निकाल
(घोषित दि. 02.08.2016 व्दारा श्री.के.एन.तुंगार, अध्यक्ष)
ग्राहक संरक्षण कायदा कलम 12 अन्वये तक्रार.
तक्रारदार हा भालगांव येथील रहिवाशी असून गट नं.35, 145, 147 या शेतजमीनीचा मालक आहे. गैरअर्जदार क्र.1 ही बॅंकींग कंपनी आहे. गैरअर्जदार क्र.2 हे शेतीसाठी लागणारे साहित्य व ठिबक सिंचनाचे संच विकतात. तक्रारदार याने गैरअर्जदार क्र.1 यांच्याकडे ठिबक सिंचनाच्या खरेदी करिता रु.95,000/- चे कर्ज मिळावे म्हणून अर्ज केला. त्यानंतर त्याच्या सर्व शेतजमीनीबाबत बॅंकेचे बेबाकी प्रमाणपत्र आणून दिले. कर्ज प्रकरणाकरता आवश्यक असलेल्या सर्व कागदपत्राची पुर्तता केली. त्यानंतर गैरअर्जदार क्र.1 यांनी तक्रारदार हिला गैरअर्जदार क्र.2 यांच्याकडून ठिबक सिंचनाचे साहित्य घेण्याबददल तोंडी सुचना केली. तक्रारदार याच्या खात्यातील रक्कम रु.25,000/- व कर्ज रक्कम रु.95,000/- असे एकंदरीत रु.1,20,000/- किंमतीचे ठिबक सिंचनाचे साहित्य गैरअर्जदार क्र.2 यांनी तक्रारदार याला दिले नाही. त्यावेळी गैरअर्जदार क्र.2 यांनी तक्रारदार याला शेतामधील जुन्या ठिबक सिंचनाचे फोटो आणून द्या व नंतर ठिबक सिंचन साहित्य देण्यात येईल असे सांगितले. परंतू त्या नंतरही सदर साहित्य दिले नाही. माल आल्यावर देऊ अशा प्रकारची उत्तरे तक्रारदाराला देण्यात आली. गैरअर्जदार क्र.1 यांच्याकडून कर्ज मंजूर होऊन 6 महिन्यांचा कालावधी झाल्यानंतरही तक्रारदार याला ठिबक सिंचनाचे साहित्य मिळाले नाही, आणि त्याबददल गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी कोणताही खुलासा केला नाही. गैरअर्जदार क्र.1 यांनी दिलेल्या पत्राआधारे तक्रारदार यांनी तलाठी यांच्याकडून 7/12 चा उतारा गैरअर्जदार यांना दिला, तरीही गैरअर्जदार यांनी ठिबक सिंचनाचा संच तक्रारदार याला पुरविला नाही. तक्रारदार याने त्याला मंजूर झालेल्या कर्जाची रक्कम व त्याच्या खात्यातील जमा रक्कम रु.25,000/- याबाबत गैरअर्जदार बॅंकेकडे चौकशी केली त्यावेळी सदर माहिती देण्यास गैरअर्जदार क्र.1 यांनी नकार दिला. त्यानंतर तक्रारदार यांनी महितीच्या अधिकारामध्ये बॅंकेकडे सदर माहिती देण्याबाबत अर्ज दिला, त्या नंतरही बॅंकेकडून अपूर्ण माहिती तोंडी सांगण्यात आली. दि.05.01.2016 रोजी नाईलाजाने तक्रारदार यांनी गैरअर्जदार क्र.1 बॅंकेकडे तक्रार अर्ज दिला परंतू सदर पत्राचे कोणतेही उत्तर देण्यात आले नाही. गैरअर्जदार क्र.1 यांच्या सांगण्याप्रमाणे तक्रारदाराला गैरअर्जदार क्र.2 यांच्याकडून ठिबक सिंचनाचा संच घेणे बंधनकारक होते. परंतू गैरअर्जदार क्र.2 यांनी ठिबक सिंचनाचे कोणतेही साहित्य तक्रारदाराला दिले नाही. तक्रारदाराने गैरअर्जदार क्र.2 यांच्याविरुध्द तक्रार केल्यानंतरही गैरअर्जदार क्र.1 बॅंक यांनी त्या प्रकाराकडे दुर्लक्ष केले. यावरुन बॅंक व ठिबक सिंचन संच पुरविणारी संस्था यांचेमध्ये संगनमत आहे असे दिसून येते. वरील कारणास्तव तक्रारदार याने गैरअर्जदार यांच्याकडून वेगवेगळया शिर्षाखाली नुकसान भरपाई मागितली आहे. एकूण नुकसान भरपाईची रक्कम रु.1,85,000/- आहे. तक्रारदाराचे असे म्हणणे आहे की, गैरअर्जदार यांनी सेवेत कसूर केलेला आहे त्यामुळे तक्रारदाराचे ठिबक सिंचनाचे साहित्य गैरअर्जदार यांनी त्वरीत द्यावे किंवा तक्रारदार यांची सर्व रक्कम 20 टक्के व्याजासह परत मिळावी तसेच तक्रार अर्जाचा खर्च मिळावा.
तक्रारदाराने तक्रार अर्जासोबत बॅंकेने दिलेलया कर्जाच्या बोजांची नोंद 7/12 वर घेण्याबाबतच्या पत्राची प्रत, दि.05.01.2016 रोजी गैरअर्जदार क्र.1 यांना पाठविलेल्या तक्रार अर्जाची नक्कल व तक्रारदाराच्या कर्जखात्याचा उतारा दाखल केला आहे.
गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी त्यांचा लेखी जबाब नि.8 प्रमाणे दाखल केला. गैरअर्जदार यांनी तक्रारदार यांनी केलेले सर्व आरोप फेटाळले आहेत. परंतू बॅंकेने तक्रारदार यांना रक्कम रु.95,000/-चे कर्ज ठिबक सिंचनाकरता मंजूर केल्याची गोष्ट मान्य केली आहे. सदर कर्जाला मंजूरी दिल्यानंतर गैरअर्जदार क्र.1 यांनी कर्जाची रक्कम तक्रारदार यांच्या विनंतीवरुन गैरअर्जदार क्र.2 यांना ट्रान्सफर केली. त्यानंतर गैरअर्जदार क्र.2 यांच्या दुकानातून ठिबक सिंचनाचे साहित्य घेऊन स्वतःच्या शेतात बसविण्याची जबाबदारी तक्रारदार यांची होती. गैरअर्जदार क्र.1 यांनी तक्रारदार यांच्या खात्यातील रु.25,000/- मार्जीन मनी व कर्ज रु.95,000/- असे एकंदरीत रु.1,20,000/- ची रक्कम गैरअर्जदार क्र.2 यांच्या खात्यात वर्ग केली. प्रत्यक्षात तक्रारदार यांनी गैरअर्जदार क्र.2 यांना विनंती केली की, त्यांना ठिबक सिंचनाच्याऐवजी दवाखान्याच्या खर्चाकरीता व सोने तारण कर्ज सोडवण्याकरीता पैशांची आवश्यकता आहे, त्यामुळे तक्रारदाराला कर्ज प्रकरणातून मंजूर झालेली रक्कम रु.1,20,000/- व दुसरे कर्जदार अल्काबाई यांच्या नावाचे कर्ज प्रकरणातील मंजूर झालेले रु.1,20,000/- असे एकूण रु.2,40,000/- दि.19.06.2015 रोजी तक्रारदार अलकाबाई व तिचे पती यांनी साक्षीदार गोरख पाचफुले रा.दुधपुरी, योगेश भोरे रा.बोरी व बाळू इंगळे रा. डावरगांव यांच्यासमक्ष परत घेतले आहेत. तक्रारदार यांनी दुकानदाराकडून ठिबक सिंचनाचे साहित्य न घेता त्यांचे वैयक्तिक कारण दाखवून कर्जाची रोख रक्कम गैरअर्जदार क्र.2 यांच्याकडून परत नेलेली आहे. अशारितीने तक्रारदार व शिवनाथ मुळे यांनी गैरअर्जदार बॅंकेची फसवणूक केली आहे. तक्रारदाराने बॅंकेकडे गैरअर्जदार क्र.2 यांच्या विरुध्द ठिबक सिंचनाचे साहित्य न दिल्याबाबत कधीही तक्रार केलेली नाही. जर खरोखरच गैरअर्जदार क्र.2 यांनी तक्रारदार यांना ठिबक सिंचनाचे साहित्य दिले नव्हते तर, तक्रारदार यांनी याबाबत पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद देणे आवश्यक होते तसेच गैरअर्जदार क्र.1 बॅंकेकडे लेखी तक्रार करणे आवश्यक होते. परंतू अशा प्रकारची तक्रार पोलीस स्टेशनकडे अथवा बॅंकेकडे केलेली नाही. तक्रारदाराने 7/12 चा उता-यावर कर्जाच्या बोजांची नोंद घेऊनही त्याला ठिबक सिंचनाचे साहित्य वितरण केले नाही हा आरोप खोटा आहे. गैरअर्जदार क्र.1 यांच्या मॅनेजरने तक्रारदार यांच्या शेतात दि.01.08.2015 व दि.07.08.2015 रोजी जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली असता त्या ठिकाणी ठिबक सिंचनाचा संच आढळून आला नाही. तक्रारदार यांनी दि.02.01.2016 रोजी बॅंकेकडे अर्ज दिला परंतू बॅंकेत कसलाही पत्र व्यवहार केला नाही हा आरोप खोटा आहे. गैरअर्जदार क्र.1 बॅंकेने कधीही ठिबक सिंचनाचे साहित्य गैरअर्जदार क्र.2 यांच्याकडूनच खरेदी करा असे सांगितले नाही. तक्रारदार याने गैरअर्जदार क्र.2 यांच्या दुकानाचे कोटेशन कर्ज प्रकरणात दाखल केले होते सदर कोटेशन पाहून तक्रारदाराच्या विनंतीनुसार बॅंकेने कर्ज मंजूरी दिलेली रक्कम गैरअर्जदार क्र.2 यांच्या खात्यात जमा केली. बॅंकेची फसवणूक झालेली निदर्शनास आल्यानंतर बॅंकेने तक्रारदार यांना कर्जाची रक्कम जमा करण्याकरीता ब-याच वेळा विनंती केली पंरतू तक्रारदाराने कर्ज फेडण्यास नकार दिला त्यामुळे बॅंकेने गैरअर्जदार क्र.2 यांच्या बॅंक खात्यामधून रक्कम रु.1,01,792/- कपात करुन तक्रारदार यांच्या कर्जखात्यात दि.01.02.2016 रोजी वर्ग केली आहे. गैरअर्जदार क्र.1 यांनी गैरअर्जदार क्र.2 यांच्या चालू खात्यातून सदरची रक्कम कपात करुन तक्रारदाराच्या कर्जखात्यात भरणा केली असल्याने गैरअर्जदार क्र.2 यास तक्रारदाराकडून सदरची रक्कम मिळणे बाकी आहे. वरील कारणास्तव गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी तक्रारदाराचा अर्ज नामंजूर करावा अशी विनंती केली आहे.
तक्रारदार यांनी गैरअर्जदार क्र.1 यांच्या कर्ज खात्याचा उतारा व गैरअर्जदार क्र.2 यांच्या बॅंक खात्याचा उतारा अवलोकनार्थ दाखल केला आहे. तक्रारदार यांचा तक्रार अर्ज व गैरअर्जदार क्र.1 व 2 यांच्या लेखी जबाबाचे आम्ही काळजीपूर्वक वाचन केले. तक्रारदार व गैरअर्जदार यांनी दाखल केलेल्या कागदपत्रांचे वाचन केले. दोन्ही बाजूच्या वकीलांनी केलेला युक्तीवाद ऐकला. त्यावरुन आमचे असे मत झाले आहे की, तक्रारदार यांना दि.16.06.2015 रोजी गैरअर्जदार क्र.1 बॅंकेकडून रक्कम रु.95,000/- चे कर्ज ठिबक सिंचनाची जोडणी विकत घेण्याकरीता मंजूर झाले. या कर्जाकरीता तक्रारदार यांचा मार्जीन मनी रु.25,000/- होता. दि.16.06.2015 रोजी काही व 19.06.2015 रोजी उर्वरीत रक्कम असे एकंदरीत रक्कम रु.1,20,000/- तक्रारदार यांच्या कर्ज खात्यामधून गैरअर्जदार क्र.2 (ठिबक सिंचनाचे संचाचे विक्रेते) यांना मिळाले. सदर रक्कम मिळूनही गैरअर्जदार क्र.2 यांनी तक्रारदार यांना ठिबक सिंचनाचा संच व जोडणी पुरविण्यास टाळाटाळ केली असे तक्रारदाराचे आरोप आहेत. तक्रारदार यांचे असेही म्हणणे आहे की, कर्ज मंजूर झाल्यानंतर गैरअर्जदार क्र.1 बॅंकेने ठिबक सिंचनाचा संच व जोडणीचे साहित्य गैरअर्जदार क्र.2 यांच्याकडूनच घेण्याबाबत तक्रारदार यास तोंडी सूचना केली परंतू खरोखर गैरअर्जदार क्र.1 यांनी तशी तोंडी सुचना केली होती अथवा नाही याबददल कोणताही ठोस पुरावा उपलब्ध नसल्यामुळे आम्ही सदर आरोपावर विश्वास ठेऊ शकत नाहीत.
तक्रारदार यांना कर्ज मंजूर झाले परंतू ठिबक सिंचनाचा संच व जोडणीचे साहित्य देण्यात आले नाही या मुद्यावर तक्रारदार हिने ब्रीच ऑफ ट्रस्ट अथवा चिटींगच्या आरोपावरुन गैरअर्जदार क्र.1 व 2 यांच्या विरुध्द पोलीस स्टेशनमध्ये किंवा कोर्टात फिर्याद केल्याचे दिसून येत नाही.
तक्रारदार याने सर्वप्रथम दि.05.01.2016 रोजी गैरअर्जदार क्र.1 बॅंकेकडे त्याच्या कर्जाची रक्कम हडप केल्याबददल तक्रार अर्ज दिलेला आहे त्याची प्रत ग्राहक मंचासमोर अवलोकनार्थ दाखल आहे. ग्राहक मंचासमोर असलेल्या सर्व कागदपत्रांची तपासणी केल्यावर असे आढळून येते की, दि.16.06.2015 पासून दि.05.01.2016 पर्यंत तक्रारदाराने वर उल्लेख केलेल्या तक्रारी व्यतिरिक्त दुसरी कोणतीही लेखी तक्रार बॅंकेकडे केलेली नाही. प्रत्यक्षात 16 जून 2015 हा पावसाळयातील दिवस होता, त्या कालावधीत ठिबक सिचंन बसविल्यावर त्याचा सुयोग्य वापर करुन तात्काळ अधिक उत्पादन मिळविण्याची अजिबात शक्यता नव्हती. तरीही तक्रारदार याने जर त्याच्या तक्रारीचा लेखी पाठपुरावा पोलीस स्टेशनमध्ये अगर बॅंकेतील वरीष्ठ अधिका-यांकडे केला असता तर, तक्रार अर्जात केलेल्या आरोपाबाबत काहीतरी सर्व मान्य तोडगा जरुर निघाला असता. परंतू तक्रारदार हा दि.16.06.2015 पासून पुढील 6 महिने कालावधीकरीता गप्प बसलेला दिसून येतो, ही बाब तक्रारदार यांच्या तक्रारीमागील सत्य व तथ्या विषयी रास्त संशय उत्पन्न करणारी वाटते.
तक्रारदार यांनी त्याची फसवणूक झाल्याबाबत स्पष्ट शब्दात पोलीस स्टेशनमध्ये तक्रार न करता माहितीच्या अधिकारात बॅंकेकडूनच माहिती मागविली ही गोष्ट खरोखरच तक्रारदार याला ठिबक सिंचनाचे साहित्य न मिळाल्यामुळे तक्रार करावयाची होती अथवा बॅंकेवर दबाव आणण्याकरता तसे केले असा प्रश्न पडतो.
या प्रकरणात बॅंकेकडूनही कर्ज वाटपाच्या कार्यवाहीत ब-याच अक्षम्य चुका केलेल्या दिसून येतात. दैनंदिन व्यवहारात जर एखाद्या शेतक-याने त्याची शेती सुधारण्याकरीता विद्युत मोटार, ठिबक सिंचन, गोबर गॅस प्लॅंट किंवा इतर अत्यावश्यक सुविधांकरीता कर्ज घेतले तर कर्ज मंजूर करणारी बॅंक कर्ज घेणा-या शेतक-याने सदर सुधारणा ज्या टप्प्यांनी केल्या आहेत, त्याच टप्प्याटप्प्याने खातरजमा करुन मंजूर कर्जाची रक्कम प्रत्यक्ष खर्चाप्रमाणे कर्जदाराला देते. या प्रकरणात गैरअर्जदार क्र.1 बॅंकेने कोणताही विचार न करता कर्ज मंजूरीची सर्व रक्कम ठिबक सिंचनाच्या विक्रेत्यास परस्पर देऊन टाकली. खरे पाहता असे अभिप्रेत होते का? गैरअर्जदार क्र.2 ठिबक सिंचनाचे विक्रेते यांनी स्टेप्स स्टेप्सने तक्रारदार यांच्या शेतामध्ये ठिबक सिंचनाची जोडणी बसविल्यानंतर टप्प्याटप्प्याने त्याच्या किंमतीची भरपाई गैरअर्जदार क्र.1 बॅंकेने गैरअर्जदार क्र.2 यांना करणे आवश्यक होते. त्याप्रमाणे बॅंकेच्या सक्षम अधिका-याने खरोखरच ज्या कारणाकरीता कर्ज मंजूर झाले, त्याच कारणाकरीता कर्जाची रक्कम प्रत्यक्ष वापरली गेली की नाही याची खातरजमा करुन घेणे व पुर्तता अहवाल बनवणे आवश्यक होते परंतू असे केल्याचे दिसून येत नाही.
गैरअर्जदार यांच्या लेखी जबाबातील परिच्छेद 7 मध्ये असा उल्लेख आहे की, बॅंकेचे मॅनेजर यांनी प्रत्यक्ष स्थळ पाहणी दि.01.08.2015 व दि.07.08.2015 रोजी केली त्यावेळी त्याठिकाणी ठिबकचा संच आढळून आला नाही. जर दि.15.06.2015 रोजी तक्रारदारास कर्जाची मंजूरी देऊन कर्ज रक्कम वाटप करण्यात आली तर गैरअर्जदार क्र.1 बॅंकेने दि.1 ऑगष्ट पर्यंत स्थळपाहणी करण्याकरीता का विलंब लावला, याचा कुठेही खुलासा दिलेला दिसून येत नाही. जर कर्ज मंजूर झालेली रक्कम कर्ज मंजूरीच्या कारणाकरीता वापरली नसेल तर त्या प्रकाराकरीता (योग्य ती काळजी न घेता कर्जाची रक्कम गैरअर्जदार क्र.2 याला परस्पर देण्याबाबत) बॅंकेचे संबंधित अधिकारी निश्चितच जबाबदार आहेत असे आमचे स्पष्ट मत आहे.
दि.01.08.2015 वदि.07.08.2015 रोजी बॅंकेचे मॅनेजर यांनी जी प्रत्यक्ष स्थळपाहणी केली त्यावेळी त्यांनी स्थळपाहणीचा पंचनामा केला होता अथवा नाही, याबाबत कोणताही खुलासा दिसून येत नाही. जर तसा पंचनामा केला नसेल तर बॅंक मॅनेजर यांनी खरोखरच स्थळपाहणी केली होती असे गृहीत धरणे चूक होईल, आणि जर बॅंक मॅनेजर यांनी स्थळपाहणी पंचनामा केला असेल तर तो लेखी जबाबासोबत का जोडला नाही यांचा खुलासाही बॅंकेने केलेला नाही.
तक्रारदार यांनी कर्ज मंजूरीची रक्कम गैरअर्जदार क्र.2 ठिबक सिंचनाचे विक्रेते यांच्या खात्यात जमा झाल्यानंतर त्यांची भेट घेतली व सदर कर्जाची रक्कम दवाखान्याच्या खर्चाकरीता व सोने तारण कर्ज सोडवण्याकरिता वापरावयाची आहे असे सांगून या प्रकरणातील कर्जाचे रु.1,20,000/- व तक्रारदाराच्या नातेवाईकाला (अलकाबाईला) याच कारणाकरीता मंजूर केलेल्या कर्जाबाबत रु.1,20,000/- असे एकूण रु.2,40,000/- गैरअर्जदार क्र.2 यांच्याकडून घेऊन गेले असा खुलासा गैरअर्जदार यांनी त्यांच्या लेखी जबाबाच्या परिच्छेद 5 मध्ये केला. या मुद्यावर तक्रारदार यांनीही प्रत्युत्तरात शपथपत्राद्वारे पुरावा देऊन ही गोष्ट स्पष्ट शब्दात नाकारणे आवश्यक होते. गैरअर्जदार यांनी असाही आरोप केला आहे की, सदर रु.2,40,000/- ची रक्कम गैरअर्जदार क्र.2 यांच्याकडून तक्रारदार व शिवनाथ यांनी नेली त्यावेळी गोरख पाचफुले रा.दुधपुरी, योगेश भोरे रा.बोरी व बाळू इंगळे रा.डावरगांव हे इसम हजर होते. त्यामुळे त्यांची शपथपत्रे देऊन तक्रारदाराने वरील आरोप नाकारणे आवश्यक होते परंतू तसे तक्रारदार यांनी केलेले नाही.
वरील विवेचनावरुन आमचे असे मत झाले आहे की, तक्रारदार याने ठिबक सिंचनाचे कारण दाखवून रक्कम रु.95,000/- चे कर्ज मंजूर करवून घेतले, त्यामध्ये मार्जीन मनी रु.25,000/- स्वतः टाकली. त्यानंतर एकूण रक्कम रु.1,20,000/- गैरअर्जदार क्र.1 बॅंकेने गैरअर्जदार क्र.2 यांच्या खात्यामध्ये वर्ग केली. त्यामुळे या प्रकरणात तक्रारदाराला मंजूर झालेले कर्ज विनाकारण गैरअर्जदार बॅंकेने अडवल्याचे दिसून येत नाही.
गैरअर्जदार क्र.2 हे या आरोपाबाबत काही प्रमाणात दोषी आहेत. गैरअर्जदार क्र.1 यांच्याकडून तक्रारदाराला ठिबक सिंचन पुरवण्याकरता रु.1,20,000/- ची रक्कम मंजूर झाली परंतू तक्रारदार यांनी खोटेनाटे कारण सांगून गैरअर्जदार क्र.2 यांना सदर रक्कम तक्रारदार यास परत देण्यास भाग पाडले. पण अशी कर्जाची रक्कम परत करणे गैरअर्जदार क्र.2 यांच्या करिता योग्य नव्हते. त्यामुळे या मुद्यावर गैरअर्जदार क्र.2 हे दोषी आहेत.
गैरअर्जदार क्र.2 याचे करंट अकाऊंट खात्यामधून गैरअर्जदार क्र.1 बॅंकेने कर्ज मंजूर रक्कम रु.95,000/- च्या वसुलीपोटी रक्कम रु.101792/- कापून ती रक्कम तक्रारदार यांच्या कर्ज खात्यात भरली आहे. त्यामुळे आता गैरअर्जदार क्र.2 यांचेकडे तक्रारदाराची फक्त मार्जीन मनीची रक्कम रु.25,000/- अजूनही शिल्लक आहे.
तक्रारदार यांनी दवाखान्याचा खर्च व सोने तारण कर्ज सोडवण्याकरता पैशाची गरज आहे असे कारण सांगून कर्जाची रक्कम गैरअर्जदार क्र.2 यांच्यावर दबाव आणून नेल्यामुळे गैरअर्जदार क्र.2 यांची सेवा ठिबकचा संच पुरवणेबाबत त्रुटीची आहे असे तांत्रिक दृष्टीने म्हणता येणार नाही. तरीही रक्कम रु.1,20,000/- पैकी अद्यापही गैरअर्जदार क्र.2 यांच्याकडे रु.25,000/- तक्रारदार याचे मार्जीन मनी पोटी शिल्लक आहेत असे दिसून येते. सदर रक्कम गैरअर्जदार क्र.2 यांनी तक्रारदार यास देणे आवश्यक आहे असे आमचे मत आहे. कारण गैरअर्जदार क्र.2 हयांची वागणूक Unfair trade Practice मध्ये येते असे आम्हाला वाटते.
तक्रारदार यांनी असा आरोप केला आहे की, ते ज्यावेळी गैरअर्जदार क्र.2 यांचेकडे ठिबक जोडणी देण्याबाबत भेटले त्यावेळी गैरअर्जदार क्र.2 यांनी त्यांना जुन्या ठिबक संचाचे फोटो आणून तेच नव्या जोडणीचे आहेत असे सांगण्याचे सुचवले व तक्रारदार यांनी ते ऐकले असे उपलब्ध कागदपत्रांचे अवलोकनावरुन जाणवते. परंतू तक्रारदार यांचे याप्रकारे दिशाभूल करणारे व खोटेपणाचे वर्तन बेकायदेशीर व चुक आहे त्यामुळे ते ग्राहक मंचाकडून कोणतेही आदेश त्यांचे हक्कात मागू शकत नाहीत असे आम्हाला वाटते. पण तरीही तक्रारदार हे एक दुष्काळी भागातील गरीब शेतकरी आहेत. त्यांची कष्टाची रु.25,000/- ची रक्कम गैरअर्जदार क्र.2 यांचेकडे बेकायदेशीरपणे अडकली आहे. त्यामुळे आम्ही रु.25,000/- चे हददीपर्यंत तक्रारदाराचे हक्कात आदेश करावा अशा मताचे आहोत.
तक्रारदार यांनी गैरअर्जदार क्र.1 व 2 यांच्यावर वेगवेगळया मुद्यावर वेगवेगळे गंभीर आरोप केल्यामुळे आता मूळ ठिबक सिंचनाचे संचाबाबतचा व्यवहार तक्रारदार यांचे मागणीप्रमाणे पूरा होईल असे वाटत नाही. त्यामुळे तक्रारदार फक्त उर्वरीत थकीत रक्कम रु.25,000/- चे वसुलीकरीता पात्र आहेत असे आम्ही गृहीत धरतो त्यामुळे आम्ही खालीलप्रमाणे आदेश पारीत करतो.
आदेश
1) तक्रारदाराचा तक्रार अर्ज अंशतः मंजूर करण्यात येतो.
2) तक्रारदाराची रु.25,000/- ची मार्जीन मनीची रक्कम गैरअर्जदार क्र.2 यांनी
तक्रारदार यास या आदेशापासून 30 दिवसाच्या आत राष्ट्रीयकृत बॅंकेच्या
डिमांड ड्राफ्टद्वारे परत करावी.
3) गैरअर्जदार क्र. 2 यांनी तक्रारदार याला झालेल्या मानसिक त्रासाबददल
नुकसान भरपाई म्हणून रक्कम रु.1,000/- व तक्रार अर्जाच्या खर्चापोटी
रु.2,000/- या आदेशापासून 30 दिवसाच्या आत द्यावेत.
श्री. सुहास एम.आळशी श्रीमती रेखा कापडिया श्री. के.एन.तुंगार
सदस्य सदस्या अध्यक्ष