निकालपत्र
तक्रार दाखल दिनांकः- 02/03/2012
तक्रार नोदणी दिनांकः- 02/03/2012
तक्रार निकाल दिनांकः- 11/06/2013
कालावधी 01 वर्ष.03 महिने. 09 दिवस.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी
अध्यक्ष श्री.पी.पी.निटूरकर.B.Com.LL.B.
सदस्य
श्री.आर.एच.बिलोलीकर.B.Tech, MBA, DCM, LLB.
------------------------------------------------------------------------------------------------------------
प्रसाद धोंडिराम कवळे. अर्जदार
वय 48 वर्षे. व्यवसाय.शेती. अड.जी.बी.भालेराव.
रा.निवळी (खु.) जिंतुर जि.परभणी.
विरुध्द
शाखा व्यवस्थापक. गैरअर्जदार.
युनायटेड इंडिया इन्शुरन्स कं.लि. अड.जी.एच.दोडीया.
दयावान कॉम्प्लेक्स, दुसरा मजला स्टेशन रोड,परभणी.
------------------------------------------------------------------------------------
कोरम - 1) श्री.पी.पी.निटूरकर. अध्यक्ष.
2) श्री.आर.एच.बिलोलीकर सदस्य.
(निकालपत्र पारित व्दारा.श्री.आर.एच.बिलोलीकर. सदस्य)
अर्जदाराची तक्रार हि गैरअर्जदाराने अर्जदाराच्या अपघातग्रस्त टॅम्पोचा विमादावा नाकारुन सेवेत त्रुटी दिल्या बद्दल गैरअर्जदार विमा कंपनी विरुध्द आहे.
अर्जदाराची थोडक्यात तक्रार अशी की, अर्जदार हा निवळी (खु) ता.जिंतुर जि.परभणी या गावचा रहिवाशी असून तो शेतकरी आहे.अर्जदाराचे पुढे हे म्हणणे आहे की, तो अल्प भुधारक आहे व कुटूंबाला आर्थिकदृष्टया सक्षम करण्यासाठी टॅम्पो विकत घेण्याचे ठरविले. व एप्रिल 2010 मध्ये अर्जदाराने टाटा कंपनीचा नं. एम.एच. 16 क्यु 58 या क्रमांकाचा जुना टॅम्पो विकत घेतला.व गैरअर्जदार कंपनीकडून सदरच्या टॅम्पोचा विमा पॉलिसी क्रमांक 230601/31/10/01/00000251 अन्वये 20/04/2010 ते 19/04/2011 पर्यंतचा 10,310/- रुपये भरुन विमा उतरवला.अर्जदाराचे असे ही म्हणणे आहे की, दिनांक 23/05/2010 रोजी अर्जदाराचा टॅम्पो लग्नाचे व्हराड घेवुन जिंतुरहून गडदगव्हाणकडे निघाले असता मानधनी शिवराजवळ समोरुन मोटार सायकल क्रमांक एम.एच. 30 के. 506 ला वाचवताना अपघात होवुन टॅम्पो डाव्या बाजुस पल्टी होवुन त्यातील लोकांना दुखापत झाली व टॅम्पोचे देखील बरेच नुकसान झाले. टॅम्पो ड्रायव्हरची काहीही चुक नसतांना जिंतुर येथे दिनांक 24/05/2010 रोजी टॅम्पो ड्रायव्हर विरुध्द गुन्हा नोंदविण्यात आला.अर्जदाराचे हे म्हणणे आहे की, सदरचा अपघात झाल्यानंतर त्याबाबतची माहिती गैरअर्जदार कंपनीला कळवली.गैरअर्जदार कंपनीने म.राझेक शेख याना स्पॉट सर्व्हेसाठी नियुक्त केले, त्यांनी घटनास्थळी दिनांक 24/05/2010 रोजी भेट देवुन स्पॉट सर्व्हे केला. त्यानंतर टोचन करुन अपघातग्रस्त टॅम्पो गैरअर्जदार यांच्या सांगण्यावरुन जालना येथे गॅरेज मध्ये दुरुस्तीसाठी दिला. गैरअर्जदाराने किशोर ल.पिसे. औरंगाबाद यांना सर्व्हेअर नेमुन वाहनाचा सर्व्हे केला.
