(पारीत व्दारा श्रीमती वृषाली गौ.जागीरदार मा.सदस्या)
(पारीत दिनांक – 25 मार्च, 2019)
01. तक्रारदाराने प्रस्तूत तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 12 खाली विरुध्द पक्षाविरुध्द दाखल केलेली आहे.
02. तक्रारीचा थोडक्यात आशय खालील प्रमाणे-
तक्रारकर्ता उपरोक्त नमुद पत्त्यावर राहत असून त्याने विरुध्द पक्ष यांचेकडून दिनांक 28/01/2016 रोजी ‘अमुल्य जीवन’ नावाची पॉलीसी क्रं. 979327218 (टर्म प्लॉन) असलेली पॉलीसी रुपये 25,00,000/- (अक्षरी रुपये पंचवीस लाख फक्त) विकत घेतली, परंतु सदर पॉलीसीचे मुळ दस्ताऐवज विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याला रजिष्टर्ड पोस्टाद्वारे मिळाली नसल्याने दिनांक 31/03/2017, 07/07/2017, 23/08/2017 व दिनांक 17/09/2017 या अर्जाद्वारे तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षाकडे मागणी केली व विरुध्द पक्षाचे व्यवस्थापक यांची प्रत्यक्षात भेट घेतली, परंतु त्यांच्याकडून तक्रारकर्त्याचे कोणतेही समाधान करण्यात आलेले नाही.
तक्रारकर्त्याने पुढे असे नमुद केले की, विरुध्द पक्षाच्या चुकीमुळे तक्रारकर्त्याची पॉलीसी दिनांक 29/08/2017 रोजी बंद करण्यात आली. तक्रारकर्त्याने शेवटची नोटीस दिनांक 17/09/2017 रोजी विरुध्द पक्ष यांना दिली. सदर नोटीस विरुध्द पक्ष यांना मिळूनही त्यांनी सदर नोटीसला उत्तर दिलेले नाही. तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षाकडून विकत घेतलेली मुळ पॉलीसी मिळालेली नसल्यामुळे या मंचात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीव्दारे मागणी केली की, विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याची बंद केलेली पॉलीसी पूर्ववत सुरु ठेवावी आणि तक्रारकर्त्याने विकत घेतलेल्या पॉलीसीचे मुळ दस्ताऐवज देण्यात यावे तसेच तक्रारकर्त्याला झालेल्या शारीरीक व मानसिक त्रासापोटी रुपये 10,000/- आणि तक्रारखर्च रुपये-2,000/- मिळावे अशी मागणी केलेली आहे.
03. विरुध्दपक्ष विमा कंपनी तर्फे मंचासमक्ष दाखल केलेल्या लेखी उत्तरात नमुद केले की, तक्रारकर्त्याने दिनांक 28/01/2016 रोजी अमुल्य जीवन-II नावाची पॉलीसी रुपये 25,00,000/- (अक्षरी रुपये पंचवीस लाख फक्त) पॉलीसी क्रं. 979327218 घेतली होती व विरुध्द पक्षाने दिनांक 25/04/2016 रोजी स्पीड पोस्ट नं. EM466283921IN द्वारे तक्रारकर्त्याच्या न्यु फ्रेन्ड्स कॉलनी, श्रध्दा पेठ, खात रोड, भंडारा या पत्त्यावर पॉलीसी पाठविलेली होती ही बाब मान्य केलेली आहे. तक्रारकर्त्याच्या तक्रारीस आक्षेप नमुद करुन तक्रारीतील इतर परिच्छेद निहाय कथन अमान्य केले आहे.
विरुध्द पक्षाने विशेष कथनात नमुद केले की, सदर पॉलीसीचे विमा हप्ते तक्रारकर्त्याने दिनांक 27/07/2016 व 07/02/2017 रोजी अर्धवार्षिक प्रिमीयम एकूण रुपये 10,148/- भरलेले आहेत. तक्रारकर्त्याला जर पॉलीसी मिळाली नव्हती तर लगेच विरुध्द पक्षाकडे विमा पॉलीसी मिळाली नसल्याबाबतची मागणी करायला पाहिजे होती, परंतु तक्रारकर्त्याने जवळ-जवळ एक वर्षानंतर पॉलीसी न मिळाल्याबाबत दिनांक 31/03/2017 रोजी व त्यानंतरचे पत्र पाठवून विचारण केली आहे. तक्रारकर्त्याने विरुध्द पक्ष यांना दिलेल्या पत्रामध्ये कुठेही पॉलीसी क्रमांकाचा उल्लेख केलेला नाही. विरुध्द पक्षाकडे सर्व रेकॉर्ड हे पॉलीसी क्रमांकानुसार असतात. तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षाकडे दिलेल्या पत्रात पॉलीसी क्रमांक नमुद नसल्यामुळे तक्रारकर्त्याच्या तक्रारीचे निराकरण विरुध्द पक्ष करु शकले नाही.
विरुध्द पक्षाने पुढे असे नमुद केले आहे की, विरुध्द पक्ष हे तक्रारकर्त्याला दुय्यम प्रत देण्यास आजही तयार आहे, परंतु विमा पॉलीसीच्या अटी व शर्तीनुसार लागणारे दस्ताऐवज व खर्च तक्रारकर्त्याला करावा लागेल. तसेच बंद पडलेली पॉलीसी पुर्नजीवीत करण्यासाठी तक्रारकर्त्याला पॉलीसीच्या अटी व शर्तीनुसार वैद्यकीय अहवालाच्या आधारावर पात्र ठरल्यास दिनांक 28/07/2017 पासून दोन वर्षाच्या आत पॉलीसी पूर्ववत सुरु करता येईल. म्हणजेच दिनांक 27/07/2019 पर्यंतच पॉलीसी पुर्नजीवीत केल्या जावू शकते. तक्रारकर्त्याने स्वतःहून पॉलीसीचे प्रिमीयम भरणे बंद केल्यामुळे पॉलीसी बंद झाली आहे आणि विरुध्द पक्षाने कोणतीही चूक केलेली नसल्यामुळे तक्रारकर्त्याची तक्रार दंडासहीत खारीज होण्यास पात्र आहे अशी विनंती विरुध्द पक्ष विमा कंपनी तर्फे करण्यात आली.
04. तक्रारकर्त्याने तक्रारीचे पृष्टयर्थ दस्तऐवज यादी पृष्ठ क्रं- 05 नुसार एकूण-09 दस्तऐवजाच्या प्रती दाखल केल्या असून ज्यामध्ये कुरिअर पोचपावती, विरुध्द पक्षाला दिलेले पत्र व पोचपावत्या, अशा दस्तऐवजाच्या प्रतीचा समावेश आहे. पृष्ठ क्रं- 31 वर तक्रारकर्त्याने शपथेवरील पुरावा दाखल केला असून, पृष्ठ क्रं- 38 नुसार तक्रारकर्त्याने लेखी युक्तीवाद दाखल केला आहे.
05. विरुध्दपक्ष विमा कंपनी तर्फे लेखी उत्तर दाखल करण्यात आले. विरुध्दपक्ष विमा कंपनी तर्फे पुराव्या दाखल पृष्ठ क्रं- 34 वर शपथपत्र दाखल केले असून, पृष्ठ क्रं- 36 वर विरुध्द पक्ष यांनी लेखी युक्तीवाद दाखल केला आहे.
06. तक्रारकर्त्याची तक्रार, शपथपत्र, तसेच लेखी युक्तिवाद विरुध्दपक्ष विमा कंपनी तर्फे लेखी उत्तर व शपथपत्र तसेच लेखी युक्तिवाद आणि तक्रारकर्त्याने दाखल केलेल्या दस्तऐवजांचे मंचातर्फे अवलोकन करण्यात आले. तक्रारकर्ता व विरुध्द पक्षाच्या वकीलांचा मौखीक युक्तीवाद ऐकण्यात आला, त्यावरुन मंचाचा निष्कर्ष पुढील प्रमाणे-
:: निष्कर्ष ::
07. तक्रारकर्त्याने विरुध्द पक्ष यांचेकडून अमुल्य जीवन-II नावाची पॉलीसी रुपये 25,00,000/- (अक्षरी रुपये पंचवीस लाख फक्त) पॉलीसी क्रं. 979327218 दिनांक 28/01/2016 रोजी घेतली होती ही बाब उभय पक्षात वादातीत नाही. तक्रारकर्त्याने सदर पॉलीसीचे अर्धवार्षिक प्रिमीयम भरल्याची बाब देखील वादातीत नाही. तक्रारकर्त्याने प्रिमीयम भरल्याच्या पावत्या अभिलेखावरील पृष्ठ क्रं. 09 व 10 वर दाखल केल्या आहेत.
तक्रारकर्त्याच्या म्हणण्यानुसार तक्रारकर्त्याच्या पॉलीसीचे मुळ दस्ताऐवज वारंवार विनंती करुन सुध्दा विरुध्द पक्षाने पुरविले नाही, त्यामुळे केवळ विरुध्द पक्षाच्या चूकीमुळे सदरची पॉलीसी बंद झालेली आहे.
08. या उलट विरुध्द पक्षाच्या म्हणण्यानुसार त्यांचेद्वारे तक्रारकर्त्याच्या पॉलीसीचे मुळ दस्ताऐवज स्पीड पोस्टाद्वारे पाठविण्यात आले आहे तसेच तक्रारकर्त्याने पॉलीसीचे प्रिमीयम भरले नसल्याने सदरची पॉलीसी बंद करण्यात आली आहे.
09. मंचाद्वारे अभिलेखावरील दाखल सर्व दस्ताऐवजांचे काळजीपूर्वक अवलोकन करण्यात आले. तक्रारकर्त्याने दिनांक 31/03/2017, 17/07/2017 व दिनांक 23/08/2017 रोजी विरुध्द पक्ष यांना पॉलीसीचे मुळ दस्ताऐवत पाठविण्याबाबतचे पत्र अभिलेखावरील पृष्ठ क्रं. 29 वर दाखल केलेले आहेत. सदर पत्र विरुध्द पक्ष विमा कंपनी यांना प्राप्त झाल्यासंबंधी दाखल पोचपावतीवरुन दिसून येते. तक्रारकर्त्याने पृष्ठ क्रं. 16 वर दिनांक 17/09/2017 रोजी मुळ दस्ताऐवज पाठविण्याविषयीचे विनंती पत्र विरुध्द पक्ष यांना मिळाल्यासबंधीची पोचपावतीसह अभिलेखावर दाखल केले आहे, परंतु विरुध्द पक्ष विमा कंपनीने तक्रारकर्त्याच्या सदर पत्राची दखल घेतली असल्याचा पुरावा मंचासमक्ष सादर केला नाही.
विरुध्द पक्ष विमा कंपनीने आपल्या लेखी उत्तरासोबत दाखल केलेले कागदपत्र क्रं. 1 नुसार तक्रारकर्त्यास पॉलीसीनंबरची मागणी करणारे पत्र दाखल केलेले आहे, परंतु सदर पत्र तक्रारकर्त्यास मिळाल्यासंबंधीची पोचपावती दाखल केलेली नाही, त्यामुळे सदर पत्र तक्रारकर्त्यास मिळाले किंवा नाही हे अभिप्रेत होत नाही.
10. विरुध्द पक्ष विमा कंपनी यांचे म्हणण्यानुसार त्यांनी तक्रारकर्त्याच्या पॉलीसीचे मुळ दस्ताऐवज तक्रारकर्त्याच्या पत्त्यावर दिनांक 25/04/2016 रोजी स्पीड पोस्टाद्वारे पाठविले होते. मंचाद्वारे अभिलेखावर दाखल विरुध्द पक्ष विमा कंपनी यांनी दाखल केलेल्या पोस्ट विभागाच्या पत्राचे अवलोकन केले असता त्यात कुठलाही अभिलेख पोस्टाच्या विभागात फक्त 18 महिन्यापर्यंत राखुन ठेवता येतो असे नमुद आहे. मंचाचे मते जर पोस्ट विभागात अभिलेख 18 महिन्यापर्यंत राखुन ठेवता येत असेल तर तक्रारकर्त्यास मुळ दस्ताऐवज न मिळाल्याबाबतचे तक्रारकर्त्याचे दिनांक 31/03/2017 रोजी दिलेल्या पहिल्या अर्जाची दखल विरुध्द पक्ष यांनी वेळेवर घेतली असती तर समस्येचे त्वरीत निराकरण करता येणे शक्य होते. यावरुन विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्त्याच्या पत्राची कुठलीही दाखल घेतली नसल्याचे स्पष्ट होते. विरुध्द पक्ष विमा कंपनी यांनी तक्रारकर्त्याच्या पॉलीसीचे मुळ दस्ताऐवज न पुरवून सेवेत त्रुटी केली आहे या निष्कर्षाप्रत मंच येते. विरुध्द पक्ष यांनी त्यासंबंधीत कुठलाही पुरावा मंचासमक्ष सादर केला नाही. विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्त्याला दुय्यम प्रत देण्यास तयार आहे ही बाब मान्य केली आहे. परंतु विमा पॉलीसीच्या अटी व शर्तीनुसार लागणारे दस्ताऐवज व खर्च तक्रारकर्त्याला करावा लागेल. तसेच बंद पडलेली पॉलीसी पुर्नजीवीत करण्यासाठी तक्रारकर्त्याला पॉलीसीच्या अटी व शर्तीनुसार वैद्यकीय अहवालाच्या आधारावर पात्र ठरल्यास दिनांक 28/07/2017 पासून दोन वर्षाच्या आत पूर्ववत सुरु करता येईल. म्हणजेच दिनांक 27/07/2019 पर्यंतच पॉलीसी पुर्नजीवीत केल्या जावू शकते असे कथन केले आहे. मंचाचे मते विरुध्द पक्ष विमा कंपनीने तक्रारकर्त्याला वेळीच पॉलीसीचे मुळ दस्ताऐवज पुरविले असते तर तक्रारकर्त्याने त्यावेळी अर्धवार्षिक प्रिमीयमचा भरणा विरुध्द पक्षाकडे केला असता व तक्रारकर्त्याची पॉलीसी बंद पडली नसती.
11. मंचाचे मते विरुध्द पक्ष विमा कंपनीने तक्रारकर्त्याला दुय्यम प्रत देण्याचे मान्य केलेले असल्यामुळे विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्त्याची कुठलीही वैद्यकीय तपासणी न करता पॉलीसीची दुय्यम प्रत देण्यात यावी तसेच तक्रारकर्त्याने पॉलीसीपोटी थकीत असलेली संपूर्ण रक्कम विरुध्द पक्ष विमा कंपनीकडे जमा करावे व त्यावर विरुध्द पक्ष विमा कंपनीने कुठलेली व्याज व इतर शुल्क न आकारता स्विकारावी आणि पॉलीसी पूर्ववत सुरु ठेवावी. सदर प्रकरणांत विरुध्द पक्ष विमा कंपनीने तक्रारकर्त्याला वेळीच पॉलीसीचे दस्ताऐवज न पुरविल्यामुळे तक्रारकर्त्याला शारीरीक व मानसिक त्रास सहन करावा लागला व मंचात तक्रार दाखल करावी लागली, म्हणून तक्रारकर्ता शारीरीक व मानसिक त्रासापोटी रुपये 2,000/- व तक्रारीचा खर्च रुपये 1,000/- मिळण्यास पात्र आहे असे मंचाचे मत आहे.
12. उपरोक्त नमुद सर्व वस्तुस्थितीचा विचार करुन मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
:: आदेश ::
(01) तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजूर करण्यांत येते.
(02) विरुध्द पक्ष विमा कंपनीला आदेशीत करण्यात येते की, त्यांनी तक्रारकर्त्याची कुठल्याही प्रकारची वैद्यकीय तपासणी न करता पॉलीसी पुर्ववत सुरु करावी व पॉलीसीची दुय्यम प्रत 45 दिवसाचे आत द्यावी.
(03) विरुध्द पक्ष विमा कंपनीने तक्रारकर्त्याकडे थकीत असलेली फक्त प्रिमीयमची राशी कुठलेली व्याज व इतर शुल्क न घेता स्विकारावी व तक्रारकर्त्याने त्याचेकडे असलेली प्रिमीयमची थकीत राशी भरावी.
(04) विरुध्दपक्ष विमा कंपनीने तक्रारकर्त्याला मानसिक व शारिरीक त्रासापोटी रुपये-2,000/- (अक्षरी रुपये दोन हजार फक्त) आणि तक्रारीचा खर्च रुपये-1,000/- (अक्षरी रुपये एक हजार फक्त) द्यावेत.
(05) उभय पक्षाने सदर आदेशाचे अनुपालन आदेशाची प्रमाणित प्रत प्राप्त झाल्याचे दिनांकापासून 45 दिवसांचे आत करावे.
(06) निकालपत्राच्या प्रमाणित प्रती सर्व पक्षकारांना निःशुल्क उपलब्ध करुन देण्यात याव्यात.\
(07) तक्रारकर्तीला “ब” व “क” फाईल्स परत करण्यात याव्यात.