(पारीत व्दारा श्री भास्कर बी.योगी, मा.अध्यक्ष )
(पारीत दिनांक– 17 सप्टेंबर, 2019)
01. तक्रारकर्त्याने प्रस्तुत तक्रार विरुध्दपक्ष सहकारी पतसंस्थे विरुध्द जास्तीच्या रकमेची कर्जाची वसुली केल्या संबधात ग्राहक मंचा समक्ष दाखल केलेली आहे.
02. तक्रारीचा थोडक्यात आशय खालील प्रमाणे-
तक्रारकर्त्याचे तक्रारी प्रमाणे विरुध्दपक्ष ही एक सहकारी पतसंस्था असून त्याने सदर पतसंस्थेत दिनांक-14.11.2015 रोजी खाते उघडले असून त्याचा खाते क्रं 287 असा आहे. तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष पतसंस्थे मधून दिनांक-14.11.2015 रोजी दुचाकी वाहन हिरो फॅशन खरेदी करण्यासाठी रुपये-42,000/- एवढया रकमेचे कर्ज उचलले होते. कर्जाची परतफेड दिनांक-03.12.2015 ते दिनांक-29.11.2017 या कालावधीत प्रतीमाह मुद्यलाची रक्कम रुपये-1750/- व त्यावरील व्याज रुपये-315/- असे मिळून प्रतीमाह एकूण रुपये-2065/- या प्रमाणे करावयाची होती. तक्रारकर्त्याने विरुध्पक्ष संस्थे कडून कर्ज घेऊन व्याजासह परतफेड केली असल्याने तो विरुदपक्षाचा ग्राहक आहे.
तक्रारकर्त्याने तक्रारीत त्याने केलेल्या कर्ज परतफेडी बाबतचे विवरण दिले, ते येथे नमुद करण्यात येत आहे-
अक्रं | दिनांक | परतफेड केलेली मुद्यल मासिक हप्त्याची रक्कम | परतफेड केलेली व्याजाची मासिक हप्त्याची रक्कम | परतफेड केलेली मुद्यल व व्याजाची मासिक हप्त्याची एकूण रक्कम | अतिरिक्त वसुल केलेली रक्कम | एकूण वसुल केलेली रक्कम |
01 | 02 | 03 | 04 | 05 | 06 | 07 |
01 | 03.12.2015 | 1750/- | 315/- | 2065/- | ...... | 2065/- |
02 | 09.01.2016 | 1750/- | 315/- | 2065/- | ...... | 2065/- |
03 | 06.02.2016 | 1750/- | 315/- | 2065/- | ...... | 2065/- |
04 | 09.03.2016 | 1750/- | 315/- | 2065/- | ...... | 2065/- |
05 | 10.05.2016 | 1750/- | 315/- | 2065/- | 300/- | 2365/- |
06 | 04.07.2016 | 3500/- | 630/- | 4130/- | 600/- | 4730/- |
07 | 27.08.2016 | 3500/- | 630/- | 4130/- | 600/- | 4730/- |
अक्रं | दिनांक | परतफेड केलेली मुद्यल मासिक हप्त्याची रक्कम | परतफेड केलेली व्याजाची मासिक हप्त्याची रक्कम | परतफेड केलेली मुद्यल व व्याजाची मासिक हप्त्याची एकूण रक्कम | अतिरिक्त वसुल केलेली रक्कम | एकूण वसुल केलेली रक्कम |
01 | 02 | 03 | 04 | 05 | 06 | 07 |
08 | 29.09.2016 | 1750/- | 315/- | 2065/- | 300/- | 2365/- |
09 | 17.12.2016 | 3500/- | 630/- | 4130/- | 600/- | 4730/- |
10 | 11.03.2017 | 3500/- | 630/- | 4130/- | 600/- | 4730/- |
11 | 08.04.2017 | 1750/- | 315/- | 2065/- | 600/- | 2665/- |
12 | 13.05.2017 | 1750/- | 315/- | 2065/- | 300/- | 2365/- |
13 | 07.06.2017 | 1750/- | 315/- | 2065/- | 300/- | 2365/- |
14 | 07.08.2017 | 3500/- | 630/- | 4130/- | 900/- | 5030/- |
15 | 16.10.2017 | 3500/- | 630/- | 4130/- | 900/- | 5030/- |
16 | 29.11.2017 | 5250/- | 945/- | 6195/- | 300/- | 6495/- |
| एकूण- | 42,000/- | 7560/- | 49,560/- | 6300/- | 55,860/- |
अशाप्रकारे वर नमुद विवरणपत्रा पमाणे विरुध्दपक्ष पतसंस्थेची संपूर्ण कर्जाची व्याजासह परतफेड करुनही तक्रारकर्त्या कडून अतिरिक्त रुपये-6300/- जास्तीच्या रकमेची वसुली विरुध्दपक्ष पतसंस्थेनी केली. या बाबत वेळोवेळी अतिरिक्त रकमेची मागणी त.क.ने केली परंतु प्रतिसाद न मिळाल्याने तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षाला दिनांक-09.02.2018 रोज रजिस्टर पोस्टाने नोटीस पाठविली परंतु नोटीस प्राप्त होऊनही प्रतिसाद मिळाला नाही वा लेखी उत्तर सुध्दा दिले नाही. म्हणून तक्रारकर्त्याने प्रस्तुत तक्रार ग्राहक मंचा समक्ष दाखल करुन विरुध्दपक्ष याचे विरुध्द खालील प्रमाणे मागण्या केल्यात-
(01) विरुध्दपक्ष पतसंस्थेला आदेशित करण्यात यावे की, तक्रारकर्त्या कडून जास्तीची वसुल केलेली रक्कम रुपये-6300/- वार्षिक-18 टक्के दराने व्याजासह तक्रारकर्त्याला परत करावी.
