निकालपत्र तक्रार दाखल दिनांकः- 10/03/2011 तक्रार नोदणी दिनांकः- 17/03/2011 तक्रार निकाल दिनांकः- 02/08/2011 कालावधी 04 महिने 16 दिवस जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी अध्यक्ष - श्री.चंद्रकांत बी. पांढरपट्टे, B.Com.LL.B. सदस्या सदस्या सुजाता जोशी B.Sc.LL.B. सौ.अनिता ओस्तवाल M.Sc. आनंद पिता नारायणराव वाघमारे. अर्जदार वय 38 वर्ष.धंदा.व्यापार. अड.टी.एम.घनसावध. रा.सर्डे सिस्टर यांचा वाडा.हुतात्मा स्मारक,जिंतूर. ता.जिंतूर जि.परभणी. विरुध्द शाखाअधिकारी. गैरअर्जदार. एच.डी.एफ.सी.बँक.डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळयाच्या पाठीमागे.काबरा बिल्डींग, स्टेशन रोड. परभणी. ------------------------------------------------------------------------------------ कोरम - 1) श्री.सी.बी.पांढरपट्टे. अध्यक्ष. 2) सौ.सुजाता जोशी. सदस्या. 3) सौ.अनिता ओस्तवाल. सदस्या. ------------------------------------------------------------------------------------------------------- ( निकालपत्र पारित व्दारा – सौ.सुजाता जोशी. सदस्या.) गैरअर्जदाराने दिलेल्या त्रुटीच्या सेवेबद्दल अर्जदाराने ही तक्रार दाखल केलेली आहे. अर्जदाराची थोडक्यात तक्रार अशी आहे की, अर्जदाराने गैरअर्जदाराकडे दिनांक 19/03/2007 रोजी हिरोहोंडा स्प्लेंडर गाडी घेण्यासाठी कर्जाची मागणी करण्यासाठी अर्ज दिला अर्जदाराचा अर्ज मंजूर झाला त्याच दिवशी अर्जदाराने गैरअर्जदाराकडे डाऊनपेमेंट म्हणून रु.14,906/- भरले व उर्वरित रक्कमे करीता रु. 1185/- प्रमाणे “ 35 ” चेक जमा केले ती सर्व रक्कम अर्जदाराने गैरअर्जदाराकडे मुदतीतच जमा केले व एका चेकची रक्कम रु. 1185/- व दंड रु. 568/- असे रोख रु.1753/- गैरअर्जदाराकडे जमा केले अर्जदाराने कर्जाची संपूर्ण रक्कम गैरअर्जदाराकडे जमा केली असून अर्जदाराच्या वाहनाचे आर.सी.बुक गैरअर्जदाराकडे आहे ज्याची मागणी अर्जदार वारंवार गैरअर्जदाराकडे करत आहे व नाहरकत प्रमाणपत्र जे आर.टी.ओ.कार्यालयात देणे आवश्यक होते त्याचीही मागणी गैरअर्जदाराकडे करुनही गैरअर्जदाराने आजतागायत अर्जदारास आर.सी.बुक व नाहरकत प्रमाणपत्र दिलेले नाही.म्हणून अर्जदाराने ही तक्रार दाखल केली आहे व आर.सी.बुक, नाहरकत प्रमाणपत्र, व नुकसान भरपाई म्हणून रु.15,000/- मिळावेत अशी मागणी केली आहे. अर्जदाराने तक्रारी सोबत त्याचे शपथपत्र, गैरअर्जदाराशी केलेला पत्रव्यवहार,वाहनाच्या विम्याची कव्हरनोट, पैसे भरल्याची पावती वाहन किमतीच्या पावत्या, खाते उतारा इ.