(पारीत व्दारा श्री भास्कर बी.योगी, मा.अध्यक्ष)
(पारीत दिनांक- 22 जुलै, 2022)
01. तक्रारदार यांनी प्रस्तूत तक्रार ग्राहक संरक्षण कायदा -2019 च्या कलम-35 खाली विरुध्दपक्ष क्रं 3 इफको टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी मर्यादित, आणि इतर यांचे विरुध्द तक्रारकर्ती क्रं 1 चे पती आणि ईतर तक्रारदारांचे वडील यांचे अपघाती मृत्यू संबधात समूह वैयक्तिक अपघात विमा दाव्याची रक्कम मिळण्यासाठी आणि इतर अनुषंगीक मागण्यांसाठी दाखल केलेली आहे.
02. तक्रारीचा थोडक्यात आशय खालील प्रमाणे-
तक्रारदाराचे तक्रारी प्रमाणे तक्रारकर्ती क्रं 1 ही मृतक अंबादास दिनाजी भोयर याची पत्नी असून वर नमुद तक्रारदार क्रं 2 ते 4 ही त्यांची अपत्ये
आहेत. मृतक श्री अंबादास दिनाजी भोयर हा सरकारी प्राथमिक व दुय्यम आश्रमशाळा, कुरानदिमल, तहसिल आरमोरी, जिल्हा भंडारा येथे स्वयंपाकी पदावर नौकरीत होता, नौकरीत असताना त्याने विरुध्दपक्ष क्रं 1 भंडारा अर्बन को ऑपरेटीव्ह बॅंक, शाखा वडसा, तालुका आरमोरी, जिल्हा गडचिरोली यांचे मार्फतीने विरुध्दपक्ष क्रं 3 विमा कंपनी कडून समूह व्यक्तीगत विमा पॉलिसी काढली होती. सदर विमा पॉलिसीचा क्रं-54382594 असा असून विमा पॉलिसीचा कालावधी हा दिनांक-09.12.2018 ते दिनांक-08.12.2019 असा होता. श्री अंबादास दिनाजी भोयर याने तो हयातीत असताना विरुध्दपक्ष क्रं 1 बॅंकेचया शाखेतून दिनांक-18.12.2015 रोजी रुपये-3,00,000/- एवढया रकमेचे कर्ज घेतलेले असल्यामुळे कर्ज रकमेच्या सुरक्षितेसाठी विरुध्दपक्ष क्रं 1 बॅंकेने विरुध्दपक्ष क्रं 3 विमा कंपनी कडून समूह वैयक्तिक अपघात विमा पॉलिसी काढली होती.सदर विमा पॉलिसीचा वार्षिक हप्ता रुपये-276/- होता आणि सदर विम्याचे हप्त्यांची रक्क्कम मृतकाचे कर्ज खात्यातून कपात होत होती. सदर विमा पॉलिसी प्रमाणे विमा राशी रुपये-3,00,000/- एवढी होती आणि सदर विमा पॉलिसी मध्ये मृतकाचे नाव अक्रं-3454 वर दर्शविले होते. अशा प्रकारे मृतक हा विरुध्दपक्षांचा ग्राहक होता. श्री अंबादास दिनाजी भोयर याचा दिनांक-18.09.2019 रोजी अपघाती मृत्यू झाला होता, त्या संबधी पोलीस स्टेशन आरमोरी येथे एफ.आय. आर. नोंदविल्या गेला होता. वैद्दकीय अधिकारी, आरमोरी यांनी मरणोत्तर तपासणी अहवाल दिला. अपघाताचे दुसरे दिवशी तक्रारकर्तीने विरुध्दपक्ष क्रं 1 बॅंके मध्ये माहिती दिली असता त्यांनी पोलीस दस्तऐवज सादर करण्यास सांगितले, त्याप्रमाणे तकारकर्ती क्रं 1 हिने दिनांक-22.09.2019 रोजी दस्तऐवज विरुध्दपक्ष क्रं 1 बॅंके मध्ये सादर केले आणि त्यांनी ते विरुध्दपक्ष क्रं 3 विमा कंपनीकडे सादर केले. त्यावेळी विरुध्दपक्ष क्रं 1 बॅंके तर्फे विमा रक्कम प्राप्त झाल्या नंतर थकीत कर्जाची रक्कम समायोजित करुन कर्ज नसल्याचा दाखला देऊ असे आश्वासन दिले होते. त्यानंतर विरुध्दपक्ष क्रं 1 बॅंकेनी तक्रारकर्ती क्रं 1 हिला दिनांक-21.01.2020 रोजीचे पत्र देऊन मृतकाचे दोन चाकी वाहना संबधात कायम चालक परवाना दस्तऐवजाची मागणी केली परंतु तिला मृतकाचा कायम चालक परवाना ऐवजी शिकाऊ चालक परवाना मिळाला तो तिने विरुध्दपक्ष क्रं 1 बॅंके मध्ये दिला परंतु विरुध्दपक्ष क्रं 1 बॅंकेनी पुन्हा दिनांक-14.02.2020 रोजीचे पत्राव्दारे कायम चालक परवाना प्रतीची मागणी केली. विरुध्दपक्ष क्र1 बॅंकेनी तक्रारकर्ती क्रं 1 हिला दिनांक-03.09.2020 रोजीचे पत्रान्वये कळविले की, तिचा विमा दावा विरुध्दपक्ष क्रं 3 विमा कंपनीने दिनांक-18.08.2020 रोजी खारीज केला.