अर्जदाराचे असेही म्हणणे आहे की, सदरचा अपघातग्रस्त टॅम्पो दुरुस्त करण्यासाठी जवळपास 1 ते 1.25 लाख खर्च गैरअर्जदारांच्या सांगण्या प्रमाणे केला, त्यानंतर दुरुस्ती खर्चाचा विमादावा गैरअर्जदारांकडे आवश्यक त्या कागदपत्रांसह, खर्चाच्या बिलांसह दाखल केला. त्यानंतर अर्जदाराने सदरच्या विमा दावा मिळण्यासाठी गैरअर्जदाराकडे अनेक चकरा मारल्या जुलै 2011 मध्ये गैरअर्जदार कडून अर्जदाराच्या नांवे 12/07/2011 रोजी पत्र आले त्यामध्ये असे नमुद केले आहे की, “ पोलीस पेपर वरुन व वर्तमानपत्राच्या कात्रनावरुन असे दिसते की, सदर वाहनामध्ये अपघाता वेळी प्रवासी बसले होते ” व पॉलिसीच्या नियमा प्रमाणे आपला विमादावा देता येत नाही व गैरअर्जदाराने अर्जदाराच्या विमा प्रस्ताव 1 ते सव्वा वर्ष लोंबकळत ठेवला, म्हणून गैरअर्जदाराने अर्जदारास प्रचंड मानसिकत्रास दिला.म्हणून मंचास विनंती केली आहे की, सर्व्हे रिपोर्ट नुसार गैरअर्जदाराकडून नुकसान भरपाई म्हणून 35,996/- रुपये दिनांक 24/05/2010 पासून 12 टक्के व्याजाने संपूर्ण रक्कम देई पर्यंत गैरअर्जदाराने अर्जदारास देण्याचा आदेश व्हावे, व तसेच मानसिक त्रासापोटी 10,000/- रुपये व तक्रार अर्जाच्या खर्चापोटी 5,000/- रुपये गैरअर्जदाराने द्यावे, असा आदेश व्हावा.
तक्रार अर्जाच्या पुष्टयर्थ अर्जदाराने आपले शपथपत्र नि. क्रमांक 2 वर दाखल केले आहे. तसेच नि.क्रमांक 4 वर 9 कागदपत्रांच्या यादीसह कागदपत्रे दाखल केली आहेत.ज्यामध्ये 4/1 वर एफ.आय.आर.ची कॉपी, 4/2 वर पॉलिसी कव्हरनोट, 4/3 वर गैरअर्जदाराने अर्जदारास दिनांक 12/07/2011 रोजी पाठविलेले पत्र, 4/4 वर ड्रायव्हींग लायसेंन्स, 4/5 वर अड.सारडा यांचे आर.टी.आय. खालील अर्ज, 4/6 वर गैरअर्जदार कंपनीने दिनांक 18/11/2011 रोजी अड. सारडा यांस पाठविलेले पत्र, 4/7 वर पॉलिसीची प्रत, 4/8 वर स्पॉट सर्व्हे रिपोर्ट, 4/9 वर लॉस असेसर रिपोर्ट इत्यादी कागदपत्रे दाखल केलेली आहेत.
गैरअर्जदारास मंचातर्फे लेखी जबाब दाखल करण्यासाठी नोटीसा पाठविण्यात आल्या त्याप्रमाणे गैरअर्जदार वकिला मार्फत मंचासमोर हजर व नि.क्रमांक 9 वर आपले लेखी म्हणणे सादर केले. गैरअर्जदाराचे असे म्हणणे आहे की, अर्जदाराची तक्रार खोटी तथ्यहीन आणि ग्राहक संरक्षण कायद्याच्या विरुध्द आहे.गैरअर्जदाराचे म्हणणे की, गैरअर्जदाराने ट्रक क्रमांक एम.एच. 16 /क्यु/ 0058 याचा विमा उतरविला होता तो “Goods carrying public carriers package policy” असा उतरविला होता. गैरअर्जदाराचे असे ही म्हणणे आहे की, Sec 166 (3) of Motor Vehicle Act 1988 चे उल्लंघन केलेले आहे व तसेच त्यांचे हे म्हणणे आहे की, सदरच्या अपघाताच्या वेळी वाहन मालकाने मालवाहु ट्रक मध्ये लग्नाचे व-हाड नेले. म्हणजेच प्रवाशांची वाहतुक केली व तसेच गैरअर्जदाराचे म्हणणे आहे की, गैरअर्जदाराने सर्व कागदपत्रांची छाननी करुन अर्जदाराचा विमादावा नाकारला आहे. व तसे पत्र 24/08/2011 रोजी अर्जदारास दिले. सदरच्या प्रकरणात गैरअर्जदारातर्फे सर्व्हेअर म्हणून राझेक शेख यांची नियुक्ती केली व त्याप्रमाणे सदरच्या सर्व्हेअरनी सदर वाहनाचा स्पॉट सर्व्हे करुन अहवाल सादर केला व तसेच गैरअर्जदाराचे हे म्हणणे आहे की, गैरअर्जदाराने अर्जदारास अपघातग्रस्त वाहनाचा टोचन करुन जालना येथे वाहन दुरुस्तीसाठी नेण्यास सांगीतले नव्हते, अर्जदाराने स्वतःच तसे केले आणि म्हणून गैरअर्जदाराने वेगळे सर्व्हेअर नेमून नुकसान भरपाईचे अंदाज घेतले सदरच्या प्रकरणात किशोर पीसे यांना लॉस असेसर म्हणून नेमले होते, त्यानी त्याचा अहवाल सादर केला व त्या अहवाला प्रमाणे 27,200/- रुपयांचा खर्च वाहन दुरुस्तीसाठी लागलेला आहे,म्हणून गैरअर्जदाराचे म्हणणे असे की, विमा पॉलिसीच्या नियमांचे उल्लंघन करुन व तसेच एम.व्ही अक्ट 1988 चे कलम 166(3) चे उल्लंघन करुन सदरचा ट्रक हा मालवाहू असून देखील त्याचा उपयोग प्रवासी नेण्यासाठी वापरला व म्हणून गैरअर्जदाराने अर्जदाराचा विमादावा नाकारला व कोणतीही त्रुटीची सेवा दिली नाही, गैरअर्जदाराने मंचास विनंती केली आहे की, सदरची तक्रार खर्चासह फेटाळण्यात यावी.
