ORDER | निकालपत्र ( पारित दिनांक :25/02/2015) ( मा. अध्यक्ष, श्री. प्रकाश एल. जाधव यांच्या आदेशान्वये) तक्रारकर्त्याने ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 12 अन्वये प्रस्तुत तक्रार विरुध्द पक्षा विरुध्द दाखल केली आहे. - तक्रारकर्त्याच्या तक्रारीचा थोडक्यात आशय असा की, त.क. चे वि.प. बँकेत बचत खाते क्रं.6008462824 उघडण्यात आले आहे. त.क. ने सदर खाते हे जमा रक्कमेवर व्याज मिळेल व रक्कम सुरक्षित राहील याकरिता उघडले आहे.
- त.क.चे पुढे असे कथन की, वि.प.बॅंकेने गजानन कवडूजी लोहकरे यांना ते त.क.च्या बचत गटात कोणत्याही पदावर नसतांना अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष यांची कुणाचीही स्वाक्षरी न घेता त.क.च्या बचत खात्यातून दि. 25.07.2013 रोजी 1280/-रुपये व दि. 27.07.2013 रोजी रु.8000/- काढून घेतले व वि.प. बँकेने गजानन कवडूजी लोहकरे यांना गुन्हा करण्यास मदत केलेली आहे व त्यामुळे त.क. चे नुकसान झालेले आहे. वि.प. बँकेची ही कृती बेकायदेशीर असून त.क. गटाला ज्या सेवा पुरवावयाच्या आहेत, त्या सेवांच्या कार्यात भंग केला आहे व त.क. ची वि.प. बँकेत जमा असलेली रक्कम त्रयस्थ इसमाला दिली असून त्या रक्कमेचा अपहार केला आहे.
- त.क.ने पुढे असे कथन केले आहे की, वि.प. बँकेला गजानन लोहकरे यांचा त.क.शी काहीही संबंध नाही हे माहिती होते तरी देखील त्यांनी ही गैरकायदेशीर कृती करुन स्वतःला बेकायदेशीर कार्यात लिप्त केले आहे. परिणामी त.क.च्या गटाला, सदस्यांना व पदाधिका-यांना फारमोठा आर्थिक फटका बसला. त.क.चे खात्यातून 9280/-रुपये एवढे प्रत्यक्ष नुकसान झाले होते, ही बाब लक्षात आल्यानंतर त.क.च्या गटातील सर्व सदस्यांनी आपआपले कामधंदे सोडून बॅंकेकडे जवळपास एक महिना यावे लागले तरी देखील वि.प. बॅंकेने ती रक्कम परत केले नव्हते. त्याकरिता त्यांना येण्या-जाण्यामुळे व त्यांचे रोजचे काम बुडाले, त्यामुळे रोजी मिळाली नाही. तर येण्या-जाण्यासाठी प्रवासासाठी खर्च करावा लागला. यासर्व खर्चापोटी 50,000/-रुपये एवढे नुकसानभरपाई वि.प.ने त.क.ला देणे योग्य आहे व ती बंधनकारक आहे. त्याकरिता दि.08.11.2013 रोजी त.क.ने वि.प. बॅंकेला वकिलामार्फत सूचना पत्र देऊन नुकसानभरपाईची मागणी केली. परंतु वि.प.ने काहीही कारवाई केली नाही. म्हणून त.क.ने प्रस्तुत तक्रार दाखल करुन नुकसानभरपाई बद्दल 50,000/-रुपये व तक्रारीचा खर्च म्हणून 10,000/-रुपये मिळावे अशी मागणी केली आहे.
- वि.प. बॅंकेने आपला लेखी जबाब नि.क्रं. 10 वर दाखल केला असून तक्रार अर्जास सक्त विरोध केला आहे. त.क.चे वि.प.च्या बॅंकेत बचत खाते आहे व गजानन कवडूजी लोहकरे यांनी 1280/- व 8,000/-रुपये नमूद केलेल्या तारखेला त.क.च्या खात्यातून काढले हे हे मान्य केलेले असून इतर सर्व आक्षेप अमान्य केलेले आहे.
