निकालपत्र तक्रार दाखल दिनांकः- 16/12/2010 तक्रार नोदणी दिनांकः- 16/12/2010 तक्रार निकाल दिनांकः- 06 /09/2011 कालावधी 08 महिने 21 दिवस जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी अध्यक्ष - श्री.चंद्रकांत बी. पांढरपट्टे, B.Com.LL.B. सदस्या सदस्या सुजाता जोशी B.Sc.LL.B. सौ.अनिता ओस्तवाल M.Sc. यास्मीन रफीक ममदाणी. अर्जदार वय 37 वर्ष.धंदा.घरकाम. अड.एस.एन.वेलणकर. रा.मौलाना आझाद चौक, राजाराणी मंगल कार्यालय समोर, परभणी. विरुध्द शाखाधिकारी. गैरअर्जदार. भारतीय जीवन वीमा निगम. अड.ए.एन.पालीमकर. परभणी शाखा,जिवन ज्योती. एल.आय.सी.बिल्डींग,स्टेशन रोड,परभणी. ------------------------------------------------------------------------------------ कोरम - 1) श्री.सी.बी.पांढरपट्टे. अध्यक्ष. 2) सौ.सुजाता जोशी. सदस्या. 3) सौ.अनिता ओस्तवाल. सदस्या. ------------------------------------------------------------------------------------------------------- ( निकालपत्र पारित व्दारा – श्रीमती. अनिता ओस्तवाल.सदस्या.) गैरअर्जदाराने त्रुटीची सेवा दिल्याच्या आरोपावरुन अर्जदाराने प्रस्तुतची तक्रार मंचासमोर दाखल केली आहे. अर्जदारांची थोडक्यात तक्रार अशी की, अर्जदाराच्या पतीने वर्ष 2008 मध्ये गैरअर्जदार कडून रक्कम रु. 5,00,000/- ची विमा पॉलिसी काढली होती.जिचा क्रमांक 987148530 असा असून दिनांक 26/03/2008 रोजी वार्षीक प्रथम हप्ता रु. 34,347/- भरला होता.नंतर दरवर्षी तेवढाच हप्ता दिनांक 26 तारखेस भरावयाचा होता व पॉलिसी पुर्ण होण्याची तारीख 26/03/2028 दिली होती पैसे परतीच्या योजना वेळीपत्रका नुसार 5 वर्षात एकुण पॉलिसी रक्कमेच्या 20 टक्के नंतर 15 वर्षा पर्यंत दर 5 वर्षांनी 20 टक्के व शेवटी 40 टक्के रक्कम मिळेल असे सांगितले होते. अर्जदाराच्या पतीस पुढचा हप्ता दिनांक 26/03/2009 रोजी भरावयाचा होता परंतु त्या तारखेचा हप्ता विमादाराने भरला नाही तदनंतर त्याने या संदर्भात विचारणा केली असता 6 महिन्यात म्हणजे दिनांक 26/09/2009 पर्यंत तो हप्ता भरुन पॉलिसी पुढे चालू ठेवता येईल असे त्यास सांगितले परंतु दिनांक 11/08/2009 रोजी तिव्र ह्यदय विकाराच्या झटक्याने अर्जदाराच्या पतीचे निधन झाले.दिनांक 04/09/2009 रोजी तिने गैरअर्जदारांकडे तिच्या पतीने घेतलेल्या पॉलिसीचा लाभ मिळण्याकरता अर्ज दाखल केला.त्यावर गैरअर्जदाराकडून कसलाही प्रतिसाद न मिळाल्यामुळे शेवटी दिनांक 22/02/2010 रोजी अर्जदाराने गैरअर्जदारास कायदेशिर नोटीस पाठवली दिनांक 09/03/2010 रोजी गैरअर्जदाराने असे कळविले की, त्यांनी या आधी दिनांक 04/09/2009 रोजी सदर पॉलिसी लॅप्स झाल्यामुळे कोणतीही रक्कम मिळणार नसल्याचे कळविले होते.