(02) तक्रारकर्त्याला झालेल्या शारिरीक, मानसिक व आर्थिक त्रासा बद्यल रुपये-10,000/- आणि तक्रारीचा खर्च म्हणून रुपये-10,000/- विरुध्दपक्ष पतसंस्थेनी तक्रारकर्त्याला देण्याचे आदेशित व्हावे.
(03) या शिवाय योग्य ती दाद तक्रारकर्त्याचे बाजूने मंजूर करण्यात यावी.
03. विरुध्दपक्ष पतसंस्थे तर्फे लेखी उत्तर पान क्रं 41 ते 44 वर दाखल करण्यात आले. विरुध्दपक्ष ही एक सहकारी पतसंस्था असल्याची बाब मान्य केली परंतु तक्रारकर्ता हा त्यांचा ग्राहक असल्याची बाब नामंजूर केली. तक्रारकर्त्याने दिनांक-14.11.2015 रोजी विरुध्दपक्ष पतसंस्थेत खाते उघडले असून त्याचा खाते क्रं 287 असा असल्याची बाब मान्य केली. तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष पतसंस्थे कडून दिनांक’14.11.2015 रोजी दुचाकी वाहना करीता रुपये-42,000/- कर्ज उचललेले होते ही बाब मान्य केली. तक्रारकर्त्या कडून कर्जापोटी रुपये-6300/- एवढी अतिरिक्त जास्तीची रक्कम वसुल केल्याची बाब नामंजूर केली. तक्रारकर्त्याची तक्रार खोटी असून ती खारीज होण्यास पात्र असल्याचे नमुद केले. पुढे विशेष कथनात असे नमुद केले की, उभय पक्षां मध्ये दोन जमानतदारां समोर झालेल्या करारा प्रमाणे तक्रारकर्त्यास वाहन कर्जाची परतफेड दिनांक-14.11.2015 पासून ते दिनांक-14.11.2017 पर्यंत प्रतीमाह हप्ता रुपये-2065/- प्रमाणे एकूण 24 मासिक हप्त्यांमध्ये करावयाची होती. करारामध्ये कर्जाचे शिल्लक रकमेवर दरमहा दरशेकडा 9टक्के व्याज दर होता आणि मासिक हप्ता थकीत राहिला असेल तर विरुध्दपक्ष पतसंस्था कर्जाच्या एकूण असलेल्या शिल्लक रकमेवर 2 टक्के जास्तीचा व्याज दर आकारेल. कर्जधारकाने विहित तारखे पर्यंत मासिक किस्त जमा न केल्यास प्रत्येक महिन्यात रुपये-300/- प्रमाणे विलंब शुल्क आकारण्यात येईल. तक्रारकर्त्याने महिन्याच्या 14 तारखे पर्यंत परतफेडीची मासिक किस्त जमा न केल्यामुळे करारनाम्या नुसार विलंब शुल्क आकारण्यात आले व त्यास तक्रारकर्त्याची सहमती होती. तक्रारकर्त्याने कर्ज परतफेडी पर्यंत कोणत्याही प्रकारचा आक्षेप नोंदविलेला नाही कारण त्याला कर्ज करारातील अटी व शर्तीची चांगल्या प्रकारे माहितीहोती. परंतु अशी माहिती असतानाही त्याने विरुध्दपक्ष पतसंस्थे विरुध्द खोटी तक्रार दाखल केली असल्याने सदर तक्रार रुपये-50,000/- दंडासह खारीज करण्यात यावी असे विरुध्दपक्षा तर्फे नमुद करण्यात आले.
04. उभय पक्षां तर्फे दाखल दस्तऐवजांच्या प्रती, दाखल पुरावे आणि उभय पक्षांचे वकीलांचा मौखीक युक्तीवाद यावरुन मंचा समोर खालील मुद्दे उपस्थित होतात-
अक्रं | मुद्दा | उत्तर |
(1) | त.क. हा विरुध्दपक्ष पतसंस्थेचा ग्राहक होतो काय? | होय. |
(2) | वि.प.ने, त.क.ला दोषपूर्ण सेवा दिल्याची बाब सिध्द होते काय? | |
(3) | काय आदेश? | अंतिम आदेशा नुसार |
:: कारण मिमांसा ::
मुद्दा क्रं-1 बाबत-
05. तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष पतसंस्थे कडून वाहनासाठी कर्ज उचललेले असून त्याची परतफेड व्याजासह केली असल्याने तक्रारकर्ता आणि विरुध्दपक्ष पतसंस्था यांचे मध्ये ग्राहक आणि सेवा पुरविणारे असे संबध निर्माण होतात त्यामुळे त.क. हा विरुध्दपक्ष पतसंस्थेचा ग्राहक होत असल्याने मुद्या क्रं 1 चे उत्तर होकारार्थी नोंदविण्यात येते.
मुद्दा क्रं-2 बाबत-
06. विरुध्दपक्ष पतसंस्थेनी पान क्रं 60 व 61 वर उभय पक्षां मध्ये वाहन कर्जा संबधी झालेल्या करारनाम्याची प्रत दाखल केली. सदर करारनाम्याचे अवलोकन केले असता त्यामध्ये कर्जाची रक्कम रुपये-42,000/- दिनांक-14.12.2015 पासून ते दिनांक-14.10.2017 पर्यंत परतफेडीचा मासिक हप्ता मुद्यल व व्याजासह रुपये-2065/- प्रमाणे एकूण मासिक 24 हप्त्यांमध्ये परतफेड करावयाची होती. करारातील अट क्रं 2 प्रमाणे कर्जावरील व्याजाचा दर कर्जाचे शिल्लक रकमेवर वार्षिक 9 टक्के असा नमुद आहे. तर अट क्रं 3 प्रमाणे कर्जाचा मासिक हप्ता थकीत राहिला तर विरुध्दपक्ष संस्था कर्जाच्याएकूण शिल्लक रकमेवर 2 टक्के जास्तीचे व्याज आकारेल. अट क्रं 4 प्रमाणे प्रत्येक महिन्यात विहित मुदतीत मासिक हप्त्याची रक्कम जमा न केल्यास प्रतीमाह रुपये-300/- प्रमाणे विलंब शुल्क आकारण्यात येईल असे नमुद आहे. सदर कर्ज करारावर तक्रारकर्ता आणि जमानतदाराची सही आहे. सदर कर्ज दिनांक-14.11.2015 रोजी तक्राकर्त्याचे कर्ज खात्यामध्ये ट्रान्सफर सुध्दा करण्यात आले.
07. तक्रारकर्त्याने अभिलेखावर दाखल केलेल्या मासिक किस्तीच्या पावत्यां वरुन त्याचे कडून विलंब शुल्काची रक्कम करारा प्रमाणे विरुध्दपक्ष पतसंस्थेनी विवरणपत्रात नमुद केल्या नुसार संपूर्णपणे वसुल केलेली आहे. तक्रारकर्त्याचा मुख्य विवाद हा विलंबशुल्काचे रकमेचा नसून त्याचे कडून विलंब शुल्का व्यतिरिक्त जी जास्तीची रुपये-6300/- रक्कम वसुल केली त्या संबधीचा आहे. विरुध्दापक्ष पतसंस्थेचे असे म्हणणे आहे की, करारातील अट क्रं 3 प्रमाणे जर कर्जधारकाने कर्जाचे मासिक हप्ते थकीत केले तर संस्था कर्जाच्या एकूण असलेल्या शिल्लक रकमेवर 2 टक्के जास्तीचे व्याज आकारेल परंतु सदर व्याज हे प्रतीमाह 2 टक्के कि वार्षिक 2 टक्के ही बाब करारात स्पष्ट केलेली नाही. ग्राहक मंचाचे मते करारा प्रमाणे प्रतीमाह मासिक किस्त विहित मुदतीत जमा न केल्यास तक्रारकर्त्या कडून विलंबशुल्काची रक्कम वसुल केल्या नंतर पुन्हा त्याच कारणासाठी जास्तीचे 2 टक्के व्याज आकारण्याचे कोणतेही प्रयोजन विरुध्दपक्ष पतसंस्थेला नाही. तक्रारकर्त्याने करारा