कागदपत्र दाखल केले आहेत. गैरअर्जदाराला मंचाची नोटीस मिळूनही गैरअर्जदाराने नेमल्या तारखेला मंचासमोर हजर राहून त्याचे लेखी म्हणणे प्रकरणात सादर न केल्यामुळे त्याचे विरुध्द एकतर्फा आदेश पारीत करण्यात आला. तक्रारीत दाखल कागदपत्रावरुन निर्णयासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात. मुद्दे. उत्तर 1 अर्जदारास गैरअर्जदाराने त्रुटीची सेवा दिली आहे काय ? होय. 2 अर्जदार कोणता अनुतोष मिळणेस पात्र आहे.? अंतिम आदेशा प्रमाणे. कारणे. अर्जदाराने गैरअर्जदाराकडून कर्ज घेवुन स्प्लेंडर प्लस हे वाहन घेतले आहे हे नि.5/7 वरील युनायइटेड ईंडिया इन्शुरन्स कं.च्या कव्हरनोट वरुन सिध्द होते. नि.5/8 वरील पावतीवरुन अर्जदाराने ताडेश्वर अटो एजंसी मध्ये रु.14,906/- डाऊनपेमेंट म्हणून जमा केल्याचे सिध्द होते.नि.5/9 वरील टॅक्स इन्व्हॉइस वरुन स्प्लेंडर प्लस या वाहनाची किंमत रु.40,240/- आहे असे सिध्द होते. अर्जदाराने गैरअर्जदाराकडे रु.1185/- चे 35 चेकची रक्कम जमा केल्याचे नि.9/1 वरील मराठवाडा ग्रामीण बँकेतील वंदना अण्णा ईंगळे यांच्या पासबुकावरुन सिध्द होते.वंदना अण्णा ईंगळे या अर्जदारच्या कायदेशिर पत्नी असल्याचे व त्याच खात्यातून गैरअर्जदारांना कर्ज परताव्याचे 35 चेक दिले असलयाचे अर्जदाराने नि.12 वरील शपथपत्रातून सांगीतले आहे.व वंदना अण्णा ईंगळे यांचे नाव आता वंदना आनंद वाघमारे आहे हे दाखवण्यासाठी नि.13 वर महाराष्ट्र शासन राजपत्र दाखल केले आहे. व त्यात पान क्रमांक 327 वर नोंदणी क्रमांक D-3432 अन्वये अर्जदाराच्या पत्नीचे बदललेले नाव आहे. अर्जदाराने गैरअर्जदारास रु. 1185/- च्या 35 चेक्स व्दारे एकुण रु. 41,475/- व नि.9/2 वरील रोखीने भरलेले रु.1753/- असे एकुण रु.43,228/- दिलेले सिध्द होतात.व नि.5/8 वरील ताडेश्वर अटो एजन्सीच्या डाऊनपेमेंटच्या पावतीवरुन रु.14,906/- दिल्याचे सिध्द होते.म्हणून नि.5/9 वरील स्प्लेंडरप्लसच्या किंमतीचे व्याजासह पैसे अर्जदाराने गैरअर्जदारास दिल्याचे दिसून येते. गैरअर्जदाराना मंचाची नोटीस मिळूनही त्यानी मंचासमोर हजर राहून आपले लेखी म्हणणे तक्रारीत सादर केले नाही म्हणजेच त्यांना अर्जदाराचे म्हणणे मान्य आहे असे मानावे लागेल. कर्जाची व्याजासह संपूर्ण परतफेड झाल्यानंतरही अर्जदारास दुचाकीचे नाहरकत प्रमाणपत्र व आर.सी.बुक न देवुन गैरअर्जदाराने त्रुटीची सेवा दिलेली आहे असे आम्हांस वाटते.म्हणून खालील प्रमाणे आदेश करण्यात येत आहे. आ दे श 1 अर्जदाराची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येत आहे. 2 गैरअर्जदाराने अर्जदारास निकाल समजल्यापासून 30 दिवसांचे आत स्प्लेंडर प्लस एम.एच. 22/ के.1445 या दुचाकीचे नाहरकत प्रमाणपत्र व आर.सी.बुक द्यावे. 3 गैरअर्जदाराने अर्जदारास आदेश मुदतीत मानसिक त्रासापोटी रु.3000/- व तक्रारीच्या खर्चापोटी रु.2000/- द्यावेत. 4 पक्षकाराना आदेशाच्या प्रती मोफत पुरवाव्यात. सौ. अनिता ओस्तवाल सौ.सुजाता जोशी श्री. सी.बी. पांढरपटटे सदस्या सदस्या अध्यक्ष.
| [HONABLE MRS. Sujata Joshi] Member[HONABLE MR. JUSTICE C. B. Pandharpatte] PRESIDENT[HONABLE MRS. Anita Ostwal] Member | |