न्या य नि र्ण य
(व्दाराः- मा. सौ. रुपाली धै. घाटगे, सदस्या)
1. तक्रारदाराने प्रस्तुत तक्रार अर्ज ग्राहक सरंक्षण कायदा 1986 चे कलम 12 प्रमाणे दाखल केला आहे. तक्रार अर्जातील थोडक्यात कथन पुढीलप्रमाणे—
वि.प.क्र.2 ही एचडीएफसी स्टँडर्ड लाईफ इन्शुरन्स कं.लि. या नावाने इन्शुरन्सची सेवा देण्याचे कार्य करतात. वि.प.क्र.1 हे वि.प. क्र.2 यांचे कोल्हापूर स्थित शाखा कार्यालय आहे. तक्रारदार यांनी वि.प. यांचेकडून एचडीएफसी लाईफ संचय या नावाची पॉलिसी ता. 9/6/14 रोजी घेतलेली असून सदर पॉलिसीचा नंबर 16830692 व कालावधी 15 वर्षाकरिता होता. सदरच्या पॉलिसीनुसार वि.प. यांनी तक्रारदार यांना पॉलिसी कालावधीत त्यांचा मृत्यू झालेस कमीत कमी रक्कम रु. 9,70,030/- चा बेनिफिट देण्याचे कबूल केले होते. सदर पॉलिसी अंतर्गत वि.प. यांनी तक्रारदार यांचेकडून विमा हप्त्यापोटी रक्कम रु.97,003/- प्रमाणे प्रतिवर्ष पुढील तीन वर्षाकरिता स्वीकारण्याचे मान्य केले होते. त्यानुसार तक्रारदार यांनी वि.प. यांचेकडे दि.30/4/2014 रोजी रक्कम रु. 97,003/- चा हप्ता व टॅक्स असे मिळून एकूण रक्कम रु.1 लाख जमा केलेले आहेत. तक्रारदार यांनी वि.प. यांचेकडे सदरच्या पॉलिसी अंतर्गत विमा हप्ता जमा केल्यानंतर 8 दिवसांतच तक्रारदार यांच्या लक्षात आले की, त्यांना सदर पॉलिसीचे पुढील हप्ते वि.प. यांचेकडे जमा करणे शक्य होणार नाही म्हणून तक्रारदार यांनी वि.प. यांचेकडे हप्ता जमा केलेनंतर 8 व्या दिवशीच वि.प. यांचेकडे ता. 30/4/2014 रोजी जमा केलेल्या विमा हप्ता एकूण रक्कम रु.1 लाखची परताव्याची मागणी केली. वि.प. यांनी सदरची रक्कम वरिष्ठ कार्यालयाकडून 15 दिवसांत संमत करुन घेवून तक्रारदार यांना परत देणेची हमी दिली. तथापि तक्रारदार यांनी वेळोवेळी सदरच्या विमा हप्त्याची मागणी वि.प. क्र.1 यांचेकडून केली असता वि.प. यांनी सदरची रक्कम देणेस टाळाटाळ केली व तक्रारदारास कोणतीही दाद दिलेली नाही. सबब, वि.प. यांनी तक्रारदार यांचे मागणीनुसार विमा क्लेमच्या रकमेचा परतावा परत न करुन तक्रारदार यांना द्यावयाचे सेवेत त्रुटी केली आहे. सबब, पॉलिसीची रक्कम रु. 1,00,000/- व सदर रकमेवर 15 टक्केप्रमाणे व्याज मिळावे, नुकसानीपोटी रु. 50,000/-, मानसिक त्रासापोटी रक्कम रु.50,000/- व तक्रारअर्जाचा खर्च रु. 15,000/- देणेचा आदेश वि.प. यांना व्हावा अशी मागणी तक्रारदाराने केली आहे.
2. तक्रारदाराने सदरकामी अॅफिडेव्हीट, कागदयादी सोबत विमा पॉलिसी, तक्रारदारांनी वि.प. यांना पाठवलेली नोटीस, सदर नोटीसचा ट्रॅक रिपोर्ट इ. कागदपत्रे दाखल केली आहेत. तसेच तक्रारदाराने पुराव्याचे शपथपत्र व लेखी युक्तिवाद दाखल केला आहे.