वास्तविक पाहता ही बाब अन्याय कारक आहे. गैरअर्जदार कंपनीच्या नियमानुसार मासिक हप्ता पॉलिसी करता हप्ता भरण्याचा वाढीव कालावधी 15 दिवस नंतर त्रैमासिक,अर्धवार्षिक व वार्षीक हप्त्यांना देखील 30 दिवसच ठेवण्यात आले आहे.जे नैसर्गिक न्यायतत्वाच्या विरुध्द आहे.मासिक हप्ता पॉलिसी करता हप्ता भरण्याचा वाढीव कालावधी 15 दिवस म्हणजे ½ कालावधी असेल तर त्या प्रमाणात त्रैमासिक हप्ता पॉलिसीस 45 दिवस सहामाही करता 90 दिवस व वार्षीक हप्ता पॉलिसी करीता 180 दिवस असा वाढीव कालावधी असावयास हवा पुढे गैरअर्जदाराच्या नियमा प्रमाणे मृत पॉलिसीच्या पुनःप्रवर्तनासाठी 5 वर्षाचा कालावधी दिला आहे म्हणजे त्या काळात सर्व हप्ते व्याजासह भरले तर ती पुन्हा चालू होते प्रस्तुत प्रकरणात पॉलिसी हप्ता भरण्याच्या वाढीव कालावधी हा 26/4/2009 पर्यंत होता व अर्जदाराचे पतीचा आकस्मिक मृत्यू दिनाक 11/8/2009 पर्यंत झाला म्हणजे तो हयात राहीला असता तर त्यास पॉलिसी पुर्नःजिवीत करता आले असते म्हणून अशा परस्पर विरोधी नियमामुळे अर्जदारास न्याय हक्का पासून वंचित रहावे लागले आहे.पॉलिसीच्या शर्ती अतिशय बारीक अक्षरात असल्यामुळे त्याचे वाचन करणे अवघड जाते म्हणून विमाधारकास याचे ज्ञान नसते तसेच पॉलिसी बंद झाल्याचे देखील विमा धारकास कधीच कळवले नाही.तसेच गैरअर्जदाराचे नियमा प्रमाणे 5 वर्षाचा पॉलिसी पुर्नःजिवनाचा कालावधी ग्राहय धरुन अर्जदाराची देय रक्कम रु.5,00,000/- मधून वार्षिक हप्ता रक्कम रु.34,347/- वजा करुन घेऊन अर्जदारास तिच्या दाव्या बाबत देय रक्कम म्हणून रु.4,65,653/- देणे आवश्यक होते.म्हणून अर्जदारास सदर रक्कम दावा नाकारल्याची ता.09/03/2010 पासून योग्य त्या व्याजासह व लाभासह मिळण्यासाठी अर्जदाराने प्रस्तुतची तक्रार मंचासमोर दाखल करुन गैरअर्जदाराने पॉलिसी क्रमांक 987148530 च्या दाव्या बाबत रक्कम रु.4,65,653/- दिनांक 09/03/2010 पासून योग्य व्याजासह व लाभासह द्यावी तसेच पॉलिसीच्या अटी व शर्ती ठळक अक्षरात छापून पॉलिसी धारकांना द्याव्यात व पॉलिसी बंद झाल्यास 15 दिवसांच्या आत त्याची सुचना पॉलिसी धारकास व नॉमिनीस द्याव्या मानसिक त्रासापोटी रक्कम रु.10,000/- व तक्रारीच्या खर्चापोटी रक्कम रु.5,000/- द्यावे अशा मागण्या मंचासमोर केल्या आहेत. अर्जदाराने तक्रार अर्जासोबत शपथपत्र नि.2 वर व पुराव्यातील कागदपत्र नि.4/1 ते नि.4/5 मंचासमोर दाखल केली. मंचाची नोटीस गैरअर्जदारास मिळाल्यानंतर लेखी निवेदन नि.13 वर दाखल करुन अर्जदाराचे कथन बहूतअंशी अमान्य केले आहे.