तक्रारदारांनी पुढे असेही नमुद केले की, श्री अंबादास दिनुजी भोयर यांचा अपघाती मृत्यू दिनांक-18.09.2019 रोजी झालेला असताना विरुध्दपक्ष क्रं 1 बॅंकेनी विम्याचे वार्षिक हप्ते अनुक्रमे दिनांक-01.10.2019 आणि दिनांक-01.09.2020 रोजी वार्षिक हप्ता रुपये-276/- प्रमाणे त्याचे खात्या मधून कपात करुन विरुध्दपक्ष क्रं 3 विमा कंपनी मध्ये जमा केलेत. या व्यतिरिक्त मृतकाने जिल्हा मध्यवर्ती बॅंके कडून गृहकर्ज घेतले होते व त्या संबधात युनायटेड इंडीया एश्योरन्स कंपनी कडून रुपये-6,00,000/- रकमेची विमा पॅलिसी काढली होती परंतु त्यांनी केवळ पोलीस दस्तऐवजाचे आधारे विमादाव्याची रक्कम दिली परंतु कायम चालक परवाना प्रतीची मागणी केली नाही. अशाप्रकारे विरुध्दपक्षांनी त्यांना दोषपूर्ण सेवा दिली म्हणून तक्रारकर्तीने अधिवक्ता श्री एस.जी. हरडे यांचे मार्फतीने विरुध्दपक्षांना दिनांक-14.12.2020 रोजी कायदेशीर नोटीस पाठविली परंतु नोटीस मिळूनही विरुध्दपक्षांनी उत्तर दिले नाही तसेच प्रतिसाद दिला नाही. म्हणून शेवटी तक्रारदारांनी प्रस्तुत तक्रार जिल्हा ग्राहक आयोगा समक्ष दाखल करुन त्याव्दारे पुढील प्रमाणे मागण्या केल्यात-
- विरुध्दपक्षांनी तक्रारदारांना मृतकाचे समूह वैयक्तिक अपघात विमा पॉलिसी क्रं-54382594 अन्वये देय विमा रक्कम रुपये-3,00,000/- आणि सदर रकमेवर मृतकाचा मृत्यू दिनांक-18.09.2018 पासून ते रकमेच्या प्रत्यक्ष अदायगी पावेतो द.सा.द.शे.18 टक्के दराने व्याज यासह रक्कम देण्याचे आदेशित व्हावे.
- तक्रारदारांना झालेल्या शारिरीक व मानसिक त्रासा बद्दलरुपये-30,000/- आणि तक्रारीचा खर्च रुपये-20,000/- विरुध्दपक्षांकडून तक्रारदारांना देण्याचे आदेशित व्हावे.
- शिवाय योग्य ती दाद तक्रारदारांचे बाजूने मंजूर करण्यात यावी.
03. विरुध्दपक्ष क्रं 1 शाखा प्रबंधक, दि भंडारा अर्बन को-ऑप. बॅंक लिमिटेड शाखा वडसा यांनी लेखी उत्तर जिल्हा ग्राहक आयोगा समक्ष दाखल केले. त्यांनी मृतकाची बॅंके कडून कर्जा संबधीची विमा पॉलिसी होती आणि विम्याची रक्कम रुपये-3,00,000/- होती या बाबी मान्य केल्यात. मृतकाचे त्यांचे बॅंके मध्ये कर्ज खाते क्रं-002402020000068 होते असे नमुद केले. विरुध्दपक्ष क्रं 3 विमा कंपनीने दिनांक-18.08.2020 रोजी कायम चालक परवाना दिला नसल्याचे कारणा वरुन खारीज केला होता. त्यांनी तक्रारकर्तीला कोणतीही दोषपूर्ण सेवा दिलेली नाही असे नमुद केले.
04. विरुदपक्ष क्रं 2 शाखा प्रबंधक, अर्बन को ऑपरेटीव्ह बॅंक मर्यादित, मूळ शाखा भंडारा यांना संधी देऊनही त्यांनी लेखी उत्तर दाखल केले नाही करीता विरुदपक्ष क्रं 2 यांचे विरुध्द त्यांचे बिला लेखी जबाबा शिवाय तक्रार पुढे चालविण्याचा आदेश प्रकरणात दिनांक-17.11.2021 रोजी जिल्हा ग्राहक आयोगाव्दारे पारीत करण्यात आला.
05. विरुध्दपक्ष क्रं 3 इफको टोकीयो जनरल इनशुरन्स कंपनीने लेखी उत्तर जिल्हा ग्राहक आयोगा समक्ष दाखल केले. मृतक श्री अंबादास दिनुजी भोयर याने विरुध्दपक्ष क्रं 1 भंडारा अर्बन को ऑपरेटीव्ह बॅंक, शाखा वडसा, तालुका आरमोरी, जिल्हा गडचिरोली यांचे मार्फतीने विरुध्दपक्ष क्रं 3 विमा कंपनी कडून समूह व्यक्तीगत विमा पॉलिसी काढली होती. सदर विमा पॉलिसीचा क्रं-54382594 असा असून विमा पॉलिसीचा कालावधी हा दिनांक-09.12.2018 ते दिनांक-08.12.2019 असा होता व सदर विमा पॉलिसीचा वार्षिक हप्ता रुपये-276/- होता या बाबी मान्य केल्यात. सदर विमा पॉलिसी मध्ये विमाधारक म्हणून विरुध्दपक्ष क्रं 2 भंडारा अर्बन को ऑपरेटीव्ह बॅंक भंडारा यांचे नाव आहे. तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष क्रं 1 व क्रं 2 बॅंके मधून घेतलेल्या कर्जा संबधी विरुध्दपक्ष क्रं 3 यांचा कोणताही संबध नाही. मृतक हा विरुध्दपक्ष क्रं 3 विमा कंपनीचा ग्राहक नाही कारण विमा पॉलिसी विरुध्दपक्ष क्रं 2 बॅंकेनी काढलेली आहे व विमा पॉलिसी मध्ये विमाधारक म्हणून बॅंकेचे नाव आहे. मृतकाने विरुध्दपक्ष क्रं 1 व क्रं 2 बॅंके मधून एकूण रुपये-3,00,000/- कर्ज घेतले होते आणि कर्ज रकमेच्या सुरक्षितते करीता विरुध्दपक्ष क्रं 3 विमा कंपनी कडून विमा पॉलिसी काढली होती. मृतका जवळ अपघाताचे वेळी दुचाकी मोटर सायकल चालविण्याचा कायम चालक परवाना नव्हता तरीही मृतकाने वाहन चालविले आणि अपघात घडला ,त्यामुळे विमा पॉलिसीतील अटी व शर्तीचा भंग झाला, त्यामुळे विमा राशी देण्यास विरुध्दपक्षक्रं 3 विमा कंपनी जबाबदार नाही.विरुध्दपक्ष क्रं3 विमा कंपनीने दिनांक-11.12.2019, दिनांक-09.01.2020, दिनंक-21.01.2020, दिनांक-05.02.2020, दिनांक-24.02.2020 आणि दिनांक-16.03.2020 अशा तारखांना सातत्याने विरुध्दपक्ष क्रं 2 बॅंके कडे पत्रव्यवहार करुन मृतकाचे कायम दुचाकी वाहन चालक परवान्याची मागणी केली परंतु वैध कायम चालक परवाना सादर केला नाही. मागणी केलेल्या दस्तऐवजाची पुर्तता न झाल्यामुळे विरुध्दपक्ष क्रं 3 विमा कंपनीने दिनांक-18.08.2020 रोजीचे पत्रा नुसार विमा दावा बंद केला. विरुध्दपक्षक्रं3 विमा कंपनीने तक्रारदारांना कोणतीही दोषपूर्ण सेवा दिलेली नाही. सबब तक्रारदारांची तक्रार खर्चासह खारीज व्हावी अशी विनंती केली.
06. तक्रारदारांची तक्रार, शपथे वरील पुरावा व दाखल दस्तऐवज, विरुध्दपक्ष क्रं 3 चे लेखी उत्तर व लेखी युक्तीवाद याचे अवलोकन करण्यात आले तसेच तक्रारदारां तर्फे अधिवक्ता श्री एम.जी. हरडे आणि विरुध्दपक्ष क्रं 3 इफको टोकीयो जनरल इन्शुरन्स कंपनी तर्फे अधिवक्ता श्री क्षिरसागर यांचा मौखीक युक्तीवाद ऐकण्यात आला, यावरुन जिल्हा ग्राहक आयोगा समोर खालील मुद्दे न्याय निवारणार्थ उपस्थित होतात-
अक्रं | मुद्दा | उत्तर |
1 | तक्रारदार हे विरुध्दपक्ष क्रं 3 विमा कंपनीचे ग्राहक आहेत काय? | -होय- |
| | |
2 | विरुध्दपक्ष क्रं 3 विमा कंपनीने मृतकाचा विमा दावा नाकारुन तक्रारदारांना दोषपूर्ण सेवा दिल्याची बाब सिध्द होते काय? | -होय- |
3 | काय आदेश | अंतीम आदेशा नुसार |
मुद्दा क्रं 1 ते क्रं 3 बाबत-
07 प्रस्तुत तक्रारी मध्ये तक्रारकर्ती क्रं 1 ही मृतक विमाधारक अंबादास दिनाजी भोयर याची पत्नी असून वर नमुद तक्रारदार क्रं 2 ते 4 ही त्यांची अपत्ये आहेत. सदर नमुद तक्रारदार हे मृतकाचे कायदेशीर वारसदार असल्यामुळे लाभार्थी म्हणून विरुध्दपक्ष क्रं 3 विमा कंपनीचे ग्राहक होतात. विरुध्दपक्ष क्रं 3 विमा कंपनीचे असे म्हणणे आहे की, त्यांचे कडून जी समूह व्यक्तीगत अपघात विमा पॉलिसी काढल्या गेली होती, ती विरुध्दपक्ष क्रं 2 बॅंकेचे नावे होती, त्यांचा मृतकाशी कोणताही संबध येत नाही त्यामुळे तक्रारदार हे त्यांचे ग्राहक होत नाहीत. या संबधात जिल्हा ग्राहक आयोगाव्दारे स्पष्ट करण्यात येते की, श्री अंबादास दिनुजी भोयर याने तो हयातीत असताना विरुध्दपक्ष क्रं 1 बॅंकेच्या शाखेतून दिनांक-18.12.2015 रोजी रुपये-3,00,000/- एवढया रकमेचे कर्ज घेतलेले असल्यामुळे कर्ज रकमेच्या सुरक्षितेसाठी विरुध्दपक्ष क्रं 1 बॅंकेनी विरुध्दपक्ष क्रं 3 विमा कंपनी कडून
समूह वैयक्तिक अपघात विमा पॉलिसी काढली होती. सदर विमा पॉलिसीचा वार्षिक हप्ता रुपये-276/- होता आणि सदर विम्याचे हप्त्यांची रक्क्कम मृतकाचे कर्ज खात्यातून कपात होत होती त्यामुळे मृतक हा विरुध्दपक्ष क्रं 3 विमा कंपनीचा ग्राहक होतो असे जिल्हा ग्राहक आयोगाचे स्पष्ट मत आहे त्यामुळे आम्ही मुद्दा क्रं 1 चे उत्तर होकारार्थी नोंदवित आहोत.
08. अभिलेखावरील दाखल दस्तऐवजा वरुन असे दिसून येते की, मृतक विमाधारक श्री अंबादास दिनाजी भोयर याने विरुध्दपक्ष क्रं 1 बॅंकेच्या वडसा, जिलहा गडचिरोली शाखे मधून कर्ज घेतले होते आणि त्या कर्जाचे सुरक्षितेसाठी विरुध्दपक्ष क्रं 1 बॅंकेच्या शाखेचे मार्फतीने विरुध्दपक्ष क्रं 3 विमा कंपनी कडून काढली होती आणि विम्याचे वार्षिक हप्त्यांची रक्कम परस्पर मृतकाचे बॅंक खात्यामधून कपात होऊन विरुध्दपक्ष क्रं 3 विमा कंपनीला मिळत होती असे खात्यामधील नोंदी वरुन सिध्द होते. पोलीस स्टेशन आरमोरी, जिल्हा गडचिरोली यांचे प्रथम दर्शनी अहवाल, घटनास्थळ पंचनामा, इन्क्वेस्ट पंचनामा यावरुन मृतकाचा मोटर सायकल वरुन अपघात झाला होता असे स्पष्ट होते. मृतकाचा अपघात होताना पाहणारा कोणीही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नाही. मृतक अपघाताचे वेळी त्याचे वाहन निष्काळजीपणाने, जलद गतीने, नशा घेऊन चालवित होता त्यामुळे त्याचा अपघात झाला असे पोलीस दस्तऐवज मध्ये कुठेही नमुद नाही.
09. तक्रारकर्तीने दाखल केलेल्या विमा पॉलिसी प्रमाणे विरुध्दपक्षक्रं 2 भंडारा अर्बन को ऑपरेटीव्ह बॅंक भंडारा यांचे नावे विरुध्दपक्ष क्रं 3 विमा कंपनी कडून समूह व्यक्तीगत विमा पॉलिसी काढलेली असून. सदर विमा पॉलिसीचा क्रं-54382594 असा आहे. विमा पॉलिसीचा कालावधी हा दिनांक-09.12.2018 ते दिनांक-08.12.2019 असा आहे. श्री अंबादास दिनुजी भोयर याने तो हयातीत असताना विरुध्दपक्ष क्रं 1 बॅंकेचया शाखेतून दिनांक-18.12.2015 रोजी रुपये-3,00,000/- एवढया रकमेचे कर्ज घेतलेले असल्यामुळे कर्ज रकमेच्या सुरक्षितेसाठी विरुध्दपक्ष क्रं 1 बॅंकेनी विरुध्दपक्ष क्रं 3 विमा कंपनी कडून समूह वैयक्तिक अपघात विमा पॉलिसी काढली होती. सदर विमा पॉलिसीचा वार्षिक हप्ता रुपये-276/- होता आणि सदर विम्याचे हप्त्यांची रक्क्कम मृतकाचे कर्ज खात्यातून कपात होत होती. सदर विमा पॉलिसी मध्ये मृतकाचे नाव अक्रं-3454 वर दर्शविले असून त्याचे नावा समोर विमा राशी रुपये-3,00,000/- नमुद आहे. सदर विमा पॉलिसी मध्ये अपघाती मृत्यू मुळे संपूर्ण विमा राशी देय असल्याचे सुध्दा नमुद आहे. सदर विमा पॉलिसी मध्ये आत्महत्या, नशापाणी, एच.आय.व्ही. आजार इत्यादी कारणामुळे विमा राशी देय नसल्याचे नमुद आहे परंतु विमा पॉलिसी मध्ये अपघाती मृत्यू झाल्यास मृतकाची कायमस्वरुपी वाहन चालक परवाना प्रत दाखल करावी लागेल असे कुठेही नमुद नाही.
10. मृतका जवळ अपघाताचे वेळी वैध चालक परवाना नव्हता हे पाहण्या ऐवजी अपघाताचे वेळी मृतक विमाधारक हा त्याचे वाहन निष्काळजीपणे चालवित होता काय आणि त्याचे स्वतःचे निषकाळजीपणाने अपघात झाला होता हे विमा कंपनीने विमा दावा निश्चीत करताना पाहणे आवश्यक आहे असे वेळोवेळी मा.वरिष्ठ न्यायालयांनी स्पष्ट केलेले आहे. या संदर्भात जिल्हा ग्राहक आयोगाव्दारे खालील मा. उच्च न्यायालय, मुंबई खंडपिठ औरंगाबाद यांनी दिलेल्या निवाडयावर भिस्त ठेवण्यात येते-
- WRIT PETITON NO.-2420 OF 2018-BHAGUBAI DEVIDAS JAVLE-VERSUS-THE STATE OF MAHARASHTRA & ANOTHER
सदर निवाडयात मा. उच्च न्यायालयाने शेतकरी अपघात विमा योजना ही मृतक शेतक-यांच्या वारसदारांना नुकसान भरपाई देण्यात यावी यासाठी सुरु केलेली आहे. एफ.आय.आर. वरुन असे दिसून येते की, वाहन चालविण्या-या शेतक-या विरुध्द तो वाहन चालक परवाना नसताना वाहन चालवित होता असा कोणताही गुन्हा नोंद केलेला नाही. प्रथम दर्शनी असे दिसून येते की, महाराष्ट्र शासनाचे परिपत्रकातील अट क्रं 21 नुसार अपघातग्रस्त शेतक-या जवळ अपघाताचे वेळी वैध वाहन चालक परवाना असणे ही अट बंधनकारक नसल्याचा निष्कर्ष मा. उच्च न्यायालयाने काढला. कारण ही योजना सामाजिक दायीत्वाचे तत्वावर शासनाने तयार केलेली आहे.
- WRIT PETITON NO.-10185 OF 2015-LATABAI RAOSAHEB DESHMUKH-VERSUS-THE STATE OF MAHARASHTRA & ANOTHER
सदर निवाडया मध्ये मा. उच्च न्यायालयाने स्पष्ट केले की, मृतक शेतक-याची मोटर सायकल ही रस्त्याच्या उजव्या बाजूला सापडली आणि मृतक शेतक-याच्या दोषामुळे अपघात झाला होता असे कुठेही दस्तऐवजा मध्ये नमुद नाही.
- HON’BLE MAHARASHTRA STATE CONSUMER DISPUTE REDRESSAL COMMISSION MUMBAI, BENCH AT AURANGABAD- FIRST APPEAL NO. 1126 OF 2019 DATE OF ORDER -05/10/2021- “THE ORIENTAL INSURANCE COMPANY LTD.-VERSUS-SMT.GANGUBAI VISHNU SHINDE & OTHERS”
सदर निवाडया मध्ये मा. राज्य ग्राहक आयोगाने स्पष्ट नमुद केले की, पोलीसांनी नोंदविलेल्या एफ.आय.आर. वरुन आणि पोलीस दस्तऐवजावरुन असे दिसून येते की, जो काही अपघात झालेला आहे तो अज्ञात वाहनचालकाने दोषपूर्ण वाहन चालविल्यामुळे झालेला आहे. महाराष्ट्र शासनाचे दिनांक-04.12.2009 चे परिपत्रकातील अट क्रं 21 नुसार अपघातग्रस्त शेतक-या जवळ अपघाताचे वेळी वैध वाहन चालक परवाना असणे ही अट बंधनकारक नसल्याचा निष्कर्ष मा. राज्य ग्राहक आयोगाने काढला.
- HON’BLE MAHARASHTRA STATE CONSUMER DISPUTE REDRESSAL COMMISSION MUMBAI, BENCH AT AURANGABAD- FIRST APPEAL NO. 200 OF 2018 DATE OF ORDER -27/09/2021- THE NATIONAL INSURANCE COMPANY-VERSUS-SUNDHUBAI HAMBIRRAO NAGNE & OTHERS.
सदर निवाडया मध्ये मा. राज्य ग्राहक आयोगाने स्पष्टपणे नमुद केले की, जो काही अपघात झालेला आहे तो मृतक शेतक-याजवळ वैध चालक परवाना नव्हता या कारणामुळे झालेला नाही तसेच सदर निवाडया मध्ये मा. राज्य ग्राहक आयोगाने मा. सर्वोच्च न्यायालयाचे पुढील निवाडयावर भिस्त ठेवली- In the case in hand it is quite apparent that, the accident is not occurred for want of valid license of the deceased. Not having license is not the cause of accident. Hence , the complainant rightly relied upon the Judgement of Hon’ble Apex Court in 2004 (5) ALL MR (SC) 251 (Supreme Court) in National Insurance
Company Ltd.-Vs. Swaran Singh stated Supra. But the accident occurred due to the fault on the part of driver of offending vehicle and the offence is also registered against him. Therefore, in the case in hand repudiating the claim on the ground that, the driver was not having valid and effective driving license at the time of accident, amounts to deficiency in service on the part of opponent Insurance Company.
आमचे समोरील हातातील प्रकरणात मृतक मोटर सायकल चालवित असताना त्याचा अपघाती मृत्यू झालेला आहे.
- HON’BLE MAHARASHTRA STATE CONSUMER DISPUTE REDRESSAL COMMISSION MUMBAI, BENCH AT AURANGABAD- FIRST APPEAL NO. 158 OF 2020 DATE OF ORDER -24/11/2021- THE ORIENTAL INSURANCE COMPANY-VERSUS-SMT. GAYABAI APPASAHEB JADHAV & OTHERS.
