Exh.No.36
सिंधुदुर्ग जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सिंधुदुर्ग
तक्रार क्रमांक- 23/2014
तक्रार दाखल झाल्याचा दि.15/07/2014
तक्रार निकाल झाल्याचा दि. 03/06/2015
श्री आनंद भास्कर शिरवलकर
भागीदार,
तेंडोलकर शिपिंग अँड लॉजिस्टिक्स
उ.व. 32, धंदा- व्यवसाय,
रा.वेताळबांबर्डे, ता.कुडाळ,
जिल्हा- सिंधुदुर्ग. ... तक्रारदार
विरुध्द
शाखा व्यवस्थापक,
कॅनरा बँक, शाखा – सावंतवाडी,
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग ... विरुध्द पक्ष.
गणपूर्तीः- 1) श्री कमलाकांत ध. कुबल, प्रभारी अध्यक्ष
3) श्रीमती वफा ज. खान, सदस्या.
तक्रारदारतर्फे विधिज्ञ – श्री तुषार अवधुत भणगे
विरुद्ध पक्षातर्फे विधिज्ञ – श्री दिपक दत्ताराम नेवगी, श्री कौस्तुभ दिलीप नेवगी.
निकालपत्र
(दि. 03/06/2015)
द्वारा : वफा जमशीद खान, सदस्या.
1) तक्रारदार या ग्राहकांस विरुध्द पक्ष बँकेने सेवा देण्यात कसुर केलेली असल्याने त्यांनी तक्रार दाखल केलेली आहे.
2) तक्रारीची थोडक्यात हकीकत अशी की, विरुध्द पक्ष यांच्या बँकेत तक्रारदार व त्याचा भागीदार श्री अमेय यशवंत प्रभुतेंडोलकर यांनी मिळून ‘तेंडोलकर एस्. लॉजिस्टीक’ नावाने खाते उघडलेले आहे. त्याचा खाते नं.2798201000124 असा आहे. सदर खाते संयुक्त खाते असून त्यातील सर्व व्यवहार तक्रारदार व त्याचा भागीदार यांच्या संयुक्त सहीने चालतात. एका भागीदाराच्या सहीने सदरच्या खात्यातील पैसे काढता येत नाहीत.
3) तक्रारदार यांचे पूढे असे कथन आहे की, अॅझॉईक कॅरिअर्स (Azoic Carriers) या संस्थेच्या बार्जिस तक्रारदार यांची भागीदारी संस्था भाडयाने घेत असते. त्याच्या बिलाबाबत तक्रार नसल्यास त्याचे पेमेंट आर.टी.जी.एस. मार्फत केले जाते. सदर अॅझॉईक कॅरिअर्स यांनी दिलेल्या बिलापोटी भागीदारी संस्थेचे भागीदार श्री अमेय यशवंत प्रभुतेंडोलकर यांनी विरुध्द पक्ष बँकेचे धनादेश क्र.546566 रक्कम रु.1,19,008/- आणि धनादेश क्र.546567 रक्कम रु.3,28,359/- असे दि.18/6/2014 रोजी अॅझॉईक कॅरिअर्सकडे दिले होते व सदर दोन्ही धनादेशावर तक्रारदार यांची सही घेण्यास सांगितले होते. परंतु तक्रारदार यांची बिलाबाबत काही तक्रार असल्याने त्यांनी त्यावर सहया केलेल्या नाहीत. ती तक्रार दूर करुन व तक्रारदार यांच्या सहया त्यावर घेऊन नंतर धनादेश बँकेत जमा करणेचा होता. या सर्व गोष्टींची कल्पना तक्रारदार यांने विरुध्द पक्ष बँकेस दिली होती व तक्रारदार यांची सही नसलेले उक्त धनादेश वटण्यासाठी आल्यास पैसे अदा करु नयेत असेही सांगितलेले होते. तरीही विरुध्द पक्ष बँकेने अॅझॉईक कॅरिअर्स यांना सामील होऊन तक्रारदार यांची सही नसतांना दि.21/06/2014 रोजी दोन्ही धनादेश पास करुन त्यांची रक्कम रु.4,47,367/- अॅझॉईक कॅरिअर्स यांच्या खात्यात वळती करुन तक्रारदार यांचे आर्थिक नुकसान केले. तसेच विरुध्द पक्ष यांना सदर रक्कमा पुन्हा तक्रारदार यांच्या खात्यात वर्ग करा असे सांगितले असता विरुध्द पक्ष यांच्या शाखाधिकारी यांनी उडवाउडवीची उत्तरे देऊन उध्दट भाषा वापरली. कागदपत्रांची मागणी केली असता टाळाटाळ केली. वरिष्ठाकंडे तक्रार करणार असे सांगितल्यावर कागदपत्रांच्या प्रमाणित नक्कला देण्यात आल्या.