गैरअर्जदाराचे म्हणणे असे की,वार्षीक, अर्धवार्षीक, व त्रैमासिक हप्त्यांच्या पॉलिसी करता हप्ता भरण्याचा वाढीव कालावधी हा फक्त 1 महिन्याचा असल्यामुळे अर्जदाराच्या पतीने ग्रेस पिरीयड मध्ये पॉलिसीचा हप्ता न भरल्यामुळे पॉलिसी लॅप्स झालेली होती.तसेच पॉलिसीच्या अटी व शर्ती नुसार विमाधारकाने जर 3 वर्ष किंवा 5 वर्षा करीता प्रिमीयमचा भरणा केला असेल तरच प्रिमीयमची रक्कम पॉलिसी धारकाच्या वारसाला देण्यात येते, परंतु प्रस्तुत प्रकरणाला फक्त एकच हप्ता भरलेला आहे त्यामुळे गैरअर्जदार विमा दाव्याची रक्कम अथवा विमा हप्त्यापोटी भरलेली रक्कम देण्यास बांधील नाही,म्हणून अर्जदाराची तक्रार खर्चासह खारीज करण्याची विनंती गैरअर्जदाराने मंचासमोर केली आहे.. गैरअर्जदाराने लेखी निवेदना सोबत शपथपत्र नि.14 वर दाखल केले. दोन्ही पक्षांच्या कैफियतीवरुन खालील मुद्दे उपस्थित होतात. मुद्दे. उत्तर 1 गैरअर्जदाराने अर्जदारास त्रुटीची सेवा दिल्याचे शाबीत झाले आहे काय ? नाही. 2 आदेश काय ? अंतिम आदेशा प्रमाणे. कारणे मुद्दा क्रमांक 1 व 2 अर्जदाराच्या पतीने गैरअर्जदाराकडून रक्कम रु.5,00,000/- ची विमा पॉलिसी काढली होती दिनांक 26/3/2008 रोजी वार्षीक प्रथम हप्ता रु.34,347/- चा भरला होता अर्जदाराच्या पतीने पुढील हप्ता 26/3/2009 रोजी भरावयाचा होता परंतु त्यास काही अडचणीमुळे त्याला तो हप्ता भरता आला नाही, परंतु दिनांक 26/9/2009 पर्यंत हप्ता भरुन पॉलिसी पुढे चालू ठेवता येईल असे त्याला सांगण्यात आले,परंतु दिनांक 11/08/2009 रोजी त्याचे निधन झाले.अर्जदाराच्या पतीने घेतलेल्या विमा पॉलिसीचा लाभ मिळण्या करीता अर्जदाराने दिनांक 4/9/2009 रोजी अर्ज दाखल केला परंतु वाढीव मुदतीत अर्जदाराच्या पतीने हप्ता न भरल्यामुळे सदर पॉलिसी लॅप्स झाल्यामुळे अर्जदारास कोणतीही रक्कम देण्यास गैरअर्जदाराने इनकार केला अशी थोडक्यात अर्जदाराची तक्रार आहे.यावर गैरअर्जदाराचे म्हणणे असे की, अर्जदाराच्या पतीने वाढीव मुदतीत देखील हप्ता न भरल्यामुळे सदर पॉलिसी लॅप्स झाली होती व तसेच पॉलिसीच्या अटी व शर्ती नुसार विमाधारकाने जर 3 वर्ष अथवा 5 वर्षासाठी प्रिमियम भरला असेल तरच प्रिमीयची रक्कम विमाधारकाच्या वारसास देण्यात येते,परंतु प्रस्तुत प्रकरणात अर्जदाराच्या पतीने फक्त एकच हप्ता भरलेला आहे.