निकालपत्र :- (दि.17/09/2010) (व्दारा-सौ.वर्षा एन.शिंदे, सदस्या) (1) प्रस्तुतची तक्रार स्विकृत करुन सामनेवाला यांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाला क्र.1, 3, 4, 6, 8 ते 11, 13 ते 15 यांना नोटीस लागू, सामनेवाला क्र.5, 12, 16, 17 यांनी नोटीस न स्विकारलेने शे-यानिशी मंचाकडे परत लखोटे आले. सामनेवाला क्र. 2 व 7 नमुद पत्तयावर रहात नसलेने नोटीस परत आलेने दि.13/08/2010 रोजीच्या मे.मंचाचे आदेशानुसार जाहीर समन्स दै.पुण्यनगरी मध्ये केलेले आहे. सामनेवाला क्र.1 यांनी लेखी म्हणणे दाखल केले सबब सामनेवाला क्र.2 ते 17 यांना नोटीस बजावणी होऊनही त्यांनी लेखी म्हणणे दाखल केलेले नाही किंवा त्यांनी हजर होऊन युक्तीवादही केलेला नाही. सबब यांचेविरुध्द एकतर्फा आदेश पारीत करणेत आला. सुनावणीचे वेळेस तक्रारदाराचे वकील यांनी युक्तीवाद केला सामनेवाला गैरहजर आहेत. (2) यातील तक्रारदार यांची थोडक्यात तक्रार अशी :-अ) तक्रारदार क्र. 1 हे तक्रारदार क्र.2 चे वडील असून तक्रारदार क्र.1 यांनी स्वत:चे नांवे तसेच त्यांची पत्नी सौ.लिलावती व तक्रारदार यांनी वैयक्तिकपणे व संयुक्तिकपणे ठेवी ठेवल्या होत्या. सामनेवाला क्र.1 महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियमानुसार स्थापन झालेली संस्था आहे. सामनेवाला क्र.1 ही पत संस्था असून सामनेवाला क्र.2 हे सदर संस्थेचे व्यवस्थापक सामनेवाला क्र.3 हे संस्थापक, सामनेवाला क्र.4 अध्यक्ष, सामनेवाला क्र.5 उपाध्यक्ष व सामनेवाला क्र.6 ते 17 संचालक म्हणून काम पाहतात. तक्रारदाराने खालीलप्रमाणे सामनेवाला यांचेकडे मुदत बंद ठेवी ठेवलेल्या होत्या. अ.क्र. | ठेवीदाराचे नांवे | ठेव पावती क्र | ठेव रक्कम | ठेवीची तारीख | परतीची तारीख | व्याज दर | 01 | आप्पासाहेब का.घोटगे | 1253 | 25,000/- | 03/03/07 | 03/03/10 | 10 % | 02 | आप्पासाहेब का.घोटगे/सौ.लिलावती आ.घोटगे | 15099 | 30,000/- | 21/09/00 | 21/10/02 20/12/08 | 15 % 9 % | 03 | -‘’- | 3741 | 35,000/- | 03/05/08 | 03/05/11 | 10 % | 04 | -‘’- | 3742 | 35,000/- | 03/05/08 | 03/05/11 | 10 % |
ब) तक्रारदारचे वय वर्षे 84 असून ते वयोवृध्द आहेत. तक्रारदार क्र.2 हे त्यांचे एकमेव मुलगी असून ती त्यांची कायदेशीर व सरळ वारस आहे. तक्रारदाराने त्यांचे हृदय विकार व मधुमेहाचे औषधोपचारासाठी सदर रक्कमांची गरज असलेने मुदत पूर्व ठेव रक्कमांची मागणी केली असता सदर रक्कमा देणेस टाळाटाळ केली. तक्रारदार क्र.1 यांची पत्नी सौ.लिलावती या मयत झालेनंतरही ठेव रक्कमांची मागणी करुनही ठेव रक्कमा देणेचे टाळून सामनेवाला यांनी सेवेत कसूर केला आहे. याबाबत दि.02/12/2009 रोजी श्री एस.एस.गावडे यांचेमार्फत नोटीस पाठवली. सदर नोटीस सामनेवाला क्र.1यांनी स्विकारलेली नाही. सामनेवाला क्र.2 व 4 यांनी स्विकारली. प्रस्तुतच्या ठेव रक्कमा तक्रारदारास वेळेत मिळणे अतिशय गरजेचे आहे. सबब तक्रारदाराची तक्रार मंजूर करुन तक्रारीतील नमुद ठेव रक्कमा द.सा.द.शे.12 टक्के प्रमाणे व्याजासहीत सामनेवालांकडून वैयक्तिक व संयुक्तिकरित्या वसुल होऊन मिळावेत. सामनेवालांकडून मानसिक त्रासापोटी रक्कम रु. 5,000/- व तक्रारीच्या खर्चापोटी रककम रु.5,000/- मिळावेत अशी विनंती सदर मंचास केली आहे. (3) तक्रारदाराने आपल्या तक्रारीच्या पुष्टयर्थ तक्रारीतील नमुद ठेव पावत्यांच्या सत्यप्रती, मुलीचा शाळा सोडल्याचा दाखला, तक्रारदार क्र.1 चे पत्नीचे मृत्यूचे प्रमाणपत्र, सामनेवाला यांना पाठविलेली वकील नोटीस इत्यादीच्या सत्यप्रती व सदर नोटीस पाठवलेल्या पावत्या व नोटीस मिळाल्याच्या पोच पावत्या इत्यादी कागदपत्रे दाखल केली आहेत. (4) सामनेवाला संस्थेने दाखल केलेल्या लेखी म्हणणेनुसार तक्रारदाराच्या तक्रारीतील संपूर्ण कथने खोटी, लबाडीची असून ती सामनेवाला यांना मान्य व कबूल नाहीत. तक्रारदारने सामनेवाला संस्थेकडे ठेवलेल्या ठेवींची मुदत अदयापही संपलेली नाही. सबब प्रस्तुतच्या अर्जास कोणतेही कारण घडलेले नाही. तक्रारदाराच्या पत्नी मयत झाले असल्याने दिवाणी न्यायालयाकडून वारसा दाखला घेणे आवश्यक आहे. तक्रारदार क्र.2 हे कोणत्या प्रकारे वारस लागतात याबाबतचा कोणताही पुरावा दाखल केलेला नाही. ठेव पावतीवरील व्याज दर देणे अडचणीचे आहे. कारण अदयापही सदर ठेवींच्या मुदती संपलेल्या नाहीत. संस्थेची आर्थिक परिस्थिती अडचणीची झाली असलेने व कर्जदार जाणूनबुजून रक्कम भरणेस टाळाटाळ करीत आहेत. सदर रक्कम वसुल करुन ठेवीदारांना रक्कम देत आहोत. तक्रारदारांनी यापूर्वी त्यांच्या ठेव रक्कम व त्यावरील व्याज नेलेले आहे. त्यामुळेच पुन्हा ठेवी ठेऊन त्यावर व्याज नेलेले आहे. मुदतपूर्व ठेवीच्या रक्कमा देणे अडचणीचे आहे. सामनेवाला ठेवीची मुदत संपलेनंतर तसेच वारसा दाखला दिलेनंतर वसुल होईल त्याप्रमाणे रक्कमा देणेस तयार आहेत. सबब तक्रारदाराने कायदेशीर बाबींची पूर्तता न केल्याने तक्रार अर्ज नामंजूर करणेत यावा अशी विंनती सामनेवाला संस्थेचे सदर मंचास केली आहे. (5) सामनेवाला संस्थेने प्रसतुतचे म्हणणेसोबत अन्य कोणतेही कागदपत्र दाखल केलेले नाहीत. (6) तक्रारदाराची तक्रार, दाखल कागदपत्रे, सामनेवाला संस्थेचे लेखी म्हणणे तक्रारदाराचा युक्तीवाद इत्यादीचे बारकाईने अवलोकन केले असता पुढील महत्वाचे मुद्दे निष्कर्षासाठी येतात. 1. सामनेवाला यांनी सेवेत त्रुटी ठेवली आहे काय --- होय. 2. तक्रारदार क्र.1 त्यांच्या ठेव रक्कमा मिळणेस पात्र आहे काय --- होय. 3. काय आदेश --- शेवटी दिलेप्रमाणे मुद्दा क्र.1 व 2 :- तक्रारदाराने दाखल केलेल्या पावत्यांच्या सत्यप्रतीचे अवलोकन केले असता तक्रारदार क्र.1 यांनी स्वत:चे नांवे तसेच स्वत:चे व पत्नीचे नांवे संयुक्तिकपणे ठेवी ठेवलेचे दिसून येते त्याचा तपशील खालीलप्रमाणे अ.क्र. | ठेवीदाराचे नांवे | ठेव पावती क्र | ठेव रक्कम | ठेवीची तारीख | परतीची तारीख | व्याज दर | 01 | आप्पासाहेब का.घोटगे | 1253 | 25,000/- | 03/03/07 | 03/03/10 | 10 % | 02 | आप्पासाहेब का.घोटगे/सौ.लिलावती आ.घोटगे | 15099 | 30,000/- | 21/09/00 | 21/10/02 | 15 %, 9% | 03 | -‘’- | 3741 | 35,000/- | 03/05/08 | 03/05/11 | 10 % | 04 | -‘’- | 3742 | 35,000/- | 03/05/08 | 03/05/11 | 10 % |
पावती क्र.15099, 3741 व 3742 या तक्रारदार व त्यांचे पत्नीचे नांवे ठेवलेल्या संयुक्तिक पावत्या आहेत व पावती क्र.1253 ही तक्रारदाराचे वैयक्तिक नांवे आहे. पावती क्र. 15099 चे अवलोकन केले असता प्रस्तुत पावतीवर 15 % व 9% अशा दोन व्याजदराची नोंद आहे व मुदत संपलेचा दि.21/10/2002 नोंद आहे. तक्रारदाराने आपल्या तक्रारीत प्रस्तुतची पावतीची मुदतीनंतर दि.21/12/2008 अशी नमुद केली आहे. त्यासाठी 9% व्याजदराचे नोंद दिसून येते. सामनेवालांनी आपल्या म्हणणेमध्ये प्रस्तुतची बाब स्पष्टपणे नाकारलेली नाही. याचा अर्थ सदर पावतीची मुदत संपलेनंतर पुन्हाच्या मुदतीसाठी 9%व्याज दर दाखवलेला आहे असे या मंचाचे स्पष्ट मत आहे. प्रस्तुतची तक्रारदि.05/01/2010 रोजी स्विकृत केलेली आहे व सदर तारखेपर्यंत प्रस्तुत तक्रारीतील पावत्यांच्या मुदती पूर्ण झालेल्या आहेत.तक्रारदारचे जरी मुदत पूर्व रक्क्मांची मागणी केली असली तरीही पावती क्र.1253 व 15099 याच्या मुदती पूर्ण झालेल्या आहेत. पावती क्र.3741 व 3742 या मुदतपूर्व ठेव पावत्या आहेत ही वस्तुस्थिती निर्विवाद आहे. प्रस्तुत ठेव रक्कमा तक्रारदाराने वेळोवेळी मागणी करुनही सामनेवालांनी त्या अदा केलेल्या नाहीत. कोणताही ठेवीदार मुदत बंद ठेवीमध्ये रक्कमा ठेवतो ते भविष्यात त्या रक्कमा उपयोगी पडाव्यात हा हेतू असतो. सबब ठेवीदार मुदतीपूर्वसुध्दा ठेवीची मागणी करु शकतो. त्याप्रमाणे तक्रारदार हे वय वर्षे 84 तसेच हृदयरोग व मधुमेहाने पिडीत वयोवृध्द व्यक्ती आहेत व त्यांनी त्यांचे औषधोपचारासाठी प्रस्तुत रक्कमांची मागणी करुनही सामनेवालांनी प्रस्तुतच्या रक्कमा वारसा दाखला दिलेला नाही तसेच संस्था आर्थिक अडचणीत आहे व ठेवीच्या मुदती संपल्यानंतर वसुली होईल तशा रक्कमा अदा करु याचा विचार करता वर नमुद केलेल्या चार ठेवींपैकी एक ठेव तक्रारदाराचे स्वत:चे नांवे तीन ठेवी तक्रारदाराचे व पत्नीचे नांवे संयुक्तिक ठेवलेल्या आहेत. तक्रारदाराची पत्नी दि.16/12/2008 रोजी मयत झालेचे दाखल मृत्यू प्रमाणपत्रावरुन दिसून येते. नमुद संयुक्तिक ठेवीमध्ये लिलावती या मयत झाल्या असल्यातरी संयुक्तिक ठेवीदार आप्पासाहेब काशीनाथ घोटगे हे जिवीत आहेत व त्यांनीच ठेव रक्कमेची मागणी केलेली आहे. सबब त्यासाठी वारसा दाखल्याची गरज नाही. प्रस्तुतच्या ठेवी नांवे असलेले दोन्ही ठेवीदार म्हणजेच तक्रारदार क्र.1 व त्यांच्या पत्नी लिलावती हे दोघेही मयत असते व तक्रारदार क्र.2 यांना रक्कम देणे असते त्यावेळी वारसा दाखलाची मागणी संयुक्तिक ठरली असती. मात्र प्रस्तुतचा ठेवीदार व संयुक्तिक ठेवीदार तक्रारदार क्र.1 हे जिवीत आहेत व प्रस्तुतच्या रक्कमा तक्रारदार क्र.1 हे मिळणेस पात्र असलेने तक्रारदार क्र.2 यांचा प्रश्नच उदभवत नाही. सबब सदरच्या रक्कमा सामनेवाला यांनी देणेस टाळाटाळ करुन सेवेत त्रुटी ठेवलेचे निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे व यासाठी सामनेवाला क्र.1,3ते 17 वैयक्तिक व संयुक्तिकरित्या तर सामनेवाला क्र.2हे सामनेवाला संस्थेचे कर्मचारी असलेने त्यांनी फक्त संयुक्तिकरित्या तक्रारदाराच्या ठेव रक्कमा देणेस जबाबदार असलेचे निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. तक्रारदार क्र.1 ठेव पावती क्र.1253, 15099 नमुद ठेव रक्कमा अनुक्रमे रक्कम रु.25,000/- व रु.30,000/- नमुद मुदतीसाठी नमुद व्याजदराप्रमाणे व तदनंतर द.सा.द.शे.6 टकके प्रमाणे व्याजासहीत मिळणेस पात्र आहेत. तसेच ठेव पावती क्र.3741 व 3742 सदर ठेव ठेवले तारेखपासून ते दि.09/12/2009 चे वकील नोटीस पर्यंत जेवढी मुदत पूर्ण झालेल्या कालावधीसाठी असणा-या सामनेवालांच्या प्रचलीत व्याज दरातून 1 टक्का वजा जाता व्याज मिळणेस तसेच तदनंतर द.सा.द.शे.6 टक्के दराने व्याजासहीत मिळणेस पात्र आहे या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. सबब मुद्दा क्र.1 व 2 होकारार्थी आहे. मुद्दा क्र.3 :-तक्रारदार हे वय वर्षे 84 वर्षाचे हृदय रोगाने व मधुमेहाने पिडीत वयोवृध्द व्यक्ती असून त्यांचे औषधोपचारासाठी सदर रक्कमांची आवश्यकता होती. मात्र सदर रक्कमा सामनेवालांच्या सेवात्रुटीमुळे तक्रारदारांना मिळू न शकलेने तक्रारदार मानसिक त्रासापोटी व तक्रारीच्या खर्चापोटी रक्कम मिळणेस पात्र आहेत. सबब हे मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे. आदेश (1) तक्रारदाराची तक्रार मंजूर करण्यात येते. (2) सामनेवाला क्र.1, 3 ते 17 यांनी वैयक्तिकरित्या व संयुक्तिकरित्या व सामनेवाला क्र. 2 यांनी फक्त संयुक्तिकरित्या तक्रारदार क्र.1 यांना त्यांचे ठेव पावती क्र.1253, 15099 नमुद ठेव रक्कमा अनुक्रमे रक्कम रु.25,000/- व रु.30,000/-अदा करावी व सदर रक्कमांवर नमुद मुदतीसाठी नमुद व्याजदराप्रमाणे व तदनंतर संपूर्ण रक्कम अदा होईपर्यंत द.सा.द.शे.6 टकके प्रमाणे व्याज अदा करावे. तसेच ठेव पावती क्र.3741 व 3742 प्रत्येकी रु.35,000/- अदा करावी व सदर रक्कमेवर ठेव ठेवले तारेखपासून ते दि.09/12/2009 चे वकील नोटीस पर्यंत जेवढी मुदत पूर्ण झालेल्या कालावधीसाठी असणा-या सामनेवाला संस्थेच्या प्रचलीत व्याज दरातून 1 टक्का वजा जाता व्याज व तदनंतर संपुर्ण रक्कम अदा होईपर्यंत द.सा.द.शे.6 टक्के दराने व्याज अदा करावे. (3) सामनेवाला क्र.1, 3 ते 17यांनी वैयक्तिकरित्या व संयुक्तिकरित्या व सामनेवाला क्र.2 यांनी फक्त संयुक्तिकरित्या तक्रारदारांना मानसिक त्रासापोटी रु.1,000/-(रु.एक हजार फक्त) व तक्रार अर्जाच्या खर्चापोटी रु.1,000/-(रु.एक हजार फक्त) अदा करावेत.
| [HONABLE MRS. Mrs.P.J.Karmarkar] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT[HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER | |