निकालपत्र
तक्रार दाखल दिनांकः- 03/10/2013
तक्रार नोदणी दिनांकः- 04/10/2013 तक्रार निकाल दिनांकः- 01/03/2014
कालावधी 04 महिने. 25 दिवस.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी
अध्यक्ष श्री.पी.पी.निटूरकर.B.Com.LL.B.
सदस्या
सौ.अनिता ओस्तवाल.M.Sc. L.L.B.
---------------------------------------------------------------------------------------------------------
नितीन प्रकाश चव्हाण, अर्जदार
वय 25 वर्षे. धंदा.ड्रायव्हर, अॅड.के.पी.मुडपे.
रा.शिवाजी नगर,मानवत,ता.मानवत जि.परभणी.
विरुध्द
1 शाखाधिकारी, गैरअर्जदार.
एच.डी.एफ.सी.बँक लि. अॅड.आर.बी.चव्हाण.
स्टेशन रोड, परभणी.
2 शाखाधिकारी,
एच.डी.एफ.सी.बँक लि.
कन्नावार क्लॉथ समोर,काळी कमान,नांदेड,
______________________________________________________________________
कोरम - 1) श्री.पी.पी.निटूरकर. अध्यक्ष.
2) सौ.अनिता ओस्तवाल. सदस्या.
(निकालपत्र पारित व्दारा.श्री.पी.पी.निटूरकर.अध्यक्ष.)
गैरअर्जदाराने अर्जदाराच्या मालकीचे वाहन (Tata 407) क्रमांक MH-22-N-2826 बेकायदेशिरपणे जप्त करुन अर्जदारास सेवेत त्रुटी दिली, म्हणून सदरची तक्रार आहे.
अर्जदाराची थोडक्यात तक्रार अशी आहे की, तो मानवत येथील रहिवाशी आहे. अर्जदाराने दिनांक 16/03/2011 रोजी Tata -407 LCV टेम्पो खरेदी केला. ज्याचा चेसीस नं. 455051B8B08560 व इंजीन क्रमांक 497 SPTC 40 BYY 611122 असा आहे व सदर टेम्पोचा क्रमांक MH-22-N 2826 असा आहे.
अर्जदाराचे म्हणणे की, सदरचे टेम्पो खरेदी करते वेळी त्याने गैरअर्जदार बँकेकडून 5,35,000/- रु. चे करार नं. 18260133 व्दारे कर्ज घेतले होते व सदर कर्जाची परतफेड अर्जदाराने 47 हप्त्यामध्ये गैरअर्जदाराकडे करायची ठरली होती, व प्रत्येक मासिक हप्ता हा 14,479/- रु. चा होता.
अर्जदाराचे म्हणणे की, सदर कर्ज करार झाल्यानंतर अर्जदाराने गैरअर्जदाराकडे दिनांक 16/03/2011 ते 23/03/2013 पर्यंतचे संपूर्ण 24 हप्ते असे एकूण 3,47,496/- रु. भरले आहेत व सदर टेम्पो खरेदी करते वेळी 1,20,000/- डाऊन पेमेंट म्हणून गैरअर्जदाराकडे अर्जदाराने भरले आहेत.
अर्जदाराचे म्हणणे की, त्याने 3,47,496+1,41,000/- = 4,88,496/- रु. गैरअर्जदाराकडे त्याने भरले आहेत.
अर्जदाराचे म्हणणे की, गैरअर्जदाराचे कर्मचारी श्री जैसवाल यांना दिनांक 22/08/2013 रोजी अर्जदाराच्या थकीत हप्त्यापोटी अर्जदाराचा भाऊ नामे सतीष प्रकाश चव्हाण यांनी SBI मानवत शाखेचा चेक दिला होता, ज्या चेकचा क्रमांक 586102 असा आहे. अर्जदाराचे म्हणणे की, गैरअर्जदाराने पाठवलेली नोटीस अर्जदारास 02/09/2013 रोजी मिळाली व त्यात गैरअर्जदाराने 3,35,259/- रु. ची मागणी केली गैरअर्जदाराची सदरची नोटीस प्राप्त झाल्यानंतर अर्जदार स्वतः गैरअर्जदाराकडे थकीत हप्ते भरण्यासाठी गेला असता त्यास गैरअर्जदाराने संपूर्ण रक्कमेची बेकायदेशिरपणे मागणी केली.