- वि.प. चे म्हणणे असे की, त.क.ने वि.प. बॅंकेकडे खाते सुरु करतांना आवश्यक त्या कागदपत्रावर अध्यक्ष म्हणून श्री. मारोती उरकुडा पिसे, उपाध्यक्ष म्हणून विठ्ठल संभाजी दांडेकर व सचिव या नात्याने श्री. गजानन कवडूजी लोहकरे यांनी सहया केल्या. सदर बचत खात्याचा व्यवहार हा सचिव या नात्याने गजानन कवडूजी लोहकरे पाहत होते. दि. 25.07.2013 रोजी सचिव गजानन लोहकरे यांनी पिक विम्यापोटी सदरील खात्यातून 1280/-रुपये वळते केले व दि. 27.07.2013 रोजी 8000/-रुपये काढले. तो पर्यंत त.क.ने वि.प. बॅंकेला गजानन लोहकरे हे सचिव पदावर नसल्याबाबत कोणत्याही प्रकारची सूचना अगर माहिती दिली नव्हती. परंतु सदर बाब त.क.ने दि. 25.09.2013 रोजी वि.प. बॅंकेकडे दिली असता त्यानंतर लगेच वि.प.ने गजानन लोहकरे यांना सूचना देऊन सदरील रक्कम त.क.च्या खात्यात भरण्यास सांगितले व त्याप्रमाणे त्याने वरील रक्कम रुपये8,000/- दिनांक 25.09.2013 रोजी व रक्कम रुपये1280/- दिनांक 27.09.2013 रोजी त.क.च्या बचत खात्यात जमा केली. गजानन लोहकरे यांनी त.क.च्या बचत गटाच्या सचिव पदाचा पूर्वीच राजीनामा दिला असल्याबाबतची कोणत्याही प्रकारची सूचना अगर माहिती त.क.ने बॅंकेला दिली नव्हती. त्यामुळे बॅंकेच्या नेहमीच्या व्यवहार पध्दतीने व विश्वास ठेवून गजानन लोहकरे यांच्या व्यवहारास संमती दिली व त्यामध्ये जाणूनबुजून कोणतीही बेकायदेशीर कृती किंवा अपहार केलेली नव्हती. गजानन लोहकरे यांनी राजीनामा दिल्याची बाब अंधारात ठेवून बॅंकेतील व्यवहार केल्यामुळे त्याबाबत त.क.चे उपाध्यक्ष श्री. विठ्ठल संभाजी दांडेकर यांचे दि. 25.09.2013 चे रिपोर्टवरुन पोलिस स्टेशन समुद्रपूरने गजानन लोहकरे यांच्या विरुध्द भा.द.वि. चे कलम 420 प्रमाणे गुन्हा नोंदविला आहे. गजानन लोहकरे यांचे बेकायदेशीर व्यवहार व कृतीबाबत वि.प.ला कायदेशीर जबाबदार धरण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. गजानन कवडूजी लोहकरे यांनी वरील रक्कम लगेच जमा केल्यामुळे त.क.चे आर्थिक नुकसान झालेले नाही व त.क.ने गजानन कवडूजी लोहकरे यांना या प्रकरणात पार्टी केलेले नाही. त.क.ने पैसे उकळण्यासाठी खोटी तक्रार दाखल केलेली आहे, म्हणून सदर तक्रार त.क.वर रुपये 10,000/- दंड लावून खारीज करण्यात यावी अशी विनंती केलेली आहे.
- त.क.ने त्याच्या कथनाच्या पृष्ठयर्थ अध्यक्ष, मारोती उरकुडा पिसे यांचे शपथपत्र नि.क्रं. 12 वर दाखल केलेले आहे व वर्णन यादी नि.क्रं.4 प्रमाणे एकूण 08 कागदपत्रे दाखल केलेली आहे. तसेच वर्णन यादी नि.क्रं. 17 प्रमाणे एकूण 9 कागदपत्रे दाखल केलेली आहे. वि.प. यांनी कोणताही तोंडी पुरावा दाखल केलेला नसून लेखी युक्तिवादा सोबत काही कागदपत्रे स्वतःच्या कथनाच्या पृष्ठयर्थ दाखल केलेले आहे.
- त.क. यांचा लेखी युक्तिवाद नि.क्रं.13 वर व अतिरिक्त लेखी युक्तिवाद नि.क्रं. 15 वर दाखल केलेला आहे व लेखी युक्तिवाद हाच तोंडी युक्तिवाद गृहीत धरण्यात यावे अशी पुरसीस नि.क्रं. 18 वर दाखल करण्यात आलेली आहे. वि.प. च्या वकिलांनी लेखी युक्तिवाद नि.क्रं.14 वर दाखल केलेला आहे. वि.प. च्या वकिलांचा तोंडी युक्तिवाद ऐकून घेतला.
