जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच लातूर यांचे समोर
ग्राहक तक्रार क्रमांक – 243/2011 तक्रार दाखल तारीख – 21/09/2011
निकाल तारीख - 31/03/2015
कालावधी - 03 वर्ष , 06 म. 10 दिवस.
अनंत गोविंदराव मानकेश्वर,
वय – 42 वर्षे, धंदा – शेती,
रा. सुमठाणा, पो. डिगोळ ता. शिरुर अनंतपाळ,
जि. लातुर. ....अर्जदार
विरुध्द
1) मा. शाखा व्यवस्थापक,
महिंद्रा अॅन्ड महिंद्रा फायनानशिअल सर्व्हिसेस,
सदानंद हाऊस तळमजला महिंद्रा टॉवरच्या
बाजुला 570 पी बी मार्ग वरळी मुंबई 400 018.
2) मा. शाखा व्यवस्थापक,
महिंद्रा अॅन्ड महिंद्रा फायनानशिअल सर्व्हिसेस,
कृष्णाई बिल्डींग खर्डेकर स्टॉप,
साकोळकर हॉस्पिटल जवळ, औसा रोड,
लातुर.
3) मा. शाखा व्यवस्थापक,
महिंद्रा अॅन्ड महिंद्रा शेारुम,
अष्टविनायक मंदिराजवळ, लातुर. ..गैरअर्जदार
को र म - श्रीमती ए.जी.सातपुते, अध्यक्षा.
श्री अजय भोसरेकर, सदस्य
श्रीमती रेखा जाधव, सदस्या.
तक्रारदारातर्फे :- अॅड.एल.एन. शिंदे. गैरअर्जदार क्र. 1 व 2 तर्फे :- अॅड. पी.जी.रुद्रवार.
गैरअर्जदार क्र. 3 तर्फे :- अॅड.एम.डी.कोटलवार.
निकालपत्र
(घोषितव्दारा – श्रीमती रेखा जाधव,मा.सदस्या )
अर्जदार यांनी प्रस्तुतची तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 प्रमाणे गैरअर्जदारा विरुध्द दाखल केली आहे.
अर्जदाराने शेतीच्या कामासाठी गैरअर्जदार क्र. 2 व 3 मार्फत करार क्र. 00748590 केला असून, महिंद्रा अर्जुन – 605 ट्रॅक्टर खरेदी केले. अर्जदाराने सदरचा करार गैरअर्जदार क्र. 1 व 2 च्या सहमतीने केला. अर्जदाराने डाऊन पेमेंट गैरअर्जदार क्र. 3 कडे रु. 2,00,000/- नगदी भरले. अर्जदारास त्याच दिवशी महिंद्रा अर्जुन – 605 ट्रॅक्टर दिले. सदर ट्रॅक्टर व्यवस्थित चालत नसल्याची तक्रार गैरअर्जदाराकडे केली असता, गैरअर्जदाराने दि. 15/07/2008 रोजी अर्जदारास ट्रॅक्टरचा हप्ता रु. 83,100/- भरण्याची नोटीस दिली. अर्जदाराने सदरचे ट्रॅक्टर व्यवस्थित चालत नाही, त्याची पाहणी करावी असे गैरअर्जदार क्र. 3 ला सांगितले व 10 ते 12 दिवसात सदरचा हप्ता जमा करतो अशी विनंती गैरअर्जदार क्र. 2 ला केली. अर्जदाराचे ट्रॅक्टर दि. 24/08/2008 रोजी गैरअर्जदाराच्या एजंटामार्फत ओढून नेले. अर्जदाराने सदर ट्रॅक्टर दुरुस्त करुन देण्याची विनंती गैरअर्जदारास केली व सदरचे हप्ते वेळेवर भरण्याची हमी दिली. अर्जदारास रु. 4,55,514/- ची गैरअर्जदाराने नोटीस दिली आहे, अर्जदारा विरुध्द निकाल लागला आहे. अर्जदाराने सदरच्या नोटीसची गैरअर्जदार क्र. 2 व 3 कडे चौकशी केली असता, गैरअर्जदार क्र. 1 ने काय केले याची कल्पना नाही. अर्जदारास लातुर न्यायालयाची रु. 4,55,514/- भरण्याची नोटीस मिळाली आहे. सदरचे प्रकरण न्यायालयात प्रलंबित आहे. अर्जदाराने गैरअर्जदारास दि. 25/07/2011 रोजी नोटीस दिली.
अर्जदाराने तक्रारी अर्जात डाऊन पेमेंट भरलेली रक्कम रु. 2,00,000/- किंवा महिंद्रा अर्जुन ट्रॅक्टर – 605 सुस्थितीत दुरुस्त करुन दयावा. व तक्रारीचा खर्च रु. 20,000/- मानसिक, शारिरीक खर्चापोटी रु. 50,000/- असे एकुण – 2,70,000/- देण्याची मागणी केली आहे.
अर्जदाराने तक्रारी अर्जासोबत पुरावा म्हणून शपथपत्र दिले आहे. व त्यासोबत एकुण – 05 कागदपत्रे दाखल केली आहेत.
गैरअर्जदार क्र. 2 ने लेखी म्हणणे दिले आहे. सदरची तक्रार मंचाच्या कार्यक्षेत्रात येत नाही. गैरअर्जदाराचा व गैरअर्जदार क्र. 3 चा संबंध नाही. अर्जदारास थकीत कर्जापोटी हप्ते जमा करण्यासाठी नोटीस दिली. अर्जदाराने गैरअर्जदाराकडे दि. 22/08/2008 रोजी सदरचे ट्रॅक्टर स्वत:हुन जमा केले आहे. अर्जदाराच्या ट्रॅक्टरची दि. 05/09/2008 रोजी 3,52,000/- रुपयास लिलावाद्वारे विक्री केली आहे. अर्जदाराकडे कर्ज थकीत रक्कम रु. 2,45,415/- असुन, त्यावर अतिरिक्त 3 टक्के दंड व्याज थकीत आहे. गैरअर्जदाराने अर्जदाराविरुध्द यापुर्वीच लवादाकडे प्रकरण दाखल केले आहे, त्याचे निकाल लागला आहे. अर्जदाराविरुध्द जिल्हा न्यायालय लातुर येथे वसुली दरखास्त क्र. 19/2011 चालु आहे. अर्जदाराने सदरील प्रकरण जिल्हा कोर्ट लातुर येथे चालु असताना जाणीवपुर्वक सदरचा तक्रारी अर्ज दाखल केला आहे. सदरची तक्रार कायदेशीररित्या योग्य नाही. अर्जदाराने कर्जाचा एकही हप्ता दिला नाही.
गैरअर्जदार क्र. 3 ने लेखी म्हणणे दिले आहे. अर्जदार आणि गैरअर्जदार यांच्यात करार झाला नाही. अर्जदाराची तक्रार पुर्णत: खोटी आहे. गैरअर्जदार महिंद्रा ट्रॅक्टरचा डिलर आहे. गैरअर्जदाराने अर्जदारास ट्रॅक्टरच्या दि. 12/05/2008 वॉरंटी कालावधीत सेवा दिल्या आहेत. गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांच्याशी गैरअर्जदार क्र.3 चा संबंध नाही. गैरअर्जदाराचा व्यवसाय हा स्वतंत्र आहे. गैरअर्जदाराविरुध्द तक्रार दाखल करण्यास कोणतेही कारण घडले नाही. अर्जदाराची तक्रार मुदतीत नाही. अर्जदाराची तक्रार दंडासह खारीज करण्यात यावी.
अर्जदाराचा तक्रारी अर्ज व त्यासोबत दाखल केलेली कागदपत्रे, व पुरावा म्हणून दिलेले शपथपत्र तसेच गैरअर्जदाराचे लेखी म्हणणे, अर्जदार व गैरअर्जदार यांचा युक्तीवाद याचे अवलोकन केले असता.
अर्जदाराने गैरअर्जदारास मोबदला देवून सेवा घेतल्या आहेत. सदरचा मोबदला गैरअर्जदाराने स्विकारल्यामुळे अर्जदार हा ग्राहक होतो. अर्जदाराने सदरचे ट्रॅक्टर दि. 11/01/2008 रोजी खरेदी केले आहे. अर्जदारास दि. 28/02/2008 रोजी गैरअर्जदार क्र. 2 ने थकीत हप्ता रक्कम रु. 83,100/- दि. 15/07/2008 रोजी देय होता. सदरील हप्ता भरण्यासाठी नोटीस दिली आहे. अर्जदाराने कर्जाचे परतफेडची शेडयुल दाखल केले आहे, त्यात दि. 11/01/2008 रोजी करार क्र. 00748590 असुन, कर्ज रक्कम रु. 4,25,000/- व त्यावरील फायनान्स चार्ज रु. 2,36,300/- असुन व्याजाचा दर 13.90 टक्के आहे. सदर कर्जाचा कालावधी दि. 11/01/2008 ते 10/01/2012 एकुण कर्ज 8 हप्ते रक्कम रु. 83,100/- इतके आहेत. अर्जदाराने कर्जाचा एकही हप्ता भरला नसल्याचे दिसुन येते. गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांनी अर्जदारा विरुध्द लवाद न्यायालयात केस क्र. 2074/09 द्वारे तक्रार दाखल केली, त्याचा निकाल 23 सप्टेंबर 2010 रोजी गैरअर्जदार क्र. 1 व 2 च्या हक्कात झाल्याचे दिसुन येते. गैरअर्जदाराने अर्जदाराविरुध्द वसुली दरखास्त क्र. 19/2011 दाखल केली आहे. अर्जदाराने सदरच्या निर्णया विरुध्द योग्य त्या कोर्टात अपील केले पाहिजे होते. अर्जदाराने सदर मंचात दाखल केलेले प्रकरण व लवादाकडे निकाल लागलेले, अर्जदाराचे प्रकरण याचा विषय एकच असल्यामुळे त्याच मुद्दयावर दोन वेगवेगळया न्यायमंचात प्रकरण दाखल करणे व चालविणे हे न्यायाच्या दृष्टीने बेकायदेशीर असल्यामुळे, अर्जदाराने सदरच्या निकाला विरुध्द संबंधित न्यायालयात अपील केल्याचे दिसुन येत नाही. अर्जदारांच्या सदर प्रकरणाचा यापुर्वी निकाल लागला असल्यामुळे सदरचे प्रकरण न्यायमंचाच्या कार्यक्षेत्रात येत नसल्यामुळे फेटाळण्यात येत आहे. हे सदर न्यायमंचाचे मत आहे.
सबब हे न्यायमंच खालील प्रमाणे आदेश पारित करत आहे.
आदेश
1) अर्जदाराची तक्रार रद्द करण्यात येत आहे.
2) खर्चाबाबत काही आदेश नाही.
(श्रीमती ए.जी.सातपुते) (श्रीमती रेखा जाधव)
अध्यक्षा सदस्या
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, लातूर.