अर्जदाराचे म्हणणे की, गैरअर्जदार क्रमांक 2 च्या आदेशाने गैरअर्जदार क्रमांक 1 यांनी अर्जदाराचे वाहन दिनांक 14/09/2013 रोजी मानवत येथून बळजबरीने धाक दाखवुन ओढून नेले, जे की, बेकायदेशिर आहे व तसेच गैरअर्जदाराने सदरचे वाहन विक्री करुन टाकण्याची अर्जदारास धमकी दिली. गैरअर्जदाराने अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केला आहे व अर्जदाराची फसवणुक केलेली आहे. गैरअर्जदाराने अर्जदारावर काढलेली थकबाकी रु. 3,35,259/- ही खोटी आहे, म्हणून अर्जदारास सदरची तक्रार दाखल करणे भाग पडले व मंचास विनंती केली आहे की, सदरचा तक्रार अर्ज मंजूर करावा व गैरअर्जदारांना आदेश करावा की, त्याने अर्जदाराचे थकीत हप्ते भरुन घ्यावेत व गैरअर्जदाराने अर्जदारास टेम्पो देण्याचा आदेश करावा व तसेच शारीरिक व मानसिक त्रासापोटी 50,000/- व फायद्या पासून वंचीत राहिल्यामुळे 30,000/- व तक्रार अर्ज खर्चापोटी 15,000/- गैरअर्जदाराने अर्जदारास देण्याचा आदेश व्हावा.
तक्रार अर्जाच्या पुष्टयर्थ अर्जदाराने नि.क्रमांक 2 वर आपले शपथपत्र दाखल केलेले आहे.
अर्जदाराने पुराव्याबाबत नि.क्रमांक 6 वर 6 कागदपत्रे दाखल केली आहेत. ज्यामध्ये सतीष मोटार्सची पावती, सतीष मोटार्सची दिनांक 05/03/2011 ची पावती, गैरअर्जदाराने अर्जदारास पाठविलेल्या पत्राची प्रत, गैरअर्जदाराचे दिनांक 14/09/2013 चे पत्र, आर.सी. बुकची प्रत, स्टेटमेंट ऑफ अकांऊंट इ. कागदपत्रे दाखल केली आहेत. व तसेच अर्जदाराने नि.क्रमांक 20 वर स्टेट बँक ऑफ इंडिया मानवत शाखेचा रु. 15,000/- चा चेक क्रमांक 586102 चा चेक दाखल केला आहे.
तक्रार अर्जास लेखी निवेदन सादर करण्यासाठी मंचातर्फे गैरअर्जदाराना नोटीसा काढण्यात आल्या.
गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 मंचासमोर हजर व नि.क्रमांक 15 वर आपला लेखी जबाब सादर केला व त्यात त्यांचे असे म्हणणे आहे की, सदरची तक्रार ही खोटी व बनावटी आहे व ती कायद्याच्या विरोधात आहे व ती खारीज होणे योग्य आहे.
गैरअर्जदाराचे म्हणणे की, करारा प्रमाणे सदरची तक्रार चालवण्यास मंचास अधिकार नाही. करार नाम्याच्या Clause- 28 व 31 प्रमाणे करारा संबंधात कोणताही वाद निर्माण झाल्यास तो अरबीट्रेटरकडे करावा व ते पूणे येथे करावा असे स्पष्ट उल्लेख केला आहे, त्यामुळे सदरची तक्रार मंचात चालु शकत नाही व तसेच सदरच्या करारावर अर्जदाराने सही केली आहे व ते मान्य केले आहे. तसेच गैरअर्जदाराचे म्हणणे की, अर्जदाराने सदरचा टेम्पो हा व्यापार करण्याकरीता घेतला आहे, म्हणून अर्जदार ग्राहक होत नाही, जे की, ग्राहक संरक्षण कायद्या अंतर्गत सदरची तक्रार मंचासमोर चालु शकत नाही.
