ग्राहक तक्रार क्र. 115/2013
अर्ज दाखल तारीख : 08/08/2013
अर्ज निकाल तारीख: 25/11/2014
कालावधी: 01 वर्षे 03 महिने 17 दिवस
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद
1. मानिक महादेव कोरके,
वय-45 वर्षे, धंदा – शेती,
रा.आरणी, ता. जि. उस्मानाबाद. ....तक्रारदार
वि रु ध्द
1. शाखा अधिकारी,
स्टेट बँक ऑफ हैद्राबाद.
शाखा- ढोकी, ता.जि.उस्मानाबाद. ..विरुध्द पक्षकार
कोरम : 1) मा.श्री.एम.व्ही.कुलकर्णी, अध्यक्ष.
2)मा.श्रीमती विदयुलता जे. दलभंजन सदस्य.
3) मा.श्री.एम.बी.सस्ते, सदस्य.
तक्रारदारातर्फे विधीज्ञ : श्री.आर.एस.मुंढे.
विरुध्द पक्षकारातर्फे विधीज्ञ : श्री.एस.पी.दानवे.
निकालपत्र
मा. अध्यक्ष श्री.एम.व्ही.कुलकर्णी यांचे व्दारा:
1) तक्रारदाराच्या तक्रारी अर्जाचे थोडक्यात कथन पुढीलप्रमाणे :
तक्रारदार मौज आरणी ता.जि. उस्मानाबाद येथे शेती व्यवसाय करतात. आपल्या व्यवसायासाठी व्यंकटेश ट्रेडर्स, उस्मानाबाद यांच्याकडून New Holand कंपनीचा ट्रॅक्टर क्र.MH-25-1589 खरेदी केला. त्यासाठी विपकडून कर्ज रु.5,00,000/- दि.27/07/2010 रोजी व्याज द.सा.द.शे.14.90 नुसार देण्याच्या अटीवर घेतले. तक्रारदाराचे कर्ज खाते क्र.62046953652 असे आहे.
तक्रारदाराने वेळोवळी विपकडे कर्ज रक्कम भरली ती अशी, दि.29/10/2007 रोजी रु.5,750/- भरले, दि.16/06/2007 रोजी रु.51,000/- भरले, दि.11/01/2010 रोजी रु.12,000/-, दि.06/12/2008 रोजी रु.38,000/-, दि.12/12/12 रोजी रु.2,50,000/- भरले असे एकूण रु.4,16,750/- फेडलेले आहेत. त्यापैकी दि.29/10/2007 रोजीची रु.12,000/-, दि.09/01/2012 रोजीचे रु.12,000/-, दि.07/12/2012 रोजीचे रु.38,000/-, दि.20/11/2009 रोजीचे रु.17,000/- व दि.03/11/2012 रोजीचे रु.60,000/- ची अशी रक्कम विपने खाते उता-यात दाखविली नाही.
दि.20/06/2012 रोजी कोणत्याही प्रकारची नोटीस न देता विपने तक्रारदाराचा ट्रॅक्टर जबरदस्तीने नेला आहे. सदरची कृती जाणीवपूर्वक तक्रारदारास त्रास देण्याच्या हेतूने केली आहे. विपने अवाजवी कर्ज खाते उता-यावर टाकून थकीत रक्कमेमध्ये विपने विनाकारण अवाजवी वाढ केलेली आहे. तक्रारदाराने एकूण रु.5,55,750/- एवढा भरणा केला आहे. उर्वरीत कर्ज रक्कम व नियमाप्रमाणे व्याज भरण्यास तक्रारदार तयार आहे. तक्रारदाराने विपकडून दि.20/04/2013 रोजी हिशोबाची मागणी केली असता विपने हिशोब दिलेला नाही. विपने तक्रारदाराचा ट्रॅक्टर त्याला परत करावा तसेच बेकायदेशीर कर्ज व्याज वजा जाता हिशोब दयावा व योग्य ती बाकी तक्रारदारास भरण्याची परवानगी मिळावी अशी विनंती केली आहे.
तक्रारदाराने तक्रारीसोबत कर्ज खात्याचा उतारा, भरलेली रक्कम, पावतींच्या छायांकित प्रती व जाहीर लिलावाच्या नोटीसची प्रत हजर केलेली आहे.
2) विपने आपले लेखी म्हणणे दाखल केले आहे. त्याप्रमाणे कर्ज दि.29/10/2007 रोजी वाटप झाले. दि.29/10/2010 रोजी भरलेले रु.5,750/- अपफ्रॅन्ट फि म्हणून भरले कारण त्याआधी नावे टाकण्यात आले नव्हते. तक्ररदाराने दि.16/06/2007 रोजी रु.51,000/- भरलेले नसून दि.16/06/2008 रोजी रु.51,000/- भरलेले आहेत. दि.11/01/2010 रोजी रु.12,000/- उशीरा जमा केले. दि.17/08/2012 रोजी रु.60,000/- जमा केले नसून दि.23/11/2012 रोजी जमा केले आहेत. दि.06/12/2012 रोजी रु.38,000/- तक्रारदाराने जमा केले नसून दि.07/12/2012 रोजी जमा केले आहेत. ट्रॅक्टरचा लिलाव झाल्यानंतर खरेदीदार नामे सचिन मोतिराम कराड यांनी ती रक्कम रु.2,50,000/- जमा केली आहे. दि.29/10/2007 रोजी रु.12,000/- जे जमा केले आहेत ते बचत खाते क्र.62046224370 मध्ये जमा केले आहे. दि.09/01/2010 रोजी जमा केलेली रक्कम रु.12,000/- उशीरा आल्यामुळे दि.11/01/2010 रोजी जमा झालेले आहे. दि.07/12/2012 रोजीची जमा केलेले रु.38,000/- तसेच दि.20/11/2009 रोजीची रु.17,000/- दावा कर्ज खात्यात जमा केलेले नाही. दि.03/11/2012 रोजी रु.60,000/- जमा केलेले नसून दि.23/11/2012 रोजी जमा केलेले आहेत. पेइंग स्लीपच्या तारखेचा शिक्का मारला आहे त्यात 2 चा आकडा निट उमटला नाही याचा तक्रारदार फायदा घेवू इच्छितो. तक्रारदाराने रु.5,55,570/- जमा केले हे चूकीचे आहे.
अटी व शर्तीनुसार वसूली न दिल्यामुळे तक्रारदाराचे कर्ज थकीत झाले. विपने त्यासाठी रितसर वसूली एजंट म्हणून पॅनल तयार केले आहे व औरंगाबाद येथील डानॅमीक फायनान्शीअल सर्व्हीसेस या फर्मला वसुली एजंट नेमले. तक्रारदाराने विप यांच्या हक्कात नजर गहाण खत लिहून दिले होते. त्यानुसार वर्तमानपत्रात जाहीरात देवून ट्रॅक्टर विक्री केला आहे. सचिन मोतिराम कराड यांनी दि.12/12/12 रोजी सदर ट्रॅक्टर खरेदी केला. पे-र्इंग स्लीपव्दारे रु.2,50,000/- कर्ज खात्यात जमा केला आहे. तक्रारदाराने ती रक्कम स्वत: दिलेली नाही. म्हणून तक्रारदाराची तक्रार रदद होण्यास पात्र आहे.
3) तक्रारदाराची तक्रार, त्यांनी दाखल केलेली कागदपत्रे, गैरतक्रारदार यांचे म्हणणे, त्यांनी दाखल केलेली कागदपत्रे, उभयतांचा लेखी युक्तीवाद इत्यादींचा विचार करता आम्ही निष्कर्षासाठी खालील मुद्ये उपस्थित करीत आहोत. त्यांची उत्तरे त्यांच्या समोर खाली दिलेल्या कारणांसाठी देतो.
मुद्ये निष्कर्ष
1) विरुध्द पक्षकारने अर्जदाराच्या सेवेत त्रुटी केली आहे का ? नाही.
2) अर्जदार रिलीफ मिळण्यास पात्र आहे काय ? नाही.
3) काय आदेश ? शेवटी दिल्याप्रमाणे.
निष्कर्षाचे विवेचन
मुद्या क्र.1 व 2 चे विवेचन
4) तक्रारदाराचे कर्ज खाते क्र.62046953652 असे आहे. त्या खाते उता-याचे निरीक्षण केले असता विप ने दि.27/10/2010 रोजी अप्रन्ट फी म्हणून रु.5,750/- डेबीट केली, ती रक्कम भरल्यावर दि.29/10/2010 रोजी क्रेडीट करण्यात आली. कर्ज रु.5,00,000/- दि.29/10/2007 रोजी डेबीट टाकण्यात आलेले आहे. दि.29/10/2007 रोजी रु.5,450/- कर्ज फेडीत भरल्याबददलची तक्रारदाराची तक्रार योग्य दिसून येत नाही.
5) तक्रारदाराच्या म्हणण्याप्रमाणे दि.16/06/2007 रोजी त्यांनी रु.51,000/- भरले परंतु जी पावती हजर करण्यात आलेली आहे त्या पावतीवर दि.16/06/2008 असे ती रक्कम कर्ज खात्यात जमा करण्यात आलेली आहे. दि.16/06/2007 रोजीची कोणतीही पावती तक्रारदाराने दाखल केलेली नाही व दिशाभूल करण्याचा प्रयत्न केल्याचे दिसते. दि.09/01/2010 रोजी रु.12,000/- भरल्याचे तक्रारदाराचे म्हणणे आहे परंतु त्याची पावती हजर केलेली नाही. उलट उता-याप्रमाणे दि.11/01/2012 रोजी रु.12,000/- जमा झालेले आहे. विपचे म्हणण्याप्रमाणे रक्कम उशीरा आल्यामुळे पुढील कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी रक्कम जमा करण्यात आली आहे. तक्रारदाराच्या म्हणण्याप्रमाणे रु.51,000/- दि.16/06/2007 रोजी जमा केले मात्र जी पावती हजर करण्यात आलेली आहे त्यात स्पष्टपणे दि.16/06/2008 दिसुन येते.
6) तक्रारदाराच्या म्हणण्याप्रमाणे दि.17/06/2012 रोजी रु.60,000/- जमा केले पावतीवर स्पष्टपणे दि.23/11/2012 दिसुन येते. रु.38,000/- दि.06/12/2012 रोजी जमा केल्याचे म्हंटलेले आहे परंतु पावती नुसार दि.07/12/2012 रोजी जमा केल्याचे दिसून येते. दि.29/10/2007 रोजी रु.12,000/- जमा केले असे तक्रारदाराचे म्हणणे आहे त्या पावतीवर स्पष्टपणे खाते क्र.62046224370 असा दिसुन येतो, ते दुसरे खाते असून कर्ज खाते नाही व दिशाभुल करण्याचा तक्रारदाराचा प्रयत्न दिसुन येतो. दि.20/11/2009 रोजी तक्रारदाराने रु.17,000/- रोख भरले. खाते उतारा हजर केला असून त्यामध्ये ही रक्कम दिसून येत नाही. परंतु दि.05/09/2009 रोजीचा व्यवहार पहील्या पानाच्या शेवटी आला आहे. त्यानंतरच्या पानावर नावे टाकलेली रक्कम असून दि.11/01/2010 रोजी रु.12,000/- जमा झाल्याचे दाखविले आहे. जमा बाजूला रु.85,750/- दाखविले आहे. त्यामध्ये रु.17,000/- अंर्तभूत असल्याचे स्पष्ट होते. रु.17,000/- जमा झाल्याचे प्रिंटमध्ये आले नव्हते, ती प्रिंट विपने नंतर हजर केलेली आहे. विपने हायपोथीकेशन डिडची प्रत हजर केलेली आहे जे तक्रारदाराने करुन दिलेले आहे. कलम 3 प्रमाणे कर्ज परत फेडीत तक्रारदारचा डिफॉल्ट झाल्यास विपस ट्रॅक्टर परत घेण्याचा अधिकार आहे. तसेच दि.11/02/2012 ची पावती स्पष्टपणे दाखवित आहे की लिलाव घेणा-याने कर्ज खात्यात रक्कम रु.2,50,00/- भरलेले आहे. म्हणजेच पुर्णपणे दिशाभुल करण्याचा तक्रारदाराचा विचार दिसुन येतो.
7) तक्रारदारातर्फे खालील केस लॉवर भर देण्यात आलेला आहे. III 2012 CPJ 662 (N.C.) त्यामध्ये असे म्हंटले आहे की विपने नोटीस न देता, विक्रीचे डिटेल न देता विक्री केली वाहनाची इंन्शूरर्ड किंमत रु.4,72,000/- होती परंतू विक्री रु.54,548/- होती. आपल्या खटल्यामध्ये तक्रारदाराने रु.1,98,000/- भरल्याचे दिसते तर येणे रु.3,50,000/- पर्यंतचे दिसते. तक्रारदाराने दिशाभुल करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ना. सर्वोच्च न्यायालयाचा न्यायनिवाडा II (2013) C.P.J.1 SC Export credit guarantee corp. Of india ltd. Verses Garg Sons international पान क्र.1 प्रमाणे करार झाला त्याचा शब्दश: अर्थ काढला पाहीजे. कराराचा अर्थ काढतांना न्यायालयास स्वत: शब्द वाढवता येणार नाही तसेच कमी करता येणार नाही अगर शब्दात बदल करता येणार नाही. सदर कराराप्रमाणे विपस वाहन जप्त करुन विक्री करण्याचा हक्क होता या उलट तक्रारदाराने खोटे बोलून न्यायमंचाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणून विपने तक्रारदाराच्या सेवेत त्रूटी केली असे आम्हास वाटत नाही. म्हणून मुददा क्र.1 व 2 चे उत्तर नकारार्थी देतो व खालीलप्रमाणे आदेश करतो.
आदेश
1) तक्रारदाराची तक्रार रदद करण्यात येते.
2) खर्चाबाबत कोणतेही आदेश नाही.
3) उभय पक्षकारांना आदेशाच्या प्रमाणित प्रती निशु:ल्क देण्यात याव्यात.
(श्री.एम.व्ही.कुलकर्णी)
अध्यक्ष
(श्री.मुकूंद.बी.सस्ते) (मा.विदयुलता जे.दलभंजन)
सदस्य सदस्या
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद.