(निकालपत्र पारित व्दारा.सौ.अनिता ओस्तवाल.सदस्या.)
गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 यांनी त्रुटीची सेवा दिल्याच्या आरोपावरुन अर्जदाराने ही प्रस्तुतची तक्रार दाखल केली आहे.
अर्जदाराची तक्रार अशी की, अर्जदाराचे पती नामे प्रल्हाद आढे हे शेतकरी होते, व ते गैरअर्जदार क्रमांक 2 चे खातेदार तसेच किसान कार्ड धारक होते, डिसेंबर 2011 मध्ये गैरअर्जदार क्रमांक 2 यांनी त्यांच्या बँकेच्या किसान कार्ड धारकासाठी एक विमा संरक्षणाची योजना गैरअर्जदार क्रमांक 1 यांच्या सहाय्याने राबविली होती, त्या प्रमाणे गैरअर्जदार क्रमांक 2 यांनी प्रत्येक कार्ड धारकाच्या खात्यावर प्रिमीयमची रक्कम नावे टाकून प्रत्येकासाठी रु. 50,000/- चे विमा संरक्षण दिनांक 12/12/2011 ते दिनांक 11/12/2014 पर्यंत गैरअर्जदार क्रमांक 1 कडून घेतलेले आहे. सदर किसान क्रेडीटकार्ड धारकाचा पॉलिसीचा क्रमांक 23601/47/11/43/00002602 असा आहे.
अर्जदाराचा पती हा किसान कार्ड धारक असल्यामुळे त्याचा या योजने मध्ये समावेश करण्यात आला होता, पूढे दिनांक 29/03/2013 रोजी सकाळी सुमारे 9.00 वाजता अर्जदाराचा पती प्रल्हाद आढे हा शंकर आढे यांच्या सोबत मोटार सायकल वरुन दहिफळ फाटा येथून जालना – मंठा रोड ओलांडून वाटूरकडे जात असतांना भरधाव वेगाने येणा-या वाहनाने धडक दिल्याने अपघात झाला व यात दोघेही जण जबर जखमी झाले व उपचाराठी प्राथमिक आरोग्य केंद्र वाटूर ता.परतूर जि.जालना येथे दाखल केले असता, अर्जदाराच्या पतीला मयत घोषीत केले, व सदर घटनेची नोंद पोलीस स्टेशन परतूर येथे करण्यात आली व पोलीसांनी गुन्हा क्रमांक 50/2013 वाहन चालका विरुध्द भा.द.वि. कलम 304 ( ए ), 279, 338, 427 अन्वये नोंदविला, तदनंतर अर्जदाराने तिच्या मयत पतीचा विमादावा मिळण्यासाठी दिनांक 06/05/2013 रोजी गैरअर्जदार क्रमांक 1 यांच्याकडे गैरअर्जदार क्रमांक 2 मार्फत आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह प्रस्ताव दाखल केला, पूढे गैरअर्जदाराने अर्जदारास तिच्या पतीचे ड्रायव्हींग लायसेन्स मागीतले, परंतु अर्जदाराचा पती अपघाता समयी सदरचे वाहन चालवित नसल्यामुळे तिने वाहन चालक शंकर आढे यांचे ड्रायव्हींग लायसेन्स गैरअर्जदाराकडे सुपूर्द केले, त्यानंतर विमादाव्याची रक्कम मिळण्यासाठी अर्जदाराने गैरअर्जदाराकडे वेळोवेळी पाठपुरावा केल्यानंतर वाहन चालकाचे ड्रायव्हींग लायसेन्स वैध नसल्याच्या कारणास्तव गैरअर्जदार क्रमांक 1 ने दिनांक 04/08/2014 रोजीच्या पत्राव्दारे अर्जदाराचा विमादावा निरस्त केल्याचे गैरअर्जदार क्रमांक 2 ने अर्जदारास सांगीतले. अर्जदाराचा विमादावा विनाकारण निरस्त केल्यामुळे अर्जदाराने मंचात तक्रार दाखल करुन गैरअर्जदारांनी अर्जदारास तिच्या मयत पतीच्या विमादाव्याची रक्कम रु. 50,000/- दिनांक 06/08/2013 रोजी पासून पूर्ण रक्कम देय होईपर्यंत 9 टक्के व्याजदाराने द्यावी, तसेच मानसिक त्रासापोटी रक्कम रु. 10,000/- व तक्रारीच्या खर्चापोटी रक्कम रु. 5,000/- मिळावी अशी मागणी अर्जदाराने मंचासमोर केली आहे.
अर्जदाराने तक्रार अर्जासोबत शपथपत्र नि.क्रमांक 2 वर व पुराव्यातील कागदपत्र नि. 4 वर मंचासमोर दाखल केले.
मंचाची नोटीस गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 यांना तामील झाल्यानंतर त्यांनी लेखी निवेदन अनुक्रमे नि. 12 व नि. 9/A वर दाखल केले आहे.
गैरअर्जदार क्रमांक 1 चे म्हणणे असे की, विमादाव्या सोबत दाखल केलेल्या कागदपत्राचे अवलोकन केले असता, असे निदर्शनास येते की, वाहनाचा चालक मयत प्रल्हाद आढे व शंकर आढे दोघांकडे देखील वाहन चालवण्यासाठी लागणारा वैध परवाना नव्हता व अर्जदाराने गैरअर्जदार विमा कंपनीकडे दाखल केलेले शंकर आढे यांचे ड्रायव्हींग लायसेन्स हे लर्निंग ड्रायव्हींग लायसेंन्स होते, व ते देखील सदरचा अपघात झाल्यानंतर म्हणजे दिनांक 20/09/2013 नंतरच्या कालावधीसाठी वैध होते, त्यामुळे अपघाता समयी दोन्ही व्यक्तीकंडे देखील ड्रायव्हींग लायसेन्स नसल्यामुळे गैरअर्जदार विमा कंपनी विमादाव्याची रक्कम देण्यास बांधील नाही. म्हणून योग्य त्या कारणास्तव अर्जदाराचा विमादावा निरस्त करण्यात आलेला असल्यामुळे अर्जदाराची तक्रार खर्चासह खारीज करण्याची विनंती गैरअर्जदाराने मंचासमोर केली आहे.
गैरअर्जदाराने लेखी निवेदना सोबत शपथपत्र नि.11 वर दाखल केले.
गैरअर्जदार क्रमांक 2 चे म्हणणे असे की, अर्जदाराचा पती प्रल्हाद आढे हा अपघातात मयत झाला तदनंतर विमादाव्याची रक्कम मिळण्यासाठी आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह गैरअर्जदार क्रमांक 1 कडे प्रस्ताव दिनांक 06/05/2013 रोजी दाखल केला, विमादाव्याची रक्कम अर्जदारास मिळण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न गैरअर्जदाराने केलेले आहेत, त्यामुळे त्यांनी अर्जदारास त्रुटीची सेवा दिली असे मानता येणार नाही.
दोन्ही पक्षांच्या कैफियतीवरुन खालील मुद्दे उपस्थित होतात.
मुद्दे. उत्तर.
1 गैरअर्जदार विमा कंपनीने त्रुटीची सेवा दिल्याचे अर्जदाराने
ठोसरित्या शाबीत केले आहे काय ? होय.
2 आदेश काय ? अंतिम आदेशा प्रमाणे.
कारणे.
मुद्दा क्रमांक 1.
अर्जदाराचा पती प्रल्हाद आढे हे शेतकरी होते, व ते गैरअर्जदार क्रमांक 2 चे खातेदार तसेच किसानकार्ड धारक होते, डिसेंबर 2011 मध्ये गैरअर्जदार क्रमांक 2 यांनी त्यांच्या बँकेच्या किसान कार्ड धारकांसाठी एक विमा संरक्षणाची योजना गैरअर्जदार क्रमांक 1 यांच्या सहाय्याने राबविली होती. या योजने नुसार रक्कम रु. 50,000/- चे विमा संरक्षण प्रत्येक किसान कार्ड धारकांना मिळणार होते, पूढे दिनांक 29/03/2013 रोजी सकाळी सुमारे 9,00 वाजता अर्जदाराच्या पती दुचाकी वाहना वरुन जात असतांना दुस-या वाहनाने धडक दिल्यामुळे अपघात झाला व या अपघातात अर्जदाराच्या पतीचा मृत्यू झाला, उपरोक्त योजने अंतर्गत विमादाव्याची रक्कम मिळण्यासाठी अर्जदाराने प्रस्ताव गैरअर्जदार विमा कंपनीकडे दाखल केला, पूढे गैरअर्जदाराने अर्जदाराकडे तिच्या पतीचे ड्रायव्हींग लायसेंन्स मागीतले, परंतु अपघाता समयी सदरचे वाहन शंकर आढे चालवित होता, त्यामुळे त्याचे ड्रायव्हींग लायसेन्स अर्जदाराने गैरअर्जदाराच्या सुपूर्द केले, वाहन चालकाचे लायसेन्स वैध नसल्याच्या कारणास्तव गैरअर्जदाराने अर्जदाराचा विमादावा निरस्त केला, अशी थोडक्यात अर्जदाराची तक्रार आहे. यावर गैरअर्जदाराचे म्हणणे असे की, वाहनाचा चालक हा मयत प्रल्हाद आढे व शंकर आढे या दोघांकडे देखील वाहन चालविण्यासाठी लागणारा वैध परवाना नव्हता, त्यामुळे योग्य त्या कारणास्तव अर्जदाराचा प्रस्ताव निरस्त करण्यात आलेला आहे.
निर्णयासाठी महत्वाचा व एकमेव मुद्दा असा की, गैरअर्जदाराने योग्य त्या कारणास्तव अर्जदाराचा प्रस्ताव निरस्त केलेला आहे काय ? याचे उत्तर नकारार्थी द्यावे लागेल. मंचासमोर दाखल केलेल्या कागदपत्राची अवलोकन केले असता, अपघाता समयी सदरचे वाहन हे शंकर आढे चालवित असल्याचे पहिली खबर मध्ये नमुद करण्यात आल्याचे निदर्शनास येते. त्यामुळे मयत प्रल्हाद आढे यांचे ड्रायव्हींग लायसेन्स मागण्याचा प्रश्नच उदभवत नाही, गैरअर्जदाराने निव्वळ अर्जदाराचा विमादावा नामंजूर करण्यासाठीच हा बचाव घेतल्याचे मंचाचे मत आहे. व तसेच अपघाता समयी अर्जदाराचा पती हाच वाहन चालवित असल्या संदर्भातील अन्य कोणताही ठोस पुरावा गैरअर्जदाराने मंचासमोर दाखल केला नाही, व सदर पॉलिसीच्या अटी व शर्तीची प्रत देखील मंचासमोर दाखल केलेली नाही, सबब मुद्दा क्रमांक चे उत्तर होकारार्थी देऊन आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोंत.
आदेश
1 अर्जदाराचा तक्रार अर्ज अंशतः मंजूर करण्यात येतो.
2 गैरअर्जदार क्रमांक 1 ने निकाल कळाल्यापासून 30 दिवसांच्या आत अर्जदारास
तिच्या मयत पतीच्या विमादाव्याची रक्कम रु 50,000/- फक्त द्यावी.
3 गैरअर्जदार क्रमांक 1 ने मानसिक त्रासापोटी रक्कम रु. 3,000/- फक्त व
तक्रारीच्या खर्चापोटी रक्कम रु. 2,000/- फक्त आदेश मुदतीत अर्जदारास
द्यावी.
4 दोन्ही पक्षांना निकालपत्राच्या प्रती मोफत पुरवाव्यात.
5 वरील आदेशाच्या पुर्ततेचा अहवाल दोन्ही पक्षकारानी निकालाच्या तारखे पासून 45
दिवसाच्या आत मंचात दाखल करावा, प्रकरण 45 दिवसानंतर आदेशाच्या पुर्ततेसाठी
ठेवण्यात यावे.
सौ.अनिता ओस्तवाल. श्री. प्रदीप.पी.निटूरकर
मा.सदस्या. मा.अध्यक्ष.