4) तक्रारदार यांच्या भागीदारी संस्थेचे विरुध्द पक्ष यांचेकडे काढलेल्या चालू खात्याचा व्यवहार हा दोन्ही भागीदारांच्या सहीने होत असतात. एकाच भागीदाराच्या सहीने असलेले धनादेश बेकायदेशीररित्या वटवून तक्रारदार यांची आर्थिक, मानसिक नुकसानी करुन तक्रारदार यांस ग्राहक या नात्याने सेवा देण्यास कसुर केल्याने विरुध्द पक्ष यांचेकडून दोन धनादेशांची रक्कम रु.4,47,367/- व त्यावर दि.21/6/2014 पासून वसुल होईपर्यंत द.सा.द.शे.18% व्याज मानसिक नुकसानीपोटी रु.1,00,000/-, तक्रार अर्जाचा खर्च रु.52,933/- वसुल होऊन मिळणेसाठी तक्रार दाखल केलेली आहे.
5) सदर ग्राहक तक्रार सेवात्रुटीसंबंधाने असल्याने दाखल करुन घेणेत आली. विरुध्द पक्ष हजर होऊन त्यांनी नि.11 वर अर्ज दाखल करुन तक्रारदार यांच्या भागीदारी संस्थेचे बँक अकाऊंट असून तक्रारदार या एकाच भागीदाराने वैयक्तिक स्वरुपात तक्रार अर्ज दाखल केला आहे. ते वैयक्तिकरित्या विरुध्द पक्षाचे ग्राहक नसल्याने तक्रार चालविण्याचे अधिकारक्षेत्र सिंधुदुर्ग ग्राहक मंचास नसल्याने प्राथमिक मुद्दा काढून तक्रार फेटाळणेची विनंती केली. प्राथमिक मुद्दयासंबंधाने दि.25/2/2015 रोजी मंचाने आदेश पारीत करुन तक्रार या मंचामध्ये चालणेस पात्र असल्याचे निष्कर्ष नोंदवले. विरुध्द पक्ष यांनी तक्रार अर्जकामी लेखी म्हणणे नि.13 वर दिले असून तक्रार अर्ज खोटा व खोडसाळ असल्याने तो फेटाळणेत यावा अशी विनंती केली आहे. तसेच तक्रारदार यांची भागीदारी फर्मचे एकत्रित अकाऊंट असून अन्य भागीदारांस पक्षकार केले नसल्याने तक्रार कायदेशीररित्या चालणारी नाही असेही म्हटले आहे.
6) विरुध्द पक्ष यांचे पुढे असे म्हणणे आहे की चेक बुक योग्य प्रकारे ठेवणे आणि त्यातील चेक योग्य त्या व्यक्तीला देणे ही सर्व जबाबदारी खातेधारकाची असते. एखादया भागीदारांने बँकेतील अकाउंटबाबत कोणत्याही कागदावर सही करुन दिल्यास त्याची जबाबदारी दुस-या भागीदारावरही असते व ती कायदयानेही येते. तक्रारदाराच्या बाबतीत त्यांनी तशी जबाबदारी स्वीकारलेबाबतचे कागदपत्र विरुध्द पक्ष बँकेला लिहून दिलेले आहेत.
