(घोषित दि. 18.09.2012 व्दारा श्रीमती रेखा कापडिया, प्र.अध्यक्ष)
अर्जदार यांचे गैरअर्जदार बॅंकेत खाते असून त्यांनी त्यांच्या खात्यात 66,500/- रुपयाचा धनादेश जमा केला. गैरअर्जदार यांनी ही रक्कम त्यांच्या खात्यात जमा न केल्यामुळे अर्जदाराने सेवेतील त्रुटी म्हणून ग्राहक संरक्षण कायदा 1986 अंतर्गत मंचात तक्रार दाखल केली आहे.
अर्जदाराने दाखल केलेल्या तक्रारीनुसार त्यांचे गैरअर्जदार यांच्या बँकेत खाते असून त्यांनी मौलाना आझाद महामंडळा तर्फे त्यांच्या नावे देण्यात आलेला 66,500/- रुपयाचा धनादेश दिनांक 17.03.2010 रोजी वटविण्यासाठी जमा केला. अर्जदाराने सदरील रक्कम त्यांच्या खात्यात जमा झाली नसल्याचे आढळून आल्यामुळे, गैरअर्जदार यांच्याशी अनेक वेळेस संपर्क साधला त्याच प्रमाणे दिनांक 03.01.2012 रोजी वकीला मार्फत कायदेशीर नोटीस देखील पाठविली. गैरअर्जदार यांनी सदरील धनादेश गहाळ झालेला असल्यामुळे रक्कम खात्यात जमा करुन शकत नसल्याचे सांगितले. गैरअर्जदार यांच्या या सेवेतील त्रुटीमुळे आर्थिक नुकसान झाले असल्यामुळे अर्जदाराने नुकसान भरपाईची मागणी केली आहे.
अर्जदाराने तक्रारी सोबत धनादेश वटविण्यासाठी बँकेने दिलेली पावती, वकीला मार्फत पाठविलेली नोटीस इत्यादी कागदपत्रे जोडली आहेत.
गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 यांच्यातर्फे दाखल करण्यात आलेल्या जवाबानुसार अर्जदाराचे त्यांच्या बँकेत खाते असल्याचे त्यांना मान्य आहे. त्याच प्रमाणे दिनांक 17.03.2010 रोजी अर्जदाराने त्यांच्या खात्यात वटविण्यासाठी 66,500/- रुपयाचा धनादेश दिला असल्याचेही त्यांना मान्य आहे. गैरअर्जदार यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी सदरील धनादेश कुरिअर मार्फत मुंबई येथील कार्यालयात वटविण्यासाठी पाठविला होता. परंतू तो कुरिअर कंपनीतर्फे गहाळ झाला. दिनांक 16.12.2011 रोजी त्यांनी मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ, जालना यांना सदरील धनादेश गहाळ झाला असल्याचे कळवून दुसरा धनादेश अर्जदाराच्या नावे देण्याची विनंती केली. जालना येथील या मंडळाच्या कार्यालयाने त्यांच्या मुंबई येथील प्रधान कार्यालयाशी संपर्क केला असून त्यांची परवानगी मिळाल्यानंतर दुसरा धनादेश देण्यात येईल असे सांगितले. अर्जदाराने वकीला मार्फत दिलेली नोटीस प्राप्त झाल्यानंतर त्यांनी दिलेल्या जवाबात देखील ही बाब स्पष्ट केली असल्याचे त्यांनी म्हटले आहे. सदरील धनादेश गहाळ झालेला असल्यामुळे मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाकडून दुसरा धनादेश मिळविण्याचा ते सतत प्रयत्न करीत आहेत. महामंडळातर्फे देखील त्यांच्या बँकेस (कॉर्पोरेशन बँक) सदर धनादेश वटविण्यासाठी आल्यास तो वटवू नये असे कळविले आहे. अर्जदारास या सर्व प्रकाराची वेळोवेळी पूर्ण माहिती देण्यात आली आहे. परंतू महामंडळाकडून दुसरा धनादेश आणण्यासाठी अर्जदार त्यांना मदत करीत नसल्याचे गैरअर्जदार यांचे म्हणणे आहे. अर्जदारास देण्यात आलेल्या सेवेत त्रुटी नसल्याचे सांगून तक्रार खारीज करण्याची विनंती मंचास केली आहे.
गैरअर्जदार यांनी जवाबासोबत मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ यांच्यासोबत झालेल्या पत्रव्यवहाराच्या प्रती जोडल्या आहेत.
अर्जदार व गैरअर्जदार यांनी दाखल केलेल्या कागदपत्रांवरुन व मंचासमोर झालेल्या सुनावणीवरुन असे आढळून येते की, अर्जदाराचे गैरअर्जदार क्रमांक 1 यांच्याकडे खाते असून ते बँकेचे ग्राहक आहेत. त्यांचा खाते क्रमांक 068130100000310 असा असल्याचे दिसून येते. दिनांक 17.03.2010 रोजी अर्जदाराने त्यांना मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ यांच्याकडून मिळालेला धनादेश (क्रमांक 537945) त्यांच्या खात्यात वटविण्यासाठी जमा केला. सदरील धनादेश महामंडळाचे खाते असलेल्या कॉर्पोरेशन बँक, मुंबईचा होता. गैरअर्जदार क्रमांक 1 यांनी सदरील धनादेश कुरीअर कंपनी मार्फत मुंबई येथे वटविण्यासाठी पाठविला. सदरील धनादेश गहाळ झाल्याचे गैरअर्जदार क्रमांक 1 यांनी मान्य केले आहे. अर्जदाराने त्याच्या खात्यात रक्कम जमा झाली नसल्यामुळे अनेक वेळेस याबाबत विचारणा केली असल्याचे गैरअर्जदार यांना देखील मान्य आहे. गैरअर्जदार यांनी सदरील धनादेश गहाळ झाल्यामुळे मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ, जालना यांच्याकडे दुसरा धनादेश देण्याची विंनती केलेली दिसून येते. सदरील महामंडळाच्या मुंबई येथील कार्यालयातर्फे त्यांचे खाते असलेल्या कॉर्पोरेशन बँकेस सदरील धनादेश वटवू नये अशी सूचना केलेली दिसून येते. यावरुन अर्जदाराच्या खात्यात अद्याप पर्यंत 66,500/- रुपये जमा झाले नसल्याचे स्पष्ट होते. बँकींग नियमानुसार बाहेरगावचा चेक 30 दिवसात वटून खात्यात जमा होणे अपेक्षित आहे. धनादेश गहाळ झाल्यास ती जवाबदारी संबंधित बँकेने स्विकारुन धनादेशावर नमूद केलेली रक्कम संबंधित ग्राहकाच्या खात्यात जमा करणे हे ही बँक नियमावलीत नमूद केले आहे.
अर्जदाराने दिनांक 17.03.2010 रोजी गैरअर्जदार यांच्या बँकेत मुंबई येथील कॉर्पोरेशन बँकेचा 66,500/- रुपयाचा धनादेश वटविण्यासाठी जमा केला. नियमाप्रमाणे सदरील धनादेश एक महिन्याच्या आत म्हणजे दिनांक 17.04.2010 पर्यंत अर्जदाराच्या खात्यात जमा होणे अपेक्षित होते. अर्जदाराने वेळोवेळी तक्रार करुन सुध्दा गैरअर्जदार यांनी पहिल्यांदा दिनांक 26.11.2010 रोजी मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ, जालना यांना पत्र लिहून धनादेश गहाळ झाला असल्याचे कळविले व दुसरा धनादेश देण्याची विनंती केली. कोणत्याही धनादेशाची व्हॅलिडीटी ही सहा महिन्याची असते व त्यानंतर वटविण्यासाठी आला असल्यास कालबाह्रय मानला जातो. अर्जदाराचा धनादेश वटविण्याची मुदत देखील दिनांक 17.09.2010 पर्यंत होती. यावरुन गैरअर्जदार यांनी अर्जदाराने वटविण्यासाठी धनादेश दिल्यानंतर, एक महिन्याचा वटविण्यासाठी असलेला कालावधी वगळता सात महिन्यानंतर संबंधितांना पत्र लिहून दुसरा धनादेश देण्याची मागणी केलेली दिसून येते. गैरअर्जदार यांची ही कृती बेजवाबदारपणाची असून ती सेवेतील त्रुटी मानण्यात येते. गैरअर्जदार यांनी धनादेश गहाळ झाल्याबद्दल पोलीसांकडे तक्रार केली असल्याचे म्हटले आहे. परंतू पुरावा म्हणून कोणतीही कागदपत्रे दाखल केलेली नाहीत. गैरअर्जदार यांनी आपल्या जवाबात अर्जदार हे त्यांचे कर्जदार असून त्यांच्याकडून कॅश क्रेडीट लिमिट घेतली असल्याचे म्हटले आहे. या कॅश क्रेडीट पोटी गैरअर्जदार हे नियमाप्रमाणे व्याज देखील आकारीत आहेत. अर्जदाराच्या खात्यात मुदतीत सदरील धनादेशाची रक्कम जमा करण्यात न आल्यामुळे अर्जदाराचे आर्थिक नुकसान झालेले आहे हे अप्रत्यक्षपणे गैरअर्जदार यांनी देखील मान्य केले आहे.
वरील सर्व निरीक्षणावरुन गैरअर्जदार यांनी सदरील धनादेश त्यांच्याकडून गहाळ झालेला असल्यामुळे ती रक्कम अर्जदाराच्या खात्यात एक महिन्यानंतर जमा करणे अपेक्षित होते. अर्जदाराची तक्रार मान्य करण्यत येते.
आदेश
- गैरअर्जदार क्रमांक 1 यांनी अर्जदाराच्या खात्यात 66,500/- रुपये 30 दिवसात जमा करावे.
- गैरअर्जदार क्रमांक 1 यांनी अर्जदारास 66,500/- रुपयावर 18.04.2010 ते प्रत्यक्ष रक्कम जमा करे पर्यंत 9 टक्के दराने व्याज द्यावे.
- गैरअर्जदार क्रमांक 1 यांनी अर्जदारास मानसिक त्रास व खर्चाबद्दल रुपये 2,500/- 30 दिवसात द्यावे.