेस पिरीयड 30 दिवसांचा नियमाप्रमाणे त्यांना मिळत होता. म्हणजे त्यांना हप्ता भरण्याची शेवटची तारीख दि.15/05/2008 अशी होती परंतु मयत विमाधारक यांनी त्या तारखेपर्यंत हप्ता भरलेला नव्हता व दुर्दैवाने दि.17/05/2008 रोजी त्यांचा अपघाती मृत्यु झाला. यानंतर पोलिस स्टेशन सिडको यांचा एफ.आय.आर. क्र. 140/08 या गुन्हान्वये नोंद आहे. पॉलिसी क्र.983398901 या पॉलिसीच्या मागे जे नियम दिलेले आहेत या नियम क्र.5 नुसार ग्रेस पिरीयडनंतर विमा हप्त्याची रक्कम भरली नसल्या कारणाने ही पॉलिसी लॅप्स झाली व विशेष परिस्थीतीमध्ये ही रक्कम फॉरफिचर होते त्यामुळे गैरअर्जदार यांच्या वरची जबाबदारी निघुन गेली, या नियमा अंतर्गत गैरअर्जदारांनी पॉलिसीची रक्कम देण्यास नकार दिला ही त्यांनी केलेली कार्यवाही योग्य असणे याला सेवेतील त्रुटी म्हणता येणार नाही. अर्जदाराच्या वकीलांने युक्तीवाद केला की, हप्त्याची रक्कम न भरल्यानंतर देखील सहा महिन्यापर्यंत त्यांना दंड व्याजासह हप्त्याची रक्कम भरता येते हे त्यांचे म्हणणे तेंव्हाच शक्य होऊ शकते जेंव्हा विमाधारक जिवंत आहे व त्यांनी अर्ज करुन दंडासह हप्त्याची रक्कम भरण्यास तयारी दर्शविली तरच गैरअर्जदार ते घेतात व बराच उशिर झाला म्हणजे सहा महिन्याचा कालावधी असेल तर मेडीकल करुन ही रक्कम स्विकारली जाते व पॉलिसी रिनिव्ह केली जाते व यात विमाधारक हे जिवंत असणे आवश्यक आहे. एकदा का त्यांचा मृत्यु झाला की ही गोष्ट निघुन जाते यात दोन दिवस जरी उशिर झाला तो करार मोडीत निघतो व गैरअर्जदार यांची जबाबदारी टळते म्हणुन एल.आय.सी.ची रक्कम ही आपली जोखीम गैरअर्जदारावर कायम ठेवण्यासाठी वेळेत हप्ता भरणे अतीशय आवश्यक आहे, असे न केल्यास पॉलिसी लॅप्स होते व सगळया म्हणण्यावर पाणी फिरते. अर्जदाराने आपल्या तक्रारीमध्ये ही बाब मान्य केली व हे कबुली दिली आहे की, फक्त दोन दिवस यांच्याकडुन उशिर झाला व मयताची पत्नी हीचेवर पुर्ण कुटुंबाचे उदरनिर्वाहची जबाबदारी आहे, सासु, सासरे वयस्कर आहेत. म्हणुन सहानुभूतीपुर्वक विचार करुन त्यांना विम्याची रक्कम मिळावी ही मागणी मंचाच्या अखत्यारीमध्ये नाही. अशाप्रकाची मागणी ते गैरअर्जदार यांचेकडे अर्ज देऊन करु शकतात यावर गैरअर्जदारानेच सहानुभुतीपुर्वक विचार करु शकतील. यात मंच आदेश देऊ शकत नाही. अर्जदार यांचेवर नियतीने आधीच घाला घातलेले आहे. त्यामुळे गैरअर्जदार यांची खर्चासह तक्रार खारीज करण्याची मागणी फेटाळण्यात येते. वरील सर्व बाबींचा विचार करुन आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत. आदेश. 1. अर्जदार यांचा तक्रारअर्ज खारीज करण्यात येतो. 2. दावा खर्च ज्यांनी त्यांनी आपापला सोसावा. 3. संबंधी पक्षकार यांना निकाल कळविण्यात यावा. (श्री.बी.टी.नरवाडे पाटील) (श्री.सतीश सामते) अध्यक्ष सदस्य गो.प.निलमवार.लघूलेखक. |