::: आ दे श :::
( पारित दिनांक : 30/06/2015 )
माननिय सदस्या श्रीमती जे.जी. खांडेभराड, यांचे अनुसार : -
1. ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे, कलम : 12 अन्वये दाखल केलेल्या या तक्रारीचा सारांश थोडक्यात खालीलप्रमाणे -
तक्रारकर्ती ही मालेगाव, जि. वाशिम येथील रहिवाशी आहे. तक्रारकर्तीचे पती व तक्रारकर्ते क्र. 2 व 3 चे वडील यांनी एम.एच. 37-जी-0528 क्रमांकाचा तीन चाकी अॅटो हा प्रकाश एस. नेमाणे यांच्याकडून विकत घेतला होता व सदर गाडीचा विमा हा विरुध्द पक्ष क्र. 1 कडे काढलेला होता. सदर विमा हा दिनांक 17/06/2012 ते 16/06/2013 पर्यंत वैध होता. तक्रारकर्ती क्र. 1 चे पती हे सदर अॅटोने गांगलवाडी वरुन मालेगांवला जात असतांना दिनांक 20/11/2012 रोजी सदर अॅटोला एम.एच. 37-अे-3244 क्रमांकाचे जिपने धडक दिली. सदर धडकेत जास्त मार लागल्याने दिनांक 25/11/2012 रोजी तक्रारकर्तीचे पतीचा मृत्यू झाला. सदर अॅटो क्र. एम.एच. 37-जी-0528 हा विरुध्द पक्षाकडे विमाकृत असल्याने, तक्रारकर्त्यांनी सदर रक्कमेची विरुध्द पक्ष यांच्याकडे मागणी केली असता, विरुध्द पक्षाने सदर गाडी प्रकाश एस. नेमाणे यांच्या नांवावर असल्याने विमा रक्कम देण्याचे नाकारले. सदर गाडीची आर.सी. ही तक्रारकर्ती क्र. 1 चे पती वारल्यानंतर त्यांच्या घरी आल्याने त्याची माहिती विरुध्द पक्ष यांना देता आली नाही. विरुध्द पक्ष यांच्याकडे विमाकृत रक्कमेची मागणी करुनही, नोटीस पाठवूनही विरुध्द पक्ष यांनी रक्कम न दिल्याने, विरुध्द पक्षाने नोटीसची दखल घेतली नाही. अशाप्रकारे विरुध्द पक्ष यांनी सेवा देण्यात उणीव व अनुचीत व्यापार प्रथेचा अवलंब केलेला आहे.
त्यामुळे, तक्रारकर्तीने सदर तक्रार, या न्यायमंचासमोर, दाखल करुन, तक्रार मंजूर करावी, विरुध्द पक्षानी तक्रारकर्तीस विमा रक्कम रुपये 2,00,000/- दयावी, तसेच अनुचीत व्यापार पध्दतीचा अवलंब केल्यामुळे नुकसान भरपाई रुपये 50,000/- व तक्रारीचा खर्च दयावा, अशी विनंती, सदर तक्रारीचे शेवटी, केलेली आहे.
सदर तक्रार शपथेवर दाखल असुन, त्यासोबत एकंदर 09 दस्त पुरावा म्हणून सादर केले आहेत.