निर्णयासाठी महत्वाचा मुद्दा असा की, गैरअर्जदाराने पॉलिसी हमी पोटी लाभ देण्याचे नाकारुन त्रुटीची सेवा दिली आहे काय ? या मुद्दाचे सविस्तर विवेचन करणे गरजेचे आहे. अर्जदाराने नि.4/1 वर पॉलिसीची झेरॉक्स प्रत दाखल केली आहे त्या मधील अटी व शर्तीचे अवलोकन केले असता कंडीशन क्रमांक 2 नुसार वार्षीक, अर्धवार्षीक, त्रैमासिक हप्त्यांच्या पॉलिसी करीता हप्ता भरण्याचा वाढीव कालावधी हा फक्त 1 महिन्याचा होता या वाढील कालावधी मध्ये जर हप्ता भरला नाही तर पॉलिसी लॅप्स होईल असे स्पष्टपणे नमुद केलेले आहे सदर प्रकरणात अर्जदाराच्या पतीच्या पॉलिसीचा वार्षीक हप्ता होता त्याला दिनांक 26/3/2009 रोजी हप्ता भरवयाचा होता परंतु तो त्या तारखेस हप्ता भरु शकला नाही.त्याची वाढीव मुदत दिनांक 26/04/2009 रोजी पर्यंत होती परंतु अर्जदाराच्या पतीने वाढीव कालावधीमध्ये हप्ता भरलेला नसल्यामुळे सहाजीकच सदर पॉलिसी लॅप्स झाली असली पाहिजे अर्जदाराच्या पतीचा मृत्यू दिनांक 11/08/2009 रोजी झाला पॉलिसी लॅप्स झाल्यानंतर देखील अर्जदाराच्या पतीने लॅप्स झालेली पॉलिसी पुर्नःजिवीत करण्यासाठी काहीही हालचाल केलेली दिसून येत नाही.पॉलिसी कंडीशन 3 प्रमाणे लॅप्स पॉलिसी पुर्नःजिवीत ( Revival ) करावयाची असल्यास ती विमाधारकाच्या जिवंतपणी व गैरअर्जदाराच्या संमतीनेच करता येते त्यामुळे सदर पॉलिसी पुर्नःजिवीत करण्यासाठीचा प्रश्नच उदभवत नाही.शिवाय पॉलिसीची कंडीशन क्रमांक 4 अंतर्गत अर्जदार लाभ मिळण्यास पात्र नाही.कारण अर्जदाराच्या पतीने फक्त एकच हप्ता भरलेला आहे.अर्जदाराच्या वतीने दाखल केलेल्या सायटेशन मा.मेघालय राज्य आयोग शिलॉंग 2004 (2) CPR 342 मध्ये व्यक्त कलेले मत IMP Points – Where LIC in its decision allowed revival of lapsed policy but failed to communicate revival to insured’ and consequently insured could not deposit arrears of premium towards revival of policy and insured died after sometime legal heirs of insured would be entitled to policy amount. या प्रकरणाला लागु होत नाही. कारण पॉलिसी revival चा प्रश्नच येथे उदभवत नाही. तसेच मा.राजस्थान राज्य आयोग जयपूर 2008 (2) CPR 118 मध्ये व्यक्त केलेले मत ही सदर प्रकरणात अर्जदाराच्या पतीने एकच हप्ता भरल्यामुळे लागु होणार नाही. म्हणून वर विस्तृत केलेल्या विवेचना प्रमाणे मुद्दा क्रमांक 1 चे उत्तर नकारार्थी देऊन आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोंत. आदेश 1 अर्जदाराचा तक्रार अर्ज नामंजूर करण्यात येत आहे. 2 दोन्ही पक्षांना आदेशाच्या प्रती मोफत पुरवाव्यात. सौ. अनिता ओस्तवाल सौ.सुजाता जोशी श्री. सी.बी. पांढरपटटे सदस्या सदस्या अध्यक्ष.
| [HONABLE MRS. Anita Ostwal] Member[HONABLE MR. JUSTICE C. B. Pandharpatte] PRESIDENT | |