गैरअर्जदाराने आपल्या म्हणण्याच्या पुष्टयर्थ आपले शपथपत्र नि.क्रमांक 11 वर दाखल केले आहे. व तसेच नि.क्रमांक 10 वर गैरअर्जदाराने 6 कागदपत्रांच्या यादीसह झेरॉक्स प्रती दाखल केले आहेत, ज्यामध्ये 10/1 वर एफ.आय.आर. ची कॉपी 10/2 वर बिल चेक रिपोर्ट, 13/3 वर वर्तमानपत्राचे कात्रन, 10/4 वर पॉलिसी, 10/5 वर कव्हरनोट, 10/6 वर आर.सी.बुक, 10/7 वर अर्जदारास आर.टी. अक्ट खाली माहिती पुरविल्याचे पत्र, 10/8 वर दावा नाकारल्याचे पत्र.इत्यादी कागदपत्रे दाखल केले.
दोन्ही बाजुंच्या कैफियतीवरुन निर्णयासाठी उपस्थित होणारे मुद्दे.
मुद्दे उत्तर
1 गैरअर्जदाराने अर्जदाराचा विमादावा नाकारुन सेवेत त्रुटी
दिली आहे काय ? नाही.
2 आदेश काय ? अंतिम आदेशा प्रमाणे.
कारणे
मुद्दा क्रमांक 1 व 2
अर्जदाराने हे सिध्द केले आहे की, अर्जदार हा अपघाताच्या वेळी एम.एच. 16/ क्यु/0058 या मालवाहु टॅम्पोचा मालक होता. व तसेच अपघाता दिवशी म्हणजेच 23/05/2010 रोजी अर्जदाराने गैरअर्जदाराकडे काढलेला विमा वैध होता हे नि.क्रमांक 10/4 वर दाखल केलेल्या पॉलिसी वरुन सिध्द होते. हे की अपघाताच्या वेळी सदरच्या वाहना मध्ये व-हाडी बसून जात होते, हे गैरअर्जदाराने दाखल केलेल्या नि.क्रमांक 10/3 वरील कागदपत्रावरुन सिध्द होते व तसेच दिनांक 23/05/2010 रोजी एम.एच./ क्यु/0058 या वाहनास जिंतूर ते आडगांव रोडवर अपघात झाला हे नि.क्रमांक 4/1 वर दाखल कलेल्या कागदपत्रांवरुन सिध्द होते.
सदरचे वाहन हे माल वाहतुकीसाठी होते हे नि.क्रमांक 10/6 वर दाखल कलेल्या आर.सी. बुक वरुन सिध्द होते.आणि सदरच्या अपघातावेळी वाहनामध्ये व-हाडी माणसे बसून जात होती ही बाब नि.क्रमांक 4/1 वर दाखल केलेल्या एफ.आय.आर. कॉपी वरुन सिध्द होते, अर्जदाराने नियमांचे उल्लंघन करुन अपघाता वेळी सदरच्या टॅम्पो मध्ये माल वाहून नेण्यासाठी परवानगी असतांना देखील अनेक प्रवासी बसून नियमांचे उल्लंघन केले सदरचा विमा हा फक्त माल वाहतुकीसाठी होता Goods carrying (other than 3 wh)- public carriers package policy म्हणून गैरअर्जदाराने अर्जदाराचा विमादावा नाकारुन कोणत्याही प्रकारे सेवेत त्रुटी दिलेली नाही ही बाब सिध्द हाते, कारण प्रवासी वाहतुकीसाठीचा विमा उतरविलेला नव्हता व म्हणून प्रवासी वाहतुक करुन अपघात झाल्यावर विमा कंपनीकडे तसा विमा उतरवलेला नसताना विमादावा मागणे हे मंचास कायदेशिर वाटत नाही, प्रवासी वाहतुक करुन अर्जदाराने मुळ पॉलिसीचेच उल्लंघन केले आहे.अर्जदार आपली तक्रार सिध्द करण्यास पूर्णपणे असमर्थ ठरला आहे,म्हणून मुद्दा क्रमांक 1 चे उत्तर नकारार्थी देवुन मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आ दे श
1 अर्जदाराचा तक्रार अर्ज नामंजूर करण्यात येते.
2 तक्रारीचा खर्च ज्याचा त्यांनी सोसावा.
3 पक्षकारांना आदेशाच्या प्रती मोफत पुरवाव्यात.
श्री.आर.एच.बिलोलीकर. श्री. पी.पी.निटूरकर
मा.सदस्य मा.अध्यक्ष