7) विरुध्द पक्ष यांचे पुढे असे म्हणणे आहे की तक्रारीत नमूद केलेप्रमाणे तक्रारदार अॅझॉईक कॅरिअर्सचे देणे लागत होते. त्यांची रक्कम फेडणे दोन्ही भागीदारांवर बंधनकारक होते आणि भागीदारांच्या देण्यापोटी सदर चेक्स देण्यात आले होते. ही वस्तुस्थिती तक्रारदारालाही मान्य होती आणि म्हणूनच तक्रारदार किंवा भागीदारांनी सदर चेकबाबत कधीही स्टॉप पेमेंट इन्स्ट्रक्शन विरुध्द पक्ष बँकेला दिलेले नव्हते व नाही. केवळ तांत्रिक त्रुटीचा तक्रारदार हे कपट हेतूने गैरफायदा घेणेचा प्रयत्न करीत आहेत. तसेच विरुध्द पक्षाच्या म्हणण्यानुसार सदर दोन्ही चेकचे क्लिअरिंग (पेमेंट) हे विरुध्द पक्ष शाखा व्यवस्थापक यांचेकडे झालेले नसून ते मुंबई येथिल क्लिअरिंग सेक्शन मधून झालेले आहे. त्यामुळे विरुध्द पक्ष शाखा व्यवस्थापक यांचेविरुध्द प्रस्तुत तक्रार चालण्याजोगी नाही. तक्रारदार यांना विरुध्द पक्ष बँकेने वेळोवेळी योग्य ते सहकार्य केलेले आहे. कोणतीही सेवात्रुटी केलेली नाही. त्यामुळे ती रद्द करावी असे म्हणणे मांडले.
8) तक्रारदार यांनी तक्रार अर्जाच्या पुष्टयर्थ नि.4 सोबत धनादेश क्र.546566 व 546567 ची प्रमाणित नक्कल व विरुध्द पक्ष कडील खाते क्र.2798201000124 चा खाते उतारा, नि.14 सोबत विरुध्द पक्ष संस्थेने भागीदारी संस्थेला पाठविलेले दि.9/7/2014 चे पत्र, नि.18 सोबत दि.23/9/2013 ची भागीदारी संस्थेच्या नोंदणीसाठीच्या अर्जाची नक्कल तसेच नि.25 सोबत भागीदारी पत्र दाखल केले आहे. तसेच तक्रारदार यांनी त्यांचे शपथपत्र नि.27 वर दाखल केले आहे. विरुध्द पक्षातर्फे तक्रारदार यांचा उलटतपास घेणेसाठी परवानगीचा अर्ज नि.28 वर दाखल असून तक्रारीचे स्वरुप पाहाता कागदोपत्री पुराव्याद्वारे न्याय्य देतांना कोणतीही अडचण नसल्याने उलटतपासाची परवानगी नाकारणेत आली होती.
9) विरुध्द पक्ष यांनी त्यांचे पुराव्याचे शपथपत्र नि.30 वर दाखल केले असून तक्रारदार यांचा लेखी युक्तीवाद नि.33 वर दाखल असून विरुध्द पक्ष यांचा लेखी युक्तीवाद नि.34 वर दाखल आहे. विरुध्द पक्ष यांनी युक्तीवादासोबत दाखल केलेले कागद नि.35 सोबत आहेत. तक्रारदार करिता वकील श्री तुषार भणगे आणि विरुध्द पक्ष यांचेकरीता श्री दिपक नेवगी यांचा तोंडी युक्तीवाद ऐकला.
10) तक्रारदार यांची तक्रार, दाखल कागदोपत्री पुरावा, लेखी व तोंडी युक्तीवाद तसेच विरुध्द पक्ष यांचे लेखी म्हणणे, दाखल कागदोपत्री पुरावा, लेखी व तोंडी युक्तीवाद विचारात घेता खालील मुद्दे उपस्थित होतात.
अ.क्र. | मुद्दे | निष्कर्ष |
1 | विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार या ग्राहकास सेवा देण्यात त्रुटी ठेवली आहे काय ? | नाही |
2 | तक्रार मंजूर होणेस पात्र आहे काय ? | नाही |
11) मुद्दा क्रमांक 1 – तक्रारदार यांनी दाखल केलेल्या तक्रारीचे स्वरुप पाहता सदर तक्रार त्यांनी तेंडोलकर शिपिंग अँड लॉजिस्टीकचे भागीदार म्हणून विरुध्द पक्ष यांचेविरुध्द दाखल केली आहे. तेंडोलकर शिपिंग अँड लॉजिस्टीक या भागीदारी संस्थेचे विरुध्द पक्ष बँकेमध्ये खाते असल्याचे उभय पक्षांना मान्य आहे. तक्रारदार यांच्या म्हणण्यानुसार सदर भागीदारी संस्थेच्या एका भागीदाराने सहया करुन दोन धनादेश अनुक्रमे क्र.546566 रक्कम रु.1,19,008/- आणि धनादेश क्र.546567 रक्कम रु.3,28,359/- असे अॅझॉईक कॅरिअर्सकडे ताब्यात देऊन त्यावर तक्रारदार यांची सही घेणेस सांगितले होते. तक्रारदार यांची बिलाबाबत तक्रार असल्याने त्यांनी त्यावर सहया केलेल्या नव्हत्या. तक्रारदार व त्यांचे भागीदार यांचे तेंडोलकर शिपिंग अँड लॉजिस्टीक या नावाने जॉईंट अकाऊंट असल्याने तक्रारदार यांनी वि.प. बँकेस याची कल्पना देऊन त्यांची सही नसलेले उक्त धनादेश वटण्यासाठी आल्यावर पैसे अदा करु नयेत असे सांगितले होते. तक्रारदारतर्फे विधिज्ञ श्री तुषार भणगे यांचा युक्तीवाद असा की, तक्रारदार व अन्य भागीदार यांचे जॉईंट अकाऊंट असूनही तक्रारदार यांची सही नसतांना एकाच भागीदाराची सही असलेले वर नमुद दोन्ही धनादेश वटवून वि.प. बँकेने अॅझॉईक कॅरिअर्स यांना रक्कमा अदा केल्या. दोन्ही भागीदारांच्या सहया आवश्यक आहेत याची वि.प.बँकेला माहिती होती हे दर्शविण्यासाठी तक्रारदार यांचे वकील श्री भणगे यांनी नि.16/1 वर मंचाचे लक्ष वेधले. तसेच नि.4/3 या खाते उता-यावर जॉईंट होल्डर म्हणून तक्रारदार यांचे नाव असल्याचे दर्शविले. त्यामुळे जॉईंट अकाऊंट असतांना एकाच भागीदाराच्या सहीने असलेले धनादेश वटवून वि.प.बँकेने सेवात्रुटी केली व तक्रारदार यांचे आर्थिक व मानसिक नुकसान केले असल्याचे स्पष्ट केले.
12) विरुध्द पक्ष यांचे विदयमान वकील श्री दीपक नेवगी यांनी वर नमूद बाबींचे खंडण करुन बॅंकेतर्फे करण्यात आलेल्या कृतीसंबंधाने लेखी युक्तीवादासोबत नि.35/3 कडे दाखल केलेल्या कागदोपत्री पुराव्याचा आधार घेतला. तसेच भागीदारी कायदा कलम 18, 19, 25 आणि 69 यांचा आधार घेतला. तक्रारदार व त्यांचे भागीदार यांनी तेंडोलकर शिपिंग अँड लॉजिस्टीक या नावाने खाते उघडतांना विरुध्द पक्ष बँकेकडे दि.28/10/2013 रोजी भागीदारी पत्र सादर केले होते ते विरुध्द पक्ष यांनी नि.35/3 कडे दाखल केले आहे. सदर पत्रामध्ये दोघेही भागीदार हे संयुक्तरित्या व वैयक्तिकरित्या कोणाही एका भागीदाराने केलेल्या पेमेंटला व सर्व कृत्यांना जबाबदार राहतील; तसेच एका भागीदाराची सही ही भागीदारी फर्मवर व दुस-या भागीदारांवर बंधनकारक राहील असे लिहून तक्रारदार व अन्य भागीदार यांनी सहया केलेल्या आहेत. या भागीदारी पत्राला अनुसरुन धनादेशांचे पेमेंट झालेले आहे आणि ते पेमेंट विरुध्द पक्ष शाखा व्यवस्थापक, यांचेकडून झालेले नसून ते मुंबई येथील क्लिअरिंग सेक्शन मधून झालेले आहे. तक्रारदार यांनी स्टॉप पेमेंटच्या कोणत्याही सूचना वि.प. बँकेला दिलेल्या नाहीत. त्यामुळे विरुध्द पक्ष यांचेकडून कोणत्याही प्रकारे सेवात्रुटी झालेली नाही.
13) तक्रार प्रकरणातील कागदोपत्री पुरावा आणि युक्तीवाद विचारात घेता विरुध्द पक्ष बँकेकडून देण्यात आलेले धनादेश हे तेंडोलकर शिपिंग अॅड लॉजिस्टिक यांचेवेतीने तक्रारदार व अन्य भागीदार यांचे ताब्यात होते. वादातीत धनादेशावर एकाच भागीदाराची सही असून ते धनादेश अॅझॉईक कॅरिअर्स यांचे ताब्यात आहेत, याची कल्पना तक्रारदार यांना होती. धनादेशाची संपूर्ण पूर्तता झालेशिवाय ते भागीदारी संस्थेव्यतिरिक्त इतर व्यक्तींच्या ताब्यात जाणार नाहीत याची काळजी भागीदारी संस्थेकरीता सर्व भागीदारांनी घेणे गरजेचे होते. तक्रारदार यांनी विरुध्द पक्ष संस्थेकडे खाते उघडतांना जे भागीदारी पत्र (नि.35/3) दिले याचीही माहिती तक्रारदार यांना होती. कारण त्यावर तक्रारदार यांची सही आहे. ते पत्र उभय पक्षकारांवर बंधनकारक आहे. अशा परिस्थितीत तक्रारदार यांनी विरुध्द पक्ष बँकेकडे स्टॉप पेमेंट इन्स्ट्रक्शन देणे आवश्यक होते. परंतु तक्रारदार यांनी विरुध्द पक्ष बँकेला तसे कळविल्याचा कोणताही कागदोपत्री पुरावा दाखल केलेला नाही. तसेच तक्रारदार यांच्या भागीदारी संस्थेने जे दोन धनादेश दिले ते धनादेश पेमेंटसाठी विरुध्द पक्ष शाखेकडे आलेलेच नाहीत कारण त्यावर विरुध्द पक्ष बँकेचा पेमेंटबाबतचा शिक्का नाही. वरील सर्व बाबींचा साकल्याने विचार करता विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार या ग्राहकाला सेवा देण्यात कोणतीही त्रुटी ठेवल्याचे तक्रारदार यांनी पुराव्याद्वारे सिध्द केलेले नाही, असे मंचाचे मत आहे. त्यामुळे हे मंच मुद्दा क्र.1 चे उत्तर नकारार्थी देत आहे.
14) मुद्दा क्रमांक 2 – मुद्दा क्र.1 मध्ये विषद केलेप्रमाणे विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांना सेवा देण्यात कोणतीही त्रुटी ठेवल्याचे तक्रारदार यांनी सिध्द केले नसल्याने तक्रार नामंजूर होणेस पात्र आहे हे स्पष्ट झाल्याने खालीलप्रमाणे आदेश पारीत करणेत येतात.
आदेश
- तक्रारदार यांची तक्रार नामंजूर करणेत येते.
- उभय पक्षकारांनी आपापला खर्च सोसावा.
ठिकाणः सिंधुदुर्गनगरी
दिनांकः 03/06/2015
(वफा ज. खान) (कमलाकांत ध.कुबल)
सदस्या, प्रभारी अध्यक्ष,
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सिंधुदुर्ग
प्रत तक्रारदार यांना हातपोहोच/रजि पोस्टाने रवाना दि.
प्रत विरुद्ध पक्ष यांना हातपोहोच/रजि. पोस्टाने रवाना दि.