2) विरुध्द पक्षाचा लेखी जवाब - विरुध्द पक्षाने निशाणी-11 प्रमाणे त्यांचा लेखी जवाब मंचासमोर दाखल करुन, तक्रारकर्तीचे बहुतांश म्हणणे फेटाळले. विरुध्द पक्षाने पुढे अधिकचे कथनात नमुद केले की, तक्रारकर्तीने दाखल केलेली तक्रार ही मोघम स्वरुपाची असून, तक्रारकर्तीने वि. मंचासमक्ष आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे दाखल केलेली नाहीत. तसेच आवश्यक माहिती तक्रारीत नमूद केलेली नाही व ती वि. मंचापासून हेतूपुरस्सरपणे, वाईट उद्देशाने लपविलेली आहे. तक्रारकर्ती ही वि. मंचासमोर स्वच्छ हाताने व निर्मळ मनाने आलेली नाही, वरील सर्व कारणास्तव तक्रार खर्चासह खारिज होण्यास पात्र आहे. सदर तक्रार वि. मंचासमक्ष चालू शकत नाही, तसेच ती कायदेशिररित्या योग्य नसल्यामुळे व सपशेल खोटी असल्यामुळे, फेटाळण्यास पात्र आहे. विरुध्द पक्षाकडून श्री. प्रकाश एस. नेमाणे यांनी त्यांचे मालकीचा तीन चाकी अॅटो क्र.एम.एच. 37-जी-0528 चा विमा रितसर प्रपोझाल फॉर्म भरुन, मालकी हक्काबाबतची कागदपत्रे जसे नोंदणी प्रमाणपत्र व एल अँण्ड टी फायनान्स कंपनीचे ना हरकत प्रमाणपत्र दाखल करुन दि. 17/06/2012 ते 16/06/2013 पर्यंत काढला होता. सदर पॉलिसी क्र. 230481/31/12/02/00001333 ही पॉलिसी प्रकाश एस. नेमाणे यांचे नांवाने खाजगी वाहतूकीसाठी दिली होती. परंतू सदर अपघातामध्ये दिलीप जैन यांचे मृत्यूमुळे, त्यांच्या मृत्यूची रिस्क पॉलीसीत समाविष्ट नसल्यामुळे त्यांचे वारस नुकसान भरपाई मागण्यास पात्र नाहीत. तक्रारकर्तीचे म्हणणेनुसार तिचे पती दिलीप हनुमान जैन यांनी अॅटो मालक यांच्याकडून त्यांच्या मालकीचा अॅटो क्र. एम.एच. 37-जी-0528 हा करारनाम्यानुसार त्यांच्या मृत्यूपूर्वी विकत घेतला होता. परंतु तो करारनामा तक्रारकर्ती यांनी तक्रारीसोबत दाखल केलेला नाही, तो करारनामा का दाखल केला नाही याचे कोणतेही कारण नमूद केलेले नाही. सदर वाहन हे भारत हनुमानदास जैन रा. मालेगांव यांच्या नावे आरटीओ रेकॉर्डला पुर्वीचे मालक प्रकाश नेमाणे यांचे नांव वगळून त्यांचे नांव कोणत्या तारखेला नोंदण्यात आले व ते मालक म्हणून कोणत्या तारखेला झाले, याचा स्पष्ट उल्लेख नाही. म्हणून अपघात व मूत्यूच्या तारखेला दिलीप जैन हे रजि. ओनर होते असे गृहीत धरता येणार नाही. विमा पॉलिसीच्या नियमानुसार तसेच मोटार वाहन कायदयाचे कलम 157 नुसार सुध्दा पूर्वीच्या गाडी मालकाने व गाडी विकत घेतलेल्या मालकाने त्याच्या नावाने आरटीओ रेकॉर्डला सदरहू वाहन ट्रान्सफर झालेल्या तारखेंपासून 14 दिवसांच्या आत विमा कंपनीला लेखी कागदपत्र सादर करुन व नवीन प्रपोझल फॉर्म भरुन तसेच रितसर फी भरुन सदरची विमा पॉलिसी ही त्यांनी त्यांच्या नावाने ट्रान्सफर करुन घ्यावी लागते व नंतरच त्याचा क्लेम लागू असतो. परंतु सदरच्या प्रकारणामध्ये पॉलिसी ट्रान्सफर करुन घेतलेली नाही. म्हणून तक्रारकर्ते हे विरुध्द पक्षाचे ग्राहक होत नाहीत. विमा पॉलिसी अंतर्गत नुकसान भरपाई मिळण्याचा क्लेम तक्रारकर्तीने 30 दिवसाच्या आत दाखल करावयास पाहिजे होता व तो सुध्दा मुदतबाहय दाखल केला, तक्रारकर्तीचा क्लेम हा गैरकायदेशीर असून तो देय नाही म्हणून विरुध्द पक्षाने दिनांक 26/04/2013 ला सविस्तर लेखी कळविले, ते पत्र तक्रारकर्तीला राहत्या पत्त्यावर मिळाले. भारत हनुमानदास भिसे हे नांव तक्रारकर्तीच्या पतीचे उर्फ नाव होवू शकत नाही. भारत हनुमानदास भिसे व दिलीप हनुमानदास जैन ही दोन वेगवेगळे इसम आहेत. तक्रारकर्तीने तिच्या तक्रारीसोबत लेखी जबाबात नमुद केल्याप्रमाणे क्र.1 ते 14 या आवश्यक कागदपत्रांपैकी एकसुध्दा कागदपत्र तक्रारीच्या समर्थनार्थ दाखल केले नाही, करिता तक्रार खर्चासह खारिज करण्यात यावी. अपघाताच्या वेळी अॅटोमालक स्वत: चालक होता व त्यावेळी 8 प्रवासी भाडे तत्वावर प्रवास करीत होते. आरटीओ परवानगीनुसार सदरहू अॅटोमध्ये एकूण 4 म्हणजे 3 + 1 घरगुती प्रवासी विना भाडे तत्वावर चालविण्याची परवानगी होती म्हणून गाडी मालकाने अपघाताच्या दिवशी मोटार वाहन कायदा तसेच रहदारीच्या नियमाचे ऊल्लंघन केले. वरील सर्व कारणास्तव तक्रारकर्तीची तक्रार ही खर्चासह खारिज करण्यांत यावी. विरुध्द पक्षाने त्यांचा जबाब प्रतिज्ञापत्रावर दाखल केला व सोबत निशाणी-12 दस्तऐवज यादीप्रमाणे एकूण 6 दस्त दाखल केलेत.