गैरअर्जदाराने अर्जदारास कसल्याही प्रकारची सेवेत त्रुटी दिली नाही, गैरअर्जदाराचे म्हणणे की, अर्जदाराने करार क्रमांक 18260133 चे योग्यरित्या पालन केले नाही व तसेच अर्जदाराने हप्त्याची परतफेड वेळेवर केलेली नसल्यामुळे गैरअर्जदारास सदरचे लोन वसुल करण्याचा अधिकार आहे. याबाबत गैरअर्जदाराने थकीत हप्त्याची परतफेड करा असे वारंवार नोटीसीव्दारे अर्जदारास कळविले होते, परंतु अर्जदाराने थकीत हप्ते वेळेवर भरले नाहीत, त्यामुळे गैरअर्जदाराने कराराच्या नियमा प्रमाणे अर्जदाराचा टेम्पो ताब्यात घेतला. 25/10/2013 च्या स्टेटमेंट ऑफ अकांऊंट प्रमाणे जवळ जवळ 6 हप्ते अर्जदाराचे थकीत होते, म्हणून अर्जदारास कर्जाची थकीत रक्कम भरा म्हणून नोटीस पाठविली होती, ती योग्यच होती, परंतु अद्याप देखील थकीत हप्त्याची परतफेड गैरअर्जदाराकडे केली नाही.
गैरअर्जदाराने अर्जदाराने टेम्पो ताब्यात घेण्यापूर्वी दिनांक 10/09/2013 रोजी नानलपेठ पोलीस स्टेशन परभणीला कळविले होते, व त्यानंतर दिनांक 14/09/2013 रोजी अर्जदाराने स्वतः त्याचा टेम्पो गैरअर्जदाराच्या ताब्यात दिला व याबाबत पोलीस स्टेशन मानवतला माहिती दिली. गैरअर्जदाराने सदरचे वाहन कायद्याप्रमाणे ताब्यात घेतलेले आहे. अर्जदारावर कोणत्याही प्रकारचा दबाव टाकला नव्हता, जर अर्जदाराने थकीत हप्त्याची परतफेड योग्य वेळेत नाही केली तर गैरअर्जदारास कराराप्रमाणे व कायद्या प्रमाणे वाहन ताब्यात घेण्याचा अधिकार आहे.
गैरअर्जदाराचे म्हणणे की, 31/12/2013 च्या Statement of Account प्रमाणे गैरअर्जदाराची 3,48,626/- अर्जदाराकडे थकीत आहे. गैरअर्जदाराने हे मान्य केले आहे की, अर्जदाराने टेम्पो खरेदी करतेवेळी त्यांच्याकडून 5,35,000/- रु. चे कर्ज घेतले व सदरच्या कर्जाची परतफेड 47 हप्त्यामध्ये अर्जदाराने करायची ठरली होती व प्रत्येकी हप्ता 14,479/- रु. चा होता.
गैरअर्जदाराचे म्हणणे की, अर्जदाराने दिनांक 16/03/2011 ते 23/03/2013 पर्यंत 24 हप्त्याची एकुण 3,47,496/- रु. परतफेड केली नाही, तसेच अर्जदाराचे हे म्हणणे चुकीचे आहे की, त्याने Down payment 1,20,000/- रु. गैरअर्जदाराकडे भरले. वास्तविक Down Payment म्हणून अर्जदाराने 1,20,000/- हे सतीष मोटार्सकडे भरले आहेत. व याचा गैरअर्जदाराचा अर्थाअर्थी संबंध नाही. तसेच गैरअर्जदाराचे म्हणणे की, अर्जदाराने त्याचा भावाचा चेक हप्त्याची परतफेड करण्यासाठी गैरअर्जदारास कधीही दिले नव्हते वा अर्जदार हप्त्याची रक्कम भरण्यासाठी गैरअर्जदाराकडे आला नाही, आम्ही अर्जदारास कसल्याही प्रकारची सेवेत त्रुटी दिली नाही, म्हणून मंचास विनंती केली आहे की, सदरची तक्रार अंतरिम अर्जासह खारीज करण्यात यावी.
लेखी जबाबाच्या पुष्टयर्थ गैरअर्जदाराने नि.क्रमांक 16 वर आपले शपथपत्र दाखल केले आहे.
गैरअर्जदाराने पुराव्याबाबत नि.क्रमांक 18 वर 11 कागदपत्रे दाखल केली आहेत. ज्यामध्ये कर्ज मागणीचा अर्ज, कराराची प्रत, Statement of Account, नोटीसीची प्रत, Authorization Letter ची प्रत, वाहन ताब्यात घेण्याबाबतची पूर्वीची नोटीसीची प्रत, वाहन ताब्यात घेतल्यानंतरची नोटीसीची प्रत, सरेंडर लेटर, Inventory of interim ची प्रत, पार्किंगची प्रत, टाटा मोटार्सची प्रत इ.कागदपत्रे दाखल केली आहे.