- वरीलप्रमाणे त.क. व वि.प. यांचे परस्पर विरोधी विधानावरुन खालील मुद्दे मंचासमोर विचारार्थ काढून त्यावरील कारणमिमांसा पुढीलप्रमाणे आहे.
अ.क्रं. | मुद्दे | उत्तर | 1 | विरुध्द पक्ष बॅंकेने तक्रारकर्त्याच्या बचत खात्यातील रक्कम गजानन कवडुजी लोहकरे यांना काहीही अधिकार नसतांना पैसे उचलण्यास मदत करुन दोषपूर्ण सेवा व अनुचित व्यापार पध्दतीचा अवलंब केला आहे काय ? | नाही. | 2 | तक्रारकर्ता मागणीप्रमाणे लाभ मिळण्यास पात्र आहे काय ? | नाही. | 3 | अंतिम आदेश काय ? | नामंजूर |
: कारणमिमांसा :- - मुद्दा क्रं.1, व 2 बाबत ः- तक्रारकर्ता हा शेतकरी स्वयंसहायता बचत गट असून त्याचे वि.प. बॅंकेकडे बचत खाते आहे हे वादातीत नाही. तसेच दि. 25.07.2013 रोजी व दि. 27.07.2013 रोजी गजानन कवडुजी लोहकरे यांनी त.क.च्या बचत खात्यातून अनुक्रमे 1280/- व 8000/-रुपये काढले हे सुध्दा वादातीत नाही.
- त.क.ची तक्रार अशी आहे की, गजानन लोहकरे यांचा त.क.शी काहीही संबंध नसतांना वि.प. बॅंकेने त्याला त.क.च्या बचत गटातील वरील रक्कम काढून दिली व रक्कमेचा अपहार केला व त.क. अध्यक्ष, उपाध्यक्ष व सदस्यांना जेव्हा ही बाब कळली तेव्हा सतत ते एक महिना वि.प. बॅंकेत चकरा-मारत होते. परंतु वि.प. बॅंकेने कुठलीही दाद देत नव्हते. त्यामुळे त्यांना 50,000/-रुपयाचे नुकसान झालेले आहे आणि ती नुकसानभरपाई देण्यास वि.प. जबाबदार आहे व नुकसान भरपाईची मागणी केलेली आहे.
- या उलट वि.प. बँकेने असे कथन केले आहे की, त.क.चे बचत खाते उघडत्या वेळेस अध्यक्ष, उपाध्यक्ष व सचिव यांनी सहया केल्या व गजानन कवडुजी लोहकरे हे सचिव या नात्याने सदरील बचत खात्याचा व्यवहार पाहत होते. त्यामुळे दि. 25.07.2013 व दि. 27.05.2013 रोजी वरील रक्कम त्यांनी काढली. गजानन लोहकरे यांनी सचिव पदाचा राजीनामा दिला यासंबंधी वि.प. बॅंकेला कळविले नसल्यामुळे तो व्यवहार झालेला आहे. वि.प. बॅंकेने कुठलाही बेकायदेशीर व्यवहार केलेला नाही.
- वि.प. बॅंकेने त.क.ने जेव्हा बचत खाते उघडले त्यावेळेस त्यांनी भरलेल्या फॉर्मची झेरॉक्स प्रत मंचासमोर दाखल केलेली आहे. त्याचे अवलोकन केले असता असे निदर्शनास येते की, बचत खाते उघडतांना अध्यक्ष म्हणून मारोती उरकुडा पिसे, उपाध्यक्ष , विठ्ठल संभाजी दांडेकर व सचिव म्हणून गजानन कवडुजी लोहकरे यांनी अर्जावर सहया केल्या असून त्यांचे फोटो त्यावर लावण्यात आलेले आहे. तसेच त्यांच्या स्पेसीमन स्वाक्षरी सुध्दा अर्जावर घेण्यात आलेल्या आहेत. तसेच वरील तिन्ही पैकी सदर खात्यातील व्यवहारावर कुणा ही दोघांची सही असली तरी व्यवहार करण्याचे अधिकार देण्यात आलेले आहे. हे सत्य आहे की, दि. 25.07.2013 व 27.07.2013 रोजी गजानन लोहकरे यांनी त्यांच्या एकटयाच्या सहीने रुपये 1280/- व 8000/-रु. त.क.च्या बचत खात्यातून उचल केलेली आहे. त.क.ने गजानन कवडुजी लोहकरे यांचा त.क. शी काहीही संबंध नाही व नव्हता असे तक्रारीत व शपथपत्रात नमूद केलेले आहे. परंतु वि.प. बॅंकेने दाखल केलेल्या कागदपत्रावरुन असे दिसून येते की, गजानन कवडुजी लोहकरे हे त.क.च्या बचत गटात सचिव होते.
- त.क. चे अधिवक्ता यांनी त्यांच्या अतिरिक्त लेखी युक्तिवादामध्ये असे नमूद केलेले आहे की, अगदी सुरुवातीला वि.प.चे बॅंकेत खाते उघडल्या गेले तेव्हा त.क.च्या बचत गटाचे अध्यक्ष पदी मारोती पिसे, उपाध्यक्ष पदी विठ्ठल संभाजी दांडेकर व सचिव म्हणून गजानन कवडुजी लोहकरे होते. कालांतराने त्यांनी राजीनामा दि荛ࠀला आणि सचिव पद रिक्त केले.त्यावेळी गजानन लोहकरे यांच्या वाटयाला येणारी रक्कम मागितल्यामुळे चेक क्रं.416742 हा 886/-रुपयांचा देण्यात आला. अशा त-हेने गजानन लोहकरे यांचे सभासदत्व आणि सचिव म्हणून पदाधिकारी पद संपुष्टात आणल्या गेले होते. त्याकरिता त्याने दि荛ࠀ. 02.11.2012 पासून ते 02.08.2013 पर्यंतच्या मासिक सभा कार्यवृत्ताच्या झेरॉक्स प्रती मंचासमोर दाखल केलेली आहेत. या ठिकाणी असे नमूद करावेसे वाटते की, त.क.ने त्याच्या तक्रारीमध्ये व शपथपत्रामध्ये असे कुठेही नमूद केलेले नाही की, गजानन लोहकरे हे सचिव होते व त्यांनी त्या पदाचा राजीनामा दिला. शेवटी वि.प. बॅंकेने जेव्हा कागदपत्रे मंचासमोर दाखल केली, त्यावेळेस त.क.च्या वकिलांनी ही बाब त्यांच्या अतिरिक्त लेखी युक्तिवादात कथन केलेली आहे. त्यामुळे त.क. हा स्वच्छ हाताने मंचासमोर आलेला नाही असे दिसून येते.
- तसेच गजानन लोहकरे यांनी सचिव पदाचा राजीनामा कोणत्या तारखेला व कोणत्या वर्षी दिला हे सुध्दा त.क.ने कुठेही नमूद केलेले नाही. तसेच गजानन लोहकरे यांनी सचिव पदाचा राजीनामा दिल्यानंतर त्याची माहिती वि.प. बॅंकेला दिली असे कुठे ही नमूद केलेले नाही किंवा तसा कागदोपत्री पुरावा मंचासमोर आलेला नाही. त्यामुळे वि.प. बॅंकेला गजानन लोहकरे यांनी त.क.च्या बचत गटाच्या सचिव पदाचा राजीनामा दिला ही बाब निश्चितच माहिती नसावी. त.क.ने शेवटी अतिरिक्त लेखी युक्तिवाद सोबत मासिक सभा कार्यवृत्त दाखल केलेला आहे. त्याचे अवलोकन केले असता दि.02.11.2012. रोजी गजानन कवडुजी लोहकरे हे सभेस हजर होते. परंतु त्यावर त्यांची सही दिसत नाही. या ठिकाणी नमूद करावेसे वाटते की, मासिक सभा कार्यवृत्त यात नमूद तारखेत खाडखोड झालेली आहे. त्याचे काळजीपूर्वक अवलोकन केले असता असे दिसून येते की, सभा कार्यवृत्त हे दि.09.12.2013 चे होते त्याला खोडून दि.02.11.2012 चा तो मासिक सभेचा कार्यवृत्त करण्यात आलेला आहे. तसेच दि. 02.12.2012चा जो मासिक सभा कार्यवृत्त दाखल केलेला आहे, त्यात सुध्दा खोडुन तारीख बदलविण्यात आली आहे. तसेच गजानन लोहकरे यांनी जर त.क. बचत गटाचा राजीनामा दिला होता तर त.क. बचत गटाने ती माहिती वि.प. बॅंकेकडे द्यावयास पाहिजे होती व नविन सचिवाचे नांव गजानन लोहकरे यांच्या जागी बचत गट बॅंकेच्या खात्यात नोंदणीकरुन घ्यावयास पाहिजे होते आणि ही जबाबदारी त.क.ची होती, परंतु त.क.ने तसे केल्याचे कुठेही दिसून येत नाही.