प्रमाणे कर्ज रकमेची व्याज व विलंबशुल्कासह संपूर्ण रकमेची परतफेड केल्या नंतरही त्याचे कडून पुन्हा व्याजापोटी जी रुपये-6300/- विरुध्दपक्ष पतसंस्थेनी वसुली केलेली आहे, तीच मूळात विरुध्दपक्ष पतसंस्थेची चुक आहे. विरुध्दपक्ष पतसंस्थेनी स्वतःच कर्ज करार तयार केलेला असून तो छापील स्वरुपात असून त्यानंतर मागाहून पेनाने रिकाम्या जागेतत्यामध्ये व्याज दर, विलंबशुल्काच्या रकमा नमुद केलेल्या आहेत, त्यामुळे कर्ज करार करते वेळी करारातील हया रिकाम्या जागा भरल्या होत्या किंवा काय? या बद्यल प्रश्न निर्माण होतो आणि असा विसंगत करार हा तक्रारकर्त्यावर बंधनकारक राहू शकत नाही कारण तक्रारकर्त्याने मासिक किस्त विहित मुदतीत जमा न केल्यामुळे विरुध्दपक्ष पतसंस्थेनी त्याचेकडून विलंब शुल्क वसुल तर केलेच परंतु पुन्हा त्याच कारणासाठी अतिरिक्त रुपये-6300/- व्याजाची रक्कम सुध्दा वसुल केली, विरुध्दपक्ष पतसंस्थेची एकंदरीत कृती पाहता ही त्यांनी तक्रारकर्त्याला दिलेली दोषपूर्ण सेवा आहे आणि म्हणून आम्ही मुद्या क्रं 2 चे उत्तर होकारार्थी नोंदवित आहोत.
मुद्दा क्रं-3 बाबत-
08. विरुध्दपक्ष पतसंस्थेनी तक्रारकर्त्या कडून जास्तीची वसुल केलेली रक्कम रुपये-6300/- तक्रारकर्त्याला परत करावी आणि सदर रकमेवर तक्रार दाखल दिनांक-24.10.2018 पासून वार्षिक-15 टक्के दराने व्याज द्यावे.तसेच तक्रारकर्त्याला झालेल्या शारिरीक व मानसिक त्रासा बद्यल रुपये-1000/-आणि तक्रारीचा खर्च म्हणून रुपये-1000/- अशा रकमा विरुध्दपक्ष पतसंस्थेनी तक्रारकर्त्याला द्याव्यात असा आदेश पारीत करणे योग्य व न्यायोचित होईल असे ग्राहक मंचाचे मत आहे.
09.. उपरोक्त नमुद सर्व वस्तुस्थितीचा विचार करुन आम्ही तक्रारीत खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत-
:: आदेश ::
- तक्रारकर्त्याची विरुध्दपक्ष जनकल्याण नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित तुमसर, जिल्हा भंडारा यांचे विरुध्दची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
- विरुध्दपक्ष पतसंस्थेला आदेशित करण्यात येते की, त्यांनी तक्रारकर्त्या कडून वाहन कर्जा संबधात जास्तीची वसुल केलेली रक्कम रुपये-6300/-(अक्षरी रुपये सहा हजार तिनशे फक्त) तक्रारकर्त्याला परत करावी आणि सदर रकमेवर तक्रार दाखल दिनांक-24.10.2018 पासून वार्षिक-15 टक्के दराने व्याज द्यावे.
- विरुध्दपक्ष पतसंस्थेला आदेशित करण्यात येते की, त्यांनी तक्रारकर्त्याला झालेल्या शारिरीक व मानसिक त्रासा बद्यलरुपये-1000/- (अक्षरी रुपये एक हजार फक्त) आणि तक्रारीचा खर्च रुपये-1000/- (अक्षरी रुपये एक हजार फक्त) द्यावेत.
- सदर आदेशाचे अनुपालन विरुध्दपक्ष जनकल्याण नागरी सहकारी पतसंस्था तुमसर, जिल्हा भंडारा या सहकारी संस्थेनी प्रस्तुत निकालपत्राची प्रमाणित प्रत प्राप्त झाल्याचे दिनांकापासून 30 दिवसांचे आत करावे.
- निकालपत्राच्या प्रमाणित प्रती उभय पक्षकारांना निःशुल्क उपलब्ध करुन देण्यात याव्यात.
- तक्रारकर्त्याला “ब” व “क” फाईल्स परत करण्यात याव्यात.