दोन्ही बाजुंच्या कैफियतीवरुन निर्णयास उपस्थित होणारे मुद्दे खालील प्रमाणे आहेत.
मुद्दे. उत्तर.
1 गैरअर्जदाराने अर्जदाराच्या टेम्पो क्रमांक MH-22-N-2826
बेकायदेशिरपणे ताब्यात घेवुन अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब
करुन अर्जदारास सेवेत त्रुटी दिली आहे काय ? नाही.
2 आदेश काय ? अंतिम आदेशा प्रमाणे.
कारणे.
मुद्दा क्रमांक 1.
अर्जदाराने टाटा 407 मॉडेलचा टेम्पो ज्याचा क्रमांक MH-22-N-2826 खरेदी करतांना गैरअर्जदाराकडून 5,35,000/- रु. चे कर्ज कराराव्दारे घेतले होते व सदर कर्जाची परतफेड अर्जदाराने 47 हप्त्यामध्ये करायची ठरली होती, व मासिक हप्ता प्रत्येकी 14,479/- रु. चा ठरला होता, ही बाब अॅडमिटेड फॅक्ट आहे. फक्त वादाचा मुद्दा हा आहे की, अर्जदाराने सदर कर्जाची परतफेड वेळेवर केली होती का ? व गैरअर्जदाराने बेकायदेशिरपणे अर्जदाराचे सदरचे वाहन ताब्यात घेवुन अर्जदारास सेवेत त्रुटी दिली का ?
याबाबत अर्जदाराचे म्हणणे की, त्याने गैरअर्जदाराकडून सदर टेम्पो खरेदी करतांना 5,35,000/- रु. चे कर्ज घेतले होते व सदर हप्त्याची परतफेड 47 हप्त्यामध्ये करायची ठरली होती व प्रत्येकी हप्ता मासिक 14,479/- रु. चा होते, ही बाब गैरअर्जदाराने दाखल केलेल्या नि.क्रमांक 18/4 वरील Loan Account Status च्या कागदपत्रावरुन सिध्द होते व तसेच प्रत्येकी महिन्याचा हप्ता 16 तारखेला द्यायचा ठरला होता. सदरचे 47 हप्ते हे 16/03/2011 ते 15/01/2015 पर्यंत देय होते, ही बाब देखील नि.क्रमांक 18/4 वरील कागदपत्रावरुन दिसून येते.
अर्जदाराचे तक्रारीमध्ये म्हणणे की, त्याने सदर कर्जाच्या देयपोटी गैरअर्जदाराकडे 16/03/2011 ते 23/03/2013 चे संपूर्ण हप्ते एकुण रक्कम 3,47,496/- रु. व Down Payment म्हणून 1,20,000/- रु. गैरअर्जदाराकडे भरले हे अर्जदाराचे म्हणणे मंचास योग्य वाटत नाही, कारण Down Payment चे 1 लाख 20 हजार रु. अर्जदाराने गैरअर्जदाराकडे भरले याबाबत अर्जदाराने कोणताही ठोस कागदोपत्री पुरावा मंचासमोर आणला नाही, तसेच अर्जदाराने दिनांक 05/03/2011 रोजी सतीष मोटार्स औरंगाबाद यांचेकडे 1,31,000/- रु. भरल्याचे नि.क्रमांक 6/2 वरील पावती वरुन दिसून येते व तसेच अर्जदाराचे म्हणणे की, 16/03/2011 ते 23/03/2013 पर्यंतचे संपूर्ण हप्ते गैरअर्जदाराकडे जमा केले. याबाबत अर्जदाराने पावती मंचासमोर दाखल केले नाही, परंतु गैरअर्जदाराने दाखल केलेल्या नि.क्रमांक 18/4 वर दाखल केलेल्या Statement of Account वरुन असे दिसून येते की, अर्जदाराने दिनांक 28/04/2011 पासून ते 25/09/2013 पर्यंत जवळ जवळ 25 हप्ते अर्जदाराने गैरअर्जदाराकडे भरल्याचे दिसून येते. जे की, नियमा प्रमाणे 16/03/2011 ते 23/03/2013 पर्यंत अर्जदाराने गैरअर्जदाराकडे कराराप्रमाणे 31 हप्ते भरणे आवश्यक होते. अर्जदाराने कराराप्रमाणे हप्त्याची रक्कम वेळेवर भरणा केल्याचे दिसून येत नाही.