3. वि.प. यांनी याकामी तक्रारदाराचे तक्रारअर्जास म्हणणे दाखल केले आहे. वि.प. यांचे कथनानुसार, वि.प. यांनी सदरची पॉलिसी जून 2014 मध्ये तक्रारदार यांना अदा केलेचे तक्रारदार यांनी मान्य केले असलेमुळे व तसेच तक्रारदार यांनी सदरची तक्रार दि.21/2/2019 रोजी दाखल केलेली असलेमुळे तक्रारदारांचे तक्रारीस मुदतीच्या कायद्याची बाधा येते असे कथन केलले आहे. सदरची पॉलिसी हा विमाधारक आणि विमा कंपनी यांचेमधील कायदेशीर करार असून सदर करारातील अटी व शर्ती या पॉलिसीधारक व विमा कंपनीवर बंधनकारक आहेत. सदर पॉलिसीच्या प्रपोजल फॉर्मवर विमाधारकाने सहया केलेल्या असून त्यानुसार सदरची पॉलिसी ही वि.प. यांनी जारी केलेली आहे. पॉलिसी करारातील अटी शर्तीनुसार विमाधारकास सदरची पॉलिसी रद्द करावयाची असल्यास विमाधारक सदरची पॉलिसी पुनर्विचार (Review) करुन सदर पॉलिसीचे कागदपत्रे 15 दिवसांचे कालावधीत (Free look period) वि.प. विमा कंपनीकडून मागणी करु शकतो. त्यानुसार तक्रारदार यांनी वि.प. विमा कंपनीकडे अदा केलेली विमा रक्कम काही रकमेची कपात करुन विमाधारकास परत करता येते. सदर तक्रारीमध्ये तक्रारदार यांना सदरची पॉलिसी व त्यासोबतचे कागदपत्रे प्राप्त झाल्यानंतर तक्रारदार हे वि.प. विमा कंपनीकडे सदरची पॉलिसी रद्द करण्यासाठी 15 दिवसांच्या कालावधीत (Free look period) आलेले नसून तक्रारदार यांनी सदरची पॉलिसी व त्यासाबतची कागदपत्रे ही स्वीकारलली आहेत. त्याकारणाने सद्यपरिस्थितीत तक्रारदार हे विमारकमेचा परतावा मिळणेस पात्र नाहीत. तक्रारदारांचेवर पॉलिसीचा करार हा बंधनकारक आहे व त्यानुसार तक्रारदार यांनी सदरची पॉलिसी Free look period मध्ये रद्द करण्याचा अधिकार गमावलेला (Relinquish) आहे. तक्रारदार यांनी सदर पॉलिसी अंतर्गत पहिला विमा हप्ता वि.प. यांचेकडे अदा केलेला असून त्यानंतर तक्रारदार यांनी दुस-या वर्षीपासून कोणताही विमा हप्ता वि.प. यांचेकडे अदा केलेला नसल्यामुळे सदरची पॉलिसी ही अटी व शर्तीप्रमाणे लॅप्स मोडमध्ये गेलेली आहे. तक्रारदार यांनी फक्त एकच विमा हप्ता अदा केला असल्यामुळे सदरची पॉलिसीतील गॅरेंटेड सरेंडर व्हॅल्यू क्लॉज नं.6 नुसार तक्रारदार हे कोणतेही बेनिफीट लाभ मिळणेस पात्र नाहीत. सबब, तक्रारदारांची तक्रार नामंजूर करणेत यावी असे वि.प. यांनी म्हणणे दाखल कलेले आहे.
तक्रारअर्ज खर्चासह नामंजूर करण्यात यावा अशी मागणी वि.प. यांनी केली आहे.
4. वि.प. यांनी याकामी कागदयादीसोबत Annexure A, Annexure B, Annexure C तसेच पुरावा शपथपत्र व लेखी युक्तिवाद दाखल केला आहे.
5. तक्रारदारांचा तक्रारअर्ज, वि.प.यांचे म्हणणे, दाखल केलेली अनुषंगिक कागदपत्रे, तक्रारदाराचे व वि.प. यांचे पुराव्याचे शपथपत्र, लेखी युक्तिवाद यांचा विचार करता निष्कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात.
अ. क्र. | मुद्दा | उत्तरे |
1 | तक्रारदार हे वि.प. यांचे ग्राहक आहेत काय ? | होय. |
2 | तक्रारदारांची तक्रार मुदतीत आहे काय ? | होय |
3 | वि.प. यांनी तक्रारदाराला द्यावयाच्या सेवेत त्रुटी केली आहे काय ? | होय. |
4 | तक्रारदार हे विमा हप्त्याची रक्कम परत मिळणेस पात्र आहेत काय ? | होय. |
5 | तक्रारदार हे मानसिक व शारिरिक त्रासापोटी रक्कम मिळणेस पात्र आहेत काय ? | होय. |
6 | अंतिम आदेश काय ? | अंशतः मंजूर. |
कारणमिमांसा –
मुद्दा क्र. 1 –
6. वि.प.क्र.2 ही एचडीएफसी स्टँडर्ड लाईफ इन्शुरन्स कं.लि. या नावाने इन्शुरन्सची सेवा देण्याचे कार्य करतात. वि.प.क्र.1 हे वि.प. क्र.2 यांचे कोल्हापूर स्थित शाखा कार्यालय आहे. तक्रारदार यांनी वि.प. यांचेकडून एचडीएफसी लाईफ संचय या नावाची पॉलिसी ता. 9/6/14 रोजी घेतलेली असून सदर पॉलिसीचा नंबर 16830692 व कालावधी 15 वर्षाकरिता होता. सदरच्या पॉलिसीनुसार वि.प. यांनी तक्रारदार यांना पॉलिसी कालावधीत त्यांचा मृत्यू झालेस कमीत कमी रक्कम रु. 9,70,030/- चा बेनिफिट देण्याचे कबूल केले होते. सदर पॉलिसी अंतर्गत वि.प. यांनी तक्रारदार यांचेकडून विमा हप्त्यापोटी रक्कम रु.97,003/- प्रमाणे प्रतिवर्ष पुढील तीन वर्षाकरिता स्वीकारण्याचे मान्य केले होते. त्यानुसार तक्रारदार यांनी वि.प. यांचेकडे दि.30/4/2014 रोजी रक्कम रु. 97,003/- चा हप्ता व टॅक्स असे मिळून एकूण रक्कम रु.1 लाख जमा केलेले आहेत. सदरची पॉलिसी व तिचे कालावधीबाबत वाद नाही. सबब, वि.प. यांनी तक्रारदार यांचेकडून मोबदला स्वीकारुन सदरची पॉलिसी अदा केलेली असलेमुळे तक्रारदार हे वि.प. यांचे ग्राहक आहेत या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे. सबब, मुद्दा क्र.1 चे उत्तर हे आयोग होकारार्थी देत आहे.
मुद्दा क्र.2 व 3
7. उपरोक्त मुद्दा क्र.1 मधील विवेचनाचा विचार करता तक्रारदार हे वि.प. यांचे ग्राहक आहेत. तक्रारदार यांनी वि.प. यांचेकडे सदरच्या पॉलिसी अंतर्गत विमा हप्ता जमा केल्यानंतर 8 दिवसांतच तक्रारदार यांच्या लक्षात आले की, त्यांना सदर पॉलिसीचे पुढील हप्ते वि.प. यांचेकडे जमा करणे शक्य होणार नाही म्हणून तक्रारदार यांनी वि.प. यांचेकडे हप्ता जमा केलेनंतर 8 व्या दिवशीच वि.प. यांचेकडे ता. 30/4/2014 रोजी जमा केलेल्या विमा हप्ता एकूण रक्कम रु.1 लाखची परताव्याची मागणी केली. वि.प. यांनी सदरची रक्कम वरिष्ठ कार्यालयाकडून 15 दिवसांत संमत करुन घेवून तक्रारदार यांना परत देणेची हमी दिली. तथापि तक्रारदार यांनी वेळोवेळी सदरच्या विमा हप्त्याची मागणी वि.प. क्र.1 यांचेकडून केली असता वि.प. यांनी सदरची रक्कम देणेस टाळाटाळ केली व तक्रारदारास कोणतीही दाद दिलेली नाही. सबब, वि.प. यांनी तक्रारदार यांचे मागणीनुसार विमा क्लेमच्या रकमेचा परतावा परत न करुन तक्रारदार यांना द्यावयाचे सेवेत त्रुटी केली का ? हा वादाचा मुद्दा उपस्थित होतो. तसेच वि.प. यांनी त्यांचे म्हणण्यामध्ये वि.प. यांनी सदरची पॉलिसी जून 2014 मध्ये तक्रारदार यांना अदा केलेचे तक्रारदार यांनी मान्य केले असलेमुळे व तसेच तक्रारदार यांनी सदरची तक्रार दि.21/2/2019 रोजी दाखल केलेली असलेमुळे तक्रारदारांचे तक्रारीस मुदतीच्या कायद्याची बाधा येते असे कथन केलले आहे. सबब, तक्रारदार यांची तक्रार मुदतीत आहे काय ? हा वादाचा मुद्दा उपस्थित होतो.
8. प्रस्तुतकामी तक्रारदार यांनी वि.प. यांचेकडून घेतलेल्या पॉलिसीची प्रत दाखल केली आहे. सदर पॉलिसीच्या प्रतीचे अवलोकन करता सदरच्या पॉलिसीचा कालावधी हा 15 वर्षे असून प्रिमियम पेइंग टर्म 5 वर्षाची आहे. प्रस्तुतकामी वि.प. यांनी ता. 18/4/2019 रोजी म्हणणे दाखल केलेले असून सदर म्हणण्याचे अवलोकन करता वि.प. यांनी तक्रारदाराची तक्रार परिच्छेदनिहाय नाकारलेली आहे. सदरची पॉलिसी हा विमाधारक आणि विमा कंपनी यांचेमधील कायदेशीर करार असून सदर करारातील अटी व शर्ती या पॉलिसीधारक व विमा कंपनीवर बंधनकारक आहेत. सदर पॉलिसीच्या प्रपोजल फॉर्मवर विमाधारकाने सहया केलेल्या असून त्यानुसार सदरची पॉलिसी ही वि.प. यांनी जारी केलेली आहे. पॉलिसी करारातील अटी शर्तीनुसार विमाधारकास सदरची पॉलिसी रद्द करावयाची असल्यास विमाधारक सदरची पॉलिसी पुनर्विचार (Review) करुन सदर पॉलिसीचे कागदपत्रे 15 दिवसांचे कालावधीत (Free look period) वि.प. विमा कंपनीकडून मागणी करु शकतो. त्यानुसार तक्रारदार यांनी वि.प. विमा कंपनीकडे अदा केलेली विमा रक्कम काही रकमेची कपात करुन विमाधारकास परत करता येते. सदर तक्रारीमध्ये तक्रारदार यांना सदरची पॉलिसी व त्यासोबतचे कागदपत्रे प्राप्त झाल्यानंतर तक्रारदार हे वि.प. विमा कंपनीकडे सदरची पॉलिसी रद्द करण्यासाठी 15 दिवसांच्या कालावधीत (Free look period) आलेले नसून तक्रारदार यांनी सदरची पॉलिसी व त्यासाबतची कागदपत्रे ही स्वीकारलली आहेत. त्याकारणाने सद्यपरिस्थितीत तक्रारदार हे विमारकमेचा परतावा मिळणेस पात्र नाहीत. तक्रारदारांचेवर पॉलिसीचा करार हा बंधनकारक आहे व त्यानुसार तक्रारदार यांनी सदरची पॉलिसी Free look period मध्ये रद्द करण्याचा अधिकार गमावलेला (Relinquish) आहे. तक्रारदार यांनी सदर पॉलिसी अंतर्गत पहिला विमा हप्ता वि.प. यांचेकडे अदा केलेला असून त्यानंतर तक्रारदार यांनी दुस-या वर्षीपासून कोणताही विमा हप्ता वि.प. यांचेकडे अदा केलेला नसल्यामुळे सदरची पॉलिसी ही अटी व शर्तीप्रमाणे लॅप्स मोडमध्ये गेलेली आहे. तक्रारदार यांनी फक्त एकच विमा हप्ता अदा केला असल्यामुळे सदरची पॉलिसीतील गॅरेंटेड सरेंडर व्हॅल्यू क्लॉज नं.6 नुसार तक्रारदार हे कोणतेही बेनिफीट लाभ मिळणेस पात्र नाहीत. सबब, तक्रारदारांची तक्रार नामंजूर करणेत यावी असे वि.प. यांनी म्हणणे दाखल कलेले आहे. त्यानुसार वि.प. यांनी आयोगामध्ये Annexure A B C ला 30/4/2014 रोजी पॉलिसीची प्रत, प्रपोजल फॉर्म, प्रिमियमची पावती व इतर कागदपत्रे दाखल केलेली आहेत.