- गजानन लोहकरे यांनी बराच कालावधी त.क.च्या बचत गटाचे सचिव म्हणून काम केलेले असल्यामुळे त्याच्यावर विश्वास ठेवून वि.प. बॅंकेने सदरील रक्कम उचलण्यास परवानगी दिली आहे असे दिसून येते. जर त.क.ने नविन सचिवचे नांव त्याचे बचत खात्यात नोंद करुन घेतले असते तर निश्चितच ही चूक बॅंकेकडून झाली नसती, म्हणून ही वि.प.ची जबाबदारी होती असे म्हणता येणार नाही व वि.प. बॅंकेने हेतूपुरस्सर गजानन लोहकरे यांना त.क.च्या बचत खात्यातील रक्कम उचलण्यास मदत केली असे महणता येणार नाही.
- तसेच त.क.ने दाखल केलेल्या कागदपत्रावरुन असे दिसून येते की, दि. 25.09.2013 रोजी त.क. ने जेव्हा वि.प. बॅंकेला ही माहिती दिली त्यानंतर वि.प. बॅंकेने लगेच गजानन लोहकरे यांना सूचना देऊन त्यांच्याकडून 8,000/- दि. 25.09.2013 रोजी व 1280/-रुपये 27.09.2013 रोजी त.क.च्या बचत खात्यात जमा करुन घेतले. वि.प. बॅंकेने त.क.च्या बचत खात्याचा उतारा मंचासमोर दाखल केलेला आहे. त्यावरुन ही बाब आढळून येते की, वि.प. बॅंकेने त्यांना सचिव पदाची राजीनाम्याची सूचना प्राप्त होताच वि.प.ने गजानन लोहकरे यांना सूचना केल्याप्रमाणे ते पैसे त्याच्याकडून जमा करुन घेतले. त्यामुळे वि.प. बॅंकेने कुठलाही गैरव्यवहार केलेला नाही किंवा त्यामुळे त.क.ला फार नुकसान झाले असे म्हणता येणार नाही. या उलट त.क.ने जी काळली घ्यावयास पाहिजे होती, ती न घेतल्यामुळे सदरील रक्कम त्याच्या बचत खात्यातून उचलल्या गेली असे दिसून येते. परंतु वि.प. बॅंकेने सदर रक्कम संबंधित व्यक्तिकडून त.क. च्या खात्यात जमा करुन घेतली. म्हणून वि.प. बॅंकेने सेवा देण्यात कुठलाही त्रृटीपूर्ण व्यवहार व अनुचित व्यापार प्रथेचा अवलंब केला असे म्हणता येणार नाही असे मंचास वाटते. त्यामुळे मंच या निष्कर्षा प्रत येते की, वि.प. बँकेने त.क.ला कोणतीही दोषपूर्ण सेवा दिलेली नसल्यामुळे त.क. हा मागणीप्रमाणे कोणताही लाभ मिळण्यास पात्र नाही. म्हणून वरील 1, 2 व 3 मुद्दयाचे उत्तर नकारार्थी देण्यात येते.
सबब खालील प्रमाणे आदेश पारित करण्यात येते. आदेश 1 तक्रारकर्त्याची तक्रार खारीज करण्यात येते. 2 उभय पक्षाने खर्चाचे वहन स्वतः सोसावे. 3 मा.सदस्यांसाठीच्या ‘ब’ व ‘क’ फाईल्स संबंधितांनी परत घेवून जाव्यात. 4 निकालपत्राच्या प्रति सर्व संबंधित पक्षांना माहितीस्तव व उचित कार्यवाही करिता पाठविण्यात याव्यात. | |