3) कारणे व निष्कर्ष ::
तक्रारकर्तीची तक्रार, विरुध्द पक्षाचा लेखी जबाब, उभय पक्षाने दाखल केलेले सर्व दस्तऐवज, उभय पक्षाचा लेखी युक्तिवाद तसेच उभय पक्षाने दाखल केलेले न्यायनिवाडे, यांचे काळजीपूर्वक अवलोकन करुन, खालील निष्कर्ष कारणे देऊन पारित केला, तो येणेप्रमाणे.
तक्रारकर्ते यांचा युक्तिवाद असा आहे की, तक्रारकर्ती क्र. 1 चे पती दिलीप हनुमानदास जैन उर्फ भारत हनुमानदास भिसे यांनी श्री. प्रकाश एस. नेमाणे यांचेकडून तीन चाकी अॅटो करारनाम्यानुसार विकत घेतला. सदर गाडी ही विरुध्द पक्षाकडे विमाकृत होती व त्याचा पॉलिसी कालावधी हा दिनांक 17/10/2012 ते 16/10/2013 पर्यंत वैध होता. सदरहू गाडीचा दिनांक 20/11/2012 रोजी अपघात होवून त्यामध्ये तक्रारकर्ती क्र. 1 च्या पतीचे निधन झाले. तक्रारकर्ती क्र. 1 च्या पतीने सदर तीन चाकी अॅटो विकत घेतल्यानंतर त्याबद्दलची बाकीची कार्यवाही आरटीओ ऑफीस मध्ये पूर्ण केली होती व ह्या अॅटोची आर.सी. ही पोष्टामार्फत तक्रारकर्तीच्या घरी आली होती. तक्रारकर्ती क्र.1 हिने विरुध्द पक्षाकडे सदर वाहनाच्या पॉलिसीनुसार रक्कम मिळण्याकरिता विमा दावा दाखल केला असता, विरुध्द पक्षाने या वाहनाची पॉलिसी प्रकाश एस. नेमाणे यांच्या नांवे असल्यामुळे ही रक्कम देण्यास नकार दिला. ही सेवेतील न्यूनता आहे.
यावर विरुध्द पक्षाचा असा युक्तिवाद आहे की, अपघातातील अॅटोचा विमा हा श्री. प्रकाश एस. नेमाणे यांनी सदरहू कालावधीत काढला होता. तसेच सदरहू वाहन हे खाजगी वाहतूकीसाठी आरटीओ कडे नोंदविलेले होते. त्यामुळे ह्या अॅटोमध्ये प्रवासीभाडे वाहतूक करता येत नव्हती. परंतू पोलीस दस्तऐवज असे दर्शवितात की, सदरहू अॅटोमध्ये अपघाताच्या वेळी 8 प्रवासी भाडे तत्वावर प्रवास करीत होते. हे नियमाचे उल्लंघन आहे. तसेच विमा पॉलिसीच्या नियमानुसार व मोटर वाहन कायद्याचे कलम 157 नुसार पूर्वीच्या गाडी मालकाने व गाडी विकत घेतलेल्या मालकाने त्याच्या नावाने आरटीओ रेकॉर्डला सदरहू वाहन ट्रान्सफर झाल्यापासून 14 दिवसांच्या आत विमा कंपनीला लेखी कागदपत्र सादर करुन व नवीन प्रपोझल फॉर्म भरुन तसेच आवश्यक ती फी भरुन सदर विमा पॉलिसी त्यांच्या नावाने ट्रान्सफर करुन घ्यावी लागते. या प्रकरणात तसे न झाल्यामुळे तक्रारकर्ती क्र.1 चे पती विरुध्द पक्षाचे ग्राहक होत नाहीत.
