निकालपत्र
तक्रार दाखल दिनांकः- 27/01/2012
तक्रार नोदणी दिनांकः- 03/02/2012
तक्रार निकाल दिनांकः- 15/05/2012
कालावधी 03 महिने.12.दिवस.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी
अध्यक्ष - श्री.चंद्रकांत बी. पांढरपट्टे, B.Com.LL.
सदस्या- सौ.अनिता ओस्तवाल M.Sc.
-------------------------------------------------------------------------------------------
राजेश किशनराव शिंदे. अर्जदार
वय 30 वर्ष. अड.पी.डी.गिराम.
रा.ढेंगळी पिंपळगाव ता.सेलू.जि.परभणी.
विरुध्द
शाखा व्यवस्थापक. गैरअर्जदार.
बँक ऑफ महाराष्ट्र.आळेफाटा.ता.जुन्नर जि.पुणे.
------------------------------------------------------------------------------------
कोरम - 1) श्री.सी.बी.पांढरपट्टे. अध्यक्ष.
2) सौ.अनिता ओस्तवाल. सदस्या.
-------------------------------------------------------------------------------------------------------
(निकालपत्र पारित व्दारा श्रीमती. अनिता ओस्तवाल.सदस्या.)
गैरअर्जदार बँकेने त्रुटीची सेवा दिल्याच्या आरोपावरुन अर्जदाराने ही तक्रार दाखल केली आहे.
अर्जदाराची थोडक्यात तक्रार अशी की,
अर्जदार याचे स्टेट बँक ऑफ हैद्राबाद शाखा सेलू येथे खाते क्रमांक 62048240185 आहे.दिनांक 16/07/2011 रोजी स्टेट बँक ऑफ हैद्राबाद शाखा औरंगाबाद येथून अनुक्रमे रक्कम रु.25,000/- व रक्कम रु.25,000/- असे एकुण 50,000/- त्याच्या खात्यात जमा करण्यात आले होते. दिनांक 16/07/2011 रोजी बँक ऑफ महाराष्ट्र शाखा आळेफाटा यांच्या ATM मधून पावती क्रमांक 5173 नुसार अर्जदाराने 10,000/- काढले, परंतु गैरअर्जदाराने त्याच्या खात्या मधून विवरण पत्र क्रमांक अनुक्रमे 5315 व 5317 अन्वये एकुण रक्कम रु.20040/- ची कपात केली. पुढे अर्जदाराने स्टेट बँक ऑफ हैद्राबाद शाखा सेलू यांच्या निदर्शनास ही बाब आणून क्लेम अर्ज दाखल केला,तदनंतर सदरील बँकेला कायदेशिर नोटीस पाठवली,परंतु त्यास अद्याप पावेतो प्रतिसाद मिळालेला नाही.म्हणून अर्जदाराने मंचासमोर तक्रार दाखल करुन गैरअर्जदार बँकेने त्याच्या खात्यामधुन कपात केलेली रक्कम रु.20040/- व इतर खर्चापोटी रक्कम रु.5000/- द्यावी अशा मागण्या मंचासमोर केल्या आहेत.
अर्जदाराने तक्रार अर्जासोबत शपथपत्र नि.2 वर व पुराव्यातील कागदपत्र नि.4/1 ते नि.4/6 मंचासमोर दाखल केली.
मंचाची नोटीस गैरअर्जदारास तामील झाल्यानंतर देखील नेमल्या तारखेस गैरअर्जदार हजर न राहिल्यामुळे त्याच्या विरोधात एकतर्फा आदेश पारीत करण्यात आला
अर्जदाराच्या कैफीयती वरुन खालील मुद्दे उपस्थित होतात.
मुद्दे. उत्तर
1 अर्जदार हा गैरअर्जदार बँकेचा ग्राहक आहे
काय ? नाही.
2 आवश्यक पक्षकारा अभावी सदरचा वाद योग्य आहे काय ? नाही.
3 गैरअर्जदाराने त्रुटीची सेवा दिल्याचे अर्जदाराने शाबीत केले
आहे काय ? नाही
4 आदेश काय ? अंतिम आदेशा प्रमाणे.
कारणे
मुद्दा क्रमांक 1, 2, 3 व 4
अर्जदार हा स्टेट बँक ऑफ हैद्राबाद शाखा सेलू याचा खातेदार व ग्राहक आहे,परंतु गैरअर्जदार बँकेच्या ATM मधून रक्कम काढली व त्या बँकेची ATM ची सेवा अर्जदाराने तात्पुरती घेतली म्हणून तो ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या तरतुदी नुसार ग्राहक या संज्ञेस पात्र ठरत नाही.तसेच त्याने स्टेट बँक ऑफ हैद्राबाद शाखा सेलूला सदर प्रकरणात पक्षकार करावयास हवे होते,परंतु बँकेला सदर प्रकरणात पक्षकार करण्यात आलेले नाही. पुढे अर्जदाराचे म्हणणे असे की, त्याने फक्त पावती क्रमांक 5173 नुसार रक्कम रु.10,000/- काढले असतांना गैरअर्जदार बँकेने विवरणपत्र अनुक्रमे क्रमांक 5315 व 5317 अन्वये एकुण रक्कम रु.20,040/- ची अर्जदाराच्या खात्यातून कपात केलेली आहे,परंतु त्याच्या पृष्टयर्थ कोणताही ठोस पुरावा अर्जदाराने मंचासमोर दाखल केलेला नाही, सबब मुद्दा क्रमांक 1, 2 व 3 चे वरील प्रमाणे उत्तर देवुन आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत.
आदेश
1 अर्जदाराचा तक्रार अर्ज नामंजूर करण्यात येत आहे.
2 संबंधीत पक्षांना आदेशाच्या प्रती मोफत पुरवाव्यात.
सौ. अनिता ओस्तवाल श्री. सी.बी. पांढरपट्टे
सदस्या अध्यक्ष.