(द्वारा- श्रीमती रेखा कापडिया, सदस्य) अर्जदाराने खरेदी केलेल्या, जुन्या वाहनाचा अपघात झाल्यानंतर त्यांनी गैरअर्जदार यांच्याकडे विमा रकमेची मागणी केली. गैरअर्जदार यांनी, वाहनाचा विमा (2) त.क्र.643/08 त्यांच्या नावावर नसल्याचे सांगून विमा रक्कम दिली नाही. त्यामुळे अर्जदाराने ग्राहक संरक्षण कायद्याअंतर्गत मंचात तक्रार दाखल केली आहे. अर्जदाराने दाखल केलेल्या तक्रारीनुसार त्यांनी एम.एच.21-8-1199 या क्रमांकाचे शेवरलेट ऑपट्रा हे वाहन, जुने मालक श्री मानसिंग पवार यांच्याकडून विकत घेतले. यासाठी त्यांनी गैरअर्जदार क्र.2 यांच्याकडून वाहन कर्ज घेतले आहे. सदरील कर्ज घेतांना त्यांनी गैरअर्जदार क्र.2 यांच्याकडे वाहनाची कागदपत्रे, विमा कागदपत्रे, इत्यादी दिले असल्याचे म्हटले आहे.गैरअर्जदार क्र.1 यांच्याकडून काढण्यात आलेल्या विमा पॉलीसीचा कालावधी दि.13.01.2007 ते 12.01.2008 असा आहे. दि.15.10.2007 रोजी पुण्याजवळ अर्जदाराच्या वाहनाचा अपघात झाला. वाहन दुरुस्तीसाठी त्यांना 1,75,000/- रुपये खर्च आला. अर्जदाराने, गैरअर्जदार क्र.1 यांच्याकडे ही रक्कम देण्याची मागणी केली, पण गैरअर्जदार क्र.1 यांनी वाहनाचा विमा त्यांच्या नावावर नसल्याचे सांगून विमा रक्कम नाकारली. गैरअर्जदार क्र.1 यांच्या या कृतीमुळे अर्जदार, वाहन कर्जाची परतफेड वेळेवर करु शकले नाही व त्यामुळे गैरअर्जदार क्र.2 यांच्याकडून त्यांना वाहन जप्तीबाबत धमकी देण्यात येत असल्याचे म्हटले आहे. अर्जदाराने गैरअर्जदार क्र.1 यांना या प्रकरणी वकीलामार्फत कायदेशिर नोटीस पाठवून विमा रक्कम देण्याची नोटीस पाठविली, परंतु गैरअर्जदार यांनी विमा रक्कम न दिल्यामुळे अर्जदाराने मंचात तक्रार दाखल केली असून, विमा रक्कम व नुकसान भरपाईची मागणी केली आहे. गैरअर्जदार क्र.1 यांनी दाखल केलेल्या जवाबानुसार त्यांनी सदरील वाहनाचा विमा हा श्री.मानसिंग पवार यांच्या नावे असल्याचे सांगून वाहनाचा अपघात झाल्याबाबत एफ.आय.आर., पंचनामा इत्यादी कागदपत्रे अर्जदाराने तक्रारीसोबत दाखल केली नसल्याचे म्हटले आहे. अर्जदाराने जुने वाहन खरेदी केल्यानंतर विमा पॉलीसीची कागदपत्रे त्यांच्या नावावर करण्याबाबत कोणताही अर्ज दिलेला नाही. मा.राष्ट्रीय आयोगाने अशाच एका प्रकरणात जुन्या मालकाच्या नावावर असलेली विम्याची कागदपत्रे आपोआप नवीन मालकाच्या नावावर होत नसल्याचे म्हटले आहे. अर्जदाराने तक्रारीसोबत दाखल केलेले बिल देखील कायदेशिर बिल नसून, एस्टिमेट (अंदाजपत्र) असून, अर्जदार हा ग्राहक नसल्यामुळे त्यास तक्रार दाखल करण्याचा अधिकार नाही. त्यामुळे तक्रार खारीज करण्याची विनंती मंचास केली आहे. गैरअर्जदार क्र.2 यांनी दाखल केलेल्या जवाबानुसार अर्जदाराने मंचात दाखल केलेली तक्रार ही विमा रक्कम मिळण्याबाबत असल्यामुळे त्यांचा या प्रकरणात प्रत्यक्ष संबंध नसल्याचे म्हटले आहे, व तक्रार खारीज करण्याची विनंती केली आहे. (3) त.क्र.643/08 अर्जदार व गैरअर्जदार यांनी मंचात दाखल केलेल्या कागदपत्रांवरुन व सुनावणीवरुन असे आढळून येते की, अर्जदाराने एम.एच.21-8-1199 शेवरलेट ऑपट्रा कंपनीचे वाहन, श्री.मानसिंग पवार यांच्याकडून खरेदी केले. हे वाहन खरेदी करताना त्यांनी गैरअर्जदार क्र.2 यांच्याकडून 1,75,000/- रुपयाचे वाहन कर्ज घेतले असल्याचे दिसून येते. श्री.मानसिंग पवार यांच्याकडून विकत घेतलेल्या गाडीचा विमा हा गैरअर्जदार क्र.1 यांच्याकडून घेण्यात आला होता, व या विमा पॉलीसीचा कालावधी दि.13.02.2007 ते 12.01.2008 असा होता. अर्जदाराने श्री.मानसिंग पवार यांच्याकडून वाहन खरेदी केल्यानंतर प्रादेशिक परिवहन कार्यालयातून वाहन स्वतःच्या नावावर ट्रान्स्फर करुन घेतले, परंतु या खरेदीची सूचना किंवा विमा पॉलीसी स्वतःच्या नावावर करण्याबाबत गैरअर्जदार क्र.1 यांना कळविलेले दिसून येत नाही. मोटर वाहन कायद्यातील तरतुदीनुसार नवीन खरेदी धारकाने 15 दिवसाच्या आत विमा कंपनीला कळविणे बंधनकारक आहे. अशाच एका प्रकरणामध्ये मा.सर्वोच्च न्यायालयाने अपील नं.2131/94 न्यू इंडिया अश्युरन्स कंपनी विरुध्द कंप्लीट इन्शुलेशनस प्रायव्हेट लिमिटेड या प्रकरणामध्ये वाहन खरेदी केल्यानंतर विमा पॉलीसी नवीन खरेदी धारकाच्या नावावर आपोआप ट्रान्स्फर करता येत नसल्याचे म्हटले आहे. अर्जदाराने मंचात दाखल केलेल्या तक्रारीसोबत वाहनाचा अपघात झाल्याचा एफ.आय.आर., पंचनामा इत्यादी कोणतीही कागदपत्रे दाखल केलेली नाहीत. त्याचप्रमाणे त्यांनी न्यू युनिव्हर्सल ऑटो अन्ड सर्व्हिस सेंटर यांचे वाहन दुरुस्तीचे बिल देखील कायदेशिर नसल्याचे दिसून येते. वरील सर्व निरीक्षण केल्यावर अर्जदाराने दाखल केलेली तक्रार खारीज करण्यात येत आहे. आदेश 1) अर्जदाराची तक्रार खारीज करण्यात येत आहे. श्रीमती ज्योती पत्की श्रीमती रेखा कापडिया श्री.डि.एस.देशमुख सदस्य सदस्य अध्यक्ष
| [ Smt.Rekha Kapadiya] MEMBER[ Shri.D.S.Deshmukh] PRESIDENT[ Smt.Jyoti H.Patki] MEMBER | |