ग्राहक तक्रार क्र. : 117/2014
दाखल तारीख : 04/06/2014
निकाल तारीख : 20/08/2015
कालावधी : 01 वर्षे 02 महिने 17 दिवस जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद
1) धनराज श्रीधर मोरे,
वय – 52 वर्षे, धंदा – व्यापार,
रा. तलमोड, ता. उमरगा, जि. उस्मानाबाद. ....तक्रारदार
वि रु ध्द
1) शाखा व्यवस्थापक,
चोलामंडलम एम.एस.जनरल इंन्सुरन्स कंपनी लि.
बारे हॉऊस, दुसरा मजला, एन.एस.सी. बोसे रोड,
चेन्नई.600001. ..विरुध्द पक्षकार
कोरम : 1) मा.श्री.एम.व्ही.कुलकर्णी, अध्यक्ष.
2) मा.श्रीमती विद्युलता जे.दलभंजन. सदस्य.
3) मा.श्री.मुकुंद बी.सस्ते, सदस्य.
तक्रारदारातर्फे विधीज्ञ : श्री.जी.के.गायकवाड.
विरुध्द पक्षकारा तर्फे विधीज्ञ : श्री.डी.आर.कुलकर्णी.
न्यायनिर्णय
मा.अध्यक्ष, श्री.एम.व्ही.कुलकर्णी यांचे द्वाराः
1) आपल्या ट्रकचा विरुध्द पक्षकार (विप) विमा कंपनीकडे विमा उतरविला असताना ट्रक अपघातग्रस्त होऊन दुरुस्ती करावी लागली त्यांची भरपाई देण्याचे नाकारुन विप ने सेवेत त्रुटी केली म्हणून भरपाई मिळावी यासाठी तक्रारकर्ता (तक) यांने ही तक्रार दिलेली आहे.
तक चे तक्रारीतील कथन थोडक्यात पुढीलप्रमाणे आहे.
1. तक हा तोलमोड ता.उमरगाचा रहिवासी आहे. ट्रक क्र.एम.एच.25 यू 4953 तक चे मालकीचा आहे. तक ने विप कडे ट्रक चा विमा दि.27.12.2012 ते 26.12.2013 या कालावधीसाठी उतरविला आहे. प्रशांत किरण मोरे यांला चालक म्हणून नेमले होते. दि.19.03.2013 रोजी मिरची व आंब्याचा लोड घेऊन ट्रक मुंबईला जात होता. चालक ट्रक सावकाश व काळजीपूर्वक चालवत होता. राष्ट्रीय महामार्ग क्र.9 वर कराळी शिवारामध्ये विरुध्द बाजूने ट्रक क्र.एम.एच. 13 आर 3568 अतिशय वेगाने आला व तक च्या ट्रकला जोरात धडक दिली. तक चा ड्रायव्हर व क्लिनर यांना जखमा झाल्या. समोरच्या ट्रक मधील दोन इसम मयत झाले. घटनेनंतर उमरगा येथे पोलिस स्टेशनला फिर्याद देण्यात आली. ती फिर्याद दुस-या ट्रकचे चालकाने दिली. तक चे चालकावर गु.र.क्र. 55/13 गुन्हा नोंदविण्यात आला. पोलिसांनी घटनास्थळ पंचनामा दि.19.03.2013 रोजी केला. तक ने विप यांना पत्र देऊन कळविले. विप चे सर्व्हेअरने ट्रकची पाहणी केली. तक ला ट्रक दुरुस्त करुन घेणेकामी रु.4,00,000/- खर्च आला. तक ने विप कडे वारंवार जाऊन नुकसान भरपाईची मागणी केली. दि.02.08.2013 रोजी विप ने पत्र देऊन तक ची मागणी नाकारली. ट्रक मध्ये चार प्रवासी प्रवास करीत असल्यामुळे नुकसान भरपाई नाकारली हे योग्य नाही. ट्रकची नुकसान भरपाई रु.4,00,000/-, तक्रारीचा खर्च रु,5,000/- मिळावेत म्हणून तक ने ही तक्रार दि.04.06.2014 रोजी दाखल केलेली आहे.
2. तक ने तक्रारी सोबत विप ची दि.02.08.2014 चे पत्र, दोषारोप पत्र, एफ.आय.आर., फिर्याद, घटनास्थ्ळ पंचनामा, विद्याधर मोरे यांचा जवाब, ट्रकचे रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र, इन्शुरन्स प्रमाणपत्र, प्रशांत मोरे यांचे ड्रायव्हींग लायसन्स, इत्यादी कागदपत्राच्या प्रति हजर केल्या आहेत.
3. विप अॅड.डि.आर कूलकर्णी यांचे मार्फत हजर झाले. मात्र लेखी म्हणणे न दिल्यामुळे दि.01.01.2015 रोजी नो से ची ऑर्डर झाली. त्यानंतर दि.13.05.2015 रोजी से सोबत नो से आदेश रदद करण्याचा अर्ज दिला. दि.16.06.2015 चे आदेशाप्रमाणे खर्च रु.500/- भरल्यास से स्विकारण्याचा आदेश झाला. तथापि विप यांनी खर्च भरला नाही. मात्र विप तर्फे दि.22.07.2015 रोजी लेखी बहस व कागदपत्रे दाखल करण्यात आलेली आहेत. तक ने भाडे तत्वावर ट्रक मधून प्रवासी नेऊन विमा कराराच्या अटी व शर्ती चे उल्लंघन केले त्यामुळे तक हा विमा रक्कम मिळण्यास पात्र नाही असे म्हटलेले आहे. अंतिम सर्व्हे रिपोर्ट, गाडीचे आर सी बुक, प्रशांत मोरेचा जवाब, महारुद्र स्वामी यांचा जवाब, हनुमंत देशमूख यांचा जवाब इत्यादी कागदपत्राच्या प्रति हजर केलेल्या आहेत.
4. तक ची तक्रार, त्यांने दाखल केलेली कागदपत्रे, तसेच विप चे म्हणणे, त्यांनी दाखल केलेली कागदपत्र यांचे अवलोकन करता आमचे विचारार्थ काही मुददे निघतात आम्ही त्यांची उत्तरे त्यांचे समोर खालील दिलेल्या कारणासाठी लिहीली आहेत.
मुद्दे उत्तरे
1. विप ने सेवेत त्रूटी केली आहे काय ? होय.
2. तक अनुतोषास पात्र आहे काय ? होय, अंशतः
3. आदेश काय ? अंतिम आदेशाप्रमाणे.
कारणमिंमासा
मुद्दा क्र.1 व 2 :
5. सर्टिफिकेट ऑफ इन्शुरन्स प्रमाणे विप कडे ट्रक एम.एच.25 यू.4953 चा विमा दि.27.12.2012 ते 26.12.2013 या कालावधीसाठी उतरविला होता. ट्रकची किंमत रु.9,13,680/- दाखवली होती. प्रिमियम रु.26,477/- दिलेला होता. असे दिसते की, दि.19.03.2013 रोजी तक चे चालका विरुध्द फिर्याद दाखल झाली होती. दुस-या ट्रकच्या चालकाने फिर्याद दाखल केली. त्या ट्रक मधले प्रवासी मयत झाल्याचे दिसून येते.
6. विद्याधर धनराज मोरे हा तक चा मुलगा असून तो ट्रक मधून जात होता त्याचे जबाबाप्रमाणे त्यांने प्रशांत यांला घटनेच्या वेळी ड्रायव्हींग करायला दिले होते. त्यांचे जबाबात असे आले की, महारुद्र स्वामी, हनुमंत देशमूख व माधव मोरे हे पण ट्रक मध्ये प्रवास करत होते. अपघातात प्रशांत यांला जास्त मार लागला तर माधव मोरे, हनुमंत देशमुख व महारुद्र स्वामी यांना किरकोळ मार लागला. विप यांनी प्रशांत मोरे यांच्या जबाबाची प्रत दाखल केली आहे. त्याचप्रमाणे महारुद्र स्वामी यांचे पण जबाबाची प्रत हजर केली आहे व हनुमंत देशमुख यांचे पण जबाबाची प्रत हजर केली आहे. आर सी बुका प्रमाणे ट्रकची सिटींग कॅपसिटी 1 + 2 अशी होती. विप यांनी पूर्ण पॉलिसी कागदपत्र हजर केलले नाहीत. ट्रक मधून जाणारे लोक भाडे देऊन प्रवास करीत होते. हे दाखवण्यास कोणताही पुरावा नाही. कदाचित ते आपल्या माला बरोबर प्रवास करत असतील. प्रशांत मोरे यांला ट्रान्सपोर्ट व्हेईकल चालविण्याचे लायसन्स होते.
7. विप चे दि.02.01.2013 चे पत्रात म्हटले आहे की, अटीचा भंग झाल्यामुळे विप नुकसान भरपाई देण्यास जबाबदार नाही. विप चे असे म्हणणे की, तक ने भाडे घेऊन प्रवासी नेले पण भाडयाने प्रवासी नेल्याबददल कोणताही पुरावा नाही. तसेच पॉलिसी हजर न केल्यामुळे करारातील अटीचा भंग झाल्याचे शाबीत होत नाही. वर म्हटल्याप्रमाणे मालासोबत प्रवास करणा-या व्यक्ती ट्रक मध्ये असू शकतात व त्यामुळे अटीचा भंग झाला हे विप शाबीत करु शकला नाही. त्यामुळे भरपाई नाकारुन विप ने सेवेत त्रुटी केली असे आमचे मत आहे.
8. तक ने ट्रकचे रु.4,00,000/-नुकसान झाल्याचे म्हटले आहे पण त्याबददल कोणताही पुरावा दिलेला नाही. दुरुस्ती केली किंवा नाही हे पण स्पष्ट केलेले नाही. विप तर्फे सर्व्हेअरचा रिपोर्ट हजर करण्यात आलेला आहे. त्याप्रमाणे रु.1,92,000/- अशी नुकसान भरपाई दाखवली आहे. तेवढी नुकसान भरपाई मिळण्यास तक पात्र आहे असे आमचे मत आहे. म्हणून मुददा क्र.1 व 2 चे उत्तर होकारार्थी देतो व खालीलप्रमाणे आदेश करतो.
आदेश
1) तक ची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
2) विप यांनी तक यांना रु.1,92,000/-(एक लक्ष ब्यान्नव हजार फक्त) विमा भरपाई 30 दिवसाचे आंत द्यावी, न दिल्यास तक्रार दाखल तारखेपासून रक्कम मिळेपर्यत द.सा.द.शे. 9 दराने त्या रक्कमेवर व्याज द्यावे.
3) विप यांनी तक ला तक्रारीचा खर्च म्हणून रु.3,000/- (रुपय तीन हजार फक्त) द्यावेत.
4) ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे अधिनियम 2005 मधील कलम 20 (3) प्रमाणे तक्रारीतील सदस्यांचे संच तक्रारदाराला परत करावेत.
(श्री. एम.व्ही. कुलकर्णी)
अध्यक्ष
(श्री.मुकूंद.बी.सस्ते) (सौ.विद्युलता जे.दलभंजन)
सदस्य सदस्या
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद.