निकाल
(घोषित दि. 30.06.2016 व्दारा श्रीमती रेखा कापडिया, सदस्या)
अर्जदाराने गैरअर्जदार यांच्याकडे शेतीसाठी ठिबक संच खरेदी करण्यासाठी कर्ज देण्याची मागणी केली. गैरअर्जदार यांनी कर्ज मंजूर केल्यानंतरही कर्जपुरवठा न केल्यामुळे अर्जदाराने गैरअर्जदार यांच्या विरुध्द ग्राहक संरक्षण कायदा अंतर्गत मंचात तक्रार दाखल केली आहे.
अर्जदाराने दाखल केलेल्या तक्रारीचा सारांश खालीलप्रमाणे.
अर्जदार हे भालगाव, ता.अंबड जिल्हा जालना येथील रहिवासी असून त्यांची मौजे खडकेश्वर ता.अंबड येथे शेतजमीन आहे. अर्जदाराने गैरअर्जदार यांच्याकडे त्यांच्या शेतात ठिबक संच लावण्याकरिता रु.3,40,000/- कर्जाची मागणी केली. गैरअर्जदार यांच्या मागणीनुसार त्यांनी शेतजमिनीचा मागील 30 वर्षाचा सर्व रिपोर्ट देखील गैरअर्जदार यांच्याकडे जमा केला, या सर्च रिपोर्टसाठी त्यांना रु.3250/- खर्च करावे लागले. गैरअर्जदार यांनी दि.13.07.2015 रोजीदुय्यम सहाय्यक निबंधक, अंबड यांना पत्र लिहून त्यांच्या नावे गहाणखत करुन देण्यास सांगितले. अर्जदाराने सदरील गहाणखत गैरअर्जदार यांच्या नावाने करुन दिले ज्याचा नोंदणी क्रमांक 2816/2015 दि.15.07.2015 असा आहे. सदरील गहाणखत करण्यासाठी रु.7000/- खर्चकरावे लागले. अर्जदाराच्या म्हणण्यानुसार त्यांनी कर्जासाठी आवश्यक असलेल्या सर्व बाबींची पुर्तता केल्यानंतर त्यांना गैरअर्जदार यांनी कर्ज वितरण करणे अपेक्षित होते परंतू गैरअर्जदार यांनी कर्ज वितरण करण्यास टाळाटाळ केली. कर्ज वितरण नकेल्यामुळे त्यांचे आर्थिक नुकसान झाले याबाबत त्यांनी तहसिलदार, उपजिल्हाधिकारी व जिल्हाधिकारी यांना लेखी तक्रार दिली असून गैरअर्जदार यांना वकीलामार्फत कायदेशीर नोटीस देखील देण्यात आली. गैरअर्जदार यांनी कर्ज वितरण न करण्यामागे कोणतेही कारण दिलेले नसून त्यांनी पत्नी व मुलगा यांनी घेतलेल्या कर्जाबाबतच्या प्रकरणामुळे कर्जवाटप केले नसल्याचे तोंडी सांगितले असल्याचे अर्जदाराने तक्रारीत म्हटले आहे. कर्जाबाबत अर्ज प्राप्त झाल्यानंतर व कर्ज प्रकरणी आवश्यक असलेल्या सर्व बाबींची पुर्तता केल्यानंतर कर्ज वितरण करणे गैरअर्जदार यांना बंधनकारक आहे. गैरअर्जदार यांच्या या सेवेतील त्रुटी पोटी अर्जदाराने मंचात तक्रार दाखल केली असून रु.3,90,250/- नुकसान भरपाई तसेच कर्ज वितरण करण्याबाबत आदेश देण्याची विनंती मंचास केली आहे.
अर्जदाराने तक्रारीसोबत गहाणखत केल्याची प्रत, गैरअर्जदार यांनी तलाठयास दिलेल्या पत्राची प्रत, कर्जप्रकरणी विविध सरकारी कार्यालयात केलेल्या तक्रारीची प्रत व वकीलामार्फत दिलेली नोटीस इत्यादी कागदपत्रे मंचात दाखल केली आहेत.
गैरअर्जदार यांनी लेखी जबाब दाखल केला असून त्यांच्या जबाबानुसार अर्जदाराने त्यांच्याकडे शेतात ठिबक संच बसविण्यासाठी कर्ज देण्याची मागणी केली होती. अर्जदाराने सर्च रिपोर्ट व गहाणखत करुन दिल्याचे तसेच या गहाणखता आधारे 7/12 वर बॅंकेच्या बोजांची नोंद घेण्यात आली असल्याचे मान्य केले आहे परंतू प्रत्यक्षात कर्ज वाटप करताना अर्जदाराच्या पत्नी नामे अलकाबाई व मुलगा श्रीहरी यांनी त्यांच्याकडून ठिबक संचासाठी घेतलेल्या कर्जाची रक्कम परत केली नसून या कर्जाच्या रकमेचा अपहार केल्याचे निदर्शनास आल्यामुळे अर्जदारास कर्जाची रक्कम देण्यात आली नाही. दि.01.08.2015 वदि.07.08.2015 रोजी बॅंकेमार्फत वरील दोघांच्या भालगाव येथील शेतात जाऊन पाहणी केली असता त्या ठिकाणी ठिबक संच बसविण्यात आले नसल्याचे दिसून आले व अर्जदाराची पत्नी अलकाबाई व मुलगा श्रीहरी यांनी बॅंकेची फसवणूक केली असल्याचे दिसून आले. या प्रकरण त्यांनी संबंधित पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली असल्याचे म्हटले आहे. अर्जदार कर्जाची रक्कम घेऊन तिचा योग्य वापर करणार नाही व त्यामुळे बॅंकेचे आर्थिक नुकसान होऊ शकते म्हणून अर्जदारास कर्ज देण्यात आलेले नाही. गैरअर्जदार यांनी अर्जदाराची तक्रार खारीज करण्याची विनंती मंचास केली आहे.
गैरअर्जदार यांनी जबाबासोबत पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीची प्रत व अहवालाची प्रत सोबत जोडली आहे.
अर्जदार व गैरअर्जदार यांनी दाखल केलेल्या कागदपत्रांवरुन व सुनावणीवरुन असे दिसून येते की,
- अर्जदार यांची खडकेश्वर ता.अंबड येथे शेतजमीन आहे त्यांनी शेतात ठिबक संच बसविण्यासाठी गैरअर्जदार यांच्याकडे रु.3,40,000/- कर्ज देण्याची मागणी केली होती. कर्जाच्या रकमेची मागणी पाहता गैरअर्जदार यांनी त्यांना जागेचा सर्च रिपोर्ट दाखल करण्यास सांगितले. अर्जदाराने अॅड.व्हि.जी.चिटणीस यांच्यामार्फत सर्च रिपोर्टचा अहवाल गैरअर्जदार यांच्याकडे दाखल केलेला दिसून येतो. नियमाप्रमाणे यासाठी लागणारा खर्च अर्जदाराने करावयाचा असतो.
- अर्जदाराने बेबाकी प्रमाणपत्र व इतर बाबींची पुर्तता केल्यानंतर गैरअर्जदार यांनी दि.13.07.2015 रोजी दुय्यम निबंधक कार्यालय, अंबड यांना पत्राद्वारे गहाणखत करुन घेण्यास सांगितले ज्याचा नोंदणी क्रमांक 2816/2015 असा असून अर्जदाराने त्याची प्रत मंचात दाखल केली आहे. या गहाणखता आधारे गैरअर्जदार यांनी अर्जदाराच्या 7/12 वर कर्जाचा बोजा चढविण्याचे तहसिलदार यांना सांगितले असल्याचे स्पष्ट होते. कर्ज मिळविण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व बाबींची पुर्तता केलेली असल्यामुळे अर्जदार कर्ज मिळण्यास तांत्रिकदृष्टया पात्र होता परंतू गैरअर्जदार यांनी कर्जाची रक्कम न दिल्यामुळे अर्जदाराने सेवेतील त्रुटी म्हणून सदरील तक्रार मंचात दाखल केली आहे व नुकसान भरपाईची व कर्जाची रक्कम मिळण्याची मागणी केली आहे.
- गैरअर्जदार बॅंकेने कर्ज मंजूर केल्यानंतरही कर्जाची रक्कम अर्जदारास न देण्यामागील कारणे त्यांच्या लेखी जबाबात नमूद केली आहेत व तशी कागदपत्रे मंचात दाखल केली आहेत. अर्जदार यांच्या पत्नी अलकाबाई व मुलगा श्रीहरी यांनी गैरअर्जदार यांच्याकडून, शेतात ठिबक यंत्रणा लावण्यासाठी कर्ज देण्यात आले होते. दि.01.08.2015 व 07.08.2015 रोजी बॅंकेमार्फत वरील दोन्ही व्यक्तींना ठिबक यंत्रणा बसविण्यासाठी देण्यात आलेल्या कर्जाबाबत विचारणा व प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली या पाहणीमध्ये दोन्ही व्यक्तींनी शेतात ठिबक संच विकणा-या विक्रेत्याकडून रक्कम उचलल्याचे स्पष्ट झाले. अर्जदाराने पाठविलेल्या नोटीसला बॅंकेने दिलेल्या नोटीस व इतर कागदपत्रांवरुनही बाब स्पष्ट होते. यावरुन अर्जदाराची पत्नी अलकाबाई व मुलगा श्रीहरी यांनी कर्जाच्या रकमेचा अपहार केल्याचे स्पष्टपणे दिसून येते.
- एकीकडे ही वस्तुस्थिती असताना अर्जदाराने विविध सरकारी कार्यालयात गैरअर्जदार बॅंकेविरुध्द कर्ज वाटप न केल्यामुळे तक्रारी दाखल केल्या. गैरअर्जदार यांनी अर्जदाराची पत्नी अलकाबाई व मुलगा श्रीहरी यांनी कर्जाच्या रकमेचा अपहार केला याची तक्रार पोलीस स्टेशन अंबड येथे केलेली आहे. दि.02.10.2015 रोजी त्यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी यांना अहवाल पाठविला आहे या अहवालाचे निरीक्षण केल्यावर अर्जदाराने त्यानी केलेल्या तक्रारीची चौकशी होऊन मला न्याय मिळाला असून शेती कर्जाबाबत तक्रार नसल्याचे व अर्ज निकाली काढण्याचे नमूद केलेले आहे.
- वरील सर्व निरीक्षणावरुन अर्जदाराच्या पत्नी व मुलाने गैरअर्जदार यांच्याकडून घेतलेल्या कर्जाच्या रकमेबाबत चौकशी चालू असल्याचे दिसून येते. त्याचप्रमाणे या दोन्ही व्यक्तींनी ठिबक संचसाठी कर्ज घेऊन ठिबक संच शेतात लावलेली नाही हे गैरअर्जदार यांच्या पाहणीत दिसून आले आहे. अर्जदाराने गैरअर्जदार यांच्या या जबाबावर कोणताही खुलासा मंचात दाखल केलेला नाही. कागदपत्रांची पुर्तता केल्यामुळे तांत्रिकदृष्टया कर्ज मिळण्याचा अधिकार जसा ग्राहकास आहे, तसाच कर्जाचा विनीयोग प्रामाणिकपणे होईल व त्याच्या परतफेडीची हमी, याची दखल घेणे ही बॅंकेची जबाबदारी असते.
गैरअर्जदार यांनी मंजूर केलेल्या कर्जाचे वितरण वर नमुद केलेल्या कारणामुळे केले नसल्याची कृती योग्य असल्याचे मंचाचे मत आहे. अर्जदाराने बोजा चढविण्यासाठी झालेल्या खर्चाची किंवा बोजा उतरविण्याची मागणी केलेली नाही.
वरील सर्व निरीक्षणावरुन मंच सदरील तक्रार खारीज करीत आहे.
आदेश
1) तक्रारदाराची तक्रार खारीज करण्यात येत आहे.
2) खर्चाबददल आदेश नाही.
श्री. सुहास एम.आळशी श्रीमती रेखा कापडिया श्री. के.एन.तुंगार
सदस्य सदस्या अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, जालना