अर्जदाराचे म्हणणे की, गैरअर्जदाराने त्याच्या मालकीचा सदरचा टेम्पो दिनांक 14/09/2013 रोजी बळजबरीने धाक दाखवुन अर्जदाराच्या ताब्यातून घेवुन गेले हे म्हणणे मंचास योग्य वाटत नाही. व याबाबत गैरअर्जदाराचे म्हणणे की, त्याने करारा प्रमाणे अर्जदाराने हप्त्याची परतफेड न केल्यामुळे अर्जदाराना नोटीस देवुन ताब्यात घेतले व ही बाब नि.क्रमांक 18/9 वरील Surrender letter वरुन सिध्द होते. व त्यावर अर्जदाराची सही आहे. व तसेच गैरअर्जदाराने दाखल केलेल्या नि.क्रमांक 18/3 वरील कराराचे अवलोकन केले असता त्यामध्ये स्पष्टपणे लिहिले आहे की, जर हप्त्याची परतफेड वेळेवर कर्जदाराने नाही केली तर, वाहन ताब्यात घेण्याचा अधीकार गैरअर्जदारास आहे ( नियम क्रमांक 17)
अर्जदाराचे सप्टेंबर 2013 पर्यंत देय असलेल्या हप्त्यापैकी एकुण 6 हप्ते थकीत होते, हे निश्चित व अर्जदार ही आपल्या तक्रारी मध्ये मान्य केले आहे. गैरअर्जदाराने अर्जदाराचे वाहन ताब्यात घेवुन अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब करुन अर्जदारास सेवेत त्रुटी दिल्याचे कोठेही दिसून येत नाही, परंतु अर्जदार आपल्या तक्रारी मध्ये म्हणतो की, तो थकीत हप्ते भरायला तयार आहे, परंतु गैरअर्जदार ते स्विकारण्यास तयार नाहीत व वाहन परत अर्जदारास देण्यास तयार नाही, हे गैरअर्जदाराचे वर्तणुक मंचास योग्य वाटत नाही, कारण अर्जदाराने सदर गाडीसाठी जवळ जवळ 25 हप्ते गैरअर्जदारास दिले आहेत व त्याची बरीच रक्कम गाडी मध्ये गुंतलेली आहे व तसेच अर्जदार प्रस्तुत तक्रारीत विनंती कॉलम मध्ये विनंती करतो की, गैरअर्जदाराने थकीत हप्ते भरुन घेण्याचे आदेश व्हावेत व त्याच्या मालकीचा टेम्पो क्रमांक MH-22-N-2826 गैरअर्जदाराने अर्जदारास परत करावे याचाच अर्थ असा होतो की, अर्जदार संपूर्ण थकीत हप्ते भरण्यास तयार आहे. व त्याप्रमाणे अर्जदारास 16/03/2011 ते 16/02/2014 पर्यंत जे काही हप्ते थकीत असतील ती अर्जदारास गैरअर्जदाराकडे हप्ते जमा करण्याची संधी देणे नैसर्गिक व न्यायतत्वा प्रमाणे योग्य व न्यायाचे होईल. असे मंचास वाटते. म्हणून मुद्दा क्रमांक 1 चे नकारार्थी उत्तर देवुन मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1 अर्जदाराचा तक्रार अर्ज अंशतः मंजूर करण्यात येत आहे.
2 अर्जदाराने आदेश तारखे पासून 30 दिवसाच्या आत करार क्रमांक 586102
अन्वये 16/03/2011 ते 16 फेब्रुवारी 2014 पर्यंतच्या कालावधीतील11 थकीत
हप्तेंची (11 X 14,479) प्रमाणे रोख रक्कम गैरअर्जदाराकडे जमा करावी व
गैरअर्जदाराने दिनांक 16 फेब्रुवारी 2014 पर्यंतची एकुण थकीत हप्तेची रक्कम
अर्जदाराने त्यांचेकडे भरल्यानंतर सदर रक्कम मिळाल्यापासून 2 दिवसांच्या आत
अर्जदाराचा टेम्पो MH-22-N-2826 अर्जदारास परत द्यावा.
3 तक्रारीचा खर्च ज्याचा त्यांनी करावा.
4 आदेशाच्या प्रती पक्षकारांना मोफत पुरवाव्यात.
सौ.अनिता ओस्तवाल. श्री. पी.पी.निटूरकर
मा.सदस्या. मा.अध्यक्ष.