उभय पक्षांचा हा युक्तिवाद ऐकल्यानंतर मंचाला या प्रकरणात हे पाहणे जरुरी आहे की, तक्रारकर्ती क्र.1 चे पती हे विरुध्द पक्षाचे ग्राहक कशाप्रकारे होतात ?
या प्रकरणात तक्रारकर्ते यांनी सदरहू तीन चाकी अॅटो श्री. प्रकाश एस. नेमाणे यांचेकडून करारनाम्यानुसार कधी घेतला, हे दाखविणारे कोणतेही दस्त रेकॉर्डवर दाखल केले नाही. तसेच या प्रकरणात तक्रारकर्ती क्र.1 च्या पतीचे नाव हे दाखल असलेल्या सर्व कागदपत्रांवर भिन्न आहे. दाखल दस्तऐवजांवर काही ठिकाणी दिलीप हनुमानदास जैन तर काही ठिकाणी भारत हनुमानदास भिसे असे नमूद आहे. दोन्ही नांवे एकाच व्यक्तीचे आहे, हे दर्शविणारा कायदेशीर पुरावा, रेकॉर्डवर उपलब्ध नाही. तसेच रेकॉर्डवर सदर वाहनाची आर.सी. प्रत दाखल आहे. त्यावरुन असे दिसते की, सदर वाहन हे दिनांक 18/04/2011 रोजी भारत हनुमानदास जैन या व्यक्तीच्या नावे आरटीओ कार्यालयात नोंदणीकृत आहे. परंतु दाखल दस्तऐवजावरुन असे सिध्द होते की, ह्या वाहनाचा विमा दिनांक 17/10/2012 ते 16/10/2013 या कालावधीकरिता विरुध्द पक्षाकडे श्री.प्रकाश श्रीराम नेमाणे ह्यांच्या नावाने काढलेला आहे. त्यामुळे विमा पॉलिसीच्या नियमानुसार तसेच मोटार वाहन कायद्याचे कलम 157 नुसार तक्रारकर्ती क्र. 1 च्या पतीने त्यांच्या नावाने आरटीओ रेकॉर्डला सदरहू वाहन ट्रांन्सफर झालेल्या तारखेपासून 14 दिवसांच्या आत विमा कंपनीला ट्रांन्सफर झाल्याबाबतची कागदपत्रे सादर न करुन रितसर पॉलिसी ही त्यांच्या नांवाने करुन घेतलेली नव्हती. तक्रारकर्तीच्या मते आरटीओ कार्यालयात सदर वाहन हे तिच्या पतीच्या नांवाने नोंदणी झाले होते व सदरहू संगणीकृत आर.सी. दस्त हे तिच्या पतीच्या मृत्यूनंतर पोष्टाने घरी आली होती. परंतु ती कधी आली, हे दाखविणारे कोणतेही दस्त रेकॉर्डवर दाखल केले नाही. शिवाय प्रकरण दाखल करतांना सदर आर.सी. तक्रारकर्ती जवळ असल्यामुळेच तिने ती प्रकरणात दाखल केली आहे. सदर वाहनाच्या विमा पॉलिसीवर प्रकाश श्रीराम नेमाणे ह्यांचे नांव असल्यामुळे, ह्या प्रकरणात तक्रारकर्ती क्र. 1 चे पती विरुध्द पक्षाचे ग्राहक होऊ शकत नाहीत. कारण अपघाताच्या दिवशी तक्रारकर्ती क्र. 1 चे पती हे विरुध्द पक्षाकडे विमाकृत नव्हते. तक्रारकर्तीने दाखल केलेले न्याय निवाडे हे सदर प्रकरणात लागू पडत नाही. या उलट विरुध्द पक्षाने दाखल केलेल्या सर्व न्याय निवाडयातील निर्देशानुसार हा आदेश पारित केला आहे. तक्रारकर्ते सक्षम न्यायालयातून कथीत नुकसान भरपाई मागू शकतात.
सबब, अंतिम आदेश पारित केला तो येणेप्रमाणे.
अंतिम आदेश
- तक्रारकर्ते यांची तक्रार, त्यांना आवश्यकता भासल्यास सक्षम न्यायालयात दाद मागण्याची मुभा देऊन, खारिज करण्यांत येते.
- न्यायिक खर्चाबाबत कोणतेही आदेश नाहीत.
- उभय पक्षांना या आदेशाच्या प्रती निशुल्क पुरवाव्या.
(श्रीमती जे.जी. खांडेभराड) (श्री. ए.सी.उकळकर) ( सौ. एस.एम. उंटवाले )
सदस्या. सदस्य. अध्यक्षा.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच, वाशिम.
svg