ग्राहक तक्रार क्र. 165/2014
दाखल तारीख : 07/08/2014
निकाल तारीख : 03/07/2015
कालावधी: 0 वर्षे 10 महिने 27 दिवस
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद
1. मोहन पिता बळीराम जाधव,
वय - 45 वर्ष, धंदा – व्यापार,
रा.मुळज, ता.उमरगा, जि.उस्मानाबाद. ....तक्रारदार
वि रु ध्द
1. शाखा व्यवस्थापक,
युनायटेड इंडिया इन्सुरन्स कंपनी लि.
गाळा क्र.18 विश्व कॉम्पलेक्स,
एन.एच.नं.9 मेन रोड उमरगा,
ता.उमरगा, जि.उस्मानाबाद. ..विरुध्द पक्षकार
कोरम : 1) मा.श्री.एम.व्ही.कुलकर्णी, अध्यक्ष.
2) मा.श्रीमती विद्युलता जे.दलभंजन. सदस्या.
3) मा.श्री.मुकुंद बी.सस्ते, सदस्य.
तक्रारदारांतर्फे विधीज्ञ : श्री.जी.के.गायकवाड.
विरुध्द पक्षकार तर्फे विधिज्ञ : श्री.एस.पी.दानवे.
न्यायनिर्णय
मा. अध्यक्ष श्री.एम.व्ही.कुलकर्णी यांचे व्दारा:
अ) आपले जेसीबीचा विरुध्द पक्षकार (विप) विमा कंपनीकडे विमा उतरला असतांना जेसीबी मधील हॅड्रॉलीक पंप व 120 लिटर ऑईल चोरीला गेल्यानंतर त्याची भरपाई देण्यास नकार देऊन विप ने सेवेत त्रुटी केली म्हणून भरपाई मिळण्यासाठी तक्रारकर्ता (तक) ने ही तक्रार दाखल केलेली आहे.
1. तक चे तक्रारीतील कथन थोडक्यात पुढीलप्रमाणे आहे.
तक हा मुळज ता.उमरगाचा रहिवाशी असून शेती व्यवसाय करतो. त्याचेकडे जेसीबी क्रमांक एम.एच.25 सी. 5169 आहे. विप कडे त्याने जे.सी.बी.चा विमा दि.04/01/2013 ते 03/01/2014 या कालावधीसाठी उतरला होता. दि.22/12/2013 रोजी काही काम नसल्यामुळे तक ने जेसीबी आपले घरासमोर थांबवून ठेवला होता. दि.23/12/2013 व 24/12/2013 मधील रात्री चोरट्यांनी जेसीबीचे पाईप कापून हॅड्रॉलीक पंप चोरुन नेला तसेच 120 लिटर ऑईल चोरुन नेले. हैईड्रॉलीक पंपाची किंमत रु.48,000/- तर ऑईलची किंमत धरुन रु.1,12,400/- चे सामान चोरटयांनी चोरुन नेले आहे. तक ने पोलिस स्टेशन उमरगा येथे त्याबद्दल फिर्याद दिली. पोलिसांनी घटनास्थळ पंचनामा केला.
2. तक ने विप कडून कॉम्प्रीहेन्सीव्ह पॉलिसी घेतलेली आहे ज्यामध्ये वाहन चोरीस गेलयास नुकसान भरपाई मिळण्याची रिस्क घेतलेली आहे. तक ने प्रिमीयम रु.17,060/- भरलेला आहे. तक ने विप कडे क्लेम दाखल केला व जरुर ती कागदपत्रे दिली. विप तर्फे सर्व्हेअरने पाहणी केली. मात्र तारीख 04/07/2014 चे पत्र देऊन विप ने नुकसान भरपाई देण्यास नकार दिलेला आहे. वाहन चोरीला गेले तर त्याची रक्कम देण्याची हमी विप ने घेतलेली आहे. त्यामुळे भरपाई देण्यास नकार देऊन विप ने सेवेत त्रुटी केली म्हणून चोरीला गेलेल्या मालाची किंमत रु.1,12,400/- मानसिक त्रासाबद्दल रु.25,000/- व तक्रारीचा खर्च रु.5,000/- मिळावा म्हणून हि तक्रार तक ने दि.04/08/2014 रोजी दाखल केलेली आहे.
3. तक ने तक्रारीसोबत पोलिसाकडे दिलेल्या दि.25/12/013 रोजीच्या फिर्यादीची प्रत, त्याच दिवशी केलेल्या पंचनाम्याची प्रत, आर.सी.बुकाची प्रत, विप चे दि.04/07/2014 चे पत्र, विमा पॉलिसीची प्रत इत्यादी कागदपत्रे दाखल केलेली आहेत.
