जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, लातूर
ग्राहक तक्रार क्रमांक : 85/2011 दाखल तारीख :20/04/2011
निकाल तारीख : 11/02/2015
कालावधी : 03 वर्षे 09 म.21 दिवस
1) वसंत रामराव बादाडे,
वय 60 वर्षे, धंदा शेती,
2) सौ. विमल वसंतराव बादाडे,
वय 55 वर्षे, धंदा शेती,
रा. संत गोरा कुंभार चौक,
हत्ते नगर, रोड नं.1 लातूर,
ता. जि. लातूर. ...तक्रारदार.
-विरुध्द-
1) शाखाधिकारी,
लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी,
बँक, औसा, ता. औसा, जि. लातूर.
2) व्यवसाय,
लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी
बँक नगर परिषदे समोर,
टिळक नगर, लातूर, ता.जि. लातूर. ..... गैरअर्जदार
कोरम : 1) श्रीमती ए.जी.सातपुते, अध्यक्षा.
2) श्री.अजय भोसरेकर, सदस्य
3) श्रीमती रेखा जाधव, सदस्या.
तक्रारदारातर्फे : अॅड.एस.एस.दापके.
गै.अ.क्र.1 व 2 तर्फे : अॅड. के.एन.देशपांडे.
::: निकालपत्र :::
(घोषित द्वारा: श्रीमती ए.जी.सातपुते, मा.अध्यक्षा.)
तक्रारदाराने सदर तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 अंतर्गत गैरअर्जदारा विरुध्द दाखल केली आहे. तक्रारदाराची तक्रार थोडक्यात अशी की,
अर्जदार हा लातूर येथील रहिवाशी असून, अर्जदार हे मौजे औसा येथे जमीन गट नं 310 पैकी 2 हे. 27 आर चे मालक असून त्यांचा शेती हा प्रमुख व्यवसाय आहे व शेती करुन आपली उपजिवीका भागवितात. अर्जदाराने गैरअर्जदार क्र. 1 कडे ठरवुन दिलेल्या बँकेकडे औसा येथील सर्व शेतक-यांनी पिक विमा भरण्यास संपुर्ण पिक विम्याची रक्कमा व प्रपोजन फॉर्म हे गैरअर्जदार क्र. 1 यांचेकडे पाठविले जातात. जर दुर्दैवाने लातुर जिल्हयात शेतक-यांना निसर्गाने साथ नाही दिल्यास म्हणजेच ओला कोरडा दुष्काळ पडल्यास तहसील मार्फत त्या त्या क्षेत्रातील त्या त्या पिकाची आणेवारी काढून गैरअर्जदार क्र. 1 यांचेकडे पाठविल्यानंतर प्रती हेक्टरी शेतक-यांना भरलेल्या पिक विम्याच्या प्रमाणात पिक विम्याद्वारे मिळणारी रक्कम नोडल बँकेकडे पाठवुन देतात. त्यानंतर नोडल बँक शेतक-यांना त्यांनी पिक विमा भरलेल्या प्रमाणात पिक विम्याची रक्कम देतात.
अर्जदार शेतकरी असल्याने त्यांनी सान सन 2009-10 या खरीप हंगामासाठी दि; 30.07.2009 रोजी पिक विमा रक्कम रु. 2854/- गैरअर्जदार क्र. 1 यांचेकडे भरलेली आहे. तसेच ही रक्कम भरत असतांना नियमानुसार आवश्यक असणा-या सर्व कागदपत्रांची पुर्तता ही अर्जदारांनी केली व गैरअर्जदार क्र. 1 यांनी सर्व कागदपत्र स्विकृत करुन पिक विम्यापोटी रु. 2854/- एवढी रक्कम मिळाले बाबत दि.30.07.2009 रोजी बॅकेच्या चलनद्वारे बँकेच्या शिक्क्यानिशी व कॅशिअरच्या सहीनिशी रक्कम मिळाले बाबतची पावती अर्जदारास दिली.
अर्जदाराने सन 2009-10 या खरीप हंगामासाठी त्यांचेशेतीमध्ये संपुर्ण क्षेत्रामध्ये सोयाबीन हे पिक घेतले होते व सोयाबीन या पिकाच्या विम्यासाठी रक्कम रु; 2854/- गैरअर्जदार क्र. 1 यांचे बँकेत भरणा केलेला आहे. विमा कंपनीने सन 2009-10 या साली खरीप पिकासाठी विशेषत: सोयाबीन पिकाचे नुकसानीसाठी रु. 40,000/- औसा तालुक्यात पाऊस कमी पडल्यामुळे जाहीर केले आहे.
औसा तालुक्यामध्ये ज्या ज्या शेतक-यांनी पिक विमा भरला त्यांना नियमानुसार पिक विमा वाटप गैरअर्जदार क्र. 1 ने केलेले आहे पण अर्जदाराने पिक विमा भरुन अर्जदाराला पिक विम्याचे वाटप बॅंकेने /गैरअर्जदाराने केलेले नाही. जेंव्हा अर्जदाराने गैरअर्जदार क्र.1 कडे पिक विमा बाबत विचारणा केली तेंव्हा गैरअर्जदार क्र. 1 असे तोंडी सांगितले की, तुमचे यादीमध्ये नाव नाही. त्यानंतर अर्जदाराने बॅंकेने दिलेली चलन दाखविले व आम्ही पिक विमा भरलेला आहे व आम्हाला पिक विमा नुकसान भरपाई का मिळत नाही याबाबत विचारण केली असता गैरअर्जदार क्र. 1 यांनी अर्जदारास उडवाउडवीची उत्तरे दिली.
गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांना कायदेशीर नोटीस पाठविली. दोन्ही गैरअर्जदार यांना अनुक्रमे 08/12/2010 व 07/12/2010 रोजी नोटीस तामील झाल्या तरीही गैरअर्जदार यांनी अर्जदाराला नुकसान भरपाई दिलेली नाही किंवा नोटीसचे उत्तरही दिलेले नाही.
शासनाने व विमा कंपनीने जाहीर केलेल्या योजनेत अर्जदाराने रक्कम फ. 2854/- सोयाबीन पिकासाठी सन 2009-10 या खरीप हंगामासाठी त्यांची औसा येथील जमिन गट नं.310 मधील क्षेत्र 2 हे 27 आर बाबत पिक विमा योजनेसाठी गैरअर्जदार क्र. 1 यांच्याकडे दिनांक 30.07.2009 रोजी जमा केले आहे. अर्जदार हा पिक विमा मिळण्यास पात्र असताना सुध्दा बँकेच्या हलगर्जीपणामुळे पिक विमा अर्जदारास अदयाप मिळालेला नाही. म्हणुन गैरअर्जदाराने सेवेत त्रूटी केली असल्यामुळे, गैरअर्जदार क्र 1 व 2 यांनी संयुक्तीकरित्या अर्जदारास सोयाबीन पिकाचे विम्यापोटी रु. 40,000/- अथवा नियमानुसार मिळणारी नुकसान भरपाईची रक्कम दि. 30.07.2009 पासुन 15 टक्के व्याजासह देण्याचा आदेश करावा, मानिसक व शारिरीक त्रासापोटी रु. 10,000/- व तक्रारीचे खर्चापोटी रु. 5000/- देण्याचा आदेश व्हावा, अशी मागणी केली आहे.
गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांच्या म्हणण्या नुसार, अर्जदाराने पिक विम्याच्या पोटी रु. 2854/- गैरअर्जदार क्र. 1व 2 यांच्याकडे भरले होते हे चुकीचे आहे. तसेच अर्जदाराने 2009-2010 या खरीप हंगामासाठी सोयाबीनचे पीक घेतले होते हे म्हणणे देखील चुकीचे आहे. तसेच अर्जदाराने दि. 30.07.2009 रोजी त्याच्या गट क्र. 310 मध्ये 3 हे.27 आर जमीनीसाठी त्याने गैरअर्जदाराकडे विम्यापोटी रु. 2854/- भरले होते, ही गोष्ट असत्य आहे. परंतु गैरअर्जदार क्र 1 ने 600 शेतक-यांच्या नावे पीक विमा 2009-2010 सालासाठी दि. 30.07.2009 रोजी भरलेलो आहे व तो खरीज हंगामासाठीच भरला त्याचा हप्ता रु. 2854/- असा होता. तसेच अर्जदाराचे नावे त्या शेतक-याच्या यादीमध्ये नाही. म्हणुन गैरअर्जदार अर्जदाराच्या सेवेत कोणतीच त्रूटी केलेली नाही. तसेच अर्जदार हे गैरअर्जदाराचे ग्राहक नाहीत, त्यामुळे सदरच्या मंचास कार्यक्षेत्र येत नाही.
मुद्दे उत्तर
- अर्जदार हा गैरअर्जदाराचा ग्राहक आहे काय ? होय.
- गैरअर्जदाराने अर्जदाराच्या सेवेत त्रूटी केली आहे काय ? होय
- अर्जदार अनुतोष मिळण्यास पात्र आहे काय ? होय .
- काय आदेश ? अंतिम आदेशा प्रमाणे
मुद्दा क्र. 1 चे उत्तर होय असून, अर्जदार हा गैरअर्जदार यांचा ग्राहक आहे. त्याच्यानावे दि. 30.07.2009 रोजी रु. 2854/- ची रशीद गैरअर्जदार बँकेची असल्यामुळे तो ग्राहक आहे हे सिध्द होते.
मुद्दा क्र.2 चे उत्तर होय असून, अर्जदाराच्या सेवेत गैरअर्जदाराने त्रूटी केलेली आहे. गैरअर्जदार बँकेने 600 जाणांची जी यादी न्यायमंचात दाखल केलेली आहे, त्या यादीवरुन 200 लोकांच्या नावाचा बोधच होत नाही. त्यामुळे पीक विमा रक्कम अर्जदाराच्या नावे नाही हे म्हणणे हे न्यायमंचास पटत नाही. यादीमध्ये सुरुवातीचे नाव आहे तर आडनाव नाही. अशी यादी न्यायमंचात गैरअर्जदार क्र. 1 व 2 या बँकेने दाखल केलेली आहे. यावरुन अर्जदार हा त्या बँकेचा पीक विम्याचा लाभधारक आहे किंवा नाही हे स्पष्ट होत नाही. मात्र अर्जदाराजवळ जो गैरअर्जदार क्र. 1 व 2 च्या दि. 30.07.2009 ची जी पावती दिलेली आहे ती स्पष्ट मुळ पाहुन घेतलेली आहे, यावरुन तो गैरअर्जदार क्र. 1 व 2 चा ग्राहक होतो व लाभधारक ही होतो. कारण त्याने आपल्या हक्कात पावती सदर बँकेची दाखल केलेली आहे. इतर कागदपत्रे खाते उतारा दिनांक 11.10.2011 रोजीचा या न्यायमंचात दाखल केलेला आहे. त्यावर गट क्र्. 310 हेकटर 2.27 आर आकार 4.22 असे नमुद आहे. तसेच सात बारा देखील दाखल आहे. यावरुन अर्जदार हा स्वच्छ हाताने आलेला असून त्याने खरोखरच आपल्या शेतात झालेल्या नुकसान भरपाईची रक्कम मागत आहे. तसेच गैरअर्जदाराने अर्जदाराचे 600 ची यादी मध्ये नाव नसल्यामुळे आम्ही त्यांना सोयाबीनचे पैसे देण्यास पात्र नाही कारण तो आमचा ग्राहक नाही, कारण त्याचे बियाणे बाबतचा विमा काढलेला नाही. असे म्हणणे या न्यायमंचास पटत नाही. कारण बँकेने दिलेली यादीत कोणचे ही नाव स्पष्ट होत नाही, तसेच अर्जदाराच्या पावती वरुन त्याने रु. 2854/- दि 30.07.2009 रोजी काढल्याचे स्पष्ट होते म्हणुन हे न्यायमंच गैरअर्जदार क्र.1व 2 यांना आदेश पारित करत आहे की, सोयाबीन चे रु. 2854/- दि.30/07/2009 पासुन 9 टक्के व्याजासह दयावेत, तसेच शारिरीक व मानसिक त्रासापोटी रु. 5000/- व दाव्याच्या खर्च रु. 3000/- देण्यात यावा.
सबब न्यायमंच खालील प्रमाणे आदेश पारित करीत आहे.
आदेश
- तक्रारदाराची तक्रार अंशत: मंजुर करण्यात येत आहे.
- गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांनी तक्रारदारास रक्कम रु. 2854/- दि.30/07/2009 पासुन द.सा.द.शे. 9 टक्के व्याजासह, आदेश प्राप्ती पासुन 30 दिवसाचे आत दयावेत.
- गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी आदेश क्र. 2 चे पालन मुदतीत न केल्यास त्यावर तक्रार दाखल तारखेपासुन द.सा.द.शे. 9 टक्के व्याज देणे बंधनकारक राहील.
- गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांनी तक्रारदारास मानसिक व शारिरीक त्रासापोटी रक्कम रु. 5000/- व दाव्याच्या खर्चापोटी रु. 3000/- आदेश प्राप्ती पासुन 30 दिवसाचे आत दयावेत.
स्वा/- स्वा/- स्वा/-
(अजय भोसरेकर) (श्रीमती ए.जी.सातपुते) (श्रीमती रेखा जाधव)
सदस्य अध्यक्षा सदस्या
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच लातूर.
**//राजूरकर//**