निकालपत्र
तक्रार दाखल दिनांकः- 22/02/2012
तक्रार नोदणी दिनांकः- 02/03/2012
तक्रार निकाल दिनांकः- 15/05/2013
कालावधी 01 वर्ष 02 महिना 13 दिवस
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी
अध्यक्ष श्री.पी.पी.निटूरकर.B.Com.LL.B.
सदस्य
श्री.आर.एच.बिलोलीकर.B.Tech, MBA, DCM, LLB.
------------------------------------------------------------------------------------------------------------
अब्दुल अजीज पिता.अब्दुल हमीद. अर्जदार
वय 56 वर्षे. धंदा.मजुरी. अड.इम्तीयाज खान.
रा.फुलारी बिल्डींग जवळ,धाररोड,परभणी.ता.जि.परभणी.
विरुध्द
शाखा व्यवस्थापक. गैरअर्जदार.
आन्ध्रा बँक शाखा,शिवाजी रोड,नानलपेठ,परभणी. अड.एस.जी.देशपांडे.
------------------------------------------------------------------------------------
कोरम - 1) श्री.पी.पी.निटूरकर. अध्यक्ष.
2) श्री.आर.एच.बिलोलीकर सदस्य.
(निकालपत्र पारित व्दारा.श्री.पी.पी.निटुरकर.अध्यक्ष)
गैरअर्जदारांनी दिलेल्या त्रुटीच्या सेवेबद्दल अर्जदाराने ही तक्रार दाखल केलेली आहे.
अर्जदाराच्या तक्रारीची थोडक्यात हकीकत खालील प्रमाणे. अर्जदार हा परभणी येथील रहिवासी असून तो मोलमजुरी करुन स्वतःचे व स्वतःच्या कुटूंबाचा उतरनिर्वाह करतो. अर्जदाराचे सुमारे 20 वर्षां पासून गैरअर्जदार बँकेत बचत खाते असून व बँकेशी व्यवहार होते,त्यांने संचित केलेली बचत सदरील बँके खात्यात त्याच्या व त्याच्या मुलांबाळाचे उज्वल भविष्यासाठी पैसे जमा करतो. अर्जदाराचे गैरअर्जदार बँकेत बचत खाते असून त्या खात्याचा क्रमांक SB041510011004589 हा आहे.अर्जदाराचे हे म्हणणे आहे की, अंदाजे दोन, तीन महिन्यापूर्वी म्हणजेच ऑक्टोबर 2011 मध्ये त्याच्या स्वतःच्या सदरील खात्यामध्ये 50,000/- रोख जमा केले होते व त्याबाबत गैरअर्जदार बँकेने पोच पावती दिली होती, परंतु अर्जदाराचे असे म्हणणे आहे की, सदरील पावती गहाळ झाल्या कारणाने ती मंचासमोर दाखल करण्यास अर्जदार सक्षम नाही. अर्जदाराचे असे म्हणणे आहे की, सदरील रक्कम गैरअर्जदाराकडे जमा केल्यानंतर गैरअर्जदार बँकेने अर्जदारास बँक पासबुका मध्ये सदरील रक्कम भरण्याची नोंद करुन दिली नाही, त्यामुळे गर्दी जास्त असल्या कारणाने अर्जदार हा शेवटी घरी परतला आणि नंतर नोंद घेवु असे म्हणून बँकेतून निघून गेला.अर्जदाराचे हे म्हणणे आहे की, दिनांक 09/12/2011 रोजी बँकेत जावुन गैरअर्जदारकडे सदरील पासबुक मध्ये भरलेल्या रक्कमे बाबत नोंदी घेतल्या असता अर्जदाराचे त्यावेळेस असे लक्षात आले की, ऑक्टोबर महिन्यात ऑक्टोबर 2011 मध्ये अर्जदाराने जमा केलेल्या 50,000/- ची नोंद त्याच्या पासबुक मध्ये आली नव्हती, म्हणून अर्जदाराने गैरअर्जदारास सदरील बाब लक्षात आणून दिली व त्याचा पाठपुरावा केला असता गैरअर्जदाराने अर्जदाराचे काही एक ऐकले नाही व उडवाउडवीची उत्तरे दिली त्यानंतर गैरअर्जदाराने सदरील बाबीकडे दुर्लक्ष केल्यामुळे 15/12/2011 रोजी रजिस्टर पोस्टाव्दारे अर्जदाराने गैरअर्जदाराला लेखी तक्रार पाठविली, परंतु गैरअर्जदाराने कोणत्याही प्रकारची ठोस कार्यवाही केली नाही व अर्जदाराच्या खात्यात 50,000/- जमा केले नाही,म्हणून अर्जदाराने गैरअर्जदाराच्या वरिष्ठांना म्हणजेच महाव्यवस्थापक साहेब प्रधान कार्यालय, व शाखा व्यवस्थापक यांना वेळोवेळी आर.पी.ए.डी. व्दारे पत्रव्यवहार केला, परंतु त्याचा काही एक उपयोग झाला नाही, त्यामुळे अर्जदारास मानसिक व शारिरीकत्रास दिला व गैरअर्जदाराने अर्जदाराची रोख रक्कम 50,000/- रुपये त्याच्या बचत खात्यात जमा करण्यास टाळाटाळ केली. अर्जदाराचे हे म्हणणे आहे की, गैरअर्जदाराचे चुकीच्या सेवा दिल्याबद्दल अर्जदारास 50,000/- चे नुकसान झाले व त्यामुळे अर्जदाराने सदरील तक्रार मंचासमोर दाखल करुन मंचास विनंती केली आहे की, गैरअर्जदाराकडून त्याची रोख रक्कम 50,000/- अर्जदाराच्या खात्यात जमा करण्याचा आदेश व्हावा, व तसेच निष्काळजीपणाची सेवा दिल्याबद्दल 5,000/- व तक्रारीचा खर्च म्हणून रु.5,000/- गैरअर्जदाराकडून देण्यात येण्याचा आदेश व्हावा. अशी मंचास विनंती केली आहे.
तक्रार अर्जाच्या पुष्टयर्थ अर्जदाराने नि.क्रमांक 2 वर त्याचे शपथपत्र दाखल केले आहे. नि.क्रमांक 6 वर एकुण 6 कागदपत्रांच्या यादीसह झेरॉक्स प्रती दाखल केलेल्या आहेत. त्यामध्ये नि.6/1 वर अर्जदाराने गैरअर्जदारास लिहिलेला तक्रार अर्ज
(15/12/2011) तसेच 6/3 वर अर्जदाराने महाव्यवस्थापक मुंबई यांना लिहिलेला तक्रार अर्ज इ.कागदपत्रे दाखल केलेली आहेत.
तक्रार अर्जावर लेखी म्हणणे सादर करण्यासाठी गैरअर्जदारास प्रकरणामध्ये मंचातर्फे नोटीसा पाठविण्यात आल्यानंतर गैरअर्जदार मंचासमोर हजर होवुन नि.क्रमांक 14 वर त्यांनी आपले लेखी म्हणणे सादर केलेले आहे. गैरअर्जदाराचे असे म्हणणे आहे की, सदरची तक्रार ही खोटी व बनावटी आहे, म्हणून ती खारीज होणे योग्य आहे, व तसेच त्यांचे असे म्हणणे आहे की, अर्जदाराने गैरअर्जदाराकडे ऑक्टोबर महिन्यात 50,000/- रुपये केव्हाही रक्कम त्याच्या खात्यात जमा केलेली नाही व त्याबाबत गैरअर्जदार बँकेने 50,000/- रुपये जमा केल्या बाबतची स्लीप दाखवण्या संबंधी अर्जदारास विनंती केली होती, परंतु ती अर्जदाराने मान्य केली नाही व तसेच त्याचे हे म्हणणे खोटे आहे की, 50,000/- रुपये रक्कम त्याच्या खात्यात त्याने जमा केली होती, त्यामुळे गैरअर्जदार बँकेने अर्जदाराच्या खात्यात पासबुकावर 50,000/- रुपयांची नोंद घेतलेली नाही व त्याबाबत अर्जदाराने मंचासमोर कोणताही पुरावा आणलेला नाही वा दाखल केलेला नाही म्हणून मंचास विनंती केली आहे की, सदरची तक्रार खारीज करण्यात यावी व तसेच गैरअर्जदारांनी अतिरिक्त म्हणच्या सदरा खाली हे म्हणले आहे की,बँकेच्या नियमा प्रमाणे एखादी अतिरिक्त रक्कम बँकेच्या व्यवहारात नोंद न घेता आढळल्यास सदरील रक्कम सस्पेंस अकाऊंट आणि एक्स्ट्रा अनक्लेमड् या सदराखाली गैरअर्जदार बँक हे सेंट्रल ऑफिसकडे कळविते व सदरच्या प्रकरणा मध्ये 50,000/- रुपये अतिरिक्त वा कोणत्याही नोंदी शिवाय आढळून आलीच नाही, त्यामुळे अर्जदाराचे म्हणणे एकदम खोटे व साफ चुकीचे आहे. म्हणून 15,000/- आकारुन अर्जदाराची तक्रार खारीज करावी अशी मंचास विनंती केली आहे.
गैरअर्जदाराने आपल्या लेखी म्हणण्याच्या पुष्टयर्थ नि.क्रमांक 15 वर आपले शपथपत्र दाखल केलेले आहे.
दोन्ही पक्षांच्या कैफियतीवरुन निर्णयासाठी उपस्थित होणारे मुद्दे खालील प्रमाणे.
मुद्दे उत्तर
1 गैरअर्जदार बँकेच्या सेवेत त्रुटी आहे काय ? नाही.
2 आदेश काय ? अंतिम आदेशा प्रमाणे.
कारणे
मुद्दा क्रमांक 1.
अर्जदाराने हे सिध्द केले आहे की, गैरअर्जदार बँकेकडे त्याचे बचत खाते आहे. कारण ही बाब बँकेने त्याच्या लेखी जबाबा मध्ये तो ग्राहक नाही असे कोठेही म्हणलेले नाही, अर्जदाराच्या म्हणण्यानुसार ऑक्टोबर 2011 मध्ये त्याने त्याच्या गैरअर्जदार बँकेच्या शाखेत असलेल्या बचत क्रमांक SB041510011004589 या खात्यामध्ये त्याने 50,000/- रुपये रोख जमा केल्या बाबतचा पुरावा अर्जदाराने दिलेला नसल्यामुळे ही बाब सिध्द करण्यासाठी अर्जदार पूर्णतः असमर्थ ठरला आहे व तसेच अर्जदाराने ऑक्टोबर असे मोघम तारीख सांगुन किती तारखेला पैसे जमा केले हे अर्जदाराने सांगीतले नाही व तसेच कागदोपत्री पुरावा सादर केला नाही, व सिध्द ही केलेले नाही व तसेच रोख रक्कम 50,000/-रुपये गैरअर्जदाराकडे भरल्या बाबतचा कोणताही सबळ पुरावा अर्जदाराने मंचासमोर आणला नसल्यामुळे अर्जदार पुर्णतः त्याची तक्रार सिध्द करण्यास असमर्थ ठरला आहे व तसेच गैरअर्जदार बँकेने अर्जदारास दिनांक 26/12/011 रोजी एका पत्राव्दारे कळविले होते की, सदरील 50,000/- रुपये जमा केल्या बाबतचा पुरावा बँकेकडे सादर करावा व त्याची पावती बँकेकडे सादर करावी,असे कळविले होते, सदरचे पत्र नि. क्रमांक 6,7 वर दाखल केलेले आहे, परंतु एवढे करुनही अर्जदाराने बँकेकडे कोणत्याही प्रकारचा पुरावा सादर न केल्यामुळे गैरअर्जदार बँकेने कोणत्याही प्रकारची त्रुटीची सेवा दिलेली नाही. हे सिध्द होते.व तसेच अर्जदाराने त्याने दाखल केलेल्या शपथपत्रा मध्ये नि.क्रमांक 2 रु.50,000/- बँकेकडे भरल्या बाबतचा ठोस वक्तव्य त्याने शपथपत्रात केलेले नाही.म्हणून गैरअर्जदार बँकेने अर्जदारास कोणत्याही प्रकारची चुकीची सेवा दिलेली नाही. म्हणून मंच मुद्दा क्रमांक 1 चे उत्तर नकारार्थी देवुन खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आ दे श
1 अर्जदाराचा तक्रार अर्ज फेटाळण्यात येत आहे.
2 दाव्याचा खर्च ज्याचा त्यांनी सोसावा.
3 पक्षकाराना आदेशाच्या प्रती मोफत पुरवाव्यात.
श्री.आर.एच.बिलोलीकर. श्री. पी.पी.निटूरकर
मा.सदस्य मा.अध्यक्ष