ब) विप ने हजर होऊन दि.19/12/2014 रोजी लेखी म्हणणे दाखल केलेले आहे. तक हा जेसीबीचा वापर व्यापारी कारणांसाठी म्हणजेच नफा मिळविण्यासाठी करत आहे. त्यामुळे तक हा ग्राहक या संज्ञेत येऊ शकत नाही व प्रस्तुतचा वाद ग्राहक वाद होत नाही. तक हा शेतकरी असल्याबद्दल शाबीती तक ने करणे जरुर आहे. तक ने उपजिवीका भागविण्यासाठी जेसीबी खरेदी केला हे खोटे आहे. तक ने जेसीबी घरासमोरील रत्यावर थांबवून ठेऊन विम्यातील शर्तीचा भंग केलेला आहे. तक ने जेसीबी हा सुरक्षित जागी आवश्यक दक्षता घेऊन ठेवणे जरुर होते. जेसीबी मधून हॅाईड्रॉलीक पंप व ऑईल चोरी गेले हे अमान्य आहे. चोरीबाबत तक ने विप ला ताबडतोब माहिती देणे जरुर होते, तक ने माहिती न दिल्यामुळे करारातील अटींचा भंग झालेला आहे. विमा कराराचे सेक्शन एक मधील अट क्र.2 प्रमाणे वाहनाचा नूसता पार्ट चोरीला गेला तर त्याबददल विमा संरक्षण नाही. जर पूर्ण वाहन चोरीला गेले तरच भरपाई मिळू शकते. त्यामुळे दि.04/07/2014 चे पत्रान्वये विप ने योग्यरित्या तक चा दावा फेटाळलेला आहे. विमा करारातील अटी शर्तीशी विसंगत निर्णय करु नये असे तत्व मा. सर्वाच्च न्यायालयाने एक्सपोर्ट क्रेडीट विरुध्द गर्ग सन्स II (2013) CPJ 1 या निर्णयात विषद केले आहे. त्यामुळे तक्रार रद्द होण्यास पात्र आहे.
क) तक ची तक्रार त्यांनी दिलेली कागदपत्रे व विप चे म्हणणे यांचे अवलोकन करता आमचे विचारार्थ खालील मुद्दे निघतात आम्ही त्यांची उत्तरे त्यांच्या समोर खाली दिलेल्या कारणांसाठी लिहिली आहेत.
मुद्दे उत्तरे
1) विप ने सेवेत त्रुटी केली आहे काय ? नाही.
2) तक अनुतोषास पात्र आहे काय ? नाही.
3) आदेश कोणता ? अंतिम आदेशाप्रमाणे.
ड) कारणमिमांसा
मुद्दा क्र.1 व 2
1. तक चे म्हणण्याप्रमाणे त्याने त्याचा जेसीबी दि.22/12/2013 रोजी घरासमोर ठेवला दि.23/12/2013 रोजीचे रात्री त्याचा हॅड्रोलीक पंप व 120 लिटर ऑईल चोरीला गेले. पोलिस ठाण्यात दि.25/12/2013 रोजी कळविल्याचे दिसते त्याच दिवशी घटनास्थळ पंचनामा केल्याचे दिसते. दोन्हीची मिळून किंमत रु.1,12,400/- दाखवली असून पंपाची किंमत रु.48,000/- व ऑईलची रु.64,400/- दाखवल्याचे दिसते या पुराव्यावरुन त्या दोन वस्तु चोरीला गेले असे अनुमान काढता येईल. विप कंपनीला चोरीबद्दल कळविल्याची पोहोच तक ने हजर केलेली नाही.
2. विमा पॉलिसीची प्रत हजर केली त्याप्रमाणे पॉलिसी पिरीयड दि.04/01/2013 ते 03/01/2014 चा होता. घटनेच्या दिवशी विमा अस्तित्वात होता. चोरीची रिस्क कव्हर केल्याचेसुध्दा दिसून येते मात्र विप तर्फे आमचे लक्ष सेक्शन 1 कलम 2 (a) कडे वेधण्यात आले त्याप्रमाणे चोरीसाठी भरपाई देताना अक्सेसरीज बरोबर वाहनसुध्दा चोरीला गेले तरच भरपाई देण्यास विप जबाबदार आहे. प्रस्तुत कामी वाहन चोरीला न गेल्यामुळे कराराप्रमाणे विप ची कोणतीही जबाबदारी येत नाही. विप हे कराराप्रमाणे बांधलेले असल्यामुळे या मंचाला दुसरा अर्थ काढता येणार नाही. म्हणून आम्ही मुद्दा क्र.1 व 2 चे उत्तर नकारार्थी देतो व पुढीलप्रमाणे आदेश करतो.
आदेश
1) तक्रारदाराची तक्रार रद्द करण्यात येते.
2) खर्चाबाबत कोणताही हुकूम नाही.
3) उभय पक्षकारांना आदेशाच्या प्रमाणित प्रती निशु:ल्क देण्यात याव्यात.
(श्री. एम.व्ही. कुलकर्णी)
अध्यक्ष
(श्री.मुकूंद.बी.सस्ते) (सौ.विद्युलता जे.दलभंजन)
सदस्य सदस्या
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद..