::: नि का ल प ञ:::
(मंचाचे निर्णयान्वये, विजय चं. प्रेमचंदानी मा.अध्यक्ष)
(पारीत दिनांक :- 18/12/2014 )
अर्जदाराने सदरची तक्रार ग्राहक सरक्षंण कायदयाचे कलम 12 अन्वये दाखल केली आहे.
अर्जदाराच्या तक्रारीचा आशय थोडक्यात खालील प्रमाणे.
1. अर्जदाराने आापल्या तक्रारीत असे कथन केले आहे कि, मय्यत श्री. दिलीप बापुराव पायधन यांनी गैरअर्जदाराकडून पॉलिसी क्रं. 821368042, 821750915, 821830341, 821709959, 821459154 व 821926073 घेतलेली होती सदर पॉलिसीमध्ये अर्जदार क्रं. 1 मय्यतची पत्नी नॉमिनी म्हणून आहे. तसेच मय्यतने गैरअर्जदाराकडून पॉलिसी क्रं. 821829204 व 821154014 घेतलेली असून त्यावर अर्जदार क्रं. 2 मय्यतची मुलगी व अर्जदार क्रं. 3 मय्यतची आई नॉमिनी म्हणून आहे. अर्जदाराने पुढे असे कथन केले आहे कि, मय्यत दिलीप पायधन यांचे मृत्यु नंतर अर्जदाराने गैरअर्जदाराकडे पॉलिसीची रक्कम मिळण्याकरीता दि. 16/7/11 व 17/1/12 रोजी पॉलिसीचे क्लेम दाखल केले होते. गैरअर्जदाराने अर्जदारास सदर विमा क्लेम देण्यास टाळमटाळ केल्यामुळे दि. 19/12/11 ला अर्जदाराने त्याचे वकीलामार्फत गैरअर्जदाराला विमा क्लेम मिळण्याबाबत नोटीस पाठविले. गैरअर्जदाराने दि. 16/1/12 व 17/1/12 रोजी सदर नोटीसचे उत्तर पाठविले व विमा क्लेम देण्यास टाळमटाळ केली. अर्जदाराने गैरअर्जदाराप्रती अनुचित व्यवहारपध्दती व सेवेत ञुटी दिली असल्यामुळे अर्जदाराने सदर तक्रार मंचासमक्ष दाखल केली आहे.
2. अर्जदाराने तक्रारीत अशी मागणी केली आहे कि, गैरअर्जदाराने अर्जदारास विमा क्लेमची रक्कम देण्याचा आदेश व्हावे व अर्जदाराला झालेल्या शारिरीक व मानसिक ञासापोटी नुकसान भरपाई गैरअर्जदाराकडून मिळण्याचा आदेश व्हावे.
3. अर्जदाराची तक्रार स्विकृत करुन गैरअर्जदाराविरुध्द नोटीस काढण्यात आले. गैरअर्जदार हजर होवून नि. क्रं. 10 वर आपले लेखीउत्तर दाखल केले. गैरअर्जदाराने आपल्या लेखीउत्तरात असे कथन केले आहे कि, अर्जदाराने तक्रारीत गैरअर्जदाराविरुध्द लावलेले आरोप हे खोटे असून नाकबुल केले आहे. गैरअर्जदाराने हे मान्य केले आहे कि, मय्यतने वरील नमुद केलेल्या पॉलिसी गैरअर्जदाराकडून काढल्या होत्या. गैरअर्जदाराने पुढे असे कथन केले आहे कि, श्री. प्रतिक दिलीप पायधन यांनी दिवाणी न्यायालयात स्पेशल दिवाणी दावा क्रं. 39/11 अर्जदार व गैरअर्जदाराच्या विरुध्द दाखल केलेला आहे. सदर दाव्यात प्रतिक दिलीप पायधन हा मय्यतचा मुलगा आहे. गैरअर्जदाराने पुढे असे कथन केले आहे कि, गैरअर्जदाराला मय्यतचे वारसदार कोण आहे यासंदर्भात निर्णय घेण्याचा अधिकार गैरअर्जदार कंपनीला नसून व वारसदाराच्या मुद्दावर बरेच दावे होवू नये म्हणून गैरअर्जदार कंपनीने अर्जदारास विमा क्लेम दिलेला नाही. तसेच सिव्हिल कोर्टाकडून दि. 29/7/11 ला नोटीस प्राप्त झाला म्हणून अर्जदाराला विमा क्लेम देण्यात आला नाही या अनुषंगाने गैरअर्जदार कंपनीने अर्जदारा प्रति कोणतीही न्युनतम सेवा दर्शविली नाही सबब अर्जदाराची तक्रार खर्चासह खारीज करण्याची मागणी केली आहे.
4. अर्जदाराचा अर्ज, दस्ताऐवज, शपथपञ, लेखी व तोंडी युक्तीवाद तसेच गैरअर्जदाराचे लेखीउत्तर, दस्ताऐवज, शपथपञ लेखी व तोंडी युक्तीवाद आणि अर्जदार व गैरअर्जदार यांचे परस्पर विरोधी कथनावरुन खालील मुद्दे मंचाच्या विचारार्थ घेण्यात आले. त्यावरील निष्कर्ष आणि त्याबाबतची कारण मिमांसा पुढील प्रमाणे.
मुद्दे निष्कर्ष
(1) अर्जदार गैरअर्जदाराचा ग्राहक आहे काय ? होय.
(2) गैरअर्जदाराने अर्जदारास न्युनतापूर्ण सेवा दिली आहे
काय ? नाही
(3) गैरअर्जदाराने अर्जदाराप्रति अनुचित व्यापार पध्दतीचा अवलंब केला
आहे काय ? नाही.
(4) आदेश काय ? अंतीम आदेशाप्रमाणे.
कारण मिमांसा
मुद्दा क्रं. 1 बाबत ः-
5. मय्यत श्री. दिलीप बापुराव पायधन यांनी गैरअर्जदाराकडून पॉलिसी क्रं. 821368042, 821750915, 821830341, 821709959, 821459154 व 821926073 घेतलेली होती सदर पॉलिसीमध्ये अर्जदार क्रं. 1 मय्यतची पत्नी नॉमिनी म्हणून आहे. तसेच मय्यतने गैरअर्जदाराकडून पॉलिसी क्रं. 821829204 व 821154014 घेतलेली असून त्यावर अर्जदार क्रं. 2 मय्यतची मुलगी व अर्जदार क्रं. 3 मय्यतची आई नॉमिनी म्हणून आहे. ही बाब अर्जदार व गैरअर्जदार यांना मान्य असून अर्जदार हे गैरअर्जदाराचे ग्राहक आहे असे सिध्द होत आहे सबब मुद्दा क्रं. 1 चे उत्तर हे होकारार्थी नोंदविण्यात येत आहे.
मुद्दा क्रं. 2 व 3 बाबत ः-
6. अर्जदाराने सदर तक्रार दि. 9/2/12 रोजी दाखल केली आहे. अर्जदाराने सदर तक्रार ही बाब नमुद केलेली नाही कि, तक्रार दाखल करण्याच्या पूर्वी श्री. प्रतिक दिलीप पायधन यांनी अर्जदारांविरुध्द सिव्हिल कोर्टात सिव्हिल दावा क्रं. 39/11 दाखल केला होता. ही बाब अर्जदाराने दाखल नि. क्रं. 5 वर दस्त क्रं. 7 वरुन सिध्द होत आहे. तसेच गैरअर्जदाराने दाखल नि. क्रं. 16 वर दिवाणी दावा क्रं. 39/11 मधून स्पष्ट होते कि, सदर दिवाणी दावा दि. 27/7/11 रोजी दिवाणी न्यायालयात दाखल करण्यात आला होता व सदर दावा मय्यत दिलीप पायधनचा वारसदार ठरवून वादीला पॉलिसी मधून व इतर संपत्ती मधून त्याचा भाग मिळावा. सदर दाव्यात अर्जदार सुध्दा प्रतिवादी आहे. अर्जदार कलम 3 ग्राहक सरंक्षण कायदा 1986 प्रमाणे ग्राहक मंचात अतिरिक्त मागणी करीता तक्रार दाखल करू शकतो परंतु सदर प्रकरणात अर्जदाराने वादातील पॉलिसीबाबत दिवाणी न्यायालयात प्रकरण प्रलंबित आहे ही बाब लपवून स्वच्छ हाताने तक्रार दाखल केलेली नाही तसेच गैरअर्जदाराने वरील नमुद असलेला दिवाणी दावा प्रलंबित असल्यामुळे गैरअर्जदाराला विमा क्लेम प्रलंबित करुन कोणतीही सेवेत ञुटी दिली नाही व अनुचित व्यवहार पध्दतीचा अवलंब केलेला नाही असे सिध्द होते सबब मुद्दा क्रं. 2 व 3 चे उत्तर हे होकारार्थी नोंदविण्यात येत आहे.
मुद्दा क्रं. 4 बाबत ः-
7. अर्जदाराने सदर तक्रार तक्रार दाखल करण्याच्या पूर्वी श्री. प्रतिक दिलीप पायधन यांनी अर्जदारांविरुध्द सिव्हिल कोर्टात सिव्हिल दावा क्रं. 39/11 दाखल केला होता. ही बाब अर्जदाराने दाखल नि. क्रं. 5 वर दस्त क्रं. 7 वरुन सिध्द होत आहे. तसेच गैरअर्जदाराने दाखल नि. क्रं. 16 वर दिवाणी दावा क्रं. 39/11 ची प्रत दाखल केलेली आहे. व सदर प्रकरण वि. दिवाणी न्यायालयात प्रलंबित आहे अशा परिस्थितीत प्रकरणामध्ये गुंतागुंत होवून प्रकरण क्लिष्ट होण्याची शक्यता जास्त आहे. सबब मुद्दा क्रं. 1 ते 3 च्या विवेचनावरुन मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
अंतीम आदेश
(1) अर्जदाराची तक्रार खारीज करण्यात येत आहे.
(2) उभय पक्षांनी आापआपला खर्च सहन करावा.
(3) उभय पक्षांनी आदेशाची प्रत विनामुल्य पाठविण्यात यावी.
चंद्रपूर
दिनांक - 18/12/2014