सदर निवाडया मध्ये मा. उच्च न्यायालयाचे WRIT PETITON NO.-10185 OF 2015-LATABAI RAOSAHEB DESHMUKH-VERSUS-THE STATE OF MAHARASHTRA & ANOTHER या निवाडयाचा आधार घेऊन पुढे नमुद केले की, Wherein the Hon’ble High Court observed that, there was nothing to infer that accident was occurred due to fault of deceased, and to reject the claim. Insurance Company has committed deficiency in service mistaken in rejecting claim. In view of the scheme introduced for benefit of farmers, as seen in GR of 2009 is binding on the insurance company. This court hold that, compensation needs to be given to the petitioner and interest also to be paid, as provided in GR of 2009.
उपरोक्त नमुद मा. वरिष्ठ न्यायालयांचे न्यायनिवाडे आमचे समोरील हातातील प्रकरणात लागू पडतात. त्यामुळे आम्ही असा निष्कर्ष काढीत आहोत की, विरुध्दपक्ष क्रं 3 विमा कंपनीने तक्रारकर्तीचा विमा दावा नाकारुन दोषपूर्ण सेवा दिल्याची बाब सिध्द होते आणि त्यामुळे आम्ही मुद्दा क्रं 2 चे उत्तर होकारार्थी नोंदवित आहोत.
11. विरुध्दपक्ष क्रं 3 तर्फे वकील श्री सी.जी. क्षिरसागर यांनी खालील मा. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायनिवाडयाची प्रत दाखल केली-
Hon’ble Supreme Court of India- Civil Appeal No. 1537 of 2009- Bhuwan Singh-Versus-M/s Oriental Insurance Company Ltd. & Anr.Order dated-10th July, 2009
The question as to whether the appellant was holding a valid licence or not was within his knowledge. The driver was to show that he held licence in respect of the vehicle for which he had filed an application. Filing of an application and grant thereof would therefore are pre-requisite for holding a valid and effective license. As on 05/01//2001 the appellant was not duly licensed as his learner’s license expired on 22/12/2000. He filed an application for grant of licence much later. Insurance company, therefore in our opinion was not bound to reimburse him in terms of the Contract of Insurance.
सदर मा. सर्वोच्च न्यायालयाचे निवाडयाचे आम्ही वाचन केले, सदर निवाडया प्रमाणे याचीकाकर्ता/मूळ तक्रारकर्ता श्री भुवन सिंग हा अपघाताचे वेळी विमाकृत ट्रॅक्टर चालविता होता आणि त्याने प्राश हरीश्चंद्र गुब्बर याचे मोटरसायकलला धडक दिल्याने तो जागेवरच मृत झाला होता. याचीकाकर्ता याचे जवळील लर्नर लायसन दिनांक-22.12.2000 रोजी समाप्त झाले होते आणि अपघात हा दिनांक-05.01.2001 रोजी झाला होता आणि त्याने अपघात झाल्या नंतर लायसन मिळण्यासाठी अर्ज दाखल केला होता अशापरिस्थितीत विमा कंपनी ही विमा दाव्याची रक्कम देण्यास बाध्य नाही असे नमुद केलेले आहे.
मा.सर्वोच्च न्यायालया समोरील निवाडया मध्ये याचीकाकर्त्याने ट्रॅक्टरची धडक मोटर सायकलला दिल्याने अपघात झाला होता त्यामुळे याचीकाकर्त्या जवळ अपघाताचे वेळी वैध वाहन चालक परवाना होता काय हा प्रश्न उपस्थित झाला होता. आमचे समोरील हातातील प्रकरणात तक्रारकर्तीचे पतीचे निःष्काळजीपणामुळे अपघात होऊन तो मृत झाला होता असा कोणताही पुरावा पोलीस दस्तऐवजा वरुन दिसून येत नाही त्यामुळे सदर मा. सर्वोच्च न्यायालयाचे निवाडयाचा उपयोग विरुध्दपक्ष विमा कंपनीचे वकीलांना होणार नाही असे जिल्हा ग्राहक आयोगाचे मत आहे.
12. उपरोक्त नमुद मा. वरिष्ठ न्यायालयाचे निवाडयां प्रमाणे तसेच विमा पॉलिसी मध्ये विमाधारकाचा अपघाती मृत्यू झाल्यास कायम चालक परवाना सादर करण्याची कोणतीही अट नमुद नसताना विरुध्दपक्ष क्रं 3 विमा कंपनीने तक्रारकर्तीला विनाकारण आज पर्यंत विमा दाव्याची रक्कम न देऊन दोषपूर्ण सेवा दिल्याची बाब सिध्द होते आणि म्हणून आम्ही मुद्दा क्रं 2 चे उत्तर होकारार्थी नोंदवित आहोत. मुद्दा क्रं 1 व 2 चे उत्तर होकारार्थी आल्याने मुद्दा क्रं 3 अनुसार तक्रारदारांची तक्रार मंजूर होण्यास पात्र आहे असे जिल्हा ग्राहक आयोगाचे मत आहे.
13. सदर प्रकरणात जिल्हा ग्राहक आयोगाव्दारे प्रकर्षाने स्पष्ट करणे आवश्यक आहे की, मृतकाने विरुध्दपक्ष क्रं 1 बॅंकेच्या शाखे मधून कर्ज घेतले होते आणि ते कर्ज प्रलंबित आहे असे तक्रारकर्तीने विरुध्दपक्ष क्रं 1 बॅंकेला दिनांक-17.03.2020 रोजीचे पत्रा वरुन दिसून येते, त्यामध्ये तिने विरुध्दपक्ष क्रं 3 विमा कंपनी कडून प्राप्त विमा रकमे मधून तिचे पतीचे कर्ज रकमेचे समायोजन करावे अशी विनंती केलेली आहे. तसेच तिला डॉयरेक्टर ऑफ इन्शुरन्स महाराष्ट्र स्टेट मुंबई यांचे कडून रुपये-10,000,00/- आणि युनायटेड इंडीया इन्शुरन्स कंपनी कडून विमा रकमा प्राप्त झाल्याचे तिने दाखल केलेल्या प्रतीवरुन तसेच तक्रारी मध्ये तिने नमुद केल्या प्रमाणे दिसून येते. अशी स्थिती असताना तिने तिचे पतीची विरुध्दपक्ष क्रं 1 बॅंके कडून घेतलेलया थकीत कर्जाची रक्कम व्याजासह भरणे आवश्यक होते परंतु तिने आज पर्यंत तसे केलेले नाही वा अशी थकीत कर्ज रक्कम व व्याजाची रक्कम भरल्याचे तिचे म्हणणे सुध्दा नाही. अशा परिस्थितीत विरुध्दपक्ष क्रं 3 विमा कंपनी कडून मिळणा-या रकमां मधून विरुध्दपक्ष क्रं 1 बॅंकेचे शाखे मधून दिलेल्या कर्ज रकमेचे व्याजासह समजायोजन होणे आवश्यक आहे असे जिल्हा ग्राहक आयोगाचे मत आहे. विरुध्दपक्ष क्रं 1 व क्रं 2 बॅंके कडून मृतकाने कर्ज घेतलेले असल्यामुळे आणि विरुध्दपक्ष क्रं 2 बॅंकेच्या मार्फतीने विरुध्दपक्षक्रं 3 विमा कंपनी कडून विमा काढलेला असल्याने त्यांना तक्रारदारांनी तक्रारीमध्ये औपचारीक प्रतिपक्ष केलेले आहे करीता विरुध्दपक्ष क्रं 1 व क्रं 2 बॅंके विरुध्दची तक्रार खारीज होण्यास पात्र आहे असे जिल्हा ग्राहक आयोगाचे मत आहे.
14 उपरोक्त नमुद सर्व वस्तुस्थितीचा विचार करता तक्रारदारांची तक्रार विरुध्दपक्ष क्रं 3 विमा कंपनी विरुध्द मंजूर होण्यास पात्र आहे. विरुध्दपक्ष क्रं 3 विमा कंपनीने उपरोक्त नमुद तक्रारदारांना मृतक श्री अंबादास दिनाजी भोयर यांचे अपघाती मृत्यू संबधात समूह वैयक्तिक अपघात विमा पॉलिसीचा क्रं-54382594 अनुसार देय विमा रक्कम रुपये-3,00,000/- तक्रारदारांना दयावी आणि सदर रकमेवर विमाधारक श्री अंबादास दिनाजी भोयर याचा मृत्यू दिनांक-18.09.2019 पासून विमा दावा निश्चीतीसाठी 03 महिन्याचा कालावधी सोडून म्हणजे दिनांक-18.12.2019 पासून ते रकमेच्या प्रत्यक्ष अदायगी पावेतो द.सा.द.शे.-12 टक्के दराने व्याज दयावे त्याचबरोबर तक्रारदारांना झालेल्या शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल नुकसान भरपाई म्हणून रुपये-10,000/- आणि तक्रारीचा खर्च रुपये-10,000/- अशा रकमा विरुध्दपक्ष क्रं 3 विमा कंपनी कडून मंजूर करणे योग्य व न्यायोचित होईल असे जिल्हा ग्राहक आयोगाचे मत आहे.
15. उपरोक्त नमुद वस्तुस्थितीचा विचार करुन आम्ही प्रस्तुत तक्रारी मध्ये खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत-
::अंतिम आदेश::
- तक्रारदारांची तक्रार विरुध्दपक्ष क्रं 3 इफको टोकीयो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड नोंदणीकृत कार्यालय इफको, सदन सी-1, जिल्हा सेंटर साकेत, नवि दिल्ली-11007 तर्फे प्रबंधक यांचे यांचे विरुध्द खालील प्रमाणे अंशतः मंजूर करण्यात येते.
- विरुध्दपक्ष क्रं 3 इफको टोकीयो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, नवि दिल्ली तर्फे प्रबंधक यांना आदेशित करण्यात येते की, त्यांनी विमाधारक श्री अंबादास दिनाजी भोयर यांचे अपघाती मृत्यू संबधात समूह वैयक्तिकअपघात विमा पॉलिसीचा क्रं-54382594 अनुसार देय विमा रक्कम रुपये-3,00,000/- (अक्षरी रुपये तीन लक्ष फक्त) आणि सदर विमा रकमेवर दिनांक-18.12.2019 पासून ते रकमेच्या प्रत्यक्ष अदायगी पावेतो द.सा.द.शे.-12 टक्के दराने व्याज यासह येणारी रक्कम विरुध्दपक्ष क्रं 2 भंडारा अर्बन को ऑपरेटीव्ह बॅंक मर्यादित मुख्य शाखा भंडारा यांचे मार्फतीने तक्रारदारांना दयावी.
- तक्रारदारांना झालेल्या शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल रुपये-10,000/- (अक्षरी रुपये दहा हजार फक्त) आणि प्रस्तुत तक्रारीचा खर्च रुपये-10,000/- (अक्षरी रुपये दहा हजार फक्त) अशा नुकसान भरपाईच्या रकमा विरुध्दपक्ष क्रं 3 इफको टोकीयो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, नवि दिल्ली तर्फे प्रबंधक यांनी विरुध्दपक्ष क्रं 2 भंडारा अर्बन को ऑपरेटीव्ह बॅंक मर्यादित मुख्य शाखा भंडारा यांचे मार्फतीने तक्रारदारांना दयाव्यात.
- विरुध्दपक्ष क्रं 1 व क्रं 2 अनुक्रमे भंडारा अर्बन को ऑपरेटीव्हबॅंक, शाखा वडसा जिल्हा गडचिरोली आणि भंडारा अर्बन को ऑपरेटीव्ह बॅंक, मुख्य शाखा भंडारा यांचे विरुध्दची तक्रार खारीज करण्यात येते.
- विरुध्दपक्ष क्रं 1 व क्रं 2 बॅंकेला आदेशित करण्यात येते की, त्यांनी मृतक श्री अंबादास दिनाजी भोयर याचे कडे हिशोबाचे दिनांकापर्यंत (हिशोबाचा दिनांक म्हणजे ज्या दिवशी विरुध्दपक्ष क्रं 1 व क्रं 2 बॅंक तक्रारकर्तीचे मृतक पतीचे कर्जाचा अंतीम हिशोब करेल तो दिनांक असे समजावे) मूळ कर्ज व कर्जावरील व्याजाची किती रक्कम आहे याचा लेखी हिशोब तक्रारदारांना दयावा. विरुध्दपक्ष क्रं 3 विमा कंपनी कडून अंतीम आदेशातील अक्रं 2 व क्रं 3 मध्ये नमुद केलेल्या आदेशित रकमा विरुध्दपक्ष क्रं 2 बॅंकेला प्राप्त झाल्या नंतर मृतक श्री अंबादास दिनाजी भोयर याचेकडून त्यांना हिशोब दिनांका पर्यंत घेणे असलेली मूळ कर्जाची व कर्जावरील व्याजाची रक्कम याचे योग्य ते समायोजन विरुध्दपक्ष क्रं 3 विमा कंपनी कडून जिल्हा ग्राहक आयोगाचे आदेशा प्रमाणे प्राप्त झालेल्या रकमां मधून करावे आणि असे समायोजन केल्या नंतर काही रक्कम शिल्लक राहत असल्यास उर्वरीत रक्कम तक्रारदारांना परत करावी. तसेच विरुध्दपक्ष क्रं 1 बॅंके मधून मृतकाने उचलेल्या कर्ज रकमे संबधाने हिशोबाचे दिनांका पर्यंत थकीत मूळ कर्ज व थकीत व्याजाची संपूर्ण रक्कम प्राप्त झाल्या नंतर विरुध्दपक्ष क्रं 2 बॅंकेनी तक्रारकर्ती क्रं 1 ला मृतकाचे कर्जा संबधात कर्ज निरंक दाखला दयावा.
- तक्रारदारांना आदेशित करण्यात येते की, त्यांनी विरुध्दपक्ष क्रं 1 व क्रं 2 बॅंकेला तसेच विरुध्दपक्ष क्रं 3 विमा कंपनीला योग्य ते सहकार्य करावे आणि मृतक श्री अंबादास दिनाजी भोयर यांची विरुध्दपक्ष क्रं 1 व क्रं 2 बॅंकेच्या हिशोबाचे दिनांका पर्यंत थकीत कर्ज व थकीत व्याजाची रक्कम परतफेड जिल्हा ग्राहक आयोगाचे आदेशाप्रमाणे विरुध्दपक्ष क्रं 3 विमा कंपनी कडून प्राप्त झालेल्या रकमांमधून विरुध्दपक्ष क्रं 1 व क्रं 2 बॅंके मध्ये होईल याचे अनुपालन करावे.
- सदर आदेशाचे अनुपालन विरुध्दपक्ष क्रं 3 इफको टोकीयो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, नवि दिल्ली तर्फे प्रबंधक यांनी विरुध्दपक्ष क्रं 2 भंडारा अर्बन को ऑपरेटीव्ह बॅंक मर्यादित मुख्य शाखा भंडारा यांचे मार्फतीने सदर निकालपत्राची प्रथम प्रमाणित प्रत प्राप्त झाल्याचे दिनांका पासून 45 दिवसांचे आत करावे.
- निकालपत्राच्या प्रथम प्रमाणित प्रती सर्व पक्षकांराना निःशुल्क उपलब्ध करुन देण्यात याव्यात.
- सर्व पक्षकारांनी अतिरिक्त संच जिल्हा आयोगाचे कार्यालयातून परत घेऊन जावेत.