जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच लातूर यांचे समोर
ग्राहक तक्रार क्रमांक – 50/2012 तक्रार दाखल तारीख – 20/03/2012
निकाल तारीख - 12/05/2015
कालावधी - 03 वर्ष , 01 म. 22 दिवस.
पंडीत एकनाथराव कवडेकर,
वय – 45 वर्षे, धंदा – मजुरी,
रा.विकास नगर, लातुर. ....अर्जदार
विरुध्द
- शाखा व्यवस्थापक,
इंडसइंड बँक लि. चवंडा कॉम्प्लेक्स,
राजीव गांधी चौक, लातुर.
- मुख्य व्यवस्थापक,
इंडसइंड बँक लि.
जुना क्र. 115 व 116
नवीन क्र. 34, जी.एन.चेट्टी रोड,
टी नगर चैन्नई-600017. ..गैरअर्जदार
को र म - श्रीमती ए.जी.सातपुते, अध्यक्षा.
श्री अजय भोसरेकर, सदस्य
श्रीमती रेखा जाधव, सदस्या.
तक्रारदारातर्फे :- अॅड. व्ही.व्ही.जाधव.
गैरअर्जदारातर्फे :- अॅड. एस.टी.चव्हाण.
निकालपत्र
(घोषितव्दारा – श्रीमती रेखा जाधव,मा.सदस्या )
अर्जदार यांनी प्रस्तुतची तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 प्रमाणे गैरअर्जदारा विरुध्द दाखल केली आहे.
अर्जदाराने सन-2010 साली हिरोहोंडा कंपनीची मोटार सायकल मॉडेल पॅशन एम.एच. 24 यु- 9239 रक्कम रु. 45,300/- घेतली. अर्जदाराने डाऊन पेमेंट रु. 18,000/- दिले, व उर्वरित राहिलेली रक्कम रु. 27,300/- व पासिंग, विमा, टॅक्स यांची रक्कम रु. 5,790/- असे एकुण रु. 33,090/- चे कर्ज गैरअर्जदार क्र. 1 कडुन घेतले. त्यासाठी लागणारी प्रोसेस फीस रु. 1,000/- जमा केली. गैरअर्जदार क्र. 1 ने कोरे धनादेश व को-या कागदावर अर्जदारांच्या सहया घेतल्या सदर कर्जाची परतफेड 24 महिन्याची असून रक्कम रु. 1900/- इतका दरमहा हप्ता होता.
अर्जदाराने कर्जाची रक्कम दंडासह रु. 16,550/- गैरअर्जदार क्र. 1 कडे भरली. अर्जदाराने दोन हप्त्याची रक्कम वेळेवर भरली नाही. म्हणून गैरअर्जदाराने दि. 28/09/2011 रोजी अर्जदाराची गाडी जप्त केली. अर्जदार दुस-या दिवशी सदर रक्कम भरण्यासाठी गैरअर्जदार क्र. 1 यांचेकडे गेले असता, शाखा व्यवस्थापक बाहेरगावी गेल्यामुळे रक्कम भरुन घेतली नाही. अर्जदाराकडुन सदरची कर्ज थकीत रक्कम गैरअर्जदाराने वेळोवेळी वेगळे कारणे देवून भरुन घेतली नाही. अर्जदाराने दि. 02/01/2012 रोजी संपुर्ण हप्ते भरुन घ्यावे व गाडी परत देण्याची विनंती केली असता गैरअर्जदार क्र. 1 यांचे अधिकारी मुळे, व रवि सोनवणे यांनी सदरची गाडी विक्री केल्याचे सांगितले. अर्जदारास पुर्व कल्पना न देता गाडी विकली अर्जदाराने खाते उता-याची मागणी केली असता खाते उतारा दिला नाही. अर्जदाराने दि. 03/01/2012 रोजी M.I.D.C पोलीस स्टेशनला गैरअर्जदार क्र. 1 यांचे विरुध्द तक्रारी अर्ज दिला. अर्जदाराने RTO कार्यालय लातुर येथे दि. 09/03/2012 रोजी सदर मोटार सायकल विषयी माहिती घेतली असता गैरअर्जदारक्र. 1 ने मोटार सायकल विकली नसल्याचे निदर्शनास आले.
अर्जदाराने कर्जाचे थकीत हप्ते रु. 3800/- भरुन घ्यावे, मोटार सायकल क्र. एम.एच-24 यु- 9239 अर्जदारास दयावी, व मानसिक, शारिरीक त्रासापोटी, तक्रारी अर्जाच्या खर्चापोटी रु. 25,000/- ची मागणी केली आहे. अर्जदाराने तक्रारी अर्जासोबत अंतरिम अर्ज दिला आहे.
अर्जदाराने तक्रारी अर्जासोबत पुरावा म्हणून शपथपत्र दिले आहे व त्यासोबत एकुण 17 कागदपत्रे दिली आहेत. .
गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांचे विरुध्द दि. 11/10/2012 रोजी म्हणणे नाही आदेश झाला आहे.
अर्जदाराचा तक्रारी अर्ज व पुरावा म्हणून दाखल केलले शपथपत्र व कागदपत्रे तसेच अर्जदाराचा युक्तीवाद यांचे अवलोकन केले असता.
अर्जदाराने गैरअर्जदाराकडुन रक्कम रु. 33,090/- चे कर्ज घेवून एम.एच. 24-यु-9239 हे मोटार सायकल घेतली आहे. सदर कर्जाचा कालावधी हा 24 महिन्याचा असून त्याचा मासिक हप्ता रु. 1900/- आहे. अर्जदाराने दि. 21/05/2011 रोजी पावती क्र. 410279 द्वारे रक्कम रु. 6,700/- व पावती क्र. 791769 द्वारे रक्कम रु. 2250/- इतकी रक्कम गैरअर्जदाराकडे भरल्याच्या पावत्या दाखल केल्या आहेत. अर्जदाराने गैरअर्जदाराकडे कर्जाची एकुण रक्कम रु. 16,550/- भरली आहे. अर्जदाराने सदरचे वाहन व कर्ज 22 ऑक्टोंबर 2010 मध्ये घेतले आहे. गैरअर्जदाराचे सदर वाहन दि. 28/09/2011 रोजी जप्त केले आहे. सदरचे वाहन गैरअर्जदाराने कर्ज मुदत कालावधीत संपण्याच्या अगोदर जप्त केले आहे. अर्जदाराकडे कर्जाची थकबाकी रु. 16,440/- इतकी शिल्लक राहिलेली आहे.
गैरअर्जदारास दि. 12/11/2011 रेाजी नोटीस दिली आहे, त्यात अर्जदाराने M.I.D.C पोलीस स्टेशनला दि. 03/01/2012 रोजी गैरअर्जदार क्र. 1 विरुध्द तक्रारी अर्ज दिला आहे. सदरचा अर्ज दाखल आहे. सदरील अर्जावर M.I.D.C पोलीसांनी दि. 26/02/2012 रोजी सतीश मुळे याचा जबाब घेतला असून त्यात त्यांनी गैरअर्जदाराच्या सिनिअर मार्केटींग अधिकारी असल्याचे सांगितले आहे, अर्जदारास दि. 31/10/2011 व दि. 12/11/2011 रोजी नोटीस दिली आहे पत्ता चुकीचा म्हणून सदर नोटीस परत आली आहे.म्हणून अर्जदाराचे सदर वाहन दि. 26/12/2011 रोजी रक्कम रु. 37,750/- रुपयात विक्री केले आहे. अर्जदाराने दि. 27/04/2015 रोजीचे RTO एम.एच-24 यु-9239 चे पर्टीक्युलर दाखल केले असून, सदरचे वाहन अर्जदाराच्या नावावर आहे. यावरुन असे दिसते की, गैरअर्जदाराने पोलीसा समोरील जबाब व आर.टी.ओ पर्टीक्युलर यामध्ये विसंगती दिसते व गैरअर्जदाराचे अधिकारी खोटे बोलत असल्याचे दिसुन येते. गैरअर्जदाराने सदरील तक्रारी अर्जाबद्दल म्हणणे दिले नाही.म्हणून त्याचा उजर असल्याचे दिसत नाही. अर्जदाराने तक्रारी अर्जासोबत अंतरीम अर्ज दिला होता. गैरअर्जदाराविरुध्द कारणे दाखवा नोटीस काढण्यात आली, त्याचे उत्तर गैरअर्जदाराने दिले नाही. गैरअर्जदाराने कराराप्रमाणे अर्जदारास सेवा न देवून सेवेत त्रुटी केल्याचे सिध्द होते. गैरअर्जदाराने अर्जदाराकडुन नियमाप्रमाणे कर्जाची रक्कम रु. 16,440/- व त्यावरील कर्ज मुदत कालावधीतील व्याज अर्जदार व गैरअर्जदार यांच्यात झालेल्या कराराप्रमाणे स्विकारुन अर्जदारास त्याची मोटारसायकल व मानसिक, शारिरीक त्रास तसेच तक्रारी अर्जाच्या खर्चापोटी रु. 6,000/- अनुतोष मिळणे न्यायाचे व योग्य आहे, हे सदर न्यायमंचाचे मत आहे. -
सबब हे न्यायमंच खालील प्रमाणे आदेश पारित करत आहे.
आदेश
1) अर्जदाराची तक्रार अंशत: मंजुर करण्यात येत आहे.
2)अर्जदाराने कर्ज थकीत रक्कम रु.16,440/- व त्यावरील कर्ज मुदत कालावधीतील व्याज
आदेशाची प्रत प्राप्तीपासुन 30 दिवसाच्या आत गैरअर्जदारास देण्यात यावेत.
3) गैरअर्जदार यांना आदेश देण्यात येतो की, आदेश क्र. 2 चे पालन मुदतीत
केल्यास त्वरीत मोटार सायकल एम.एच. 24- यु-9239 योग्य स्थितीत अर्जदारास
दयावी.
4) गैरअर्जदार यांना आदेश देण्यात येतो की, अर्जदारास मानसीक व शारिरीक
त्रासापोटी रु. 3,000/- व तक्रारीच्या खर्चापोटी रु.3,000/- आदेशाची प्रत प्राप्तीपासुन
30 दिवसाच्या आत देण्यात यावेत.
(श्री.अजय भोसरेकर) (श्रीमती ए.जी.सातपुते) (श्रीमती रेखा जाधव)
सदस्य अध्यक्षा सदस्या जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, लातूर.