9. सबब, दाखल कागदपत्रे व पुरावा शपथपत्र याचे अवलोकन करता तक्रारदार यांनी वि.प. यांचेकडून स्वेच्छेने सदरची पॉलिसी घेतलेली होती. वि.प. यांनी तक्रारदार यांना सदरची पॉलिसी व त्यासोबतची कागदपत्रे सन 2014 साली पाठविलेली होती. पॉलिसी चालू झालेनंतर तक्रारदार यांनी वि.प. यांचेकडे ता. 30/4/2014 रोजी पहिल्या वर्षाचा प्रिमियम वि.प. यांना अदा केलेला आहे. वि.प. यांनी पहिल्या वर्षाच्या संपूर्ण कालावधीकरिता लाभ कव्हरेज तक्रारदार यांना दिले आहे याबाबत कोणताही वाद नाही. सदरचे पॉलिसीचा कालावधी हा 15 वर्षांकरिता होता. तक्रारदार यांनी सदरचे पॉलिसीचा हप्ता जमा केलेनंतर 8 दिवसांत पुढील हप्ते सहजासहजी वि.प. यांचेकडे जमा करणे शक्य होणार नाही म्हणून वि.प. यांचेकडे पहिला हप्ता जमा केलेनंतर 8 व्या दिवशी सदरचे हप्त्याची रक्कम रु.97,003/- अधिक टॅक्स मिळून रु.1 लाख परताव्याची मागणी केली होती व त्यावेळी वि.प. यांनी सदरची रक्कम वरिष्ठ कार्यालयाकडून 15 दिवसात संमत करुन घेत आहोत व तातडीने तक्रारदारास परत करण्याची हमी दिली होती असे तक्रारदार यांनी पुराव्याच्या शपथपत्रावर कथन केलेले आहे. वि.प. यांनी दाखल केलेल्या म्हणण्याचे अवलोकन करता पॉलिसी करारातील अटी शर्तीनुसार विमाधारकास सदरची पॉलिसी रद्द करावयाची असल्यास विमाधारक सदरची पॉलिसी पुनर्विचार (Review) करुन सदर पॉलिसीचे कागदपत्रे 15 दिवसांचे कालावधीत (Free look period) वि.प. विमा कंपनीकडून मागणी करु शकतो. त्यानुसार तक्रारदार यांनी वि.प. विमा कंपनीकडे अदा केलेली विमा रक्कम काही रकमेची कपात करुन विमाधारकास परत करता येते. सदर तक्रारीमध्ये तक्रारदार यांना सदरची पॉलिसी व त्यासोबतचे कागदपत्रे प्राप्त झाल्यानंतर तक्रारदार हे वि.प. विमा कंपनीकडे सदरची पॉलिसी रद्द करण्यासाठी 15 दिवसांच्या कालावधीत (Free look period) आलेले नसून तक्रारदार यांनी सदरची पॉलिसी व त्यासोबतची कागदपत्रे ही स्वीकारलली आहेत. त्याकारणाने सद्यपरिस्थितीत तक्रारदार हे विमारकमेचा परतावा मिळणेस पात्र नाहीत असे कथन केले आहे. तथापि तक्रारदार यांनी वि.प. यांचेकडे पॉलिसीचा हप्ता/प्रिमियम अदा न केलेमुळे वि.प. यांनी कोणत्याही माध्यमातून तक्रारदार यांना सदर पॉलिसीचा हप्ता भरणेविषयी विनंती केलेली दिसून येत नाही. तसेच सदर कालावधीमध्ये वि.प. यांनी सदरची पॉलिसी फोरक्लोज होणेपूवी पॉलिसीचे पुनरुज्जीवन करुन घ्यावे अशी कोणतीही विनंती अथवा त्याअनुषंगाने कोणताही कागदोपत्री व्यवहार तक्रारदार यांचेशी केलेला दिसून येत नाही व तसा कोणताही कागदोपत्री पुरावा वि.प. यांनी सदरकामी दाखल केलेला नाही. सदरची पॉलिसी संपुष्टात आलेबाबतची अथवा सदरची पॉलिसी रिन्यूवल करणेबाबत वि.प. यांनी तक्रारदार यांना कळविलेले नाही. त्याकारणाने सदरच्या तक्रारीस सततचे कारण Continuous cause of action घडत असलेने तक्रारदार यांची तक्रार मुदतीत आहे. प्रस्तुतकामी वि.प. यांनी सदरची पॉलिसी तक्रारदारांचेवर पॉलिसीचा करार हा बंधनकारक आहे व त्यानुसार तक्रारदार यांनी सदरची पॉलिसी Free look period मध्ये रद्द करण्याचा अधिकार गमावलेला (Relinquish) आहे, असे कथन केले असले तरी वि.प. यांनी पॉलिसी रिव्हाइ न केलेमुळे सदरची पॉलिसी ही लॅप्स मोडमध्ये गेलेली असून त्या संदर्भातील कोणतीही नोटीस तक्रारदार यांना पाठविलेली नाही व सदरची पॉलिसीतील अटी व शर्तीप्रमाणे फोरक्लोज केलेबाबत कळविलेले नाही अथवा त्याअनुषंगाने कोणतीही कागदपत्रे प्रस्तुतकामी दाखल केलेली नाहीत. प्रस्तुतकामी तक्रारदार यांनी तक्रारीसोबत दि.16/6/17 रोजी वि.प. यांना वकीलामार्फत पाठविलेली नोटीस, नोटीसची पोच व ट्रॅक रिपोर्ट दाखल केलेली आहे. तथापि सदर नोटीसीस देखील वि.प. यांनी कोणतेही उत्तर दिलेले नाही. सबब, या सर्व बाबींचा विचार करता वि.प. यांनी तक्रारदार यांना सदरची पॉलिसी फोरक्लोज झाल्याबाबतचे न कळवून तसेच तक्रारदार यांनी सदरच्या पॉलिसीच्या हप्त्याच्या परताव्याची रक्कम मागणी वि.प. यांचेकडून वेळोवेळी करुन देखील वि.प. यांनी तक्रारदार यांना सदरची परताव्याची रक्कम न देवून तक्रारदार यांना द्यावयाचे सेवेत त्रुटी केलेली आहे या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे. सबब, मुद्दा क्र.2 व 3 चे उत्तर हे आयोग होकारार्थी देत आहे.
मुद्दा क्र.4
10. उपरोक्त मुद्दा क्र.2 व 3 मधील विस्तृत विवेचनाचा विचार करता वि.प. यांनी तक्रारदार यांना द्यावयाचे सेवेत त्रुटी केलेली आहे. सबब, तक्रारदार हे वि.प. यांचेकडून विमा हप्त्याची रक्कम रु. 1 लाख मिळणेस पात्र आहेत. तथापि पॉलिसी करारातील अटी शर्तीनुसार विमाधारकास सदरची पॉलिसी रद्द करावयाची असल्यास विमाधारक सदरची पॉलिसीचा पुनर्विचार (Review) करुन सदर पॉलिसीचे कागदपत्रे 15 दिवसांचे कालावधीत (Free look period) वि.प. विमा कंपनीकडून मागणी करु शकतो. त्यानुसार तक्रारदार यांनी वि.प. विमा कंपनीकडे अदा केलेली विमा रक्कम काही रकमेची कपात करुन विमाधारकास परत करता येते असे वि.प. यांनी त्यांचे म्हणण्यामध्ये कथन केलेले आहे. या बाबीचा विचार करता तक्रारदार हे सदर रकमेवर व्याज मिळणेस अपात्र आहेत या निष्कर्षास हे आयेाग येत आहे. सबब, मुद्दा क्र.4 चे उत्तर हे आयोग होकारार्थी देत आहे.
मुद्दा क्र.5
11. वि.प. यांनी तक्रारदार यांना द्यावयाचे सेवेत त्रुटी केलेने तक्रारदार हे वि.प. यांचेकडून मानसिक त्रासापोटी रक्कम रु.8,000/- व अर्जाचे खर्चापोटी रक्कम रु.3,000/- मिळणेस पात्र आहेत. सबब, मुद्दा क्र.5 चे उत्तर हे आयोग होकारार्थी देत आहे.
मुद्दा क्र.6 - सबब आदेश.
- आ दे श - - तक्रारदाराचा तक्रार अर्ज अंशत: मंजूर करणेत येतो.
- वि.प. विमा कंपनी यांनी तक्रारदार यांना विमाहप्त्यापोटी भरलेली रक्कम रु.1,00,000/- अदा करावी.
- वि.प.विमा कंपनी यांनी तक्रारदारांना मानसिक त्रासापोटी रक्कम रु.8,000/- व तक्रारअर्जाचे खर्चापोटी रक्कम रु.3,000/- अदा करावी.
- वर नमूद सर्व आदेशांची पुर्तता वि.प. यांनी आदेश पारीत तारखेपासून 45 दिवसांत करावी.
- विहीत मुदतीत आदेशांची पुर्तता न केलेस ग्राहक सरंक्षण कायदयातील तरतुदींअन्वये वि.प. विरुध्द कारवाई करणेची मुभा तक्रारदाराला देणेत येते.
- आदेशाच्या सत्यप्रती उभय पक्षकारांना विनामुल्य पाठवाव्यात.
|