(घोषित दि. 28.02.2013 व्दारा श्रीमती.रेखा कापडिया, सदस्या)
अर्जदार यांनी गाडीच्या अपघातानंतर नुकसान भरपाई रक्कम गैरअर्जदार यांना मागितली असता गैरअर्जदार यांनी रक्कम देण्याचे नाकारल्यामुळे अर्जदाराने ग्राहक संरक्षण कायदा अंतर्गत मंचात तक्रार दाखल केली आहे.
अर्जदाराने दाखल केलेल्या तक्रारीनुसार त्यांनी दिनांक 30.01.2010 रोजी टाटा इंडिका हे चारचाकी वाहन खरेदी केले असून वाहनाची पॉलीसी दिनांक 30.01.2010 ते 29.01.2011 पर्यंत होती. दिनांक 12.05.2010 रोजी गाडी जालना येथे एका हॉटेल जवळ उभी असताना एका अज्ञात वाहनाने गाडीस धडक दिली व गाडीचे नुकसान झाले. सदरील अपघाताची नोंद पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली नाही व गाडी दुरुस्तीसाठी सानिया मोटर्स या अधिकृत सर्व्हीस स्टेशनवर आणण्यात आली व अपघाता बद्दल विमा कंपनीस कळविले. अर्जदाराच्या म्हणण्यानुसार विमा कंपनीने आधी त्यांना गाडी दुरुस्त करुन घेण्यास सांगितले व नंतर ते बिल दाखल करण्यास सांगितले. अर्जदारास सानिया मोटर्स कडून गाडी दुरुस्तीचे 1,01,565/- रुपयाचे बिल देण्यात आले. अर्जदाराच्या म्हणण्यानुसार गैरअर्जदार विमा कंपनीने त्यांना 56,000/- रुपये देण्याची तयारी दर्शविली जी अर्जदाराने नाकारली. अर्जदाराने गाडी दुरुस्तीच्या खर्चाची रक्कम 1,01,565/- रुपये व नुकसान भरपाईची मागणी केली आहे.
अर्जदाराने तक्रारी सोबत पॉलीसीची प्रत, गाडीचे रजिस्ट्रेशन, गाडी दुरुस्तीचे बिल इत्यादी कागदपत्रे दाखल केली आहेत.
गैरअर्जदार यांनी दाखल केलेल्या जवाबानुसार गाडीची विमा पॉलीसी त्यांच्याकडून घेतली असल्याचे त्यांना मान्य आहे. अर्जदाराने वाहनास अपघात झाल्याबद्दल तक्रार नोंदविली नाही. अर्जदाराने दाखल केलेली खर्चाची रक्कम अयोग्य असून मोटर टॅरीफ कायद्यानुसार सर्व्हेअरच्या अहवालानुसार नुकसान भरपाई देण्यात येते. त्यांनी अर्जदारास 56,000/- रुपये देऊ असे सांगितलेले नाही, कारण अर्जदाराने गाडीचा वापर व्यापारी कारणासाठी केलेला आहे. गाडीचा विमा खाजगी वाहनाचा असताना त्यांनी गाडी भाडे तत्वावर वापरली असल्यामुळे कायद्याप्रमाणे त्यांना पॉलीसीची रक्कम नाकारण्यात आली. अर्जदाराचा दावा दिनांक 21.12.2010 रोजी नाकारण्यात आलेला आहे. सदरील तक्रार खोटी व चुकीची असल्यामुळे ती खारीज करण्याची विनंती मंचास केली आहे.
गैरअर्जदार यांनी विमा दावा नाकारल्याचे पत्र, सर्व्हेअरचा अहवाल इत्यादी कागदपत्रे मंचात दाखल केली आहेत.
अर्जदार व गैरअर्जदार यांनी दाखल केलेल्या कागदपत्रांवरुन व सुनावणीवरुन मंचास असे आढळून येते की, अर्जदाराच्या गाडीचा विमा दिनांक 30.01.2010 ते 29.01.2011 या कालावधीसाठी विमा कंपनीकडे उतरविण्यात आला होता. दिनांक 12.05.2010 रोजी जालना येथे एका हॉटेल जवळ गाडी उभी असताना एका अज्ञात वाहनाने धडक दिल्यामुळे गाडीस अपघात झाला. अर्जदाराच्या म्हणण्यानुसार त्यांनी याबाबत संबंधित पोलीस स्टेशनमध्ये तक्रार न देता सानिया मोटर्स या अधिकृत सर्व्हीस स्टेशनमध्ये दुरुस्तीस दिली व विमा कंपनीस त्याबाबत कळविले. गैरअर्जदार विमा कंपनीने तक्रारदाराचा विमा दावा पॉलीसीच्या अटीचे उल्लंघन केल्याच्या कारणास्तव फेटाळला आहे. विमा कंपनीच्या म्हणण्यानुसार तक्रारदाराने त्यांचे खाजगी वाहन भाडे तत्वावर चालविण्यासाठी दिले होते. गैरअर्जदार यांनी त्यांच्या जवाबासोबत एक स्टेटमेंट जोडले असून त्यामध्ये तक्रारदाराने म्हटले आहे की, मी गाडी वैयक्तीक वापरासाठी ठेवतो व गरज पडल्यास नातेवाईकास एखाद्या वेळेस भाडयाने देतो. या स्टेटमेंट सोबत गैरअर्जदार यांनी शपथपत्र दाखल केलेले नाही त्यामुळे हे स्टेटमेंट मंच ग्राहय मानात नाही. गाडीच्या अपघाताच्या वेळेस गाडी भाडेतत्वावर दिली असल्याचा कोणताही पुरावा गैरअर्जदार यांनी दाखल केलेला नाही. त्यामुळे तक्रारदाराने त्यांचे खाजगी वाहन व्यापारी कारणासाठी वापरले होते हे विमा कंपनीचे म्हणणे मंच मान्य करीत नाही.
तक्रारदाराने विमा कंपनीकडून 1,01,565/- रुपये मिळावे अशी मागणी केली आहे. विमा कंपनीने प्रफुल्ल शाह यांचा सर्व्हे रिपोर्ट दाखल केला असून त्यात वाहनाच्या नुकसानीचे मूल्य 59,766/- रुपये निश्चित केले आहे. विमा कंपनीने नेमलेल्या सर्व्हेअर व लॉस असेसर श्री. प्रफुल्ल शाह यांनी वाहनाच्या नुकसानाबाबत निश्चित केलेले मूल्य मिळण्यास तक्रारदार पात्र आहे.
आदेश
- गैरअर्जदार यांनी तक्रारदारास 59,766/- रुपये (एकोणसाठ हजार सातशे सहासष्ठ रुपये) दिनांक 21.12.2010 पासून 9 टक्के व्याजासह 30 दिवसात द्यावे.
- गैरअर्जदार यांनी तक्रारदारास मानसिक त्रास व खर्चाबद्दल रुपये 2,500/- (रुपये दोन हजार पाचशे) 30 दिवसात द्यावे.