(मंचाचे निर्णयान्वये,श्री.अनिल एन.कांबळे,मा.अध्यक्ष) (पारीत दिनांक : 20.08.2011) अर्जदाराने सदर तक्रार, ग्राहक संरक्षण कायद्याचे कलम 14 सह 12 अन्वये दाखल केली असून, तक्रारीचा आशय थोडक्यात येणे प्रमाणे. 1. अर्जदाराने त्याचे मालकीचा ट्रक क्र.एम.एच.34 एल 9177 हा गै.अ.कडे विमा पॉलिसी क्र.230202/31/08/01/00007395 अन्वये दि.29/12/2008 ते 28/12/2009 या कालावधीकरीता विमाकृत केलेला होता. या ट्रकमध्ये दि.3.4.09 रोजी काळी गिट्टी भरुन चंद्रपूर वरुन सनविजय कंपनी एम.आय.डी.सी. बुट्टीबोरी येथे पाठविण्यात आली. त्यावेळी, ट्रकवर अर्जदाराचा पगारी वाहनचालक प्रफुल्ल भारत कांबळे नौकरीवर होता. दि.5.4.2009 रोजी सकाळी 9.00 वाजताचे सुमारास एम.आय.डी.सी. बुट्टीबोरी येथील कंपनीमध्ये गिट्टी उतरविण्यात आली व दि.5.4.2009 रोजी सदर कंपनीतून ट्रक निघाल्यावर सदर ड्रायव्हर ट्रक घेवून फरार झाला. त्यानंतर, अर्जदाराने, ट्रकबाबत चौकशी केली असता, आरोपी व ट्रक मिळून आला नाही. अर्जदाराने, पोलीस स्टेशन हिंगणा येथे आरोपी ड्रायव्हर प्रफूल्ल कांबळे यांच्याविरुध्द रिपोर्ट दाखल केली. अर्जदार व पोलीसांना आरोपी मिळून न आल्यामुळे शेवटी पोलीसांनी फौ.मा.क्र.44/2010 अन्वये फरार आरोपी विरोधात केस प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी, हिंगणा यांच्या न्यायालयात दाखल केले व केस न्यायप्रविष्ट आहे.
2. अर्जदाराने उपरोक्त ट्रक गै.अ.कडे विमाकृत असल्यामुळे गै.अ.ला तातडीने ट्रक गहाळ झाल्याची सुचना दिली. गै.अ.ने क्लेम रजिस्टर करुन अर्जदाराकडून मोटार दावा प्रपञ भरुन घेतले. गै.अ.ने अर्जदाराचा विमा क्लेम निकाली न काढता विनाकारण प्रलंबीत ठेवला. यानंतर, 2010 मध्ये गै.अ.ने अर्जदारास फॉर्म नं.28, 29, 30, ट्रकचे पंजिकरण दस्तऐवज, प्रथम खबर रिपोर्ट व अंतिम अहवाल नमूना मागीतला. त्याप्रमाणे, वाहन हस्तांतरणाकरीता आवश्यक असलेले फॉर्म नं.28,29, 30 चे दोन सेट सह्या करुन दि.14.6.2010 चे पञासह गै.अ.स दिले. अर्जदाराने ट्रकचे मुळ कागदपञ व हिंगणा कोर्टातून काढलेली केसची प्रमाणीत प्रत, अंतीम अहवाल गै.अ.कडे दि.19.6.2010 रोजी जमा केले. परंतु, गै.अ.विमा कंपनीने अर्जदाराचा विमा क्लेम निकाली काढला नाही. अर्जदाराने, गै.अ.स अधि.राकेश वाळके यांच्या मार्फत दि.1.8.2010 चा नोटीस पाठवून विमा क्लेम नुकसान भरपाई रक्कम देण्याची विनंती केली. तसेच, अर्जदाराने दि.3.11.2010 रोजी अधि.अभय कुल्लरवार यांच्यामार्फत गै.अ.ना नोटीस पाठवून विमा क्लेम निकाली काढण्याची विनंती केली. सदर नोटीस प्राप्त होवून सुध्दा गै.अ.ने कोणतीही दखल घेतली नाही व विमा क्लेम निकाली काढला नाही.
3. यानंतर, अर्जदारास, गै.अ.कडून दि.27.12.2010 चे पञ प्राप्त झाले. सदर पञ प्राप्त होताच, अर्जदाराने दि.27.1.11 ला दस्ताऐवज गै.अ.कडे जमा केले. तसेच, अर्जदाराने गै.अ.स दि.13.12.2010 रोजी अर्ज देवून लवकरात-लवकर नुकसान भरपाई देण्याची विनंती केली. गै.अ.वारंवार जे.एम.एफ.सी. रिपोर्ट या नावाने अस्तित्वात नसलेला दस्ताऐवज अर्जदारास मागणी करीता आहे, ही गै.अ.ने अर्जदारास दिलेली न्युनतापूर्ण सेवा असून अनुचीत व्यापार पध्दतीचा अवलंब केला आहे. त्यामुळे, गै.अ.नी दिलेली सेवा न्युनतापूर्ण व अनुचीत व्यापार पध्दती ठरविण्यात यावी. गै.अ.ने, अर्जदारास चोरी गेलेला ट्रक क्र.एम.एच.34 एल 9177 ची विमाकृत रक्कम रुपये 9,00,000/- दि.5.7.2009 पासून द.सा.द.शे.18 टक्के व्याजासह अर्जदाराचे पदरी पडेपर्यंत नुकसान भरपाई म्हणून द्यावे, असा आदेश पारीत करण्यात यावा. अर्जदारास मानसिक व शारीरीक ञासापोटी नुकसान भरपाई रुपये 50,000/- व केसचा खर्च रुपये 5000/- देण्याचा आदेश गै.अ.विरुध्द पारीत करावा, अशी मागणी केली आहे. 4. अर्जदाराने नि.4 नुसार 18 झेरॉक्स दस्ताऐवज दाखल केले. तक्रार नोंदणी करुन गै.अ.स नोटीस काढण्यात आला. गै.अ.हजर होऊन नि.13 नुसार लेखी बयान दाखल केले.
5. गै.अ.ने लेखी बयानात नमूद केले की, अर्जदाराने ट्रक गहाळ झाल्याबाबत सादर केलेला फार्म दिला होता ही गोष्ट अविवादीत आहे. तसेच, त्यासंबंधी परिच्छेदात नमूद कागदपञे व पञे दिली होती ही गोष्ट खरी आहे. परंतु, अर्जदाराने जाणून-बुजून मुख्य गोष्ट मंचापासून लपविलेली आहे, ती म्हणजे सदर वाहन चालक प्रफुल्ल कांबळे याचेकडील घटनेच्या वेळी असलेला वाहन चालक परवाना ड्रायव्हींग लायसन्स, याबाबतची माहिती अर्जदाराकडे नाही, म्हणून त्यांनी क्लेम फार्म मधील ड्रायव्हर लायसन्स संबंधी माहितीचा कॉलम रिकामा सोडलेला आहे व त्याबाबत, गै.अ.यांनी वेळोवेळी अर्जदारास मागणी केली. परंतु, आजपावेतो त्याची पुर्तता अर्जदाराने केली नाही. त्या कारणाने अर्जदाराचा क्लेम निकाली काढण्यात आलेला नाही. सदर क्लेम निकाली काढण्यास अर्जदाराने विलंब केलेला आहे. त्यामुळे, गै.अ.वर लावलेले संपूर्ण आरोप खोटे व बेकायदेशीर आहे.
6. गै.अ.ने लेखी बयानातील विशेष कथनात नमूद केले की, या प्रकरणातील मुळ वाद म्हणजे वाहन चालविण्याचा परवाना वाहन चालक प्रफुल कांबळे यांचेकडे सदर घटनेच्या वेळी नव्हता. घटनेच्या वेळी संबंधीत वाहन चालकाकडे ते वाहन चालविण्याचा वैध परवाना असणे विमा करार व कायद्याने बंधनकारक आहे व ह्या अटीचे अर्जदाराने उल्लंघन केले आहे. म्हणून तो संबंधीत विमा कराराअंतर्गत नुकसान भरपाई प्राप्त करण्यास कायदेशीररित्या पाञ नाही. म्हणून सदर तक्रार बेकायदेशीर असून सकृतदर्शनी खर्चासह खारीज होण्यास पाञ आहे. या प्रकरणात पोलीसांनी अर्जदाराच्या रिपोर्टवरुन कलम 406 भादंवी अंतर्गत गुन्हा दर्ज केलेला आहे, म्हणजे तक्रार चोरीची कलम 379 भादवी अंतर्गत पंजीबध्द नाही. म्हणून संबंधीत विमा कराराप्रमाणे कलम 406 भादंवी म्हणजे विश्वासघात या आधारे नुकसान भरपाई भरुन देण्यासंबंधी करार नाही, फक्त चोरीला गेलेल्या वाहनासंबंधी तरतूद आहे. या आधारे अर्जदाराचे नुकसान भरपाई क्लेम व तक्रार संबंधीत विमा पॉलिसी कराराअंतर्गत मोडत नाही. तसेच, अर्जदाराने घटनेनंतर पोलीसांकडे तक्रार देण्यास अतिविलंब केला. पोलीसांनी दर्ज केलेल्या अपराध खबरमध्ये अर्जदाराने ड्रायव्हर प्रफुल यांनी त्याचा विश्वासघात करुन अफरातफरी केली असून, त्याची गाडी विकून तो फरार झाला, असा आरोप केलेला आहे व त्यामध्ये गाडीची किंमत फक्त रुपये 3,00,000/- नोंदविलेली आहे. वरील घटनेसंबंधी अर्जदाराने ठिकठिकाणी दिलेल्या तक्रारीमध्ये बरीच मोठी तफावत आढळून येते. तसेच, पोलीसांनी तयार केलेला अंतीम अहवाल मध्ये नमूद केलेला चौकशी अहवाल सुध्दा अपूर्ण जाणवत आहे. एकंदरीत संपूर्ण वाद हा गुंतागुंतीचा व रेकॉर्डवरील माहितीनुसार अतिशय संशय निर्माण करणारा आहे. वाद फार गुंतागुंतीचा असून मुळ मुद्दे गौण असल्यामुळे चौकशीला वेळ लागत आहे. सबब, सदर तक्रारीत कोणतेही कायदेशीर कारण घडलेले नाही. म्हणून, तक्रार न्यायदानास पाञ नाही व खारीज करण्यात यावी. 7. अर्जदाराने नि.20 नुसार पुरावा शपथपञ दाखल केले. अर्जदाराने अर्ज व त्यासोबतचे दस्ताऐवज व शपथपञास त्याचा लेखी युक्तीवाद समजण्यात यावा, अशी पुरसीस नि.24 नुसार दाखल केली. गै.अ.ने नि.26 नुसार लेखी युक्तीवाद दाखल केला. अर्जदार व गै.अ. यांनी दाखल केलेले दस्ताऐवज, शपथपञ, लेखी युक्तीवादावरुन खालील कारणे व निष्कर्ष निघतात. @@ कारणे व निष्कर्ष @@ 8. अर्जदाराने, सदर तक्रारीत गै.अ.कडून ट्रक क्र.एम.एच.34 एल 9177 च्या बाबत नुकसान भरपाईची मागणी रुपये 9,00,000 केलेली आहे. अर्जदाराच्या मालकीचा ट्रक वाहन चालक प्रफुल्ल भारत कांबळे यांनी चंद्रपूर वरुन काळी गिट्टी भरुन सन विजय कंपनी, एम आय डी.सी. बुट्टीबोरी येथे पाठविले. ट्रक मधील माल दि.5.4.09 ला सकाळी 9-00 खाली केल्यानंतर ट्रक ड्रायव्हर परत आला नाही व ट्रक सुध्दा मिळाला नाही. अर्जदाराने ट्रक चोरी गेल्याबाबत आणि विश्वासघात, अफरातफर ट्रक ड्रायव्हरने केल्यामुळे पोलीस स्टेशन हिंगणा येथे अपराध क्र.105/09 दि.19.5.09 ला कलम 406 भा.द.वी. नुसार गुन्हा दाखल केला. अर्जदाराने पोलीस स्टेशनकडून केलेल्या तपासाबाबतचे व गुन्हा नोंदणी केल्याबाबत कागदपञ रेकॉर्डवर दाखल केला आहे. तसेच, विमा पॉलिसी आणि गै.अ.शी केलेल्या पञव्यवहारा संदर्भात कागदपञ दाखल केले आहे. सदर कागदपञाचे अवलोकन केले असता आणि गै.अ.यांनी उपस्थित केलेल्या मुद्यांवरुन असे दिसून येते की, सदर तक्रार ही आजच्या स्थितीत गुणदोषावर निकाली काढणे संयुक्तीक होणार नाही. 9. गै.अ.ने लेखी उत्तरात व लेखी युक्तीवादात असा मुद्दा घेतला आहे की, अर्जदाराने पहिल्यांदा तक्रारीत ट्रक चोरी झाल्याचा संशय घेवून रिपोर्ट दिली आणि नंतर उप प्रादेशिक अधिकारी यांना व पोलीस अधिक्षक नागपूर ग्रामीण यांना ड्रायव्हर सह गाडी गायब झाल्याचे कळविले. या सर्व बाबी बाबत तज्ञांकडून चौकशी करण्याचे काम सुरु आहे, त्याचा अहवाल प्राप्त झालेला नाही. त्यामुळे तक्रार खारीज करण्यांत यावी, असा आक्षेप घेतला आहे. गै.अ.यांनी घेतलेला आक्षेप आजच्या स्थितीत उपलब्ध रेकॉर्डवरुन मान्य करण्यास पाञ आहे. अर्जदाराने गै.अ.कडे सर्व कागदपञ दि.19.6.10 रोजी सादर केले. गै.अ. यांनी सुध्दा कागदपञ मिळाल्याची गोष्ट मान्य केली आहे. परंतु, वाहन चालकाचा परवाना बाबत माहिती उपलब्ध नसल्यामुळे क्लेम फार्ममध्ये ड्रायव्हर संबंधी माहितीचा रकाना रिकामा सोडलेला आहे. गै.अ.नी नि.19 च्या यादीनुसार दस्ताऐवज दाखल केले, त्यामध्ये अर्जदाराकडून पोलीस स्टेशन हिंगणा यांना रिपोर्ट दिला, त्याप्रमाणे पोलीस स्टेशन सान्हा क्र.22/2009 दि.12.4.09 चे 16-00 वाजता नोंद घेतली आहे व त्यासोबत अर्जदारांनी गाडीचे वर्णन, ड्रायव्हरचा हुलिया, तसेच गाडीचे झेरॉक्स पेपर व चालकाचा ड्रायव्हींग लायसन्सची झेरॉक्स जोडले, असल्याचे नमूद केले आहे. गै.अ.यांनी विमा पॉलिसीची प्रत सुध्दा दाखल केली आहे. त्यात पॉलिसी शर्ती अटीचा उल्लेख केला आहे. पॉलिसीच्या शर्ती अटींमध्ये Malicious Act चा उल्लेख केलेला आहे, तरी गै.अ.यांनी चौकशी करण्याचे काम सुरु आहे असा आक्षेप घेतल्यामुळे गै.अ.यांनी ताबडतोब चौकशी करुन क्लेमबाबत योग्य तो निर्णय लवकरात-लवकर घेवून अर्जदारास कळविणे, न्यायसंगत होईल. 10. गै.अ.यांनी असा मुद्दा घेतला आहे की, तक्रारीत कोणतेही कारण घडले नाही. परंतु, अर्जदाराने 19.6.10 ला कागदपञ सादर केले. त्यानंतर, गै.अ.यांनी विमा क्लेम न दिल्यामुळे 2.2.2011 ला सुध्दा क्लेम मिळण्याकरीता गै.अ.ला पञ दिला, तरी गै.अ.यांनी आजपर्यंत कोणताही निर्णय घेतला नाही. तक्रारीतील कथन आणि गै.अ.यांचे कथनावरुन गुणदोषावर निकाली काढण्याचे पूर्वी गै.अ. यांनी चौकशी पूर्ण न झाले असल्याचा आक्षेप घेतल्याने, गै.अ. यास चौकशी पूर्ण करुन निर्णय घेण्याची संधी देणे न्यायोचीत होईल, या निष्कर्षाप्रत हे न्यायमंच आले आहे. वरील विवेचनावरुन तक्रार निकाली काढून खालील प्रमाणे आदेश पारीत करण्यांत येत आहे. // अंतिम आदेश //
(1) अर्जदाराची तक्रार निकाली. (2) गैरअर्जदाराने अर्जदाराचा ट्रक क्र.एम.एच.34 एल 9177 संदर्भातील विमा क्लेमचा निर्णय आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून 2 महिन्याचे आंत निर्णय घेवून अर्जदारास कळवावे. (3) अर्जदार व गैरअर्जदारानी आपआपला खर्च सहन करावा. (4) उभय पक्षांना आदेशाची प्रत देण्यात यावी.
| [HONORABLE Shri Sadik M. Zaweri] Member[HONORABLE Shri Anil. N.Kamble] PRESIDENT | |