जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,नांदेड. प्रकरण क्रमांक :- 2010/100 प्रकरण दाखल तारीख - 30/03/2010 प्रकरण निकाल तारीख – 20/07/2010 समक्ष – मा.श्री. बी.टी.नरवाडे, पाटील - अध्यक्ष मा.श्रीमती सुवर्णा देशमूख, पिंगळीकर - सदस्या. मा.श्री. सतीश सामते, - सदस्य. मूखतारसिंग पि. गुरुबक्शसिंग रंधावा वय सज्ञान वर्षे, धंदा व्यापार रा.बडपूरा,गूरुद्वारा,नांदेड. अर्जदार विरुध्द बजाज अलायंन्स जनरल इंन्शूरन्स कंपनी लि. मार्फत शाखाधिकारी, शाखा जी.ई.प्लाझा गैरअर्जदार एअरपोर्ट रोड, येरवडा, पुणे, स्थानिक शाखा नांदेड. अर्जदारां तर्फे वकील - अड.जे.एस.वाघमारे गैरअर्जदारा तर्फे वकील - अड.जी.एस.औढेंकर. निकालपञ (द्वारा - मा.श्रीमती सुवर्णा देशमूख, सदस्या ) अर्जदाराचा ट्रक दि.20.08.2009 रोजीचे राञी 11 वाजण्याचे सूमारास नागापूर पाटीजवळ लाल रंगाचे टिप्पर सोबत अपघात झाला परंतु आजपर्यत गैरअर्जदार यांनी अर्जदाराच्या विम्याची रक्क्म दिली नाही. म्हणून अर्जदाराने सदरील तक्रार दाखल केली आहे. अर्जदाराची थोडक्यात तक्रार अशी की, ट्रक नंबर एम.एच./26/एच-7439 हा दि.20.08.2009 रोजीचे राञी 11 वाजण्याचे सूमारास मूदखेड येथे माल पोहचवून मूदखेड ते शिकार घाट मार्गी येत असताना त्यांचा ट्रक नागापूर पाटी जवळ आला असता अर्जदार यांच्या ड्रायव्हरने एक लाल रंगाचे टीपर जात असताना पाहिले. ते टिप्पर अचानकपणे कोणतेही इंडीकेशन न दाखवता रस्त्याचे मधोमध पूढे जाऊन थांबले म्हणून ड्रायव्हरने अपघात टाळण्यासाठी ट्रक रस्त्याचे बाजूला घेत असताना सदरील टिप्परचा पाठी मागील भाग अर्जदाराच्या ट्रकला लागून अर्जदाराचा ट्रक पलटी झाला. या अपघातासंबंधी अर्जदाराने पोलिस स्टेशनला कळवले व पोलिसांनी घटनास्थळला भेट देऊन घटनास्थळ पंचनामा करुन अपघाताची नोंद केली. सदरील ट्रकवर अर्जदाराने विमा उतरविला होता. त्यांची पॉलिसी नंबर ओ-जी-09-9995-1803-00166514 असा असून सदरील ट्रकचा रु.12,00,000/- चा विमा दि.2.2.2.2009 ते 21.02.2010 पर्यतचा उतरविला होता. सदरील ट्रकचा अपघात पॉलिसी कालावधीमध्ये झालेला होता. अर्जदाराने सदरील घटना अर्जाद्वारे गैरअर्जदार यांना कळविली व त्यांचे सांगणेवरुन वाहन दूरुस्तीसाठी मोटार गॅरेजमध्ये पाठविले. वाहन दूरुस्तीसाठी गॅरेजमध्ये गेले असता तेथील मॅकेनिकने अर्जदारास वाहनाच्या दूरुस्तीसाठी काही पार्टस बददलची किंमत रु.1,28,000/- एवढी होती असे सांगितले व ट्रक दूरुस्त केला. या खर्चाच्या सर्व पावत्या अर्जदाराने मंचासमोर दाखल केलेल्या आहेत. सदरील पावत्या अर्जदाराने गैरअर्जदारास पण दिलेल्या आहेत. आजपर्यत कोणतीही विमा रक्कम गैरअर्जदार यांनी आश्वासन देऊनही न दिल्यामूळे अर्जदारास रोजचे जीवन जगणे कठीण जात आहे. म्हणून अर्जदाराने गैरअर्जदाराकडून ट्रकची नूकसान झाल्याबददल आर्थीक शारीरिक व मानसिक नूकसान भरपाई म्हणून रक्कम रु.2,50,000/- 12 टक्के व्याजदराने मिळावेत अशी मागणी केली आहे. गैरअर्जदार हे वकिलामार्फत हजर झाले व त्यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केलेले आहे. त्यांचे म्हणण्याप्रमाणे अर्जदाराची तक्रार ही प्रिमॅच्यूअर असून त्यांनी कोणत्याही प्रकारची सेवेत ञूटी केलेली नाही. अर्जदार हे त्यांचे ग्राहक आहेत व त्यांनी त्यांचेकडे पॉलिसी काढली आहे. या मताशी ते सहमत आहेत. अर्जदाराने दाखल केलेल्या पावत्या हया बोगस असून त्या सर्व त्यांनी नाकारलेल्या आहेत. म्हणून अर्जदाराचा तक्रार अर्ज गैरअर्जदार यांना कॉस्ट देऊन रदद करण्यात यावा अशी मागणी केली आहे. अर्जदार यांनी पूरावा म्हणून आपले शपथपञ, तसेच गैरअर्जदार यांनी पूरावा म्हणून आपआपले शपथपञ दाखल केलेले आहे. दोन्ही पक्षकारानी दाखल केलेले दस्ताऐवज बारकाईने तपासून व पक्षकारांचा युक्तीवाद ऐकून खालील मूददे उपस्थित होतात. मूददे उत्तर 1. अर्जदार हे ग्राहक आहेत काय ? होय. 2. अर्जदार यांनी मागणी केलेली नूकसान भरपाई रक्कम देण्यास गैरअर्जदार बांधीत आहेत काय ? अंशतः 3. काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे. कारणे मूददा क्र. 1 व 2 ः- अर्जदार यांनी अपघातग्रस्त ट्रकची पॉलिसी गैरअर्जदार यांचेकडे उतरविली होती. या बददल उभयपक्षात वाद नाही म्हणून मूददा क्र.1 चे उत्तर सकारात्मक देण्यात येत आहे. अर्जदाराचा ट्रक राञी 11 वाजण्याच्या सूमारास लाल रंगाचे टिप्पर सोबत अपघात झाला त्या बददलचे पोलिस पेपर अर्जदाराने मंचासमोर दाखल केलेले आहेत. अर्जदाराचे हे म्हणणे बरोबर वाटते की, आजपर्यत गैरअर्जदार यांनी त्यांचा क्लेम सेटल करण्यासाठी कोणतीही कारवाई केली नाही. उलटपक्षी गैरअर्जदार असे म्हणतात की अर्जदाराची तक्रार ही प्रिमॅच्यूअर आहे. त्यांचे म्हणण्याप्रमाणे अर्जदाराने दाखल केलेले रु.1,28,000/- चे बिले हे बोगस असून त्या बिलावर सेल टॅक्स नंबर व व्हॅट नंबर नाहीत. अर्जदाराने कथन केलेली अपघाताची घटना ही अपघात झाल्या सारखी वाटत नाही. गैरअर्जदार यांचेकडे जेव्हा अर्जदारांनी विमा अपघात रक्कम क्लेम दाखल केला त्यावेळी गैरअर्जदार यांनी अर्जदारास एक पञ दिले व तूमचा क्लेम रिप्यूडेऐटेड का करु नये ? यांचे उत्तर मागितले परंतु सदरील पञास अर्जदार यांनी उत्तर दिले नाही. खरे पाहता गैरअर्जदार यांचे हे म्हणणे तितकेसे बरोबर वाटत नाही. कारण अर्जदाराची पॉलिसी ही गैरअर्जदार यांचेकडे उतरविलेली होती व त्यानुसार त्यांना क्लेम मागण्याचा अधिकार होता. त्यासाठी क्लेम मागणा-या व्यक्तीस तूमचा क्लेम रिप्यूटेऐटेड का करु नये असे पञ पाठवणे योग्य वाटत नाही. गैरअर्जदार यांनी आक्षेप केल्याप्रमाणे सेल्स टॅक्स पावती व व्हॅट पावती या गोष्टी अगदी छोटया व्यापार करणा-या व्यापा-यां कडे या पावत्या नसतात. कारण एवढया प्रकारची त्यांची उलाढाल नसते. दि.21.08.2009 पासून आजपर्यत क्लेम सेटल करण्यासाठी गैरअर्जदार यांनी कोणतीही कारवाई केलेली नाही. अपघातग्रस्त ट्रकची तपासणी करण्यासाठी सर्व्हेअर नेमण्यात आले व त्यांनी रिपोर्ट दिला व त्यानुसार रु.87,710/- चे नूकसान अर्जदाराच्या ट्रकचे झाले. त्यामूळे एवढा पूरावा हातात येऊन गैरअर्जदार विमा कंपनी यांनी अर्जदार यांना क्लेम का मान्य केला नाही असा प्रश्न मंचासमोर उभा आहे. गैरअर्जदार यांनी दाखल केलेले सायटेशन Ravneet Singh Bagga Vs KLM Royal Dutch Airliens (2000) 1 SCC 66 यामध्ये सूप्रिम कोर्ट यांनी असे स्पष्ट केले आहे की, The test of deficiency in service by stating that The deficiency in service can not be alleged without attributing fault, imperfection, shortcoming or inadequancy in the quality nature and manner of performance which is required to be performed by a person in pursuance of contract or otherwise in relation to any service. The burden of proving the deficiency in service is upon the person who alleges it. गैरअर्जदार यांनी दाखल केलेले सायटेशनमध्ये ज्या गोष्टीचे वर्णन केले आहे त्यामध्ये क्लेम सेटल न करणे हे कोणत्याही हेड मध्ये बसत नाही.अर्जदाराचा क्लेम सेटल न करुन गैरअर्जदार यांनी सेवेत ञूटी केली आहे. सर्व्हेअरच्या रिपोर्ट प्रमाणे विचार केला असता रु.87,710/- एवढे नूकसान अर्जदाराचे झालेले आहे. म्हणुन त्यांस गैरअर्जदार यांनी रु.87,710/- व त्यावर दि.20.11.2009 पासून 9 टकके व्याज दराने रककम दयावी व दावा खर्च म्हणून रु.2000/- दयावेत, संपूर्ण रक्कम एक महिन्याचे आंत दयावी, रक्कम न दिल्यास संपूर्ण रक्कम मिळेपर्यत सर्व रक्कमेवर 12 टक्के व्याज दयावे लागेल. आदेश 1. अर्जदाराचा तक्रार अर्ज अंशत मंजुर करण्यात येतो. 2. गैरअर्जदार यांनी अर्जदारास रक्कम रु.87,710/- द्यावे सदर रक्कमेवर दि.20/11/2009 पासुन 9 टक्के व्याज द्यावे. सदरील रक्कम एक महिन्याचे आंत न दिल्यास सदर रक्कमेवर रक्कम फिटेपर्यत 12 टक्के व्याज द्यावे लागेल. 3. गैरअर्जदार यांनी अर्जदारास दावा खर्च म्हणुन रु.2,000/-दयावेत. 4. उभयपक्षांना निकाल कळविण्यात यावा. श्री.बी.टी.नरवाडे पाटील श्रीमती सुवर्णा देशमूख श्री. सतीश सामते अध्यक्ष सदस्या सदस्य जयंत पारवेकर लघूलेखक. |